राजकारण्यांनी आक्रमक व्हावं , असुसंस्कृत नाही !

हाराष्ट्राच्या राजकारणातले एक ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्याशी नुकत्याच फोनवर गप्पा झाल्या .  जुन्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला आणि विषय आताच्या राजकारणावर आला . काय वाटतं सध्याच्या राजकारणावर या प्रश्नाला उत्तर देताना बबनराव ढाकणे म्हणाले , ‘चिंता वाटते .’ राजकारण्यांची भाषा , वागणं , राहणी आणि मग्रुरी यावर मग बबनराव बराच वेळ बोलत राहिले ; त्यात कळकळ होती , तळमळ होती आणि चिंताही . सध्याच्या राजकारणाचा स्तर खरंच  इतका खालावला आहे की , बबनरावांच्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे . राजकारण म्हटलं की ,आरोप – प्रत्यारोप होणारच , सत्ताधारी आणि विरोधकांत राजकीय कलगीतुरा रंगणारच पण , मनुष्य आणि प्राण्यांचे अवयव तसंच असंसदीय भाषा तेव्हाच्या राजकारणात खरंच नव्हती .
बबनराव ढाकणे यांच्याबद्दल तरुण पिढीला थोडं सांगायला हवं . राजकारणातला त्यांचा प्रवास पाथर्डी पंचायत समितीचे सदस्य ते केंद्रीय मंत्री अशा भरारीचा आणि चार दशकांचा आहे . ते राज्यातही काही काळ मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते . आवर्जून सांगायचा मुद्दा म्हणजे अतिशय आक्रमक म्हणून बबनराव ओळखले जात . अहमदनगर जिल्ह्यातल्या दुष्काळी पाथर्डी तालुक्यात विकास कामे सुरु व्हावीत म्हणून बबनरावांनी विधान सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली होती . जनतेच्या प्रश्नासाठी असं काही करणारे बबनराव देशातले पहिलेच . उडी मारुन ज्या सभागृहात त्यांनी प्रवेश केला त्याच विधानसभेचं सदस्यपद आणि उपाध्यक्षपद त्यांनी नंतर प्रदीर्घ काळ भूषवलं . विधानसभेत मंडल आयोगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार राजी होत नव्हतं , तेव्हा बबनराव चक्क सभापतींच्या आसनासमोरील राजदंड घेऊन पळाले होते . तेव्हाचे राज्यकर्तेही सुसंस्कृत होते . बबनराव ढाकणे यांनी विधानसभेत उडी मारली ती तारीख होती ८ जुलै १९६८ . ( तो संदर्भ काढला तेव्हा आता पंच्याऐंशी वर्षांच्या  बबनरावांनी पटकन ही तारीख सांगितली !) बबनराव ढाकणेंना पाच दिवसांच्या कारागृहाची शिक्षा झाली पण , महत्त्वाचं म्हणजे सभागृहात त्यावर फार गंभीर चर्चा झाली आणि प्रशासनाला खडबडवून जाग आणण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले . लक्षात घेतलं पाहिजे की , बबनरावांची ही आक्रमकता जनतेच्या प्रश्नासाठी होती , स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी नाही . शब्दांच्या धडाडत्या

जांबुवंतराव धोटे आणि बबनराव ढाकणे यांच्यासारखे अनेक नेते आक्रमक होते पण , असुसंस्कृत मुळीच नव्हते . त्यांनी भाषेची पातळी कधी सोडली नाही .

तोफांतून मारा करुन  सभागृह आणि मैदानी सभा गाजवणारे आचार्य अत्रे ,  जांबुवंतराव धोटे , केशवराव धोंडगे , प्रमोद नवलकर , एन . डी  . पाटील , छगन भुजबळ , मृणालताई गोरे , अहिल्या रांगणेकर असे अनेक नेते पाहता आले .
आठवल्या म्हणून या निमित्तानं आणखी काही जुन्या आठवणी सांगायला हव्यात . विदर्भवीर म्हणून ओळखले जाणरे जांबुवंतराव धोटे हेही खूप आक्रमक नेते होते . स्वतंत्र विदर्भाची त्यांची भूमिका मला साफ अमान्य होती तरी आमच्यात चांगलं सूत  जुळलेलं होतं .  जांबुवंतरावांचं नेतृत्व जनतेच्या कळवळ्यानं ओसंडून वाहणारं होतं . वारांगणांच्या समस्या ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू  तराळले . त्या समस्यांच्या निराकरणासाठी जांबुवंतराव धोटे  हे पहिलेच राजकीय नेते .
तेव्हा विधीमंडळाच्या सभागृहात सदस्याच्या मेजावर लांब दांडी असणारा ध्वनिक्षेपक तसंच पेपर वेटसह कागद , पेन्सिल अशी स्टेशनरी असे . विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर जांबुवंतरावांच्या आक्रमकतेचा फटका माईक तुटण्यातही झाला होता . एकदा तर त्यांनी जनतेला न्याय मिळत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं पेपरवेटही भिरकावला होता . ते प्रकरण खूप गाजलं ; जांबुवंतराव धोटे यांचं सदस्यत्व काही काळासाठी निलंबित करण्यात आलं .  या घटनेनंतर  सदस्यांच्या मेजावरचे माईक पक्के करण्यात आले . तसंच स्टेशनरीसारख्या सहज उचलता येण्याजोग्या वस्तूही गायब करण्यात आल्या . सरकार आणि विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री , जांबुवंतराव यांच्याच यवतमाळ जिल्ह्याचे वसंतराव नाईक हे जांबुवंतरावांचं आवडत लक्ष्य होतं . अतिशय कडक आणि जहरी शब्दांत जांबुवंतराव त्यांच्यावर हल्ले चढवत . मात्र वसंतराव नाईक यांनी त्यांचा सुसंस्कृतपणा कधीच सोडला नाही म्हणजे जांबुवंतरावांना विरोधकच मानलं , शत्रू नाही . जाबुवंतराव धोटे यांच्या मात्रोश्री गंभीर दुखणं घेऊन रुग्णालयात दाखल झाल्या तेव्हा त्यांची विचारपूस करायला कोणताही गाजावाजा न करता जाण्याचा सुसंस्कृतपणा वसंतराव नाईक यांनी दाखवला तेव्हा जाबुवंतराव चकीतच झाले होते .
वरील दोन्ही घटनांच्या आधीची ही हकीकत आहे आणि ती माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून अनेकदा ऐकलेली आहे– विधानसभेत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  सरकार विरुद्ध विशेषत: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी जुगलबंदी त्या काळात रंगलेली होती . आचार्य अत्रे अति आक्रमक आणि सरस्वती पुत्र त्यामुळे त्यांच्या भात्यातून एक एक जहरी शाब्दिक बाण असा काही सुटत असे की , सत्ताधारी प्रतिवादही करु शकत नसत . एकदा बोलण्याच्या ओघात

जहरी टीका होऊनही ज्यांनी कधी सुसंस्कृतपणा सोडला नाही असे महाराष्ट्राचे दोन नेते- यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक .

यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भात एक वावगा शब्द आचार्य अत्रे यांच्या तोंडून निघून गेला . तो शब्द यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी वेणूताई यांच्या जिव्हारी लागला . आपण निपुत्रिक का आहोत आणि त्याला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी कशी आहे हे यशवंतरावांच्या ( का , यशवंतरावांच्यावतीने ) आचार्य अत्रेंना कळवलं . ते ऐकल्यावर अत्रे खजील झाले  . तडक उठून यशवंतरावांच्या घरी जाऊन यशवंतराव आणि वेणूताई यांच्या प्रति आचार्य अत्रे यांनी (असं म्हणतात की हात जोडून ) दिलगिरी व्यक्त केली . या पुढची हकीकत अत्यंत हृद्य  आहे , चव्हाण दांपत्यांनी त्यांना माफ तर केलंच पण , पुढे जाऊन वेणूताई चव्हाण यांनी ‘मला एक भाऊ भेटला’ , अशा शब्दांत त्या कटू प्रसंगावर कायमचा पडदा टाकला .
हा सुसंस्कृतपणा , वर्तनातला दर्जा हा असा एकेकाळी आपल्याकडच्या राजकारण्यात वैपुल्यानं होता . कारण  आक्रमकता म्हणजे आततायीपणा , उतावीळपणा , उठावळपणा , वाचाळपणा एवढंच नाहीतर कंबरेच्या खाली वार करणं नव्हे , याचं पक्कं भान राजकारणातल्या लोकांना होतं . यातले अनेक राजकारणी अल्पशिक्षित होते पण , त्यांची सुसंस्कृतपणाची पातळी अतिशय उच्च दर्जाची होती . काही राजकारणी अतिशय निश्चितपणे ‘माडी’

चढणारे आणि ‘ताडी’ चढवणारेही होते पण , त्या संदर्भात बोभाटा न होऊ देण्याचं भान त्यांच्यात होतं . ‘द्वितीय पात्र’ समाजात उघडपणे मिरवण्याचा आणि त्याचं समर्थन करण्याचा निलाजरेपणा त्यांच्यात आलेला नव्हता . थोडक्यात नैतिकता , मानवी मूल्य आणि सुसंस्कृतपणा असा त्रिवेणी संगम त्या काळच्या बहुसंख्य राजकारण्यात होता आणि त्या नेत्यांच्या वर्तनाची मोहिनी लोकांच्या मनावर होती . म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली होणारं आंदोलन असो की सभा पैसे न देता लोक हजारांनी सहभागी होत . बबनराव ढाकणे , जांबुवंतराव धोटे , केशवराव धोंडगे , एन . डी  . पाटील,  मृणाल गोरे , अहिल्याताई रांगणेकर , अशा अनेक नेत्यांनी  काढलेल्या मोर्च्यात अनेकदा दहा-वीस हजार लोक असत  पण , त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना कधी दंडुका उभारावा लागला नाही . नेत्यानं  उच्चारलेला एक शब्द आणि बोटाने केलेला इशारा ती गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी पुरेसा असायचा .
अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते हे खरं असलं तरी , जेव्हा अध:पतन व्यक्तीगत किंवा सामूहिक पातळीवर इतक्या प्रचंड वेगानं होतं तेव्हा , कुणीही विवेकी आणि संवेदनशील माणूस साहजिकच अस्वस्थ होतो पण , यापेक्षाही जास्त गंभीर असतं ते येणार्‍या/नवीन पिढीच्या मनात त्याविषयी निर्माण होणारी तिरस्कार किंवा घृणा . मतदानाच्या न वाढणार्‍या टक्केवारीला हेही एक कारण असावं  आहे . निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत , शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील , विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदांनापासून जर दूर राहिला तर त्यांना दोष देणार तरी कसा ? तेव्हाचं म्हणजे सुसंस्कृत राजकारण का लोप पावलं यांची दोन कारणं आहेत .
एक-राजकारण करियर झालं . निवडणूक इव्हेंट झाली आणि ती इव्हेंट यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक आले ; दुसऱ्या भाषेत त्यांना मॅन्युप्लेटर्स म्हणता येईल  . सत्ता प्राप्ती हाच मूळ उद्देश झाला . सत्ता आली म्हणून  पैसा आला . त्यासाठी लपवाछपवी , ‘तोडपाणी’ आलं . त्यापाठोपाठ आला तो सत्ता आणि पैशाचा माज . या माजामुळे कर्कश एकारलेपणा आणि टोकाचा कडवेपणा आला .  यात सुसंस्कृतपणाला जागा उरली नाही आणि मग त्या  माजातून आली ती मग्रुरी . एक मारेन , थोबाड फोडेन , कानपटात लगावेन , कुणाचे तरी गाल  अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेले वळू आणि त्याला प्रत्युत्तर देताना म्हसोबाला सोडलेले बोकड ,  अशी भाषा आली . ही आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय  संस्कृतीची वाटचाल.राष्ट्रीय पातळीवर खुनी , तू चोर-तुझा बाप , चोर , दरोडेखोर , जल्लाद , मांड्या ,महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचे रंग , अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या पोलिसांचा आणि जवानांच्या हुतात्म्यांची खिल्ली व अक्षम्य अवमान , झालेला अतिरेकी हल्ला सरकारनेच घडवून आणल्याचे दावे…अशी किती उदाहरणे द्यायची ? सत्ताधार्‍यांनी जात आणि धर्माचा वापर प्रचार आणि उमेदवार निवडताना केला असा दावा करणार्‍या विरोधी पक्षांनी काय कमी दिवे पाजळले आहेत ? नागपूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीला कुणबी व कोष्टी विरुद्ध ब्राह्मण , शिरुर मतदार संघात मराठा विरुद्ध माळी असा रंग देणारे, यज्ञ आणि धार्मिक विधी जाहीरपणे करणारे ‘वाचाळेश्वर’ दिग्विजयसिंह शहारो-शहरी दिसू लागले आणि अशांमुळे अब्रू गेली ती काँग्रेसची . भाजपनं साध्वीला उमेदवारी दिली म्हणून टीका करणार्‍या काँग्रेसनं रत्नागिरीत सनातनच्या समर्थकाला उभं करण्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं ? एका मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला ‘पप्पू’ म्हणणं जितकं प्रचंड अशोभनीय व अवमानकारक आहे तेवढंच अशोभनीय व अवमानकारक देशाच्या पंतप्रधांनांना ‘फेकू’  आणि ‘चोर’ म्हणणं आहे . कंबरेचं सोडून डोक्याला  गुंडाळण्याची  गाठलेली ही अशी पातळी , हे आपल्या राजकीय अध:पतनाचं केवळ राज्यस्तरीयच नव्हे तर राष्ट्रीयही कुरुप स्वरुप झालेलं आहे .
कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्यापर्यंत आपलं राजकरण खाली गेलं आहे याचं आणखी उदाहरण दररोज देशात घडणारे नृशंस बलात्कार . आपल्या एका राज्यापेक्षा इतर राज्यातल्या अशा घटना आणि बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची उदाहरणं दिली जाणं हाही असुसंस्कृतपणाचा कळसच आहे . असे असंवेदनशील दाखले देणारे राजकीय या देशात आहेत , हे कांही त्यांच्यातल्या  सुसंस्कृतपणाचं लक्षण मुळीच नाही .

दोन-आपण बहुसंख्य मतदारांच्या मनात बहुसंख्य राजकारण्यांविषयी तिरस्कार आहे , काहीच्या मनात घृणाही पण , आपण या दिव्य लोकांना मतदान का करतो , चांगल्या उमेदवारांना निवडून का देत नाही , यासंदर्भात आपण बहुसंख्य कधीच किमानही गंभीर नसतो . आपण अनेक तर मतदानालाही जात नाही आणि राजकारणी कसे वाईट आहेत यांच्या पोस्ट समाज माध्यमांवर टाकण्यात धन्यता मानतो .

जाता जाता- याच संदर्भात आहे म्हणून – उद्धव ठाकरे यांचा कायम  ‘सुसंस्कृत राजकारणी’ असा उल्लेख मी आजवर केलेला आहे ; आजवर जो काही संपर्क आला त्यावरुन उद्धव ठाकरे यांची ती प्रतिमा माझ्यासह अनेकांच्या  मनात निर्माण झालेली आहे . केंद्रीय मंत्री नारायण यांनी वापरलेल्या कथित अपशब्दाबाबत जी काही कारवाईची भूमिका त्यांनी घेतली ती या प्रतिमेला तडा देणारी आहे . नारायण राणे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी साफ दुर्लक्ष  करायला हवं होतं , त्यामुळे त्यांचा सुसंस्कृतपणा आणखी उजळून निघाला असता , असं ठामपणे वाटतं .

( असुसंस्कृत हा शब्द असंस्कृत असाही प्रचलित आहे . )

-प्रवीण बर्दापूरकर
भ्रमणध्वनी – ९८२२०५५७९९
praveen.bardapurkar@gmail.com

किंवा – www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट