उपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव !

एखाद्याच्या पराभवातही अशी विजयाची ऐट असते की आपण आचंबित; क्वचित नतमस्तकही होतो आणि काहींचा विजयही उपेक्षेचा धनी ठरतो. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव (जन्म- २८ जून १९२१ / मृत्यू- २३ डिसेंबर २००४) हे देशाच्या राजकारणातील अशाच उपेक्षेचे नाव. एका मुलग्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘हैदराबादेतील बंजारा हिल्स भागातील मालमत्ता विकावी, अन्य कोणाकडूनही मदत घेऊ’ नये असे रावसाहेबांनी सत्तेत असताना सांगितले होते, अशी आठवण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याने नोंदवून ठेवली आहे; ‘राजकारणातील संन्यासी’ असा त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांचे शिष्योत्तम मनमोहनसिंग यांनी केलेला आहे. तरी, नुकताच झालेला त्यांचा ९४वा जन्मदिवस साजरा केल्याचे वृत्त एका केवळ एका इंग्रजी वृत्तपत्रात-एक अगदी छोटीशी बातमी वगळता कोठेही वाचनात आले नाही.

गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणारे पी.व्ही.नरसिंहराव यांच्या रामटेक लोकसभा मतदार उमेदवारी अर्ज दखल करण्याच्या कार्यक्रमाला आम्हा काही पत्रकारांना रणजित देशमुख घेऊन गेले. पहिल्याच नजरेत भरला तो त्यांचा विरळ आणि चंदेरी-पांढरे केस असणारा विस्तीर्ण भालप्रदेश, गोरापान वर्ण, दोन्ही गालात काही तरी ठेवल्यावर दिसतो तसा मोठा चेहेरा, थोडे जाड आणि लांब ओठ (हेच ओठ नंतर नामवंत व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांनी पी.व्ही.नरसिंहराव यांची ओळख म्हणून रूढ केले), बारीक लाल काठाचे स्वच्छ धोतर, सिल्कचा किंचित तांबूस रंगाचा कुर्ता आणि दोन्ही खांद्यावर महावस्त्रासारखे शालसदृश्य वस्त्र. रणजित देशमुख, मधुकरराव किंमतकर, एन.के.पी. साळवे यांच्यासह तेव्हा उपस्थितीत असलेले सर्वचजण त्यांना ‘रावसाहेब’ असे संबोधत होते आणि त्यांच्याशी अत्यंत अदबीने वागत होते. पत्रकारांशी बोलतांना रावसाहेबांनी चक्क मराठीत संवाद साधला ; हा एक सुखद धक्का होता. १९८४सालचे, ते रावसाहेब यांचे पाहिले दर्शन आजही लख्ख आठवते. नंतर अनेकदा त्यांना पाहिले पण पक्के आठवतात ते राजीव गांधी यांच्या मृत्यूची बातमी आल्यावरचे रावसाहेब. १९९१च्या लोकसभा निवडणुकांचा मतदानाचा एक टप्पा पार पडलेला होता. केंद्रीय गुप्तचर खात्यात असलेले आणि आम्ही ज्यांना बॉस म्हणत असूत त्या दिवाकरराव कुळकर्णी यांनी राजीव गांधी यांची हत्या झाल्याची बातमी धक्कादायक बातमी कळवली. नंतर धनंजय गोडबोलेसह नागपुरात फिरत असताना कोणी तरी म्हणाले, ‘रावसाहेब रवी भवनात आहेत’. आम्ही तिकडे धावलो. एव्हाना रावसाहेबांचा पडता काळ सुरु झालेला होता. आंध्रचे मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात गृह, सरंक्षण,परराष्ट्र यासारखी महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद भूषविलेल्या रावसाहेबांना काँग्रेसने १९९१च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीही दिलेली नव्हती ! आम्ही पोहोचलो तर चुरगळलेले धोतर नेसलेले आणि बंडी घातलेले रावसाहेब एका सोफ्यावर बसलेले होते. शेजारी तांब्याचा तांब्या-फुलपात्र होते. रणजित देशमुख, याकुब नावाचा मुंबईचा पत्रकार तेथे होते. जीव गेल्यागत विजेने प्रकाशलेल्या खोलीत नजरेत भरला तो रावसाहेबांचा म्लान चेहेरा आणि कपाळावर आठ्यांचे जाळे . दिल्लीला लगेच कसे जाता येईल यासाठी त्यांची आणि रणजित देशमुखांची फोनाफोनी सुरु होती. रवी भवनच्या ऑपरेटरने डायरेक्ट लाईनही दिलेली नव्हती..सरकारी संथ लयीत ऑपरेटर फोन लावून देत होता. बहुदा तेव्हा गिरीश गांधी हेही तिथे होते किंवा आम्ही निघत असतानाच आले असावे…असे काहीसे आठवते, पण ते असो. ज्यांना दिलीला जाण्यासाठी लगेच विमान मिळत नाही तो हा माणूस उद्या देशाचा पंतप्रधान होणार असल्याचे विधीलिखीत लिहिले गेलेले आहे याचा पुसटसाही संकेत आम्हाला मिळालेला नव्हता…त्यानंतर अवघा महिनाभरात रामटेक लोकसभा मतदार संघातील महापुराने मोडून पडलेल्या मोवाडच्या आपदग्रस्तांच्या भेटीसाठी आलेले रावसाहेब म्हणजे पूर्ण ट्रान्सफर सीन होता ! विशेष सुरक्षा व्यवस्था, ती अम्लानता गायब झालेली, कांती तुकतुकीत, चेहेरा टवटवीत आणि चेहेऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून जात असलेला..पंतप्रधानपद नावाची सत्ता मिळाल्यावर जणू त्यांनी कातच टाकलेली होती !

रावसाहेब रामटेकला निवडणूक लढवायला आले म्हणून भेट झाली अन्यथा एखाद्या नागपूरच्या पत्रकाराला त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळायचे कारण नव्हते. ते दिल्लीत असत कारण, दिल्लीच्या त्यांच्या कामाचा व्याप मोठा होता. ते दोन-तीन महिन्यातून एखादी चक्कर मारत अन्यथा मधुकरराव किंमतकर त्यांचा मतदार संघ सांभाळत. रावसाहेब म्हणजे जातीवंत ज्ञानी माणूस. चेहेऱ्यावर शालीनता कायम मुक्कामाला. कोणताही तोरा नसलेला, अहंकाराचा वारा न लागलेला आणि महत्वाचे म्हणजे राजकारणाचा अविभाज्य घटक झालेला सत्तेचा माज त्यांच्या अवतीभवती फिरकण्याचे धारिष्ट्यही दाखवू शकत नसे ! एक मात्र खरे, कोणाचेही म्हणणे नीट लक्ष देऊन ते ऐकत आहेत असे दिसत असले तरी त्यांच्या मनात काय सुरु आहे याचा अंदाज मात्र येत नसे..मुरब्बी राजकारण्याचे हे लक्षण त्यांच्यात ठासून भरलेले होते. जन्म तत्कालीन आंध्र प्रदेशातील आणि आताच्या तेलंगणातील करीमनगरचा. शिक्षण हैद्राबाद, नागपूर आणि पुणे येथे झालेले. तेलगु, मराठी, उर्दू, इंग्रजी, संस्कृत, तमिल, कन्नड अशा १३ भाषा त्यांना अस्खलित येत. पदवी आणि पेशाने वकील. स्वातंत्र्य चळवळीतून तावूनसुलाखून निघालेले रावसाहेब १९६२साली राजकारणात आले. राज्यात मंत्री झाले, आंध्रचे मुख्यमंत्री झाले. १९६९साली काँग्रेसमध्ये जी ऐतिहासिक फूट पडली त्यात ते इंदिरा गांधी (आणि नंतर राजीव गांधी) यांच्या बाजूने ठाम उभे राहिले आणि राष्ट्रीय राजकारणात आले. सगळी महत्वाची खाती त्यांनी केंद्रात भूषविली. बोफोर्स कांडातही ते राजीव गांधी यांच्या बाजूनेच राहिले. कमी पण, ठाम बोलणारा, एकाच वेळी अर्थकारण आणि प्रशासन यात गति असणारा, बहुपेडी जातीव्यवस्था असणाऱ्या भारतारख्या देशाची नस ओळखणारा आणि जागतिक परिस्थितीचे भान असणारा नेता असे पी.व्ही.नरसिंहराव यांच्याविषयी कौतुकाने बोलले जात असे. बहुभाषाज्ञान आणि सांस्कृतिक भान असणारा शिवाय उत्तम कवी असल्याने -‘काँग्रेसचे अटलबिहारी वाजपेयी’ ही प्रतिमा होती.

राजीव गांधी यांच्या आकस्मिक हत्त्येनंतर पंतप्रधानपदाची ‘लढाई’ झाली ती पी.व्ही.नरसिंहराव आणि शरद पवार यांच्यात. अर्थातच विजयी झाले पी.व्ही.नरसिंहराव. रावसाहेबांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा काँग्रेस पक्ष सभागृहात अल्पमतात आणि राजकारणात भांबावलेला, विस्कळीत झालेला होता. देशाची स्थिती तर अत्यंत भयंकर होती. आज ग्रीस या देशाची आर्थिक आहे त्यापेक्षा भारताची स्थिती वाईट होती. गंगाजळी आटल्याने देशाचे सोने गहाण टाकलेले होते आणि देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. राजीव गांधी यांची जाहीर हत्या व्हावी अशी कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे टांगली गेलेली होती. काश्मीर खोऱ्यात अस्वस्थता ठासून भरलेली होती, पंजाब अतिरेक्यांच्या कारवायांनी धुसमुसत होता, आसामात अशांतता होती आणि हे कमी की काय म्हणून देशावर ‘मंदीर-मस्जिद’वादाचे गहिरे संकट घोंगावत होते.

जवाहरलाल नेहेरू यांच्या परदेश धोरणाचा पाया मजबूत करतानाच पंतप्रधान म्हणून पी.व्ही.नरसिंहराव यांनी देशाला मुक्त अर्थव्यवस्थेच्या वाटेवर नेण्याचे ठरवले आणि त्यासाठी राजकारणात नसलेल्या पण जागतिक ख्याती असलेल्या अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांच्या हाती अर्थखात्याची सूत्रे सोपवण्याचा धाडसी निर्णय घेतला . कधी चर्चा, कधी संवाद तर कधी ठामपणे या जोडगोळीने आर्थिक पातळीवर जी काही पावले तेव्हा उचलली त्याची फळे आज आपण खातो आहोत ; जगाची महासत्ता होण्याची स्वप्ने बघतो आहोत. नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांनी देशाची आर्थिक घडी नीट बसवली, गंगाजळी वाढवली, परवाना पद्धत बंद करून खाजगीकरणाचा मार्ग खूला केला, उद्योग आणि व्यावसायिक जगताला उभारी दिली, अभाव असलेल्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्राला गति दिली, सेवा क्षेत्राला संजीवनी दिली आणि पाहता-पाहता देशाच्या आर्थिक तसेच औद्योगिक दिशा उजळून निघाल्या. देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाला तोवर जे यश आर्थिक क्षेत्रात लाभलेले नव्हते ते पी.व्ही.नरसिंहराव यांच्या सरकारने प्राप्त केले आणि देशाच्या त्यापुढील वाटचालीला एक ठाम दिशा मिळवून दिली. त्यामुळे जागतिक बाजारपेठ भारताला खुली झाली आणि त्यांचे बहुसंख्य भले (आणि काही वाईट) परिणाम झाले. आर्थिक प्रगती, रोजगार निर्मिती यांच्या दरात वाढ झाली. लोकांच्या खिशात पैसा खुळखुळू लागला..दरडोई उत्पन वाढले. त्याचवेळी दुसरीकडे पंजाब, काश्मीर, आसाम ही दहशतवादाने धुसमुसणारी राज्ये शांत करत तेथे निवडणुका घेऊन लोकांच्या हाती सत्ता दिली. अल्प-मतात असलेल्या सरकारचे हे कर्तृत्व डोळे दिपवणारे होते. पी.व्ही.नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाच्या याच काळात सरकार टिकवण्यासाठी विश्वासदर्शक मतासाठी लांच, शेअर बाजार हर्षद मेहेता आणि हितेन दलाल यांनी पोखरून टाकणे यासारख्या लांच्छनास्पद घटनाही घडल्या. मंदीर-मस्जिद तणाव टोकाचा वाढला आणि परिणामी बाबरी मस्जिद पाडली जाऊन देश धार्मिक विद्वेषाच्या कड्यावर उभा राहिला ; तो आजवर सावरलेला नाही.

पक्ष पातळीवरही पी.व्ही.नरसिंहराव यांना कमी आव्हाने नव्हती. मुळात पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्याकडून मिळालेल्या आव्हानानेच कारकीर्द सुरु झाली. पवार यांच्याशिवाय सीताराम केसरी, अर्जुनसिंह असे अस्वस्थ आत्मे होतेच. आधी इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांच्या हत्त्येने पक्ष भांबावलेला-खरे तर गलितगात्र आणि नेतृत्वहीन झालेला असताना श्रीमती सोनिया गांधी यांनी नेतृत्व करण्यास नकार दिला. त्यामुळे पेच वाढला असताना पी.व्ही.नरसिंहराव हे पक्ष आणि सरकार अशा दोन्ही पातळीवर नेतृत्व म्हणून समोर आले. नुसतेच समोर आले नाही तर त्यांनी सरकार म्हणून देशाला ठाम दिशा दिली आणि पक्षाध्यक्ष म्हणून काँग्रेसची पुन्हा नीट बांधणी अगदी गाव पातळीपर्यंत केली. तोवर ‘काँग्रेस आय’ मधील ‘आय’ म्हणजे ‘इंदिरा’ होते ; रावसाहेब पक्षाध्यक्ष असताना त्यात Indian National Congress म्हणजे ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ असा बदल करण्यात आला. ‘गांधी’ नाव नसेल तरी काँग्रेस पक्ष म्हणून जगू शकतो आणि सरकारही अत्यंत सक्षमपणे चालवू शकतो हा विश्वास पी.व्ही.नरसिंहराव यांनी केवळ दिलाच नाही तर ते अशक्य शक्य करून दाखवले ! आणि इथेच सगळे बिनसत गेले… सोनिया गांधी आणि पी.व्ही. नरसिंहराव यांच्यातील दुरावा वाढतच गेला. तो वाढवणाऱ्या खूषमस्क-यांची काँग्रेसमध्ये वाणवा कधी नव्हतीच.. त्यामुळे दुरावा वाढत गेला.. इतका वाढला की त्यांच्यातील संवादही थांबला.

पक्षात सक्रिय झाल्यावर आधी सीताराम केसरी यांना अध्यक्ष करायला लावून सोनिया गांधी आणि त्यांच्या गटाने पी.व्ही.नरसिंहराव यांचे पंख कापले. नंतर त्यांच्याशी सल्लामसलत बंद केली, मग भेटी-गाठी बंद झाल्या आणि समोरासमोर आल्यावर तोंड फिरवाफिरवी सुरु झाली. त्यानंतर आर्थिक उदारीकरणाचे पी.व्ही.नरसिंहराव यांची श्रेय नाकारले गेले. त्यांच्यामागे चौकशा लागल्या, खटले दखल झाले पण, पक्षाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास नकारच दर्शवला. या सगळ्यातून ते सुटले तरी पक्षाने त्यांना जवळ केले नाही इतकी कटुता तीव्र झालेली होती. एवढेच कशाला मृत्यू झाल्यावर रावसाहेबांचे पार्थिव दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात नेऊ दिले गेले नाही ते गेटवरूनच परत पाठवण्यात आले आणि त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कारही होऊ दिले गेले नाहीत ; इतकी उपेक्षा वाट्याला आलेला देशाचा हा एकमेव पंतप्रधान आहे…

पी.व्ही.नरसिंहराव यांचे अंत्यसंस्कार काँग्रेसने म्हणजे सोनिया गांधी यांनी दिल्लीत होऊ दिले नाही असे आजही उघड बोलले जाते . दिल्लीत त्यांचे स्मृतीस्थळ अन्य पंतप्रधानांप्रमाणे निर्माण व्हावे अशी विनंती आंध्र सरकारने केली तेव्हा ‘त्यांचे स्मृतीस्थळ दिल्लीत निर्माण केले तर अनिष्ट पायंडा पडेल’, असे केंद्र सरकारच्या नागरी विकास खात्याने उद्दामपणे आंध्र सरकारला कळवले… त्यावेळी केंद्रात युपीएचे सरकार पी.व्ही.नरसिंहराव यांचे शिष्योत्तम मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली होते हे विशेष आणि सोनिया यांचा पी.व्ही.नरसिंहराव द्वेष पुढे चालवण्याला त्यांनी निमुटपणे मान तुकवली हे महत्वाचे !

आता नरेंद्र मोदी सरकारने एकता स्थळ या परिसरात पी.व्ही.नरसिंहराव यांचे स्मारक उभे करण्यास संमती दिली आहे ; त्यामुळेही काँग्रेसला मिरच्या झोंबल्या आहेतच. याच परिसरात आय.के.गुजराल, चंदशेखर, झैलसिंग, शंकरदयाळ शर्मा, आर.वेंकटरमण, के.आर.नारायण यांची स्मृतीस्थळे आहेत. हे स्मृतीस्थळ होईल तेव्हा होवो..‘उपेक्षा तुझे दुसरे नाव पी.व्ही. नरसिंहराव’ अशी नोंद भारताच्या राजकारणात झालेली आहे.

=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट