नागपूर नव्हे…लबरे़ज लम्हें !

 

 

 

 

 

|| नोंद  …६ ||

नागपूर-विदर्भ सोडल्याला आता सात वर्ष होतील . नेमकं सांगायचं तर , १६ जून २०१३ ला सकाळी आम्ही नागपूरहून  दिल्लीला प्रयाण केलं आणि २५ मे २०१५ला औरंगाबादला येऊन स्थायिक झालो
२६ जानेवारी १९८१ ते १० ऑक्टोबर १९९६ , नंतर २५ मार्च २००३ ते १६ जून २०१३ असं ; सुमारे  २५ वर्षापेक्षा जास्त काळ नागपुरात वास्तव्य झालं . बेगम मंगला तर ‘बॉर्न अंड ब्रॉट अप’ नागपूर ; आधी धंतोली केडरची मग ते केडर सोडून ते कुटुंब वसंत नगरला आलं . हे ‘धंतोली केडर’ प्रकरण एकेकाळी प्रतिष्ठा ‘मोजण्या आणि तोलण्या’चं नागपूरचं वैशिष्ट्य  होतं . सांस्कृतिक जगताच्या संपन्नतेची भुरळ पडून मी नागपूरकडे कसा ओढला गेलो , हे यापूर्वी लिहिलं आहेच त्यामुळे , त्याची पुनरुक्ती करत नाही .

अगणित छटांची  हिरवाई पांघरलेल्या नागपूर शहरात पडाव टाकला तेव्हा वयाची पंचविशी नुकतीच ओलांडलेली आणि निरोप घेताना साठीच्या उंबरठ्यावर पोहोचलेलो होतो  . आमच्या लहानपणी मराठवाड्यात मुलाची किंवा मुलीची सोयरिक अमुक एकाशी ठरली असं न म्हणता ‘अमुक गावात सोयरिक ठरली’ असं म्हणत . त्याबद्दल उत्सुकता वाटायची . लहानपणी प्रवचनं ऐकण्याचा छंद होता . तेव्हाची एक आठवण सांगतो- हरिभाऊ नावाचे एक प्रवचनकार होते . त्यांना या संदर्भात विचारलं तर ते म्हणाले , ‘लग्न म्हणजे काही   केवळ दोन जीवांचं मिलन नसतं . मुलगा आणि मुलगी केवळ नवे नातेसंबंध निर्माण करत नाहीत तर , ते त्या परिसराशी जोडले जातात . लग्न करुन स्त्रीनं दुसऱ्या गावच्या सासरी जाणं किंवा पुरुषानं चाकरीसाठी दुसऱ्या गावी जाणं हे एका माणसाचं स्थलांतर  नसतं . माणूस म्हणजे झाड असतं . ते झाड  दुसऱ्या गावी जातांना अर्थातच  त्याच्या मुळांसह  जातं . चार भिंती असलेल्या  तिथल्या घरात माणूस राहतो पण , त्याची मुळं त्या गावच्या मातीत रुजतात , तिथल्या प्राणी , पक्षी , उन्ह-पाऊस-पाणी , वातावरण असं एकूणच , त्या निसर्गाशी त्या झाडाचं नातं जोडलं जातं  . तो निसर्गही त्या नवीन झाडाला आपलासा   करतो . ते झाड मग बहरतं , फुलतं , फळतं , असं हे ते एकूण समरस होणं असतं . मी नागपूरशी असाच समरस झालो . मंगलाशी याच नागपुरात भेट झाली , प्रेमाच्या आणा-भाकांतून  पुढे ती माझी बेगम झाली . वाद , प्रतिवाद आणि प्रेमातून आमचं समंजस सहचर्य  सर्वार्थानं याच नागपुरात आकाराला आलं .

पावसावरुन आठवलं- आम्हा दोघांनाही पाऊस आवडत असे . मराठवाड्यासारख्या  कमी पावसाच्या आणि दुष्काळी भागातून आल्यानं तर मला नागपूरच्या पावसाची असोशीनं प्रतीक्षा असायची . कार घेईपर्यंत म्हणजे , १९९३ पर्यंत आम्ही कधीही रेनकोट किंवा छत्री वापरली नाही . आम्ही मस्त भिजत असू . पुढे तान्ह्या कन्येलाही या भिजण्यात आम्ही सामील करुन घेतलं . आम्हा दोघांच्या अनेक आवडीच्या गाण्यांपैकी पावसाशी संबंधित  ‘रिमझिम गिरे सावन’ ( चित्रपट- मंझिल . लिंक- https://youtu.be/IRPCMEJpQaw ) हे गाणं . पावसाळ्यात किमान पंचवीस-तीस वेळा तरी हे गाणं ऐकून होत असेच . त्यात घनघोर मतभेदाचा भाग म्हणजे बेगमला ते किशोरकुमारच्या तर मला लता मंगेशकरच्या स्वरातलं आवडत असे . सुरुवातीला त्यावरुन आमच्यात  होणारे वाद ऐकून एकदा बेगमची आई-तिला सगळेच ताई म्हणत , गंमतीनं म्हणालीही होती , ‘तुम्हा दोघांच्या घटस्फोटाला हे गाणं कारण ठरु नये म्हणजे झालं !’ अखेर किशोरकुमार आणि लता मंगेशकर  या दोघांच्याही आवाजात एका पाठोपाठ हे गाणं ऐकायला आम्ही सुरुवात केली आणि ताईच्या घटस्फोटाच्या शक्यतेला पूर्णविराम दिला . ( हा मजकूर लिहितांनाही बाहेर , पाऊस बरसतोय आणि हे गाणं मी एकटाच ऐकतो आहे…)  नागपूरच्या अशा असंख्य गतकातर आठवणी मनात आकंठ आहेत !  

आपल्या देशातील  , दोन गावातील अंतराचं मोजमाप  करणारा झिरो माईल नागपुरात आहे ! 

‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा एक वार्ताहर ते ‘लोकसत्ता’ या दैनिकाच्या विदर्भ आवृत्तीचा  संपादक ; मार्गे तरुण भारत , युगधर्म , लोकमत असा पत्रकारीतेतला वाटा-वळणांचा प्रवास या काळात झाला . पत्रकारितेच्या ४२ पैकी २५वर वर्ष या नागपूर-विदर्भात कशी भर्रकन उलटली  ते कळलंच नाही . विदर्भात टळटळीत उन्हात बसने फिरलो , गोठवणा-या थंडीत  स्कूटर-मोटर सायकलवरुन भटकलो . टॅक्सी , मग स्वत:च्या  कारनंही गावा-गावात गेलो . विदर्भातल्या बहुतेक सर्व तालुक्यांच्या गावी आणि निवडणुकांच्या निमित्तानं प्रत्येक लोकसभा/विधानसभा मतदार संघाला भेटी दिल्या .

तो काळ जणू पायाला चाकं बांधलेला होता .  वेगळ्या विदर्भाचा विरोधक असूनही विदर्भावर होणाऱ्या विकासाच्या अनुशेषाबद्दल पोट तिडकीनं लेखन केलं , समस्या लिहिल्या , गावोगावच्या बातम्या दिल्या , अन्य लेखन केलं , भाषणं-व्याख्यानं दिली , असंख्य कार्यक्रमात एक वृत्तसंकलन करणारा वार्ताहर ते संपादक-लेखक असा  प्रुमख पाहुणा म्हणून सहभागी झालो . वेग-वेगळ्या विचारांच्या व्यासपीठावर गेलो , वाद घातले-प्रतिवाद केले , कधी आक्रमकपणे तर कधी संयतपणे वागलो . १९८१ नंतर नागपूर-विदर्भातील राजकीय , सामाजिक , सांस्कृतिक अशा असंख्य घटनांचा पत्रकार/संपादक म्हणून  एक साक्षीदार झालो . ते सर्वच अनुभव जगण्यातले बावनकशी ऐवज आहेत .

पत्रकारिता करताना कधी सुन्न करणा-या , कधी डोळे दिपवणा-या , कधी भोवंडून टाकणा-या बहुरंगी , बहुपेडी अनुभवांचं भांडार खूलं झालं . या काळात असंख्य  प्रकारचे मृत्यू  पहिले . प्रत्येक गाव आणि शहर तसंच तेथील जगणं आणि  मृत्यूला वेगळा गंध आणि रंग असतो , याची अनुभूती याच काळात आली . अपघातात माणसं मरताना पहिली , ४६/४७ डिग्री सेल्सियस उन्हात भर चौकात स्वत:ला जाळून घेणारा अभागी जीव बघितला तेव्हा सुन्न झालो आणि चेंगराचेंगरीत  किड्या-मुंगीसारखे चिरडलेले गोवारींचे देह बघतांना आसवं गोठून गेली . कधी इतिहास निर्माण करणा-या , कधी त्या-त्या क्षेत्रात मैलाचा दगड      ठरणा-या , कधी उमेद तर कधी  आनंद देणाऱ्या , कधी  भावना अनिवार करणा-या , तर कधी नाउमेद करणाऱ्या , कधी निराशेचे मळभ दाटून आणणाऱ्या तर कधी नकळत अश्रूंना वाट मोकळ्या करुन देणाऱ्या अशा असंख्य घटनांना  एक पत्रकार म्हणून सामोरं गेलेल्या कितीतरी भल्या-वाईट घटना…आज आर्त साद घालत आहेत

नागपूर-विदर्भानी जगण्याचं बळ दिलं , पत्रकारिता आणि लेखनाच्या प्रेरणा दिल्या . नवं भान दिलं . ज्ञानाच्या कक्षा व्यापक आणि टोकदारही केल्या . माझ्यातल्या अनेक चांगल्या पैलूंना लखलखीत तसंच भरजरी केलं आणि माझ्यातला केवळ एकच बाजू बघणारा एकांगीपणा  खाक केला . नागपूरनं  नावलौकिक , मान-सन्मान काय काय दिलं ! नागपुरात असंख्य लोक भेटले . वाचक , हितचिंतक , स्नेही , मित्र , अश्रू आणि आनंदाश्रूं ओघळत असताना साथ देणारे  दोस्तयार तर कांही चक्क मेंटर असा हा मोठ्ठा गोतावळा आहे . ज्याच्याशी माणसं जोडली जातात  त्याला धनसंचय करण्याची गरज नसते असं का म्हणतात याची व्यापक आणि संपन्न जाणीव करुन देणारा खूप मोठा गोतावळा विदर्भानं दिला . समाजाच्या सर्व स्तरातल्या ‘कळवळ्याच्या जाती’तल्यांची ही नावं मनातल्या मनात जरी नोंदवायची म्हटलं तर दिवस पुरणार नाही ! जीवाभावाच्या गोतावळ्याचा हा अमूल्य खजिना घेऊन नागपूर सोडून निघालो तेव्हा मनात मोठा कल्लोळ माजलेला होता…

पण , हेही पुरेसं नाहीच… बहुसंख्येने भल्या असणा-या वैदर्भीयांच्या कळपात कद्रू वृत्तीची , संकुचित मनाची , मत्सरी स्वभावाची आणि खुरट्या उंचीची कांही  माणसं भेटली , नाही  असं नाही . अशी माणसं आयुष्यात येणं ही जगरहाटी असते . असेही लोक भेटले आणि  जसं वागायचं असतं तसेच ते वागले पण , भल्या माणसांनी पांघरलेला लोभ अशा     किरट्या लोकांच्या वृत्तीपेक्षा जास्त  गडद ममत्वाचा ,  उबदार , आश्वासक आणि        शीतल होता . त्यामुळे  जगण्याच्या प्रवासात हे खुरटे आणि किरटे लोक खूप मागे पडले आहेत !

प्रादेशिकवाद , भाषा , धर्म , जात , मत्सर , हेवेदावे असे कोणतेही संस्कार आणि संचित घेऊन मी विदर्भात आलेलो नव्हतो आणि त्यापैकी एकही किटाळ सोबत घेतलं नाही .  तसंच मागेही ठेवलं नाहीये . इतकी वर्ष अपरंपार लोभ विदर्भाने दिला , तो यापुढेही कायम राहील असा विश्वास सोबत घेऊन मी निघालो…

आता नागपूर खूप बदललं आहे . हे महानगर डोळे विस्फारुन जावेत , असं आणखी विस्तारलं आहे . नागरी सोयी सुविधा प्रचंड वाढल्या आहेत आणि त्यांचा उपभोग घेणारे लोकही . बेगमच्या आजारपणामुळे अलीकडच्या तीन वर्षात तर नागपूरला जाणंही झालेलं नाही . तरी व्ही.एन.आय. टी. किंवा वसंत नगरच्या क्रिकेट मैदानावर मॉर्निंग वॉक करत असल्याची , तिथे हमखास भेटणाऱ्या भारद्वाज या बेगमच्या शब्दात ‘लकी’ समजल्या पक्ष्याचं दर्शन झाल्याची , सेमिनरी हिलवर भल्या पहाटे  जमिनीवर विसावणाऱ्या दाट धुक्यात हरवल्याची  स्वप्न पडतात . दोस्तयारांनी केलेला गलबला ऐकू येतो . त्या गाढ दोस्तीचे गंध प्रफुल्लीत करतात… काठोकाठ भरलेल्या अशा आठवणींना उर्दूतला  ‘लबरे़ज लम्हें’ असा सुंदर उल्लेख नुकताच वाचनात आला . नागपूर माझ्या मनात कायमच  ‘लबरे़ज लम्हें’ आहे , कायम टवटवीत आहे !

( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत  )

-प्रवीण बर्दापूरकर

( १४ जून २०२० )

Cellphone  ​+919822055799

​praveen.bardapurkar@gmail.com​ /  www.praveenbardapurkar.com 

अक्षर लेखन- विवेक रानडे

( अजूग = एकाकी / एकटा / एकेरी / बेगुमान / आड-दांड अशा अनेक अर्थछटा असलेला आणि कालौघात बराचसा विस्मरणात गेलेला शब्द म्हणजे ‘अजूग’ . )

संबंधित पोस्ट