रेगेंच्या ‘ब्रांद’ची अशीही (!) आठवण…

|| नोंद…२१ ||

 

 

〈  ‘प्रियदर्शिनी’ – एका पुस्तकाचं गवसणं ! ही अजूगपणाची  २०वी नोंद प्रकाशित झाल्यावर अनेकांनी ‘ब्रांद’  या पुस्तकाच्या आठवणीबद्दल विचारणा केली ; कांहीनी तो लेख आठवत नसल्याचं सांगितलं ,म्हणून तो लेख-

घटना आहे नोव्हेंबर २००९च्या पहिल्या आठवड्यातली . नवीन कपाटात नीट लावण्यासाठी पुस्तकं आवरत असताना प्रख्यात नाटककार हेनरिक इब्सेन यांच्या ‘ब्रांद’ या नाटकाचा सदानंद रेगे यांनी केलेला अनुवाद सापडला . पुठ्ठ्याच्या बाईंडिंगची ती प्रत होती ; म्हणजे खास ग्रंथालायासाठीच ती तयार केलेली होती . ( काही लोकं , ज्याचा ‘आरएसटीएमयु’ असा अडाण्या-कुडाण्यासारखा उल्लेख करून सातत्यानं उपमर्द करत असतात ते ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ , असं भारदस्त नाव असलेलं विद्यापीठ , जेव्हा ‘नागपूर विद्यापीठ’ अशा केवळ दोन शब्दांनी ओळखले जात होतं ; त्या विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या मालकीचं ते पुस्तक होतं . ग्रंथालयाच्या  परत करण्याच्या तारखेचं जे लेबल त्यावर होतं , त्यावर ते पुस्तक ५ ऑक्टोबर १९८२ रोजी परत करायला हवं होतं . याचा थोडक्यात अर्थ असा की , गेली २७ वर्ष आणि वर काही दिवस हे पुस्तक विद्यापीठ ग्रंथालयाच्या बाहेर होतं आणि त्याकाळात आमच्याकडे मुक्कामाला होतं !

पुस्तक हातात घेतलं आणि चाळू लागलो . वाचनात मन रमलं नाही ;  तर त्या दिवसांत म्हणजे ते २७ वर्षांपूर्वीच्या १९८२च्या दिवसात विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या त्या परिसरात गेलं . तेव्हा त्या परिसरात ग्रंथालय , पत्रकारिता विभाग , पूर्णचंद्र बुटी सभागृह आणि समोर सेनापती बापट यांचा पुतळा होता . शंकरनगरकडून बर्डीकडे जाणारा आणि महाराज बागेतून रामदासपेठेच्या गाभाऱ्यात शिरणारा रस्ता आता  आहे , तेवढा प्रशस्त नव्हता ; प्रदूषण , आवाज आणि वाहतुकीची गजबज नव्हती . बाहेर झाडाखालीही आरामात बसून वाचता येत असे . कोपऱ्यावर एक चहाची टपरी होती . त्या चहाच्या टपरीवर ग्रंथालय आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी चहा पिताना आणि क्वचित सिगारेटी फुंकताना दिसत . अनेकदा त्यांना शिकवणारे प्राध्यापकही तेथे असत .

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचं ‘मास कम्युनिकेशन’ वगैरे वगैरे भारदस्तीकरण तेव्हा व्हायचं होतं आणि शरद पाटील त्या विभागाचे मानद प्रमुख होते . शेतकरी संघटनेच्या बहराचा तो काळ होता . त्या संघटनेचे कट्टर समर्थक आणि विदर्भाचे प्रवक्ते म्हणूनही शरद पाटील काम बघत असत . शेतकरी संघटनेची चळवळ हा लष्कराचा भाकरी भाजण्याचा एकंदरीत प्रकार असला तरी शरद पाटील तो अतिशय मन:पूर्वक करत असत . प्रकाश दुबे , अनिल शर्मा , प्रकाश देशपांडे यांच्यासह दोराईराजन , मनोहर अंधारे असे आम्ही वेगवेगळ्या विचारांचे , भिन्न मानसिकतेचे आणि विविधांगी जीवनशैली असणारे लोक शरद पाटलांच्या या कार्यालयात नियमित भेटत असू . पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंदळाचा अध्यक्ष झालेला कवीमित्र श्रीपाद भालचंद्र जोशीही अधून-मधून तिथे डोकवायचा . पूर्णचंद्र बुटी सभागृहही आतासारखं , ओसाडगावची पाटीलकी लयाला गेलेल्या पाटलाच्या वाड्यासारखं झालेलं नव्हतं . त्या सभागृहात भरपूर कार्यक्रम होत . डॉ . श्रीकांत जिचकार यांच्यासह अविनाश पांडे . डॉ . सुनील देशमुख , अंबादास मोहिते अशी अनेक मंडळी त्या परिसरात उत्साहानी फेसाळत आणि खळाळत असत . पत्रकार संघाने घेतलेल्या प्रख्यात गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ . विनय वाईकर यांनी आयोजित केलेल्या भोजनाचा कार्यक्रमही याच सभागृहात झाल्याचे आठवलं . आठवणींच्या पक्ष्यांनी मनसोक्त विहरत मनाचा असा ठाव घेतला . त्यात बराच वेळ रंगून गेलो ….

सदानंद रेगे

बराच वेळ गेला तरी ‘ब्रांद’ हे अनुवादित नाटक माझ्याकडे का आलं असावं , कसं आलं असावं आणि कोणी आणून दिलं असावं , याचा उलगडा होईना ! नाटकाशी माझा संबध केवळ प्रेक्षक म्हणून आणि तोही थोडाच संबंध आहे ; शास्त्र म्हणून नाटकाकडे बघण्याची दृष्टी आणि रुचीही मला अजिबात नाही . अगदी मोजके काही अपवाद वगळतापुस्तकाच्या स्वरुपात आणून नाटक वाचल्याचंही आठवत नाही . जिथे मराठी नाटकांच्या संदर्भात वाचक म्हणून अशी नकाराची भूमिका आहे तिथे ‘ब्रांद’सारखं प्रयोगशील अभिजात नाटकाचं पुस्तक विद्यापीठाच्या ग्रंथालयातून आवर्जून आणावं आणि वाचावं , असं काही घडल्याचं आठवेनासं झालं .

तरीही हे पुस्तक आलेलं तर आहे म्हणून ते कसं आलं असावं , याविषयी उत्सुकता निर्माण झाली कारण थोडे थोडके नव्हे तर तब्बल २७ वर्ष ते पुस्तक संग्रहात मुक्कामाला होतं आणि तरीही त्याची नोंद मनाने कधीच का घेतली नाही , असं कोडं पडलं ; त्याच्याशी खेळता खेळता मग ते कोडं लोभसही वाटू लागलं . इब्सेनच्या नॉर्वे या देशात गेलो तरीही त्याच्या गावी  किंवा एकूणच युरोपमधल्या कोणीही नाटककाराच्या गावाला जावं असं वाटलेलं नव्हतं . इब्सेन तर सोडाच पण ,   इंग्लंडमध्ये जाऊन शेक्सपियरच्या गावालाही जाण्याची इच्छा झाली नाही ; इतकी नाट्यशास्त्राविषयी विरक्ती असतानाही ‘ब्रांद महाराज’ आपल्याकडे कसे काय आले असावेत , या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात काही दिवस रंगून गेलो ,  सबकॉन्शस लेव्हलवर तोच प्रश्न मनात पिंगा घालू लागला , तरीही आठवेचना ! … आठवणार तरी कसं म्हणा ?  नात्या-गोत्याची वीण नाही , मैत्रीचा गंध नाही , त्या विषयाची किमान रुचीही नाही . मग हे सगळं आपल्याला परकंच  वाटणार पण , तरीही शोधाची ही प्रक्रिया सोसल्यासारखी सुरूच राहिली .

शोध लागला नाही पण त्या शोधाच्या सोसण्यावरून बोरकरांची एक कविता आठवली-

सोस तू माझ्या जीवा रे सोसल्याचा सूर होतो

सूर साधी ताल तेव्हा भार त्याचा दूर होतो

असे काही दिवस उलटले तरी इब्सेन , ‘ब्रांद’ , सदानंद रेगे हा सोसण्याचा भार मनावरुन उतरेना मग त्याचा सूर होणं लांबच राहिलं !

एक दिवस सकाळी फिरतांना अचानक आठवलं , सदानंद रेगे वारले १९८२ मध्ये आणि ऑक्टोबर महिन्यातच . त्यावेळेस कदाचित संदर्भासाठी हे पुस्तक आणले असावं का ? पण , तोही धागा पक्का होईना आणि सोसणं थांबेच ना  . रेगेंच्या मृत्यूचं वर्ष आणि महिना जरी तोच असला तरी पुस्तकाची प्रस्तावना आणि सदानंद रेगेंचे टीपण वाचल्यावर त्याचा मेळ कुठे काही जुळेचना ! सदानंद रेगे यांच्या ‘काळोखाची पिसे’ , ‘चंद्र सावली करतो’ , या कथासंग्रहातील काही कथा आणि ‘अक्षरवेध’ तसेच ‘गंधर्व’ या कवितासंग्रहातील काही कविता तरुणपणी मनावर दीर्घकाळ रेंगाळल्या होत्या पण , त्यातलंही काहीच आता आठवत नाही . सदानंद रेगेंची ओळख कवी आणि कथाकार म्हणून मनावर कायमची मुक्कामाला आलेली असताना त्यांचं हे अनुवादित नाटक कशाला आणलं असेल , हे काही आठवेचना ?

पुस्तक ज्यांच्या मालकीचं आहे , त्या विद्यापीठाच्या ग्रंथालयातल्या कोणालाही या पुस्तकाचा शोध कशी घ्यावासा वाटला नसेल का , वार्षिक तपासणीत ही बाब कधीच लक्षात कशी काय आली नसेल , कधी जर हे पुस्तक व्यक्तीशः माझ्या नावावरून नोंदल गेलेलं असेल तर त्यांनी मला एखादं स्मरणपत्र तरी पुस्तक परत करण्यासंबंधी पाठवलं का नाही किंवा असं काही स्मरणपत्र किंवा पुस्तक परत करण्याची हाक मारणारा साधा फोनही विद्यापीठाकडून आल्याचं आठवलं नाही . या २७ वर्षापैकी जी नेमकी साडेपाच–पावणेसहा वर्षे नागपूरबाहेर होतो त्या काळात विद्यापीठानं फोन केला असेल का , सदानंद रेगे यांच्यासारख्या एक महत्वाच्या लेखकाचं पुस्तक हरवल्याच्या जाणिवेने तेव्हाचे ग्रंथपाल व्याकुळ झाले असतील का , असे अनेक प्रश्न आणि त्याच्या न सापडणाऱ्या उत्तरांचे पुंजके या काळात आजूबाजूला अनोळखी नजरेनी बागडत होते .

अखेर एका सकाळी निर्णय घेतला की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयाला हे पुस्तक परत करु , जे ज्याचं आहे ते त्याला देऊन टाकू यात .  विद्यापीठाचे तत्कालिन ग्रंथपाल किशोर काळे यांना फोन केला . काय झालं ते त्यांना सविस्तर सांगितलं . त्यांनाही काही संदर्भ लागेना पण , ते असो . लोकसत्ताच्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या विदर्भ आवृत्तीचा तेव्हा मी संपादक होतो आणि लोकसत्ताचं विद्यापीठ बीट ज्योती तिरपुडे हिच्याकडे होतं . एक सविस्तर पत्र आणि ‘ब्रांद’ ज्योतीच्या हस्ते विद्यापीठाच्या ग्रंथालयाकडे पाठवलं पाठवलं आणि मन एकदम शांत झालं . फार दिवसांनी लेक घरी आल्यासारखं फिलिंग मनभर प्रसन्नपणे पसरलं . जीव त्यात हरवून गेला .

याही घटनेला आता साताठ वर्ष उलटून गेली तरी ब्रांद आमच्याकडे मुक्कामाला कसा काय आलेला होता या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाहीच .

–आणि हो , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानंही ते पुस्तक २७ ( हा लेख प्रकाशित झाल्यावरची आता ३ आणि आधीची २७ म्हणजे एकूण  ३० ) वर्षानी परत मिळाल्याची साधी पोचही आजवर दिलेली नाही…न लेखी ना तोंडी !

( हा लेख ‘वाघूर’च्या २०१७च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे )

 © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत   

प्रवीण बर्दापूरकर

( ११ जानेवारी २०२१ )

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट