निसरड्या वाटानंतर डिजिटल वळण

देशाच्या आणि राज्याच्या राजधानीत काम करणं हे प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न असतं. राजकीय वृत्त संकलन करणाऱ्या कुणाही पत्रकारासाठी तर या दोन्ही ठिकाणी काम करण्याची संधी मिळणं अनमोल असतं. ती संधी मला मिळाली. मात्र, यात दिल्लीचं वळण अनपेक्षित होतं; त्याची थोडी पार्श्वभूमी सांगायलाच हवी – तब्बल २९ वर्ष एक्सप्रेस वृतपत्र समुहाच्या लोकसत्ता या तेव्हाच्या सर्वाधिक खपाच्या वृतपत्रात माझ्या पत्रकारितेचा प्रवास नागपूर ते मुंबई ते औरंगाबाद मार्गे शेवटी नागपूर आवृत्तीचा संपादक असा झाला़. मी लोकसत्ताचा दिलेला राजीनामा फारसा कुणाला माहिती होण्याइतके तासही उलटलेले नव्हते तोच म्हणजे; आदल्या रात्री राजीनामा दिल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई विमानतळावर उतरुन कारमध्ये बसतो न बसतो तोच, लोकमत वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष, तत्कालिन खासदार विजय दर्डा यांचा फोन आला. त्यांनी ‘लेटस बुक सीट फॉर यू इन लोकमत फ्लाईट’ अशी ऑफर दिली़. एकिकडे विजय दर्डा यांच्या या इंटिलिजन्सचं कौतुक वाटलं आणि दुसरीकडे त्यांनी दिलेली ऑफरही आवडली़. पण, लोकसत्ताचा राजीनामा देतांनाच दोन पुस्तकांच्या निर्मितीचं काम मनात होतं आणि ते संपल्याशिवाय दुसरी कोणतीही जबाबदारी स्वीकारायची नाही हे ठरवलेलं होतं. ते मी नम्रपणे विजय दर्डा यांच्या कानावर टाकलं. तरी मी नागपूरला परतल्यावर एकदा भेटायचं असं आमच्यात ठरलं. नागपूरला परतल्यावर मला लोकमतमध्ये आणण्याची जबाबदारी विजय दर्डा यांनी विदर्भाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज गिरीश गांधी यांच्यावर, सोपवलेली होती असं लक्षात आलं. मग आम्हा तिघांची एक बैठकही विजय दर्डा यांच्या नागपुरातील निवासस्थानी झाली़. हातातलं कामं संपल्यावर लोकमतला रुजू होईन, हे मी अखेर मान्य केलं. अन्य तपशील मात्र ठरले नाहीत.

‘दिवस असे की’ आणि लोकप्रभातील स्तंभ ‘नोंदी डायरीनंतरच्या’ या पुस्तकांच्या निर्मितीचं काम सुरु असतांनाच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या स्मृत्यर्थ दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या विशेषांकाची जबाबदारी घसघशीत मानधनासह सोपवतांनाच संपादकीय कामाचं पूर्ण स्वातंत्र्य गिरीश गांधी यांनी दिलं. परंपरेनं चालत आलेल्या ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ या समाजाला छेद देत आईकडे एक स्त्री म्हणून बघण्याचा दृष्टीकोन; असा माझ्या या आई या अंकाचा प्रदीर्घ काळ मनात रेंगाळलेला विषय होता़. नंतर ज्येष्ठ स्नेही डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हा अंक पाहण्यात आला; त्यांच्याच पुढाकाराने साधना प्रकाशनाकडून त्याचं पुस्तकही आलं. याच दरम्यान कवीवर्य ग्रेस यांच निधन झालं आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणा-या ‘ग्रेस नावाचं गारुड’ या प्रकल्पात मी अडकलो़. या दरम्यान, अधुनमधून विजय दर्डा यांच्याशी फोनवर बोलणं होत असे आणि लवकरच लोकमतला रुजू होण्यासंबंधी आम्ही दोघंही बोलत असू़ पण, मुहूर्त काही ठरत नव्हता. आई हा अंक आणि पुस्तकांच्या निर्मितीचं काम संपतं-न-संपतं तोच, पत्नी मंगला हिचं हृदयाचं अतिगंभीर दुखणं उद्भवलं. तिच्या हृदयात आठ ब्लॉकेजेस होते! ती शस्त्रक्रिया आणि त्यातून सावरणं यात मी आकंठ बुडालो़.

मधल्या काळात विजय दर्डा आणि माझ्यातला संपर्क जवळजवळ खंडितच झाला़. त्यातच एक दिवस त्यांच्या पत्नी सौ ज्योत्स्ना दर्डा यांच्या निधनाची बातमी आली़. ’ग्रेस नावाचं गारुड’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात व्यग्र असल्यानं मी अंत्यदर्शनालाही जाऊ शकलो नाही, ना विजय दर्डा यांची भेट घेऊ शकलो. मात्र, उठावणा कार्यक्रमाला गेलो. तिथे लोकांची अक्षरश: रीघ होती़. विजय दर्डा यांच्याशी जुजबी नमस्कार चमत्कार झाला़. रात्री उशिरा लोकमतमधून एका पत्रकार स्नेह्याचा फोन आला. विजय दर्डा यांनी दुसऱ्या दिवशी भेटता येईल का, अशी विचारणा केलेली़ असल्याचं त्यानं सांगितलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी मी विजय दर्डा यांना भेटलो़. पत्नीच्या मृत्यूच्या शोकात असूनही विजय दर्डा यांना मी लोकमतमध्ये रुजू झालो नाही याची चुटपूट लागलेली होती़; त्यामुळे मी अक्षरश: आचंबितच झालो़ आणि त्याच क्षणी लोकमतला जॉईन होण्याचा निर्णय घेतला़.

नंतर, कोणत्या आवृत्तीत रुजू व्हायचं हे ठरवण्यात बराच कालापव्यय झाला़. माझे एकेकाळचे ज्येष्ठ सहकारी आणि लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांच्यावर माझ्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती़. विजय दर्डा यांची इच्छा मी मुंबईला रुजू व्हावं अशी होती तर, रायकर मात्र मी अकोल्याला जावं म्हणून आग्रही होते. अर्थातच अकोल्यात मला काहीही रस नव्हता़. ही चर्चा बरीच रेंगाळली आणि हळुहळू लक्षात आलं की रायकर गटाला मी मुंबईत यायला नको आहे़. गंमतीचा भाग म्हणजे रायकर यासंदर्भात माझ्याशी थेट बोलतच नव्हते. माझा दोस्त डॉ. मिलिंद देशपांडे याच्यामार्फत ते संपर्कात होते. दिनकर रायकर खेळत असलेल्या या खेळी माझ्या व डॉ. मिलिंद देशपांडे यांच्या लक्षात आल्या; मग आम्ही दोघांनीच रायकरांना ‘खेळ’वायला सुरुवात केली! असं गुऱ्हाळ बरेच दिवस चाललं.

अखेर दोन-एक महिन्यांनी पुन्हा एकदा विजय दर्डा यांनीच पुढाकार घेतला आणि त्यांनी दिल्ली की मुंबई असा ​चॉईस विचारला. ३/४ वर्षासाठी मी दिल्लीला जावं असं आमच्यात ठरलं. त्यांनी माझ्या अपेक्षा विचारल्या, मी त्या त्यांना सांगितल्या. पॅकेज बद्दलची सर्व बोलणी ऋषी दर्डा यांच्याशी करावीत असं विजय दर्डा यांनी सुचवलं. लगेच, दोन-अडीच तासात ऋषी दर्डा यांचा फोन आला. माझ्या अपेक्षांबाबत बोलणं झालं. ‘उस बारेमे रायकरजी आपसे बात करेंगे’ असं ऋषी दर्डा यांनी सांगितलं. त्यांनी मागितल्याप्रमाणे लगेच बायोडेटा पाठवला.

पुन्हा रायकर आणि माझ्यात गुऱ्हाळ सुरु झालं. मी सांगितलेल्या सोयी सुविधा आणि पगारासंबंधीच्या अपेक्षांना रायकरांनी साफ नकारच दिला; असा नकार की जणू काही रायकर त्यांच्या खिशातूनच हा सर्व खर्च करणार होते. हेही गुऱ्हाळ थांबण्याची चिन्हे दिसेचना. अखेर एक निर्णायक बैठक ठरली. आमच्यातली अंतिम बोलणी दादरच्या कार्यालयात एका रविवारी दुपारी झाली. आमचं बोलणं सुरु असतांनाच ऋषी दर्डा यांचा फोन आला तेव्हा, ‘आपली ऑफर प्रवीणला मान्य नाहीये’, असं रायकरांनी त्यांना सांगूनही टाकलं! आमचा कॉमन मित्र मुकुंदा बिलोलीकर हाही त्यावेळेस हजर होता़. रायकरांचा एकूण नकारात्मक दृष्टीकोन ऐकून मी जाहीर केलं की ‘आता आपण थांबू यात!’. रायकरांनी निमूटपणे मान डोलावली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ‘सुटलो एका संकटातून’ असेच होते! मी आणि बिलोलीकर सिध्दीविनायक मंदिरापाशी येत नाहीत तोच ऋषी दर्डा यांचा फोन आला आणि त्यांनी नवीन ऑफर देत असल्याचं सांगितलं. मुलुंडला लेकीकडे पोहोचण्याच्या आतच लोकमत व्यवस्थापनाचा सोयी, सवलती आणि पगाराचा रीतसर प्रस्ताव एचआर मार्फत मिळाला . पुढच्या वीस-पंचवीस मिनिटांत आम्ही सर्वांनी चर्चा करुन तो स्वीकारत असल्याचा मेल लगेच ऋषी दर्डा यांना पाठवला मात्र, वेतनाची अपेक्षा यापेक्षा जास्त होती, हे नमूद करण्यास विसरलो नाही़.

विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा या दोघांशीही माझा जुना परिचय. हे दोघंही माझ्या लेखणीवर बेहद्द खूष असतं. तेव्हा केंद्रीय मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल आणि भाजप नेते नितीन गडकरी हे विजय दर्डा यांचे खास मित्र. या दोघांनीही माझ्या ‘स्वच्छते’ची खात्री विजय दर्डा यांना दिलेली असणार आणि  दर्डा यांनी ती खात्री करून घेतलेली असणार याची मला जाणीव होती. अन्यत्र असतात तसे लोकमतमध्ये अनेक अंतर्गत प्रवाह आहेत. राजेंद्र दर्डा यांचे चिरंजीव असलेले ऋषी दर्डा यांच्याकडे संपादकीय विभागाची अंतिम जबाबदारी आहे मात्र, ऋषी दर्डा तसंच दिनकर रायकर आणि गँग यांच्याशी माझं सूत कधी जुळलंच नाही. पण, खुद्द चेअरमन विजय दर्डा यांचा आग्रह असल्यामुळे ते मला सरळ सरळ नाकारुही शकत नव्हते, अशी ही गोची होती! अखेर नवी दिल्लीत फर्निश्ड फ्लॅट; तोही वसंत विहारसारख्या पॉश परिसरात, (विजय दर्डा यांनी खास नागपूरहून पाठवलेली होंडा अ‍ॅकॉर्ड ही) कार, ड्रायव्हर, महिन्याला वीस हजार रुपये पेट्रोल भत्ता, ड्रायव्हरचा पगार आणि याशिवाय माझा पगार असं हे कोणालाही हेवा वाटेल असं पॅकेज घेऊन दिल्लीत रुजू झालो तेंव्हा माझं वय ५७ वर्षांच होतं. अनेक मित्रांना या आम्ही वयात आणि आजारी मंगलला घेऊन दिल्लीला जाण्याची कल्पना वेडं साहस वाटत होती़ मात्र, या साहसाला मंगलाचं पूर्ण समर्थन होतं; त्याशिवाय मी तो वेडेपणा केलाच नसता, म्हणा!

दिल्लीत पत्रकारिता करण्याचं माझं स्वप्न तर साकार झाल्याचं दिसत होतं. पण आयुष्यात आलेलं हे वळण फार काळ टिकणारं नव्हतं हे दिल्लीत ​लँड होतांना माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. कारण, या वळणावर नाराजी, विरोध, वाद आणि प्रवादाचेही बरेच काटे पसरलेले आहेत याची काही कल्पना मला नव्हती. मुळचा नागपूरकर मित्र आणि माझ्या दिल्लीतील पालकत्वाची जबाबदारी स्वत:हून स्वीकारलेल्या, बड्या अधिकारी पदावर असलेला महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा खात्याच्या प्रफुल्ल पाठकसोबत महाराष्ट्र सदनाकडे कूच केलं तेव्हा मध्यम पाऊस सुरू होता़, ट्राफिक जाम होता आणि वाटा बऱ्याच निसरड्या झालेल्या होत्या़. त्याच निसरड्या वाटांवरून एक दिवस आपल्याला अचानक परत फिरायचं आहे याचे कोणतेही पुसटसुध्दा संकेत मला मिळालेले नव्हते…

====

दिल्लीत आम्ही रुळलो आणि मस्त रमलोही होतो. व्यक्तीगत पातळीवर क्षमा आणि प्रफुल्ल पाठक सोबतच जाई आणि आनंद बंग, पूजा आणि टेकचंद सोनावणे, भारती आणि विकास झाडे, शीलेश शर्मा अशा अनेक नवीन मित्रांची भर पडलेली होती. पत्रकारितेतील प्राचीन मित्र सुषमा आणि विजय सातोकर यांची होणाऱ्या भेटी आनंदायी होत्या. इंडियन हॅबिटॅट सेंटर, इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) ही आमच्या नियमित भेटीची आणि आठवड्यातून एक-दोन तरी संध्याकाळ घालवण्याची ठिकाणं झालेली होती.

दिल्लीत ज्या पध्दतीनं राजकीय घडामोडी वेगानं घडत होत्या, त्या कोणाही पत्रकाराला मोहात पडणाऱ्या होत्या. एक पत्रकार म्हणून अनुभवाची पोतडी संपन्न करणारं असं ते वातावरण होतं. निवडणुकीत दिल्ली राज्यात झालेलं सत्तांतर जवळून अनुभवता आलेलं होतं तर लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या मोठ्या सत्तांतराची चाहूल लागलेली होती. मात्र लोकमतच्या पातळीवर मी समाधानी नव्हतो. एक्सप्रेस वृत्त समुहात म्हणजे ‘लोकसत्ता’त एक साधा वृत्तसंकलक ते नागपूर आवृत्तीचा संपादक असा माझा प्रवास होतांना अत्यंत मोकळ्या आणि संपादकीयदृष्ट्या स्वतंत्र वातावरणात काम करता आलं. मी ‘माधव गडकरी स्कूल’चा असलो तरी नंतर अरुण टिकेकर, सुरश द्वादशीवार किंवा कुमार केतकर यांनी ते कधीच मनात आणलं नाही. आधी माधव गडकरी मग अरुण टिकेकर, सुरेश व्दादशीवार, कुमार केतकर, अरविंद गोखले यांच्यासारखे ज्येष्ठ संपादक आणि मुंबईत स्पेशल टीममधे करतांना दिनकर रायकर हे बॉस म्हणून लाभले. या प्रत्येकाच्या स्वभावामध्ये काही वैगुण्य होती, नाही असं नाही पण, यांच्या हाताखाली आणि सोबत काम करतांना कधी आपली गळचेपी होतेय, अवहेलना केली जातेय, डावललं जातंय असं कधी जाणवलंच नाही. ‘केतकर माझे बॉस आहेत’ किंवा ‘मी केतकरांच्या हाताखाली काम करतो’, अशी भाषाही माधव गडकरींप्रमाणेच कुमार केतकरांना आवडत नसे. अगदी चपराशाचाही ‘हा माझा सहकारी आहे’, असा उल्लेख केतकर करत असत. कधी कुणामागे ‘सर’ करत किंवा कुणाच्या नावापुढे ‘जी’ ‘जी’ करत एखादं पद किंवा लाभ पदरात पडून घ्यावा, असा अनुभव लोकसत्तातील नोकरीच्या २९ वर्षात कधीच आला नाही.

याचा अर्थ, ‘लोकसत्ता’त गटा-तटाचं राजकारण नव्हत, स्पर्धा नव्हतीच असं म्हणणं भाबडेपणा ठरेल. सगळ्याच संस्था आणि संघटनात थोड्या-बहुत प्रमाणात असतं, तसं स्पर्धा आणि गटबाजीचं वातावरण लोकसत्तातही होतं. लोकसत्ताची नागपूर आवृत्ती सुरु झाल्यावर सुरेश व्दादशीवार निवासी संपादक झाले. कारणं काहीही असोत (आणि त्यात द्वादशीवार यांची बाजू जास्तच समर्थनीय होती तरी) अरुण टिकेकर आणि सुरेश द्वादशीवार यांचं फार काही सूत जमलेलं नव्हतं, ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे नागपूर आवृत्तीत टिकेकर आणि व्दादशीवार समर्थक असे दोन गट स्वाभाविकपणाने पडले. नागपूर आवृत्ती सुरु होण्याआधीपासून मी लोकसत्तासाठी पत्रकारिता सुरु केलेली होती म्हणून स्वाभाविकच टिकेकरांच्या जास्त संपर्कात होतो; आमचा संपर्क त्या काळात अगदी दैनंदिन होता. त्यातच टिकेकर यांनी खास महाराष्ट्र टाइम्स मधून आयात केलेला त्यांचा ‘पित्तू’ द्वादशीवार कळपात गेला! त्यामुळे टिकेकर गटांच नेतृत्व ओघानं माझ्याकडे चालून आलं. तसं तर, सुरेश व्दादशीवार हे तर माझे अत्यंत जुने आणि ज्येष्ठ मित्र. त्यांच्या पत्नी-जयावाहिनीकडे बघितलं की, मला माझ्या आईची आठवण होत असे; हे जयावहिनी व सुरेश द्वादशीवार यांना माहिती असल्यानं आमच्या मैत्रीला एक हळवी किनारही होती. विदर्भ साहित्य संघ आणि अन्य अनेक व्यासपीठावर आम्ही सोबत वावरलो, वार्ताहर म्हणूनही सोबत काम केलं. अनेक विषयांचे गाढे अभ्यासक, लेखक, समीक्षक, प्राध्यापक, प्रभावी वक्ते, पत्रकार आणि उमदा स्वभाव अशा बहुपेडी व्यक्तीमत्वाचे धनी असणारे द्वादशीवार लोकसत्ताची नागपूर आवृत्ती सुरु झाल्यावर माझे बॉस बनले आणि आमचे ‘गोट’ही वेगळे झाले. तरी, आमच्यातले संबंध कायम सौहार्दाचे राहिले. मी जरी टिकेकर गटाचं प्रतिनिधित्व करीत असलो तरी, राजकारण जेवढ्यास तेवढंच हे कसब ठेवण्यात आम्ही दोघंही सहजगत्या व कमालीचे यशस्वी ठरलो. सुरेश व्दादशीवार यांच्या वाणी, व्यासंग आणि लेखणीबद्दल जितका नितांत आदर मला होता आणि आजही आहे अगदी तश्शीच माझ्या पत्रकारीतेच्या क्षमता आणि लेखणीबद्दल सुरेश व्दादशीवार यांची भावना होती. एक उदाहरणच सांगतो; आम्ही दोघं एकमेकांच्या विरुध्द गटाचे आहोत हे काही लोकसत्तात लपून राहिलेलं नव्हतं. त्यामुळे त्याचा फायदा उचलण्याचा काही सहकारी प्रयत्न करत असत. एका उपसंपादकाने काही कागाळ्या करतांना माझ्या पत्रकारितेच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्यावर व त्याबाबत हेकट भूमिका कायम ठेवल्यावर सुरेश व्दादशीवार जाम संतापले आणि त्यांनी सरळ त्याचा राजीनामाच घेतला. एवढंच कशाला नंतर काही वर्षांनी अरुण टिकेकरांच्या ब्लॅक लिस्टमध्ये मी गेलो तरी, आमच्यातला संवाद कायम होता. पत्रकार म्हणून असणारा माझा आवाका, वाचन आणि लेखणी याबद्दल कधीही प्रतिकूल टिपणी न करण्याचा उमदेपणा टिकेकर यांनी दाखवला हे आवर्जून नमूद करायला हवं. अशा निकोप वातावरणात मी कायम वावरत आलेलो होतो.

काम करत असतांना अगदी बातमीचा इंट्रो ठरविण्यापासून ते लेखाची लाईन ठरविण्यापर्यंत मला ज्येष्ठांकडून किंवा संपादकाकडून कोणताही त्रास झालेला नव्हता उलट; सतत काही तरी शिकण्याची आणि विकसित होण्याचीच संधी मिळाली. काही काळ आमचे वृत्तसंपादक असलेल्या रमेश झंवर यांना आम्ही जाम टरकायचो कारण त्यांना लेखन निर्दोष लागायचं; आमच्या लेखनात अचूकता येत गेली लेखन सफाईदार होत गेलं, याचं खूपसं श्रेय रमेश झंवर यांच्यासारख्या कडक मास्तरांना आहे. लोकसतामध्ये काम करत असताना दैनंदिन, वार्षिक किंवा कोणतंही संपादकीय म्हणा की वृत्त नियोजन करण्यात इनव्हॉल्व करुन घेतलं जायचं. अशी काही बैठक झाली आणि त्यास उपस्थित राहता आलं नाही तर भेट झाल्यावर बैठकीत ठरलेल्या बाबी संपादक आवर्जून कानावर घालत आणि त्या संदर्भात केलेल्या सूचना किंवा मत प्रदर्शन गंभीरपणे ऐकून घेत. उपनिवासी संपादक झाल्यापासून पुढे तर अशा नियोजनांचा मीही एक भागच बनलो. दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे आणि कुमार केतकर यांच्याकडून तर मी जे काही शिकलो ते अविस्मरणीय असंच आहे. संपादकाला जशी मतं असतात, काही एक भूमिका असते तशी मतं समोरच्याला असतात आणि त्यालाही प्रतिवादाचा अधिकार असतो. त्याला त्याचं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळायलाच पाहिजे; हे घुमरे आणि केतकर यांच्याकडून शिकायला मिळालेलं होतं.

====

लोकमतमध्ये मी आलो पण, आल्याबरोबरच माझ्यावर ‘चेअरमन्स बॉय’ असा जो ठसा बसला तो शेवटपर्यत कायम राहिला. लोकमतच्या दिल्ली ब्युरोत संपादकीय प्रमुख हरीश गुप्ता होते. इंडियन एक्स्प्रेसमधून हवाला केस उघडकीस आणणारे हेच ते पत्रकार. हरीश गुप्ता अस्सल हरियानवी; त्यामुळे उध्दटपणा आणि इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती त्यांच्यात ठासून भरलेली होती! मी म्हणजे ‘चेअरमन्स बॉय’, आपल्यावर हुकमत गाजवायला आलाय अशी भावना हरीश गुप्ता यांचीही झालेली होती. त्यामुळे सुरुवातीचे काही महिने त्यांच्याशी चकमक करण्यातच गेले. मी हरियानवी नसलो तरी उध्दटपणा ही माझी कवचकुंडलं आहेत आणि कामाच्या बाबतीत माझं नाणं खणखणीत आहे, हे हरीश गुप्ताला हळूहळू उमजत गेलं आणि तो नरमत गेला. नंतर हरीश गुप्ता आणि माझे सूर खूप छान जुळले, हा भाग वेगळा.

लोकमतकडच्या वातावरणाकडे वळण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की विजय दर्डा किंवा राजेंद्र दर्डा या दोघांकडून कोणताही त्रास मला कधीच झाला नाही. लोकमतमधे काम करणारेच बाहेर वावड्या उडवत असतात म्हणून आवर्जून नमूद करतो, अमुक-तमुक लिहावं किंवा लिहू नये, अशा प्रकारच्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सूचना मला या दोघांकडून कधीही मिळाल्या नाहीत. दिल्लीच्या सुरुवातीच्या काळात तर तेव्हा खासदार असलेले विजय दर्डा मला सोबत घेऊन अनेक ठिकाणी फिरले; अनेक नवीन ओळखी करून दिल्या. लोकमत वृत्तपत्र समुहासाठी दिल्लीत पत्रकारिता करण्याची संधी मिळाल्यानं माझं आकलन व्यापक झालं, भान विस्तारलं आणि परिणामी दृष्टी राष्ट्रीय झाली; त्यामुळे (तीन-चार व्यक्ती वगळता) लोकमत वृत्तपत्र समुहाविषयी आणि विजय तसेच राजेंद्र दर्डा या बंधुंविषयी कोणतीही कटुतेची भावना माझ्या मनाला शिवलेली नाहीये. बाहेरून न दिसणारे अंतर्गत जे ‘कार्पोरेट’ प्रवाह लोकमतमध्ये आहेत त्यात माझी ‘चेअरमन्स बॉय’ ही ओळख अडचणीची ठरली. लोकमतच्या संपादकीय विभागाची सूत्रे ऋषी दर्डा यांच्याकडे आहेत. माझं लोकमतमधील आगमन त्यांना रुचलेलं नाही हे त्यांनी लपवून ठेवलेलं नव्हतं; ‘बडे पापा ने (म्हणजे विजय दर्डा!) कहां है, आपकी बात सुननी तो पडेगीही’, असं सूचक नकारात्मक ते बोलत. संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांना मी शाळकरी मुलगा बघितलं आहे. तिशी–बत्तिशीच्या या तरुणांचं वर्तन आपण सर्वज्ञ आहोत अशा थाटात वयाने दुपटीपेक्षा मोठ्या असलेल्या कुवळेकर, रायकर, आणि माझ्याशी असायचं; खरं तर, ऋषी यांच्या वयापेक्षा आम्हा तिघांचाही पत्रकारितेतला अनुभव जास्त होता. सुसंस्कृतपणे ‘बॉसगिरी’ करायला माझी काही हरकत नव्हती, कारण ऋषी मालकच होता. शिवाय खरंच कुणीही ज्ञानी असेल तर वयाचा मुद्दा गौण असतो हे कळण्याच्या वयात मी होतो. ‘ऋषीसर’ किंवा ‘ऋषीजी’ असं त्यांना सर्वानी संबोधनं अनिवार्य आहे, असं मला सांगण्यात आलेलं होतं. ऋषी दर्डा यांची वर्तणूक घमेंडी असायची; त्यांच्यासमोर सर्वानी झुकण्याची परंपरा निर्माण झालेली होती; मला तर अशा वर्तनाची संवयच नव्हती. ‘अमुक याचा (म्हणजे कोणी तरी सनदी अधिकारी) नंबर काढून द्या, अमुक आता कुठे आहे किंवा तमुक बातमी का आली नाही’ अशा त्यांच्याकडून होणाऱ्या जरबेच्या आवाजातील विचारणा या मला अतिशय अपमानास्पद वाटत असत. ऋषी दर्डा यांचा पुष्कर कुळकर्णी नावाचा सहाय्यक अनेकदा मेलद्वारे सूचना करत असे किंवा त्याचा फोन आला तर तो दमात घेतल्यासारखा बोलत असे. त्याने दिलेल्या सूचना ऋषी यांच्या आहेत हे समजण्याची प्रथा होती. संपादकांऐवजी अन्य कुणाकडून सूचना घेण्याची संवय मला नव्हती. त्यामुळे पुष्करकडून येणारे मेल अवमानकारक वाटत असत. एकदा तर रात्री उशीरा अग्रलेख काढून माझा स्तंभ अग्रलेख म्हणून वापरला गेला आणि त्याबद्दल मला काहीच कल्पना देण्यात आली नाही! सकाळी इंटरनेटवर अंक बघितला तर माझा स्तंभ नाही. मग औरंगाबादच्या एका सहकाऱ्यानं काय घडलं ते सांगितलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातला तो अग्रलेख होता म्हणे; पण तो अग्रलेख आणि माझा स्तंभ गोवा आणि सोलापूर आवृत्तीत प्रकाशित झालाच; अशी ती एक सुरस कथा आहे. सर्व संपादकीय निर्णय जर ‘दर्डाज’ घेत असतील तर संपादक कशाला हवेत अशी पृच्छाच मी एकदा विजय दर्डा यांच्याकडे केली, तेव्हा ते गालातल्या गालात सूचक हंसले.

लोकमतचा संपादकीय विभाग ज्याला न्यूज डेस्क आपण म्हणतो तो; मी जेव्हा रुजू झालो तेव्हा मुंबईत तर संपादकीय पान पुण्यात होतं. न्यूज डेस्कचे प्रमुख दिनकर रायकर तर संपादकीय पानाचे सूत्रधार विजय कुवळेकर होते. कुवळेकर यांच्याशी माझा थेट संवाद फारच क्वचित झाला; ते त्यांचं म्हणणं एखाद्या सहायकामार्फत कळवत! माझी ‘रिपोर्टिंग ऑथारिटी’ असणारे दिनकर रायकर हे एकेकाळी लोकसत्तात माझे ज्येष्ठ सहकारी म्हणजे डेप्युटी एडिटर होते. त्यांच्या स्पेशल टीममध्ये मी प्रदीर्घ काळ काम केलं होतं. मात्र, लोकसत्तात अनुभवलेले उमदे रायकर आणि लोकमत मधले रायकर याच्या महदअंतर होतं. लोकसत्तातले रायकर पूर्णपणे ‘जर्नालिस्टीक’ होते, ते सर्वांशी अतिशय खेळीमेळीत वागत असत, प्रसंगी पाठीशी उभे राहत असत, मार्गदर्शन करत असत. लोकमतमधले दिनकर रायकर हे व्यवस्थापनाच्या पूर्णपणे अधीन खरं तर, अधीन हा शब्द अपुरा आहे; पूर्णपणे दंडवत घातलेले रायकरांचं बघायला मिळाले. खाजगीत ‘दर्डा लोकां’ची यथेच्छ टिंगल आणि प्रत्यक्षात मात्र ‘हांजी हांजी’ असं बिनकण्याचं शिवाय खुरट्या उंचीचं आणि किरट्या वृत्तीचं होण्यामागे रायकर यांची काय मजबुरी होती ते कधी कळलं नाही. त्यांच्यातला हा बदल बघून थक्कच व्हायला झालं. मुळात मी लोकमतमधे रुजुच होऊ नये असं रायकर यांना वाटत होतं; त्यामागे कोणती असुरक्षेची भावना त्यांच्या मनात होती हे, त्यांनी कधी बोलूनच दाखवलं नाही.

मी लोकमत मध्ये रुजू झालो आहे, याचा स्वीकारच मुंबईच्या डेस्कने म्हणजे रायकर आणि कंपूने केला नाही. मुंबई डेस्कच्या बोलण्यात कायम ‘तुला ठाऊक नाही आमच्याकडे असं आहे’, ‘बाबुजींना विचारावं लागेल’ अशी भाषा ऐकायला मिळाली. माझा दिल्ली दिनांक हा स्तंभ सुरु करण्यासाठीसुध्दा विजय दर्डा यांना लक्ष घालावं लागलं इतकी ही कंपूशाही तीव्र होती. रशियात होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी पंतप्रधानांसोबत जाण्यासाठी माझी निवड थेट विजय दर्डा यांनी केल्यावर तर रायकर आणि कंपू जाम बिथरला. रायकर आणि कंपू विजय आणि राजेंद्र दर्डा यांच्या नावाने काहीही दडपून सांगतो असं लक्षात आल्यावर, एकदा पुण्याच्या संपादकीय बैठकीत मी हे सांगितलं तेव्हा सॉलिड हल्लकल्लोळ माजला, विजय दर्डा अस्वस्थ झाले! मग बैठकीस हजर असलेल्या प्रत्येकानं लोकमतमधे संपादकीय स्वातंत्र्य असल्याचा राग आळवला…मी मात्र मनात मनात जाम हंसत होतो.

====

 

संपादक असूनही लोकमतच्या एक-दोन अपवाद वगळता दैनंदिन किंवा वार्षिक संपादकीय नियोजनामध्ये किंवा निर्णय प्रक्रियेत मला सामावून घेतलं असं कधी घडलंच नाही. त्यासंदर्भात मी नाराजी व्यक्त केल्यावर जणू काही मी कोणाची तरी विनाकारण हत्या केलीये, असा हंगामाच रायकर आणि कंपूनं माजवला; मग माझी तक्रार आणि सुनावणी वगैरे तद्दन बालिश प्रकार घडले. हे सगळं मी वेळोवेळी विजय दर्डा यांच्या कानी घालत असे. हा बेबनाव टळावा यासाठी विजय दर्डा यांनी ऋषी दर्डा आणि माझी एक स्वतंत्र ‘शिखर परिषद’ही आयोजित केली पण, परिस्थितीत फार काही बदल झाला नाहीच.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक, डॉ. नरेंद्र जाधव त्या काळामध्ये केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून दिल्लीत होते. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अगदी जवळच्या गोटात ते होते. नरेंद्र जाधव माझे जुने स्नेही त्यामुळे दिल्लीत पाय टाकल्याबरोबरच आमच्या मैत्रीचं पुनरुज्जीवन झालं, आम्ही नियमित भेटू लागलो. अशा एका भेटीत नरेंद्र जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची असलेली इच्छा बोलून दाखविली. पक्षश्रेष्ठीही त्यांना लोकसभेची उमेदवारी लातूर मतदार संघातून देण्यास अनुकूल होते, अशा टिप्स मग कॉंग्रेस वर्तुळातून मिळत गेल्या. नरेंद्र जाधव यांच्या मनात लातूर की पुणे असा संभ्रम होता. मात्र यासंदर्भात मी दिलेल्या बातमीवरून इतका काही गहजब माजवला गेला की शेवटी त्यातही विजय दर्डा यांना हस्तक्षेप करावा लागला. (नंतर नरेंद्र जाधव यांनी निवडणूक लढवलीच नाही काही काळाने ते भाजपच्या निकट गेले!)

दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच लेकीच्या एंगेजमेंटची तारीख ठरलेली होती ; नंतर तो दिवस  नेमका निकालाचा निघाला . दिल्लीच्या निवडणुका जाहीर झाल्यावर ती बाब मी रायकरांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा ‘खूप लोक आहेत आपल्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. तू घे रजा सायलीच्या एंगेजमेंटसाठी’ असं रायकरांनी मला आश्वस्त केलं. प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी मी मुंबईत असल्याचं कळल्यावर ऋषी दर्डा यांनी केलेला थयथयाट मालकपणाच्या माजाचा कळस होता; मी त्याबद्दल आजवर कोणाशीच काही बोललेलो नाही कारण लेकीनं तिच्या पसंतीने ठरवलेल्या विवाहाची एंगेजमेंट ही आमच्या आयुष्यातली एक महत्वाची आणि आनंदाची घटना होती. एक मात्र खरं, त्यामुळे मी खूपच दुखावलो गेलो पण , त्याचे कोणतेही पडसाद न उमटू देता  सकाळपासून टीव्हीवर निकाल बघून मी हजार-बाराशे  शब्दांचा निवडणूक विषयक विश्लेषणात्मक मजकूर पाठवला आणि तो मजकूर  दुसऱ्या दिवशीच्या अंकात प्रकाशितही झाला . तरीही आदल्या दिवशी घडलेल्या त्या प्रसंगाने आपण लोकमत सोडलं पाहिजे ही भावना मनात प्रबळ होऊ लागली.

लोकमतमधील दिवसेंदिवस प्रदूषितच होत जाणाऱ्या वातावरणामुळे जगण्यात शांतता अशी लाभत नव्हती. काम संपलं की वाचावं, आवडती गाणी ऐकावी, फिरावं, मित्रांत रमावं हा माझा स्वभाव; मुळात खूप गटातटाचं राजकारण करावं, सतत हेवे दावेच करत राहावेत, कुणाला तरी कायम कमी लेखावं, चुगल्या कराव्यात, हांजी हांजी करावी, ही माझी वृत्तीच नाही; त्यामुळे मला गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. त्याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी औरंगाबादला झालेल्या बैठकीत पसंतीचा उमेदवार कोण असावा, कोणाला झुकतं माप द्यायचं, त्याची किंमत किती असावी अशा चर्चा संपादकांच्या बैठकीत खुलेपणाने झाल्यानंतर मला उबगच आला. या वातावरणात आपण फार काळ गुंतून राहू शकणार नाही याची स्पष्ट जाणीव मला औरंगाबादच्या बैठकीनं करून दिली.

रायकरांच्या नेतृत्वाखालचा मुंबईचा डेस्क आणि मी यांच्यातलं अंतर दिवसेंदिवस वाढतच चाललेलं होतं. त्यातच आणखी एक बाब घडली. लोकसत्ताचा राजीनामा देईपर्यत मी मराठी टंकलेखन संगणकावर करत नसे; मला ते करताही येत नव्हतं. लोकसत्ता सोडल्याच्या हळूहळू मी संगणकावर मराठी टंकलेखनाचा सराव सुरु केलेला होता. त्यामुळे स्वभाविकपणाने माझ्या लेखनामध्ये ऱ्हस्व, दीर्घच्या चुका होत (अजूनही होतात!), शब्द इकडचे तिकडे होत असत; ही गडबड मला पूर्णपणाने मान्य होती आणि माझी कॉपी नीट बघून घ्या कारण ‘मी कुशल ऑपरेटर नाही’, हे डेस्कला वेळोवेळी सांगत आणि मजकुरावर नोंदवतही असे. शिवाय दिल्लीसारख्या नवीन वातावरणात, अपरिचित शहरामध्ये पहिल्या दिवशीपासून ‘स्टार परफॉर्मन्स’ देणं कधीच कुठल्या वार्ताहराकडून होणं शक्य नसतं, हे रायकर आणि कंपू समजूनही न उमजण्याचं ढोंग करत बातम्या कशा चुकतात, मला मराठी भाषा कशी येत नाही, लेखनात कशा चुका राहतात याच्या कागाळ्या करण्यात आणि त्या चुकांचा डोंगर उभारण्यात रंगून गेलेला होता.

औरंगाबादची बैठक आटोपून दिल्लीला परतल्यावर एक दिवस विजय दर्डा यांच्याशी गप्पा मारत असतांना त्यांनी मुंबई डेस्कची माझ्या संदर्भातली असणारी अढी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितली आणि यावर काही तरी मार्ग काढला पाहिजे असं सुचवलं. त्याबद्दल माझीही नाराजी व्यक्त करत मी विजय दर्डा यांना म्हणालो, ‘ हे असं फार काळ चालू ठेवण्यात मला तरी रस नाही. एखाद्या दिवशी तुम्ही भारतात नसाल आणि मला जर निलंबित करून टाकलं तर माझी साडेतीन दशकांची पत्रकारिता मातीमोल होईल, प्रतिमा मलीन होईल. त्यापेक्षा मी राजीनामा देतो’. त्यावर विजय दर्डा काहीच बोलले नाहीत. त्याचं हे मौन म्हणजे संमती आहे असं मी गृहीत धरलं.

याच दरम्यान डॉ. मिलिंद आणि डॉ. अंजली देशपांडे दिल्लीला आमच्याकडे आलेले होते. एका रविवारी आम्ही आग्र्याला जाऊन आल्यानंतर ड्रिंक्स घेत, गप्पा मारत असतांना मी राजीनामा लोकमतकडे पाठवून दिला. सकाळी डॉ. देशपांडे दांपत्याला विमानतळावर सोडून येतांना लोकमतचा राजीनामा दिला असल्याचं मिलिंदला सांगितलं. त्याला फारसं काही आश्चर्य वाटलं नाही. मिलिंद म्हणाला, ‘हे मला अपेक्षित होतं. खरं तर, तू तिथे गेलाच कसा याचं मला आश्चर्य वाटत होतं!’ हे मिलिंदनी याधीही दोन-तीन वेळा बोलून दाखवलं होतं. घरी आल्यावर ही वार्ता पत्नी मंगला, लेक सायली आणि मुकुंदा बिलोलीकरला कळवली. ‘हे आज ना उद्या घडणारच होतं’, अशा स्वरूपाची त्या तिघांची प्रतिक्रिया होती.

राजीनामा दिल्यावर लोकमतची कार परत करण्यासाठी गेलो तेव्हा विजय दर्डा यांची भेट झाली. पुढे काय असं त्यांनी विचारल्यावर लोकसभा निवडणुका संपेपर्यंत दिल्लीतच राहणार असल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यावर दिल्लीत आहात तो पर्यंत कार राहू द्या तुमच्याकडे, असं त्यांनी आग्रहानं सुचवलं. त्यास नम्रपणे नकार देतांना माझ्याकडे नागपूरहून आणलेली कार असल्याचं त्यांना सांगितलं. पण, त्यांच्याकडून आधी मिळालेली सुसंस्कृत वागणूक आणि या कृतीने लोकमत सोडतांना विजय दर्डा यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही नकाराची भावना किंवा अढीही निर्माण झाली नाही, हे मात्र खरं.

====

 

लोकमतचा राजीनामा दिल्यानंतर काय करायचं हा एक फार मोठा प्रश्न होता. लोकसभा निवडणुकांचा प्रचार संपेपर्यंत आम्ही दिल्लीतच राहिलो. आपण नागपूरला परतावं आणि पुन्हा लेखन, वाचनात मग्न व्हावं अशी माझी इच्छा होती परंतु, पत्नी मंगलाने औरंगाबादला स्थायिक होण्याचा आग्रह धरला. औरंगाबादला आपला मोठा फ्लॅट​ आहे. मुंबई, दिल्ली, नागपूरला आपण लहान घरात राहिलो. आता औरंगाबादला जावून मोठ्या घरामध्ये राहू यात. ती कल्पना मलाही आवडली. औरंगाबादला जीवाभावाचे मित्र होते. पण, ज्या वळणावर मी अचानक आलेलो होतो त्याच वळणावर मी ‘जॅम’ झालो होतो! माझ्या समोरचे प्रश्न आर्थिक होते तसे ते मानसिक कुचंबनेचेही होते. दिल्लीत राहून मराठी प्रकाश वृत्त वाहिन्यांसाठी काम करुन अर्थाजन करण्याचा प्रयत्न  साफ फसलेला होता. दोन वृत्तवाहिन्यांनी काम करून घेतलं आणि ठेंगा दाखवलेला होता! माझ्याकडे नाव होतं, प्रतिमा होती मात्र खिसा रिकामा होता.

लोकसत्ता सोडल्यानंतर आमचा सप्टेबर महिन्यात ड्यू असणारा आरोग्य विमा भरण्याची वारंवार आठवण मी एजंटला करून दिलेली होती. पण पठ्या निघाला एकदम वऱ्हाडी गडी! मार्च उलटला तरी विम्याची रक्कम आपल्या खात्यातून वळती झालेली नाही, असं लक्षात आलं तेव्हा मी त्याला खडसावून विचारलं. तर त्यानं अगदी खास वऱ्हाडी ठसक्यात सांगितलं, ‘विसरून गेलो नं बुआ’. मला धक्काच बसला. वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर अशा पध्दतीनं हेल्थ इन्शुरन्स टर्मिनेट होणं हे फारच धोकादायक होतं. त्यातले धोके लक्षात येवून मनाचा क्षणभर थरकापही उडाला. परंतु सुदैवाने मंगला आणि माझी प्रकृती ठणठणीत होती. तरीही प्रकृतीचं दोन अधिक दोन बरोबर चार असं कधीच नसतं, हे मला ठाऊक होतं. आम्ही तातडीनं नवी पॉलीसी काढली पण, त्यात नियमाप्रमाणे मोठ्या आजारासाठी पहिले सहा महिने संरक्षण नव्हतं.

…आणि जे घडायचं नको होतं तेच घडलं. नेमकं मंगलाला हृदयाचा दुखणं उद्भवलं. तिच्या हृदयात आठ ब्लॉकेजेस निघाले. त्यापैकी सहा ब्लॉकेजेसचं ऑपरेशन करणं अत्यंत गरजेचं ठरलं. नितीन गडकरी, डॉ. अभय बंग, मुकुंदा बिलोलीकर, डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. प्रदीप मुळे, गिरीश गांधी, अविनाश रोडे असे असंख्य मित्र धावून आले. परंतु विम्याचं सरंक्षण नसल्यामुळे ऑपरेशनमुळे पडणारा खड्डा खूप मोठा होता; त्यात गंगाजळी आटलेली होती. आधी दिल्ली आणि मग औरंगाबादच्या घराच्या केलेल्या नूतनीकरणाचा खूप खर्च मोठा होता; त्यातच लेकीचं लग्न हांकेच्या अंतरावर आलेलं होतं. तरीही आर्थिक प्रश्न फार गंभीर होणार नाहीत याची खात्री होती कारण मुकुंदा बिलोलीकर, डॉ. मिलिंद देशपांडे यांच्यासारखी मित्र मंडळी भक्कमपणे पाठीशी उभी होती.

लोकमतमध्ये ‘दिल्ली दिनांक’ हा माझा साप्ताहिक स्तंभ सुरु झाला. ‘दिल्ली दिनांक’ सुरु झाल्यावर ‘लोकसत्ता’सारखा प्रतिसाद मिळत नाही असं माझ्या लक्षात आलं. मग मी अधूनमधून लिहित असलेल्या ब्लॉगवर तो मजकूर लोकमतला क्रेडीट देऊन दर शनिवारी दुपारी अपडेट करण्यास सुरुवात केली. लोकमत सोडल्यावर एक दिवस माझ्या असं लक्षात आलं की, आपण हा ब्लॉग जर शब्दसंख्या वाढवून अधिक नियमितपणे चालवला, तर झालेली मानसिक कोंडी आपण फोडू शकतो; शिवाय त्यातून अर्थार्जनही होऊ शकतं. माझ्या ब्लॉगचं काम नागपूरचा अविनाश देवडे हा तरुण अभियंता करतो. त्याच्याशी चर्चा केली तर हा ब्लॉग व्यावसायिक करु शकतो असं त्यानं सुचवलं. त्यासाठी ब्लॉग रिलॉंन्च करायच ठरविल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही वृत्तपत्रांशी संपर्क साधला. उद्याचा मराठवाडा (नांदेड), संचार (सोलापूर), गांवकरी (नासिक), जनमाध्यम (अमरावती) अशा काही वृत्तपत्रांनी मजकूर प्रसिध्द करण्याची तयारी दर्शवली; मानधन देण्याच कबूल केलं. याच दरम्यान अविनाश धर्माधिकारीचा फोन आला. तो सनदी अधिकारी होण्याआधीपासून आमची ओळख; त्यानं शासकीय सोडल्यानंतरही आमचे संबध कायम होते. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी त्याने सुरु केलेल्या चाणक्य या संस्थेच्यावतीने ‘स्वतंत्र नागरिक’ हे साप्ताहिक प्रकाशित करण्यात येत होतं. त्या साप्ताहिकाची जबाबदारी मी घ्यावी असं अविनाशनं सुचवलं. मात्र लोकसभा निवडणुका संपेपर्यंत दिल्ली सोडायची नाही असं ठरवलेलं होतं आणि याच दरम्यान आता कुठेही नोकरी करायची नाही या निर्णयाप्रत मी हळूहळू येऊ लागलो होतो. मात्र ‘स्वतंत्र नागरिक’साठी नियमितपणे लेखन करण्याची हमी मी आणि त्या बदल्यात समाधानकारक मानधन देण्याचं अविनाशनं कबूल केलं. इतकी वर्ष मुद्रित माध्यमात घालवल्यावर आता स्वत:चं अस्तित्व ‘डिजिटली’ सिध्द करण्यासाठी, नव्यानं धडपड करण्यास मी तयार झालेलो होतो. या धडपडीला नंतर काही वर्षांनी चांगलं यश येणार आहे, याचा मात्र काहीच अंदाज आलेला नव्हता.

२००७ साली मला ‘साल्सबर्ग सेमिनार’ची एक आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती मिळाली होती. बदलत्या तंत्रज्ञानाचा माध्यमावर होणारा परिणाम हा त्या अभ्यासवृत्तीचा विषय होता. तेव्हा युरोप आणि अमेरिकेतल्या मुद्रित माध्यमासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता. कारण त्यांचे खप वाढत नव्हते; डिजिटल एडिशन मात्र वेगाने वाढत होत्या. अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे असा त्यांच्या समोर जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. जगातल्या काही मुलभूत समस्यांवर अत्यंत गंभीरपणे विचार करणारी ‘साल्सबर्ग सेमिनार’ ही संस्था आहे. युरोप अमेरिकेतील मुद्रीत माध्यमांसमोर उभ्या ठाकलेल्या समस्येच्या संदर्भात साल्सबर्ग सेमिनारमध्ये जगातल्या एकोणसाठ देशाच्या प्रतिनिधींची विचारमंथन करण्यासाठी ही अभ्यासवृत्ती होती. तिथं आशियायी देशांचं नेतृत्व करण्याची संधीही मला मिळाली. त्या अभ्यासाच्या, त्यासाठी युरोप अमेरिकेच्या केलेल्या भटकंतीमुळे उद्याचा जमाना हा डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे आणि मुद्रित माध्यमाचे खप याच्यापुढे वाढण्याची शक्यताही कमी असेल, हे लक्षात आलेलं होतं. दुसरीकडे भारतातील मुद्रीत माध्यमांचे खप वाढत आहेत हीसुध्दा वस्तूस्थिती होती; मात्र बहुतेक सर्व मोठी व्यवस्थापनं वेगवेगळ्या योजना राबवून वृत्तपत्रांचे खप वाढवून घेण्यासाठी यासाठी प्रयत्न करीत होते. आज ना उद्या या सवलतीच्या योजना संपल्या की हे खप कोसळणार हे स्पष्टच होतं; हे लक्षात येण्याचं कारण त्या काळात मी लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचा संपादक होतो.

 

मग मी सर्व लक्ष ब्लॉग लेखनावर केंद्रित केलं; आणखी एका नवीन वळणावर मी येऊन पोहोचलो होतो आणि ते होतं ‘सेल्फ मार्केटिंग’चं. लिहिलेला मजकूर अनेक नियतकालिकात प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती सुरु झाली पण, सुरुवातीला ब्लॉग लेखनाला अतिशय कमी प्रतिसाद होता; इतका कमी की, निराश वाटायला लागलं. पण, समोर पर्यायच नव्हता. हा वाचकच नवीन होता आणि तो मिळवण्यासाठी मलाच माझं मार्केटिंग करावं लागणार होतं. मग मी संकोचाची भावना खुंटीला टांगून ठेवली आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकपेज, एसेमेस, व्हाटस अप, अशा माध्यमातून ब्लॉगचं मार्केटिंग सुरु केलं; प्रसिध्दी होत गेली. हळू हळू प्रतिसाद वाढत गेला. डेलीहंट, अक्षरनामा या पोर्टल्सनी ब्लॉग मागितला. मानधन देणं सुरु केलं. शिवाय अन्य काही वृत्तपत्रात लेखन सुरु केलं. हळूहळू मी माझ्या पायावर पुन्हा उभा राहिलो पत्रकार म्हणून माझी ओळख मुद्रित माध्यमांच्या कक्षा ओलांडून विस्तारली; आणखी नवीन वाचक मोठ्या संख्येने मिळाले; हे वाचक जसे लोकल आहेत तसेच ग्लोबलही आहेत. महत्वाचं म्हणजे

प्रतिमा आणखी उजळ झाली .

आता , मी या डिजिटल वळणावर उभा आहे !

( ‘दिल्लीचे दिवस’ या लेखनातील हा संपादित मजकूर ‘उद्याचा मराठवाडा’ या दिवाळी अंकाच्या सौजन्याने . अक्षर लेखन आणि चित्रे नयन बाराहाते यांची आहेत . )

संबंधित पोस्ट