स्मरणातले विलासराव



( कांहीच कारण नसताना कांही मान्यवरांवर लिहायचं राहून गेलेलं आहे . त्यात एक महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते , माजी मुख्यमंत्री , मित्रवर्य विलासराव देशमुख . एकेकाळचे त्यांचे कार्यालयीन सहकारी रविकिरण जोशी यांनी रेटा लावला आणि राज्य विधिमंडळाच्या वि. स. पागे संसदीय केंद्रातर्फे प्रकाशित होणार्‍या ग्रंथासाठी अखेर ‘स्मरणातले विलासराव’ शब्द्ब्द्ध झाले . ‘चाणक्य मंडळ’च्या ‘स्पर्धा परीक्षा तयारी’ या यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख- )
>
अजूनही माझ्या पक्कं स्मरणात आहे. तेव्हा मी औरंगाबादला होतो . १९९८च्या डिसेंबर महिन्यातील दुपारची चार-साडेचारच्या सुमाराची वेळ . तेव्हा मोबाईल नव्हते; ‘लोकसत्ता’च्या कार्यालयातील फोन वाजला. पलीकडून नगरसेवक नरेंद्र पाटील बोलत होते. ‘सर, इकडे बोला विलासराव साहेबांशी’, असं म्हणत त्यांनी फोन विलासराव देशमुख यांच्या हाती दिला. तोपर्यंत विलासरावांना माझी औरंगाबादला बदली झाल्याचं माहिती नव्हतं . खरं तर , मुंबई सोडताना मीही त्यांना फोन करायचं विसरलो होतो . इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्यांना विचारलं , ‘कसे काय आलात औरंगाबादला ?’
तर त्यांनी सांगितलं, ‘कोर्टात केस सुरू आहे नं’.
१९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारल्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या निवडीला विलासराव देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलेलं होतं. त्या खटल्याची तेव्हा सुनावणी सुरु होती. ‘भेटूयात का ?’ मी विचारलं तर विलासराव म्हणाले, ‘या लगेच. साडेसातच्या विमानाने मी मुंबईला परत जाणार आहे.’
मी त्यांना म्हटलं, ‘मी एकटा नसेन. माझी पत्नी असेल सोबत.’
विलासराव त्यांच्या अवखळ शैलीत म्हणाले, ‘बायकोच आहे नं सोबत; मैत्रीण नाही नं ?’ आम्ही दोघेही परिचित हसलो. त्यांनी फोन बंद केला.
गुलमंडीच्या भाजी बाजारातून भाजी घेऊन पत्नी मंगला आल्यावर तिला सांगितलं, ‘आपण विलासरावांना भेटायला जातो आहोत’ आणि कार तिकडे वळवली. आम्ही विलासराव उतरलेल्या हॉटेलला पोहोचलो. रिसेप्शनच्या परिसरात टाकलेल्या एका सोफ्यावर विलासराव बसलेले होते. आम्हा दोघांना बघून पटकन सोफ्यावरून उठले. माझ्याशी शेकहँड करीत मंगलाला अत्यंत अगत्यानं म्हणाले, ‘नमस्कार वाहिनी. या.’
खरं तर विलासरावांची आणि मंगलाची काही ओळख नव्हती. पण, समोरच्याला आपलंसं करून टाकण्याची विलासरावांची ही शैली होती. त्यांचं ते अदबीनं उठून उभं राहणं, दोन पावलं समोर येणं, हे एका बाजूने म्हटलं तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता आणि दुसरीकडे लोकांवर छाप टाकणारा तो त्यांचा स्वभाव होता. जेमतेम ओळखीच्या किंवा अनेकदा अनोळखीशीही ते अशा सलगीच्या सस्मित चेहऱ्यानं बोलत की, तो समोरचा माणूस त्यांचा पंखाच होत असे.
विलासराव तेव्हा विंडसर कॅसल या साध्याशा हॉटेलमध्ये उतरले होते . मला जरा त्याबद्दल आश्‍चर्यच वाटलं. हे जेव्हा मी विलासरावांना विचारलं, तेव्हा विलासराव हंसत हंसत म्हणाले, ‘आता मी काय सत्तेत थोडीच आहे ? पराभूत आहे. फाईव्ह स्टार हॉटेल परवडायला तर पाहिजे ना.’ पुढे त्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत विलासराव अनेकदा आले आणि त्याच हॉटेलमध्ये उतरले. नरेंद्र पाटील आणि भगतसिंह देशमुख हे विलासरावांच्या अवतीभवती अत्यंत भक्तिभावानं वावरत असत; तो अपवाद वगळता माणसांचा राबता तेव्हा तिथं फारच कमी असायचा.
विलासरावांची आणि माझी ओळख तशी बरीच जुनी. एकदा लिहिलं होतं – अंबाजोगाई म्हणजे प्रमोद महाजन, बर्दापूर म्हणजे प्रवीण बर्दापूरकर, रेणापूर म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि लातूर म्हणजे विलासराव देशमुख ही एकाच रस्त्यावरची ४०/४५कि.मी. अंतरातली चार गावं. आमची चौघांची मैत्री ही अशी एका रस्त्यावरच्या गावच्या मातीशी नाळ असणारी, काहींशी नोस्टाल्जिक आणि अत्यंत अकृत्रिम. आमच्या मैत्रीला कुठलाही देण्याघेण्याचा स्पर्श कधीच नव्हता. या तिघांशी असलेली माझी मैत्री त्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत कधीच पोहोचली नाही आणि हे तिघेही माझ्या घराचा उंबरठा ओलांडून आत फारच क्वचित आले. तरीही ७०-७१पासून सुरू झालेला आमच्या मैत्रीचा प्रवाह कायम खळाळता राहिला. पत्रकारितेत आलो तेव्हा कधी मला असं वाटलंही नव्हतं, की या तीन निर्व्याज मित्रांवर मृत्यूलेख लिहिण्याची वेळ आपल्यावर येईल. पण म्हणतात ना, मृत्यूचं भाकीत कुणालाच करता येत नाही. या तिघांचाही मृत्यू आकस्मिक, अकाली वयात झाला. त्या तिघांचं ते काही मरणाचं वय नव्हतं, आणि त्या तिघांच्याही मरणाचं जे कारण होतं, ते काही त्या तिघांच्या जिंदादिल व्यक्तिमत्त्वाला शोभणारं नव्हतं. या तिघांपैकी विलासराव आणि गोपीनाथराव यांच्या मी जास्त संपर्कात राहिलो. याचं कारण, प्रमोद महाजन नंतर दिल्लीच्या राजकारणात गेले आणि तिकडेच रमलेही; पैकी विलासराव प्रदीर्घ काळ सत्तेत राहिले. आमदार-खासदार झाले; दोनदा मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले. त्यांनी अनेक विजय चाखले; एकदा विधानसभा आणि लगेच विधान परिषद निवडणुकीत पराभवालाही ते सामोरे गेले. विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांच्या या साऱ्या राजकीय प्रवासाचा मी एक मैत्रीपूर्ण साक्षीदार होतो. आम्ही भेटल्यानंतर तरुण वय आणि मराठवाड्याच्या आठवणींना उजाळा देण्यात अनेकदा रमून जात असू.
आज पहिल्यांदाच आमच्या तिघातील खास गंमत सांगतो. ( ही माहिती असणारी चौथी व्यक्ती कदाचित विलासराव यांचे दीर्घकाळ खाजगी सचिव असलेले उदय बोपशेट्टी असू शकतात. ) विलासराव आणि गोपीनाथ या दोघांनाही केस ( मराठवाडी शैलीत सांगायचं तर ‘केसं’ ! ) वाढवण्याची आणि केसाचे फुगे काढण्याची, वळणदार भांग पाडण्याची मोठी हौस होती. त्यांची ‘झुल्पं’ कायम बरीच वाढलेली असत. सार्वजनिक जीवनात वावरत असल्यामुळे घातलेले हार, शाली, सततचे प्रवास यामुळे त्यांचा भांग कायम विस्कटायचा. म्हणून सतत खिशातला कंगवा काढून भांग पाडण्याची सवय त्या दोघांनाही होती. स्वागत झालं, हार वगैरे घालून झाले, शाली घालण्याचा उपचार झाला की, हे दोघेजणं खिशातला कंगवा काढून चक्क व्यासपीठावरच केस नीट करीत. या दोघांची ही शैली मला फार पूर्वीपासूनच परिचित झालेली होती; म्हणूनच अगदीच खाजगीत मी त्यांना ‘झुल्फी’कार म्हणत असे. त्या दोघांनीही ते तितक्याच गमतीने घेतलं, हे महत्त्वाचं.
विलासराव पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि काही दिवसांनी मी मुंबईला गेलो. मंत्रालयात गेलो तर कळलं की विलासराव मंत्रालयात नाहीयेत; ताजमध्ये एका कार्यक्रमाला दुपारी चार वाजता पोहोचणार आहेत. माझ्याकडेही निवांत वेळ होता. भटकत भटकत ताजला पोहोचलो. कार्यक्रम एका उच्चभ्रू संस्थेचा होता; सहाजिकच वातावरण ‘हाय-फाय’ होतं. थोड्या वेळानं विलासराव आले. तिथेही स्वागत संपल्यानंतर त्यांनी व्यासपीठावरच विस्कटलेले केस नीट केले. मला हंसू आलं. एव्हाना त्यांनी मला नोटीस केलेलं होतं. हात हलवून बाय करून मी तिथून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी मंत्रालयात गेलो. माझी काही भेटीची वेळ ठरलेली नव्हती, पण मुख्यमंत्री कार्यालयात गेलो तर समोरच सुरेश वांदिले भेटला. सुरेश वांदिले हा माहिती खात्यातला अधिकारी. तो पत्रकारिता करीत असल्यापासून माझ्या धाकट्या ओळखीचा. सुरेशला सांगितलं, ‘मला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय’ .
तो म्हणाला, ‘मीटिंग सुरू आहे. ती संपली की मी निरोप देतो. पण, प्रवीणभाऊ तुम्ही आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं’. मी त्याला काहीच बोललो नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतकक्षात जाऊन एका सोफ्यावर पहुडलो. २०/२५ मिनिटांनी सुरेश आला आणि म्हणाला, ‘चला, साहेबांनी तुम्हाला बोलावलंय.’ सुरेशसोबत मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलो. त्यांच्या केबिनमध्ये काही अधिकारी उभे आणि त्यांच्या समोरच्या खुर्च्यांवर काही लोक बसलेले होते. विलासरावांसोबत नमस्कार-चमत्कार , हस्तांदोलन झालं. विलासरावांनी विचारलं, ‘वेळ आहे नं. कसे काय आला होता ? ’
मी त्यांना सांगितलं, ‘वेळ तर आहे पण, काम काहीच नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत कसे दिसतात एवढं बघायला आलो होतो. ते बघितलं. छान वाटलं. आता निघतो.’
इथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी की, खाजगीत बोलताना प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि मी अनेकदा एकमेकांना ‘अरेतुरे’ करीत असू पण विलासरावांचे आणि माझ्या संबंधात ‘अरेतुरे’ला कुठेच स्थान नव्हतं. विलासराव ( त्यांची जन्मतारीख २६ मे १९४५ आणि मृत्यू १४ ऑगस्ट २०१२ ) माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे पण, त्यांनीही मला कधीच ‘अरेतुरे’ केलं नाही. माझं बोलणं ऐकल्यावर विलासराव खुर्चीत मागे रेलले. झकास हंसले आणि म्हणाले, ‘बसा. चहा घेऊयात’. मग त्यांनी त्या अधिकाऱ्यांना आणि समोर बसलेल्या लोकांना सांगितलं की, ‘हे माझे फार जुने मित्र आहेत. आम्हाला एक १० मिनिटं द्या, जरा’. सत्तेच्या दालनात वावरणारांना सत्तेच्या माणसांची भाषा फार पटकन लक्षात येत असते. समोरची मंडळी आणि तिथे उपस्थित असलेले अधिकारी पटापट उठले. मुख्यमंत्र्यांची केबिन रिकामी झाली. विलासरावांनी बेल वाजवली. मुख्यमंत्री कार्यालयातला पर्मनंट असलेला तो सेवक आतमध्ये आला. त्याची माझीही जुनी ओळख होतीच. तो काय समजायचं ते समजला. ‘साहेब चहा घेऊन येतो’ म्हणाला आणि गेला . मग पुढची १२-१५ मिनिटं मी आणि विलासराव मराठवाडा, विदर्भ, राजकारण आणि अन्य काही आमच्या नेहमी होणाऱ्या टिंगलटवाळ्या केल्या. चहा पिऊन मी निघालो तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयात नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना या प्राण्याला विलासरावांनी थेट प्रवेश कसा दिला, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती.

विलासरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संदर्भात भरपूर लेखन झालंय पण, मी हे जे काही सांगतोय, तसे उल्लेख त्या मजकुरामध्ये आल्याचं मला कधी दिसलं नाही. कायम हंसतमुख असणं हे विलासरावांचं सगळ्यात मोठं भांडवल होतं. ते भांडवल व्यक्तिगत, कौटुंबिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही आणि त्यांनी सहजगत्या ‘कॅपिटलाईज’ करून घेतलेलं होतं. त्यांच्या हसतमुख असण्याला कर्तबगार राजकीय कामगिरीची भरजरी जोड होती; त्यांचं ते हसतमुख असणं खानदानी वजनदार वाटत असे. अनेकांना ‘हे काम होणार नाही’ किंवा ‘मी हे काम करू शकणार नाही’ , हे अत्यंत हंसतमुखानं विलासरावांना सांगताना मी बघितलेलं आहे. त्यांच्या या अशा शैलीतल्या सांगण्यामुळे विलासराव आपलं काम करणार नाहीयेत, याचं वैषम्य समोरच्या माणसाला वाटत नसे; विलासराव सर्वप्रथम मंत्री झाले तेव्हापासून हे मी नोंदवत आलेलो आहे. आणखी एक म्हणजे, त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य आलंय, असे फारच क्वचित प्रसंग असतील आणि ते फारच कमी लोकांना माहिती असतील. सर्वसामान्य जनतेला, पत्रकारांना, त्यांच्या अधिकारी वर्गाला त्यांच्या वेदना, अश्रू आणि नैराश्य कधी समजलं नाही; अश्रू, नैराश्य आणि वेदना हंसतमुखात दडवून ठेवणारे विलासराव म्हणजे मानवी योनीतले मत्स्य होते, असंच म्हणायला हवं. शिवाय त्यांचं राहणीमान अत्यंत ऐटबाज आणि त्यांच्या त्या हसतमुखतेला शोभणारं होतं. चुरगाळले-मुरगाळलेले कपडे घातलेले आणि त्रासिक चेहऱ्याचे विलासराव कुटुंबाला तरी पाहायला मिळाले असतील की नाही, याविषयी शंका वाटते.
दोन्ही वेळेला त्यांचं मुख्यमंत्रीपद अत्यंत विचित्र पद्धतीने गेलं. पहिल्यांदा जेव्हा त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं; तेव्हा त्याचं जे कारण मीडियात चर्चिल्या गेलं ते खरं नव्हतं हे मलाही माहिती होतं. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून त्यांनी जो काही एक एफएसआयच्या संबंधात निर्णय घेतला होता तो त्यांना भोवला होता. त्यासंदर्भात मी त्यांना एकदा विचारलंही होतं. तेव्हा विलासराव नेहमीच्या शैलीत म्हणाले, ‘अहो मराठवाडेकर, जाऊ द्या नं. गेलं की आता मुख्यमंत्रीपद’.
‘समय से पहिले और तकदीरसे ज्यादा कुछ नही मिलता’, ही त्यांची धारणा फारच खास होती आणि ती त्यांच्यातल्या अस्सल मराठवाडेकराला शोभूनही दिसणारी होती. २-३ भाषणांत त्यांनी त्याचा उल्लेखही केला होता. मराठवाड्यात म्हणजे निजामी राजवटीत शिक्षण झाल्यामुळे विलासराव हे म्हणणं ज्या उर्दू नजाकतीमध्ये सांगत ते मोठं मेलोडियस वाटत असे. विलासरावांचं मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा गेल्यानंतरचा एक प्रसंग आठवतो. त्याचा संबंध ते मुख्यमंत्री झाल्यावर औरंगाबादला झालेल्या पहिल्या कार्यक्रमाचा आहे. विलासराव मुख्यमंत्री झाल्यावर औरंगाबादला महात्मा गांधी मिशनच्या आवारात एक पाणी परिषद झाली. तेव्हा डॉ. पद्मसिंग पाटील हे सिंचन मंत्री होते. भाषणाची वेळ आल्यावर ‘आता, राज्याचा सिंचन मंत्री मी आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठवाड्याचाच आहे. तेव्हा मराठवाड्याच्या वाट्याचं २२ टीएमसी पाणी आणल्याशिवाय आम्ही दोघं गप्प बसणार नाही हे वचन आहे’, असं डॉ. पद्मसिंह यांनी त्यांच्या पहिलवानी शैलीत ठासून सांगितलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. विलासरावांनी मुख्यमंत्री म्हणून भाषण करताना पद्मसिंग पाटील यांच्या मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी आणण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केला आणि ‘हे पाणी आता येणारच’, हे ‘च’ वर जरा जास्तच भर देत जाहीर केलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पण, ते हक्काचं पाणी काही मराठवाड्यात आलंच नाही.
पहिलं मुख्यमंत्रीपद गेल्यावर ४/५ दिवसांनी विलासराव औरंगाबादला आले. औरंगाबादचे मुख्यमंत्री म्हणून जाहीर झालेले शासकीय कार्यक्रम रद्द झालेले असले तरी खाजगी जे दोन कार्यक्रम होते, ते ठरल्याप्रमाणे होणार होतेच. माजी खासदार उत्तमसिंग पवारांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की, विलासराव त्यांच्याकडे चहा प्यायला आणि थोडासा वेळ घालवायला येणार आहेत. कारण कार्यक्रम संपल्यावर विमानाला दोन-अडीच तास वेळ आहे. तेव्हा मोजक्या लोकांना भेटायला बोलावलं आहे. मी उत्तमसिंगांच्या कार्यालयात पोहोचलो. तिथे बऱ्यापैकी उपस्थिती होती. उत्तमसिंग पवार आणि उदय बोपशेट्टी यांची लगबग सुरू होती. विलासराव आले. स्वागत वगैरे झाल्यावर, लोक पांगल्यावर आम्ही भेटलो. विलासराव म्हणाले, ‘मला वाटलंच होतं तुम्ही याल म्हणून’. ( राजकारणातल्या मित्रांशी मैत्री ठेवण्याचं माझं एक तंत्र आहे. सत्तेत असलेल्या मित्र राजकारण्यांना मी सहसा नेहमी आणि आलो होतो इकडे म्हणून भेटत नाही. विलासराव जे म्हणाले त्याचा संदर्भ या माझ्या सवयीशी होता. ) मग विलासराव, मी, उत्तमसिंग पवार आणि उदय बोपशेट्टी अशा गप्पा झाल्या. खरं म्हणजे विलासराव आणि माझ्यातच गप्पा झाल्या. त्यात तो पाण्याच्या प्रश्‍नाचा विषय निघालाच . तेव्हा मी विलासरावांना म्हटलं, ‘तुमची पाणी आणण्याची गर्जना कोरडीच ठरली. ना तुमचं पाणी आलं, ना मराठवाडा भिजला. अर्थात ते होणारच होतं. काँग्रेसकडून वेगळ्या अपेक्षा काय ?’ माझ्या बोलण्यातील खोच विलासरावांच्या लक्षात आली आणि त्यांनी गंभीर होऊन सांगितलं, ‘प्रवीण तुम्हाला सांगतो. मी आणि डॉक्टरनी ( पक्षी : पद्मसिंह पाटील ) भरपूर प्रयत्न केले. हा विषय आम्ही इतका टोकापर्यंत नेला की पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पाण्याचा प्रश्‍न असा निकाली लावायचा असेल तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, अशी भूमिका घेतली. वातावरण नको तितकं ताणलं गेलं. शेवटी हा विषय मॅडमकडे गेला. मॅडमनी मला सांगितलं, विषय ताणू नका. सत्ता जास्त महत्त्वाची आहे.’
वातावरणात क्षणभर शांतता निर्माण झाली. मी विलासरावांना विचारलं, ‘लिहू का हे ?’ तर विलासराव म्हणाले, ‘लिहिता कशाला फक्त ? भाषणांमध्येही सांगा. पण एक, मला कोट करू नका. मात्र मी तुम्हाला शब्द देतो की या माहितीचा मी कधीही इन्कार करणार नाही. ’ मग मी त्याची बातमी केली. ‘लोकप्रभाच्या अंकात ‘मुख्यमंत्रीपद गेल्यावरचे विलासराव’ हा लेख लिहिला; तेव्हा आमच्यात झालेल्या चर्चेवर आधारित विस्तृत तपशील लिहिला. त्यावर बऱ्यापैकी चर्चाही झाली. राष्ट्रवादीच्या तत्कालीन काही मंत्र्यांनी मला ही माहिती कुठून मिळाली हे विचारलंही. अर्थात त्यांचं विचारणं हा दुबळा प्रयत्न होता. त्यापैकी बहुतेकांना माझे आणि विलासरावांचे असलेले संबंध माहिती होते. त्यानंतर २/३ कार्यक्रमात, एकदा तर एबीपी माझा या प्रकाश वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, तत्कालीन खासदार विजय दर्डा आणि तेव्हा भाजपचे ऱाष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मी हे सगळं बोललो पण, विलासरावांनी त्याचा कधी इन्कार केला नाही. मित्राला खाजगीतही दिलेला शब्द पाळण्याचं विलासरावांचं राजकीय धाडस हे असं होतं.
संदर्भ वैयक्तिक निघालाय तर आणखी दोन आठवणी सांगणं मुळीच अप्रस्तुत ठरणार नाही. मित्रांचं अमर्याद कौतुक करण्याचा विलासरावांचा स्वभाव होता. असं कौतुक करताना खाजगीत असो किंवा जाहीरपणे, विलासरावांनी शब्द कधी आखडते घेतले किंवा राखून ठेवले असं घडलं नाही. तेव्हा मी निवासी संपादक म्हणून नागपूरला पत्रकारिता करत होतो. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू होती. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळात पत्रकारांना रात्री जेवणासाठी एकदा मुख्यमंत्री आमंत्रित करतात. तशी ती प्रथा खूप जुनी आहे. नागपुरातही दरवर्षी असं एक जेवण होत असतं. पूर्वी रिपोर्टर असताना अशा अनेक जेवणांना मीही हजेरी लावलेली आहे. यावेळी मात्र मी अशी हजेरी लावण्याचं काही कारण नव्हतं कारण आता मी संपादक झालेलो होतो. ‘लोकसत्ता’साठी विधिमंडळाचं वृत्तसंकलन करण्यासाठी तेव्हा संतोष प्रधान नागपूरला आलेला होता. त्याला मुख्यमंत्र्यांच्या जेवणाच्या ठिकाणी केवळ चक्कर मारायची होती, नंतर तो माझ्यासोबत विमानतळावर येणार होता. संतोष प्रधानसह मी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या निवासस्थानी गेलो. संतोष मुख्य मंडपात विलासरावांना भेटायला गेला आणि मी दरवाजातच थांबलो. तेवढ्यात विलासरावांचं माझ्याकडे लक्ष गेलं . तेव्हा ते पत्रकारांच्या गराड्यात होते. तरी त्यांनी तिथून हात हलवून प्रतिसाद दिला आणि माझ्याकडे अंगुलीनिर्देशही केला. मीही प्रतिसाद दिला. अचानक कुणाला काही कळायच्या आत रांगेत लावलेल्या खुर्च्या बाजूला सरकवत विलासराव माझ्याकडे येऊ लागले. सिक्युरिटीची धावपळ झाली. ते लक्षात आल्यावर मीही पुढे गेलो. आम्ही एकमेकांशी हस्तांदोलन आणि किंचित अलिंगन दिल्यासारखं केलं. माझा हात हातात ठेवून विलासराव उपस्थितांना म्हणाले, ‘प्रवीण हे माझे असे एक पत्रकार मित्र आहेत की ज्यांनी आजवर मला कुठलंही वैयक्तिक काम सांगितलेलं नाही. आमची खूप जुनी मैत्री आहे आणि ती कायम राहणार आहे’. विलासरावांनी केलेल्या कौतुकास्पद अगत्यामुळे अनेक पत्रकारांच्या भुवया उंचावल्या जाणं स्वाभाविकच होतं.
दुसरी आठवण तर फारच वैयक्तिक आहे आणि ती मी आजवर कुणाशी शेअरही केलेली नाहीये. माझे साडू तेव्हा राज्य प्रशासनाच्या नोकरीत आणि तेव्हा ते मुंबईत होते. त्यांचं त्यांच्या आयुक्तांशी फारसं काही जमत नव्हतं. साहजिकच त्यांना बदली हवी होती. त्यांच्या खात्याचे जे मंत्री होते त्यांच्याशी माझे संबंध फारसे काही सौहार्दपूर्ण नव्हते. त्यामुळे पर्याय मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिवांना त्यासंदर्भात विनंती करणं हा होता. ‘लोकसत्ता’च्या कुठल्याशा मीटिंगला मी मुंबईला गेलो होतो. मंत्रालयाच्या जवळच नरिमन पॉईंटला मीटिंग असल्यामुळे विलासरावांना भेटणं तसं सोपं होतं म्हणून मी २/३दा फोन केला. परंतु विलासरावांचा काही प्रतिसाद मिळाला नाही. मीटिंग संपली आणि मी विमानतळाकडे निघून गेलो. सिक्युरिटी चेकिंग करीत असताना विलासरावांचा फोन आला. मग आमच्यात थोडंसं बोलणं झालं तर विलासराव म्हणाले की, ‘वेळ असेल तर या जेवायला’. मी त्यांना सांगितलं, ‘ते शक्य नाही. कारण मी सिक्युरिटी चेकिंग करतोय.’ मग मी त्यांना कशासाठी भेटायचं होतं ते सांगितलं.
तर विलासराव म्हणाले, ‘की मला तपशिलाचा एसएमएस पाठवा.’
बघा, राज्याचा मुख्यमंत्री एका पत्रकार-मित्राला त्याचं काम करण्याच्या संदर्भात एसएमएस पाठवायला सांगतो. मी तसा व्यवस्थित तपशील असलेला एसएमएस विलासरावांना पाठवला. ( तोच तत्कालीन मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनाही पाठवला. ) एसएमएस पाठवल्यावर विलासरावांना फोन करून त्यांना तो मिळाल्याची खातरजमा मी करून घेतली. असेच २/३ आठवडे गेले आणि एका रात्री सव्वानऊ-साडेनऊच्या सुमारास विलासरावांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की, ‘मराठवाडेकर तुमचं काम झालंय. ’ पुढच्या ८/१० मिनिटांतच जॉनी जोसेफ यांचाही फोन आला त्यांनीही सांगितलं, ‘तुमच्या साडूची बदली करण्यात आलेली आहे.’ नंतर मी माझ्या साडूंना फोन केला. तोपर्यंत ती बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. मग मी त्यांना काय घडलं ते सांगितलं. पण या सगळ्यातली उल्लेखनीय बाब म्हणजे विलासरावांना ( आणि फॉर दॅट मॅटर मुख्य सचिवांना ) एका कामाचा एसएमएस केला आणि ते काम त्यांनी केलं; हे अनेकांना अविश्‍वसनीय वाटू शकेल पण, मैत्री निभावण्याची विलासरावांची वृत्तीच होती. विलासरावांच्या स्वभावाचा उल्लेख आहे म्हणून आणखी पुढे सांगायला हवं की, विलासराव जसे दोस्तीला पक्के होते तसंच जो कुणी राजकीय प्रतिस्पर्धी आहे; त्याला नामोहरम करण्यातसुद्धा अतिशय मुरब्बी होते. पण, इतर राजकारणी आणि विलासराव यांच्यामध्ये एक खूप मोठा फरक असा होता की, विलासरावांनी त्यांचे राजकीय मतभेद अतिशय हंसतमुखानं आणि अतिशय हजरजबाबीपणानं निभावले. राजकारणात असल्यामुळे त्यांचे एक नाही असंख्य प्रतिस्पर्धी होते . पण विलासरावांनी त्यांना कधी शत्रू मानलं नाही; वैरभावही त्यांनी कधी चेहऱ्यावर उमटू दिला नाही. सस्मितपणे प्रतिस्पर्ध्याला गारद करणं हे त्यांचं जे वैशिष्ट्य होतं ते फारसं खास होतं. विलासरावांच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून त्यांनी आपल्यावर राजकीय पातळीवर जाऊन वार केलाय किंवा अन्याय केला हे कधी समोरच्याला जाणवतच नसे. पक्षांतर्गत अनेकांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते आणि काहींशी मतभेदही होते; तो राजकारणाचा एक अपरिहार्य भाग आहे. पक्षातल्या काही लोकांनी त्यांना नको त्या प्रमाणात त्रासही दिलेला होता. परंतु विलासराव त्यांच्याशी कधी सूड घेण्याच्या दृष्टिकोनातून वागले नाहीत. प्रथम मुख्यमंत्री झाल्यावर दिल्लीत ‘पीआर’ किती जबरदस्त पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि त्याची राजकीय किंमतही त्यांनी मुख्यमंत्री असताना नाईलाजानं चुकवली होती. म्हणूनच पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस झाल्यावर त्यांनी ही आघाडी मजबूत केली; धोरणीपणा असतो तो असा. असे हिशेबी आणि धोरणी असणाऱ्या विलासराव देशमुख यांचा बाबूराव तिडके, कन्हैयालाल गिडवाणी अशा काहींवरील अतिलोभ मात्र कायमच अनाकलनीय होता.

एक प्रसंग सांगायला हवा. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांचा अत्यंत अनपेक्षित अशा पद्धतीने पराभव झाला. खरं तर, एकूणच काँग्रेसचं त्या काळात पानिपत झालेलं होतं. राज्यात सत्तांतर झालं. शिवसेना आणि भाजपचं सरकार सत्तारूढ झालं. विलासरावांचे जिगरी दोस्त गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांचा विधानसभा मतदारसंघही अगदी शेजारी शेजारी. दोघांचे पक्ष एकमेकांचे शत्रू पण, त्यावर विलासराव आणि मुंडेंच्या जबर मैत्रीनं मात केलेली होती. पक्षभेद बाजूला ठेवून हे दोन्ही मित्र एकमेकांना कोणताही गवगवा न करता मदत करीत हे जाहीर राजकीय गुपित होतं. आपला मित्र विधानसभेत नाही ही सल गोपीनाथ मुंडेंना बोचत होती आणि त्यातूनच पुढे विलासरावांनी विधान परिषदेची निवडणूक लढवावी, अशी कल्पना पुढे आली. भाजप-सेनेकडे अतिरिक्त मतं होती. गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला बळी पडून शिवसेनेनं विलासरावांना पाठिंबा द्यायचं कबूल केलं पण, अट अशी होती की विलासरावांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नव्हे तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी. ‘मरता क्या नही करता’ अशी ती परिस्थिती होती. विलासरावांनी ती अट मान्य केली आणि अपक्ष म्हणून अर्ज भरला. विलासरावांच्या लोकप्रियत्वाचं गारुड काँग्रेस पक्षावर कायमच होतं. त्यामुळे विलासरावांना अपक्ष म्हणून निवडून येण्यात सकृतदर्शनी तरी कोणती अडचण नव्हती. पण, ऐन वेळेवर दगाफटका झालाच. शिवसेनेच्या काहींनी तेव्हा विलासरावांना मतदान केलं नाही; विलासराव अक्षरशः राजकीय विजनवासात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. पराभवाचा सलग दुसरा धक्का बसल्यानंतरही विलासरावांच्या चेहऱ्यावर नैराश्य नव्हतं. जे नैराश्य त्यांच्या मनात निश्‍चितपणानं होतं ते त्यांनी कधी ओठावर किंवा चेहऱ्यावर येऊ दिलं नाही. त्याही काळात विलासरावांचं हंसू कधीच मावळलं नाही. नंतर दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवतानाही शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याच्या संदर्भात त्यांनी कटुता बाळगली नाही.
विलासरावांच्या संदर्भातली अशीच एक वैयक्तिक आठवण खूप मजेशीर आहे. माझी नागपूरहून मुंबईला आणि मुंबईहून नंतर यथावकाश औरंगाबादला बदली झाली. १९९८साली आम्ही नागपूर सोडायचं ठरवलं. नागपुरातला राजकारण, समाजकारण आणि साहित्य क्षेत्रातला माझा गोतावळा अत्यंत व्यापक होता. नागपूरहून औरंगाबादला सामान शिफ्ट करण्याची वेळ आली तरी सर्व मित्रांना जाऊन भेटणं शक्य नव्हतं. बहुतेक सर्व मित्रांचा आग्रह हा जेवायला यावं असाच होता आणि ते शक्य नव्हतं. शेवटी मीच एक निरोपाचं जेवण धरमपेठेतल्या सुगंध मंगल कार्यालयात आयोजित केलं. साधंसं शाकाहारी जेवण आणि ४५०/५०० निमंत्रित असा तो कार्यक्रम होता. अगदी बाबासाहेब केदारांपासून दत्ता मेघे, रणजित देशमुखांपर्यंत आणि नितीन गडकरी ते एस. डब्ल्यू. धाबे असे राजकारणापासून समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक दिग्गज आलेले होते. नेमके त्याच दिवशी विलासराव नागपुरात होते. रणजित देशमुख हे त्या दिवशी सकाळी नागपुरात डेरेदाखल झालेले होते. मी त्या दोघांनाही फोन करून भोजनाचं आमंत्रण दिलं. रात्री ९ च्या सुमारास बाबूराव तिडके आले आणि त्यांनी सांगितलं, कार्यकर्त्याच्या गराड्यातून सुटका न झाल्यानं विलासराव परस्पर विमानतळावर गेले आहेत . तुम्हाला ते नंतर भेटतीलच. मात्र ऐन वेळेवर निरोप मिळूनही रणजित देशमुख त्या भोजनास आलेले होते. त्यानंतर १५/२० दिवसातच महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्ष अध्यक्षपदी रणजित देशमुखांची नियुक्ती झाल्याची बातमी आली. १९९८च्या विधानसभा निवडणुका रणजित देशमुख प्रदेशाध्यक्ष असतानाच लढवल्या गेल्या आणि काँग्रेसला महाराष्ट्रात यशही चांगलं मिळालं. त्या काळात एकदा विलासरावांची भेट झाली तेव्हा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीचा विषय निघाला. कारण विलासराव काँग्रेसमध्ये येतील आणि त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रं दिली जातील अशी चर्चा होती. मी विलासरावांना म्हटलं, ‘तुम्ही त्या दिवशी जर मी आयोजित केलेल्या भोजनसमारंभाला आला असता तर कदाचित तुम्हाला प्रदेशाध्यक्षपद मिळू शकलं असतं. रणजित देशमुख आले आणि त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळालं.’
त्यावर हंसत हंसत विलासराव म्हणाले, ‘हे म्हणजे देवावर विश्‍वास ठेवण्यासारखं झालं. आमच्या पक्षामध्ये असं कुणाकडे आल्या-गेल्यानं किंवा कुठल्या देवाची भक्ती केल्यानं काहीच मिळत नसतं. आमचा गांधी एकच’..वगैरे, वगैरे आणि परत ‘समय से पहिले और तकदीरसे ज्यादा कुछ नही मिलता’ हा डायलॉग.
त्यावर मी विलासरावांना म्हटलं, ‘तुमच्या समय आणि तकदीर या दोन्हीचं नाव गांधी आहे’ आणि त्यांनी टाळी देत दाद दिली ! देवाचा मुद्दा निघाला म्हणून, विलासराव दैववादी किंवा धार्मिक होते का ? असतीलही कदाचित वैयक्तिक पातळीवर. पण, त्या आस्तिकता म्हणा की धार्मिकतेचा देखावा त्यांनी कधी मांडला नाही हे मात्र खरं. अधूनमधून कुठल्या देवदर्शनाला गेले किंवा साधू-महाराजांच्या दर्शनाला गेले; ते जातच असत. पण, त्याचा बोभाटा होणार नाही याची खबरदारी मात्र विलासराव घेत असत.
एक आणखी आठवण सांगायला पाहिजे. माझी पत्रकार म्हणून प्रदीर्घ कारकीर्द विदर्भात गेली. त्याच्यामुळे मराठवाड्यातील लोक मला वैदर्भीय म्हणायचे आणि वैदर्भीय लोक माझा उल्लेख कायम मराठवाडेकर असा करायचे; हा सगळा गंमतीचा भाग आहे. एक दिवस गोपीनाथ मुंडे, विनायक मेटे आणि मी गप्पा मारीत असताना ‘मराठवाडा गौरव’ सन्मानाचा विषय निघाला. मी त्यांना म्हणालो, माझा कधीच कोणी या सन्मानासाठी विचार करीत नाही आणि त्याचं कारण म्हणून मी माझ्या संदर्भात असलेला प्रादेशिक प्रवाद सांगितला. त्यावर विनायक मेटेंना गोपीनाथ मुंडे म्हणाले, ‘मला जेव्हा तू हा सन्मान देशील तेव्हा प्रवीणला देशील तरच मी घेईन.’ विनायक मेटेंनी ते लगेच मान्य केलं आणि पुढच्या वर्षी तुम्हा दोघांना हा सन्मान देण्यात येईल, मात्र विलासरावांना तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आणा अशी गळ त्यांनी गोपीनाथ मुंडेंना घातली. ती अर्थातच मुंडेंनी मान्य केली. नंतर विनायक मेटेंच्या संघटनेनी कुमार केतकरांच्या घरावर हल्ला करणं वगैरे अशा सगळ्या घटना घडल्या. विनायक मेटे बरेच वादग्रस्त ठरले आणि तो समारंभ पुढे ढकलल्या गेला. मग मी मराठवाडा गौरव स्वीकारायचा की नाही या संभ्रमात पडलो. पण केतकरांनी उमदेपणाने ‘तुझ्या मातीचा हा सन्मान आहे त्यामुळे तो स्वीकार’, असं सांगितलं. तो स्वीकारण्यासाठी त्या कार्यक्रमाला गेलो. त्या कार्यक्रमात मी माझं मूळ भाषण बाजूला ठेवून गोपीनाथ मुंडे आणि विलासरावांवर भरपूर टोलेबाजी केली. विलासरावांचा गांधी कोणता ? माझा गांधी कोणता ? इथपासून ते गोपीनाथ मुंडे आणि गडकरी यांच्यात असलेले तथाकथित मतभेद…खूप अशा कोपरखळ्या मारल्या आणि टोलेबाजी केली. त्यामुळे त्या कार्यक्रमात आधी झालेल्या भाषणांमुळे जी काही मरगळ आलेली होती, ती एकदम निघून गेली; कार्यक्रमात चैतन्य आलं. माझ्या भाषणाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मग गोपीनाथ मुंडेंनी तो धागा पुढे पकडून भरपूर टोलेबाजी केली; त्यात काही टोले मलाही बसले. विलासरावांनी त्या रंगतदार कार्यक्रमामध्ये प्रचंड टोलेबाजी करत महारंगत भरली. आमची तिघांची भाषणं तेव्हा खूप गाजली आणि भाषणांची ही जुगलबंदी पुढे कधीतरी मुलाखतीच्या किंवा भाषणाच्या स्वरूपात मराठवाड्यात किमान ५/७ ठिकाणी करूयात, असं कार्यक्रम संपल्यावर आम्ही ठरवलं. परंतु लवकरच निवडणुका लागल्या आणि ते काही जमलं नाही; आता तर ते अशक्यप्राय आहे…
विलासराव महाराष्ट्राच्या काँग्रेसमधलेच किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असे नेते होते की, ज्यांचा स्थानिक नेत्यांशीच नाही, कार्यकर्त्यांशीच नाही तर सर्वसामान्य लोकांशी थेट संपर्क होता. कितीही कामात व्यस्त असताना कोणाचा फोन येऊन गेला आणि त्याला विलासरावांनी परत फोन केला नाही, असं कधी घडलेलं नाही. विलासरावांची मुख्यमंत्री म्हणून कामाची शैली कशी होती आणि त्यांनी केलेली कामं यावर अनेकांनी भरपूर लिहिलेलं आहे. त्यासंदर्भात पुनरुक्ती नको, तरी काही निरीक्षणं नोंदवायलाच हवीत. एखाद्या प्रश्‍नाच्या संदर्भात, एखाद्या समस्येच्या संदर्भामध्ये पत्रकार म्हणून जर फिडबॅक दिला तर विलासराव त्याची खातरजमा करू न तो प्रश्‍न सोडविण्याचा कसा प्रयत्न करीत, ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. काही पत्रकारांच्या लेखनाकडे त्यांचं बारीक लक्ष असे आणि ते त्या पत्रकाराच्या म्हणण्याची जातीनं दाखल घेत. एक हकीकत अशी – लाखोळी डाळीवरील बंदी उठवावी म्हणून नागपूरच्या डॉ. शांतीलाल कोठारी यांनी केलेलं उपोषण अतिशय क्रुशियल अशा पातळीवर पोहोचलं. त्यासंदर्भात नागपूरचे एक ज्येष्ठ नेते गिरीश गांधी यांच्याशी गप्पा सुरू असताना हा मुद्दा विलासरावांच्या लक्षात आणून दिला पाहिजे, असं मी म्हणालो. तर गिरीश गांधी म्हणाले, ‘तूच विलासरावांना सांग की. ’ मग मी विलासरावांना फोन लावला. विलासराव बहुदा त्या दिवशी दिल्लीत होते. त्यांचा संध्याकाळी फोन आला. मी त्यांना काय ते सांगितलं. परस्पर विरोधी दाव्यामुळे लाखोळी डाळीचा प्रश्‍न फारच प्रतिष्ठेचा व क्लिष्ट बनलेला होता; शिवाय त्यामागे मोठं अर्थकारणही दडलेलं आहे; म्हणूनच तोडगा काढणं खूपच कठीण झालेलं होतं हे मलाही ठाऊक होतं. मी विलासरावांना म्हटलं, ‘उपोषणाची आता गंभीरपणे दखल घेण्याची तातडीची गरज आहे. डॉ. शांतीलाल कोठारी यांचं काही बरंवाईट झालं तर सरकार आणि पक्ष म्हणून तुम्हाला खूपच महाग पडेल. तेव्हा तुम्ही काहीतरी चतुराईनं मार्ग काढला पाहिजे. परिस्थिती फारच चिघळली आहे. ’
विलासराव ‘बरं’ एवढंच म्हणाले. दुसऱ्या दिवशी विधानसभेत त्यांनी लाखोळी डाळीवरील बंदी तात्पुरती उठवली आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी एक समिती नियुक्त करत असल्याची अधिकृत घोषणा केली; डॉ. शांतीलाल कोठारी यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. ती समिती काही नंतर स्थापन झाली नाही. त्यामुळे त्या समितीचा अहवाल येण्याचा काही प्रश्‍नच उरला नाही; लाखोळी डाळीवरील बंदी मात्र उठली हे मात्र खरं ! खूप फायलींच्या गराड्यात, किचकट नोटिंग करण्यामध्ये विलासराव कधी गुंतलेले आहेत असं कधी दिसलंच नाही. फायलींचा ढिगारा कधी त्यांच्या टेबलवर खूप दिसत नसे. त्यांच्यासोबत काम केलेले अनेक अधिकारी नेहमी सांगत विलासरावांना सविस्तर ब्रीफिंग करण्याची कधीच आवश्यकता नसते. विशेषतः एखाद्या भागाची समस्या किंवा तिथला काही सामाजिक प्रश्‍न यासंदर्भात विलासराव आधीच अपडेट असत. याचं एकमेव कारण की त्यांचा त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही संपर्क होता; जी काही ‘feedback देणारी त्यांची यंत्रणा होती, त्याचा तो परिणाम होता. आघाडीऐवजी पक्षाला निर्णायक बहुमत मिळून जर मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर विलासरावांची कारकीर्द आणखी उजळली असती यात शंकाच नाही.
एकदा मी विलासरावांना असं विचारलं होतं , ‘तुम्ही आघाडीचं सरकार चालवता. सगळेच काही मंत्री, आमदार, खासदार तुमच्या गोटातले आहेत असा काही भाग नाही; काही अधिकारी तुमच्या विरुद्ध/काही आडमुठे असतात किंवा अनेकदा मनाच्या विरुद्धही निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी तुम्ही नेमकं करता काय ? निर्णय घेता कसे ? निर्णय घेताना मार्ग काढता कसे ?’
हजरजबाबीपणाचा मुखवटा घालत विलासराव म्हणाले, ‘ते एक अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्रेट आहे.’
‘म्हणजे काय ?’ मी विचारलं .
‘तुम्हाला सांगायला हरकत नाही पण हे काही जाहीर करू नका.’ आता विलासराव हयात नसल्यामुळे मी हे लिहितो आहे – विलासराव म्हणाले, ‘मनाविरुद्ध निर्णय घ्यायचा असेल तर मी फाईल माझ्याकडे येण्याआधीच त्या निर्णयाच्या संदर्भातला अनुकूल शेरा कसा येईल याची सूचना देतो; मग त्या मंत्र्यांकडून आलेल्या असोत किंवा सनदी अधिकाऱ्यांकडून. यापैकी कुणीतरी तो अनुकूल शेरा दिल्याशिवाय मी त्या फाईलला मंजुरीच देत नसे.’ त्यामुळे विलासराव प्रशासकीय पातळीवर फार कधी अडचणीत आलेले नाही. अर्थात हिंदी चित्रपट निर्माते सुभाष घई यांना फिल्म इन्स्टिट्यूटसाठी जमीन देण्याबाबतचा विलासरावांचा निर्णय अतिशय वादग्रस्त ठरलेला होता; तो निर्णय घेताना त्यांनी त्यांच्या सांस्कृतिक आणि वैयक्तिक संबंधांना झुकतं माप दिलं हे अतिशय उघड होतं. पुढे तो निर्णय उच्च न्यायालयानं रद्दच ठरवला, हा भाग वेगळा. पण, एक निश्‍चित होतं की काहीतरी निश्‍चित ठरवून ज्याला इंग्रजीत ‘प्रिकॉनसिव्हड मोशन्स’( Preconceived notion ) असं म्हणतात, तसं काहीतरी कुटील ठरवून, कारस्थान करून , कुणाला तरी नाउमेद करायचं ठरवून विलासराव मंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून वागले नाहीत. आणखी एक म्हणजे, अनेकदा विलासराव अधिकाऱ्यांवर चिडत, क्वचित जाम नाराज होत. अशा वेळी ते संबधिताची जोरदार कानउघाडणी करत. पण, ती ‘लेकी बोले, सुना लागे’ शैलीत. अशा प्रसंगी त्यांची वाणी बरीच बोचरीही होत असे.
दिल्लीत पत्रकारिता करायला लँड झालो तेव्हा मला विलासराव आणि प्रमोद महाजन यांची खूप आठवण झाली. तेव्हा हे दोघंही नेते मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात निघून गेलेले होते. ते दोघे जर असते तर कदाचित मी दिल्लीत आणखी रमून गेलो असतो; दिल्लीत माझी पाळंमुळं अधिक घट्टही झाली असती.
मागे वळून बघताना, लक्षात असं येतं की त्या भौगोलिक पट्ट्यातली अंबाजोगाई म्हणजे प्रमोद महाजन; रेणापूर म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि लातूर म्हणजे विलासराव देशमुख या तिन्ही भावनात्मक आणि भौगोलिक कड्या गळून पडलेल्या आहेत. आमच्या मैत्रीला कुठलाही हेतू , स्वार्थ किंवा कोणतेही बेसूर बहर नव्हते; आमच्यात होती ती केवळ शुभ संकेताची स्निग्ध सलगी. एक निखळ असा तो मैत्रीचा प्रवाह होता… ते तिन्ही प्रवाह आता आटलेले आहेत; उरली आहेत ती स्मरणं. त्या तिघांचेही सेलफोन नंबर माझ्या संपर्क यादीत अजूनही आहेत. ते नंबर फोनच्या यादीतून आणि ती मैत्री मनातूनही कधीच डिलिट न होणारी आहे…
m>( छायाचित्रे सौजन्य- गुगल )

-प्रवीण बर्दापूरकर
Cellphone ​+919822055799
www.praveenbardapurkar.com

=====================

‘डायरी’ , नोंदी डायरीनंतरच्या’ , ‘दिवस असे की…’ , ‘आई’ , ‘क्लोज-अप’ , ‘ग्रेस नावाचं गारुड’ , ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-

http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515

=====================

संबंधित पोस्ट