सुंदरलाल बहुगुणा येती घरा !

त्रकारिता करताना अनेक प्रसंग आणि व्यक्ती येऊन कधी आदळतील यांचा कांहीच नेम नसतो . कधी हे अनपेक्षितपणे घडतं तर कधी ते अपेक्षित असतं तर कधी पूर्वनियोजनाप्रमाणे घडत असतं . त्यामुळे कधी आपण भोवंडून जातो , कधी चकित होतो तर कधी त्यामुळे एक सुखद अशी भावना मनात निर्माण होते . नुकतेच दिवंगत झालेले , चिपको आंदोलनाचे प्रणेते , वृक्षप्रेमी सुंदरलाल बहुगुणा यांचा आमच्या घरी अचानक मुक्काम आमच्यासाठी एक अविस्मरणीय  सुखद घटना ठरली .

वर्ष १९८५  . एप्रिल महिना . तारीख नेमकी सांगायची तर ८ . नागपूरच्या प्रख्यात  उन्हाळा सुरु झाल्याचे ते दिवस . तेव्हा मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो . वेळ रात्री साधारण नऊची होती . दुसऱ्या दिवशी पहाटे स्कूटरने प्रवास करत मला गडचिरोलीला होणाऱ्या बाबा आमटे  यांच्या नेतृत्वाखालील ‘जंगल बचाव मानव बचाव’ या आंदोलनाचं वृत्त संकलन करायला जायचं होतं . ‘नागपूर टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचे तत्कालीन वृत्त संपादक बाबासाहेब नंदनपवार हेही माझ्यासोबत येणार होते . मी काम लवकर संपण्याच्या गडबडीत होतो . कारण सकाळी लवकर निघायचं होतं आणि प्रवासही एका दमात सुमारे दीडशे किलोमीटर करायचा होता . काम संपवण्याच्या घाईत असताना अत्यंत मधाळ स्वरात ‘नमस्तेजी , मुझे आपसे जरुरी बात करनी हैं ।’ असं म्हणणं ऐकू आलं . मी मान वर केली आणि ताडकन उठून उभा राहिलो . कारण समोर उभे होते ते सुंदरलाल बहुगुणा !

सुंदरलाल बहुगुणा हे तेव्हा देशात चर्चेतलं नाव होतं . विविध प्रकल्पांसाठी सरकारनं  सुरु केलेल्या वृक्षतोड मोहिमेला त्यांनी विरोध सुरु केला होता . आताच्या उत्तराखंड भागात तेव्हा टेहरी धरण निर्मिती सुरु होती आणि त्यासाठी मोठी वृक्षतोड करावी लागणार होती . वृक्षतोडीला विरोध म्हणून लोक झाडाला चिकटून बसत . पर्यायाने ते झाड तोंडणं अशक्य होत असे . माणसानं  झाडाला चिकटून बसण्याचं हे आंदोलन अनोखं होतं आणि ते ‘चिपको आंदोलन ’ नावानं ओळखलं जाऊ लागलं . या आंदोलनामुळे अनेक वृक्षांचा जीव वाचलेला होता ; सहाजिकच सुंदरलाल बहुगुणा लोकप्रियतेच्या कळसावर होते , निसर्ग आणि पर्यावरण प्रेमींच्या गळ्यातले ताईत बनलेले होते .

गोरापान वर्ण , भरघोस वाढलेली दाढी आणि डोईवरचे केस . त्यात लपलेले डोळे , त्यावर धातुच्या काड्यांचा चष्मा , धुवट पांढरा सदरा आणि धोतर , पाठीवर जाड , सुती कापडाची बॅग घेतलेले ते सुंदरलाल बहुगुणा होते . नमस्कार करत त्यांना खुर्ची दिली , ओरडून चपराश्याला पाणी आणायला सांगितलं आणि त्यांना विचारलं ,  ‘आपल्याला कोण पाहिजे ? आणि काय काम आहे ?’

सुंदरलालजी म्हणाले , ‘ आप प्रवीणजी हो ना ? मुझे आपसेही मिलना हैं , मुझे कुछ मदत चाहिये . ’

मी चक्रावून गेलो . एवढ्या मोठ्या माणसाचं  आपल्याकडे काय काम असेल याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली . मी त्यांना म्हणालो , ‘शक्य आहे ती सर्व मदत मी तुम्हाला करेल.’

सुंदरलाल बहुगुणांनी बाबा आमटेंचा संदर्भ दिला आणि नागपुरात काही अडचण आली तर तुम्हाला भेटा असं त्यांनी सांगितल्याचं बहुगुणा म्हणाले . दरम्यान समोर आलेल्या ग्लासातील पाणी गटागटा पिऊन ते पुढे म्हणाले , ‘उद्या , बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत आंदोलन आहे , त्यासाठी मला जायचं  आहे . दिल्लीहून येणाऱ्या  विमानाला उशीर झाल्यानं गडचिरोलीला जाणारी शेवटची बस निघून गेली म्हणून मला आजची रात्र तुमच्याकडे मुक्काम करता येईल का ?’ असं त्यांनी विचारलं .

सुंदरलाल बहुगुणा आपल्या घरी मुक्काम करणार ही घटना सुखद धक्का देणारी होती पण , आमचं घर लहान होतं . कन्या सायली जेमतेम सहा महिन्यांची होती , तिच्यासह आम्ही घरात तिघे होतो . इतक्या छोट्या घरात हा माणूस राहील का ? अशी शंका आली आणि ती शंका त्यांना स्पष्ट बोलून दाखवत ‘तुमची एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये सोय करु का ? ‘ असं विचारलं पण , सुंदरलालजी मात्र घरीच मुक्काम करण्यावर ठाम होते .

मग मी बेगम मंगला ला फोन केला आणि काय ते सांगितलं . मंगल म्हणाली , ‘अरे , माई येणार म्हणून जी शेजारची एक खोली आपण तयार करून घेतली तिथे राहतील ते आणि जेवतील आपल्यासोबत . घेऊन ये त्यांना . ’

माई म्हणजे माझी आई . ती लवकरच आमच्याकडे कायमची  राहायला येणार म्हणून शेजारची एक खोली भाड्याने घेऊन तिच्या राहण्याची तयारी आम्ही करुन ठेवलेली होती .

एव्हाना ‘नागपूर पत्रिका’ , ‘नागपूर टाइम्स’मधले अनेकजण जमा झाले . त्या गराड्यात सुंदरलाल बहुगुणा यांना सोडून मी पटापट काम  उरकलं . एस . टी . महामंडळाचे विभागीय नियंत्रक परिचयाचे होते . त्यांना फोन करुन बहुगुणा यांच्यासाठी सकाळी  साडेपाच वाजता गडचिरोलीला जाणाऱ्या बसमध्ये एक सीट राखून ठेवली . तेही इतके उत्तेजित झाले की , ‘मीच सकाळी बस स्टँडवर येतो , काळजी करु नका‘ असं म्हणाले .

काम संपवून जिना उतरताना मी सुंदरलाल बहुगुणांना म्हणालो , ‘माझ्याकडे स्कूटर आहे . तुमच्यासाठी रिक्षा करु का ? ’ ते ‘गरज नाही’ म्हणाले . सुंदरलाल बहुगुणा यांना नागपूरच्या रामदासपेठमधून छत्रपतीनगरच्या आमच्या घरी नेताना मी एकाच वेळी उत्तेजित आणि भारावूनही गेलेलो होतो .

आमच्या छोटेखानी फ्लॅटला लागूनच असलेल्या खोलीत बॅग टाकून दहाच मिनिटांत सुंदरलालजी आमच्या किचन-कम-डायनिंग-कम-हॉलमध्ये आले आणि आमच्याशी त्यांनी गप्पा सुरु केल्या .

‘तुम्हाला भाजी कोणती आवडेल ?’ असं बेगमनं विचारलं . तेव्हा त्यांनी माझा स्वयंपाक मीच करेन आणि तो गॅसवर नसेल‘, असं सांगून टाकलं .

माझ्या बेगमला ती कल्पना काही रुचली नाही . पण , ‘बेटी मेरा खाना मै खुद बनाता हूँ और खाता हूँ ‘! असं त्यानी  ठामपणे सांगितलं .

आमचा संसार तेव्हा तसा नवाच होता . पुरेशी साहित्य सामग्री नव्हती तरी  गॅसशिवाय सुंदरलालजी जेवण शिजवणार कसे ? हा प्रश्न आम्हाला फारसा भेडसावला नाही . कारण तेव्हा आम्ही आंघोळीचं पाणी कोळशाच्या शेगडीवर तापवत असू . बाथरुम समोरच्या पॅसेजमधील ती शेगडी कोळसे भरुन मी आत आणली . तोपर्यंत बेगमला हाताशी घेत सुंदरलालजींनी त्यांच्या स्वयंपाकाची तयारी केलेली होती . बटाटे , टोमॅटो , कोथिंबीर , मिरच्या अशी भाजी त्यांनी काढलेली होती आणि एका ताटात ते कणिक मळत होते . शेजारीच लोखंडी तवा ठेवलेला होता . त्यांना ‘नॉनस्टिक तवा दे’, असं मी बेगमला सुचवलं तर ते मराठी समजून सुंदरलालजी म्हणाले , त्यांना लोखंडी तवाच हवा असतो .

तिकडे बेगम आणि इकडे बहुगुणाजींचा स्वयंपाक आणि आमच्यातल्या गप्पा सुरु राहिल्या . त्यांनी दोन मोठे रोडगे बनवले . ते आधी तव्यावर आणि मग शेगडीतल्या विस्तवावर खरपूस भाजून घेतले . आमच्याकडे तेव्हा मोहरीचं तेल नव्हतं म्हणून त्यांनी एका पितळेच्या भांड्यात भाजी तशीच शिजवली . एव्हाना त्या रोडग्याचा भूक प्रज्वलित करणारा खरपूस भाजलेला वास आमच्या घरात पसरलेला होता .

तेव्हा आमच्याकडे डायनिंग टेबलही नव्हता . आम्ही तिघंही खाली बसून गप्पा मारत जेवलो . सुंदरलालजी बहुगुणा यांनी त्यांचा स्वयंपाकाचा पसारा नीट घासून आवरुन ठेवला . एव्हाना साडेअकरा झाले असावेत . छत्रपती नगरमधून गणेशपेठेतल्या एसटी स्टँडवर पोहोचण्यासाठी २० मिनिटं आणि आधी तयारीसाठी अर्धा तास म्हणजे सव्वाचार-साडेचारला उठणं आवश्यक होतं . झोपायला जाण्याआधी ‘मला सकाळी चहा वगैरे काही लागत नाही’ , असं सुंदरलालजींनी स्पष्ट केलं .

घड्याळ आणि टेलिफोन अशा दोन्ही ठिकाणी चारचा अर्लाम लावून झोपलो तरी सकाळी सुंदरलालजींना बसस्टँडवर सोडायचं आहे,  या  जाणीवेनं अधूनमधून जाग येतच  होती .

अलार्म वाजल्यावर आम्ही उठलो आणि बाहेरच्या खोलीत आलो तर सुंदरलालजी आंघोळीला जाण्याच्या तयारीत होते . पाणी तापवण्याचं भांडं गॅसवर ठेवत ‘आंघोळीसाठी दहा मिनिटांत गरम पाणी करुन देतो’ , असं मी म्हणालो . तर ’मी बाराही महिने थंड पाण्यानेच आंघोळ करतो .’ असं म्हणत ते बाथरुममध्ये शिरले . त्यांची आंघोळ होईपर्यंत मीही तयार झालो . आंघोळ झाल्यावर त्यांनी गॅलरीत जाऊन पूर्व दिशेला तोंड करुन हात जोडले . आम्हीही त्यांच्या पाया पडलो . त्यांनी आशीर्वाद दिला आणि आमचा बस स्टॅंडच्या दिशेने प्रवास सुरु झाला .

■■

एसटीचे विभाग नियंत्रकच स्वत: सुंदरलालजींच्या स्वागताला सज्ज होते . त्यांच्या ताब्यात सुंदरलालजींना सोपवून मीही परतलो . कारण मलाही प्रवास सुरु करायचा होता  . त्याप्रमाणे घरी येऊन तयार होऊन बाबासाहेब नंदनपवार यांना घेऊन आम्ही गडचिरोलीकडे कूच केलं .

गडचिरोलीला आम्ही आंदोलन स्थळी वेळेच्या आधीच पोहोचलो . बाबा आमटे , सुंदरलाल बहुगुणा आदी नेते तिथे पोहोचलेले होते . नमस्कार चमत्कार झाला . सुंदरलालजींनी जेव्हा ‘प्रवीणजीने हमे कल आश्रय दिया’, असं बाबा आमटें यांना सांगितलं तेव्हा मी विलक्षण संकोचून गेलो .

पुढे तीन चार वेळा सुंदरलालजींच्या भेटी झाल्या ‌. ते माझी ओळख कधीच विसरले नाहीत , अतिशय आगत्यानं ते चौकशी करत असत .

पत्रकारिता करताना अनेक वळणं लागतात आणि तीही अनपेक्षितपणे . एक वळण समोर उभा ठाकलेलं आहे ही आम्हाला ठाऊक नव्हतं . पोस्टात जाऊन ‘जंगल बचाव , मानव बचाव’ आंदोलनाचा वृत्तांत तारेने (टेलिग्राम) पाठवल्यावर बातमी मिळाली की नाही हे कन्फर्म करायला नागपूरला फोन केला की , तर समजलं की, रिपब्लिकन पक्षाच्या खोब्रागडे पक्षाचे एक बडे नेते आणि राज्यसभेचे माजी उपसभापती राजाभाऊ खोब्रागडे यांचं निधन झालेलं आहे . ‘दिल्लीहून त्यांचं पार्थिव चंद्रपूरला उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचेल . परवा सकाळी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होतील . ते सर्व  कव्हर करुनच मग नागपूरला परत ये’ ,असं वृत्त संपादक रमेश राजहंस यांनी सांगितलं . मंगलाला तसा निरोप द्या अशी विनंती रमेश राजहंस यांना केली आणि ती त्यानी लगेच मान्य केली .

■■

संध्याकाळी नागपूरला परतीचा प्रवास असल्यानं मी आणि नंदनपवार यांनीही अतिरिक्त कपड्यांचा जोड वगैरे आवश्यक  सामान सोबत घेतलेलं नव्हतं . पण त्यासाठी अडून बसण्याची कोणतीही सोय नव्हती .

बॅरि , राजाभाऊ खोब्रागडे हे लोकप्रिय नेते होते . केंद्र सरकारने एक टपाल तिकीट जारी करुन बॅरि . राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे .

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे मूळचे चंद्रपूरचे आणि अतिशय लोकप्रिय नेते होते . त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यानी प्रदीर्घ काळ काम केलेलं होतं . ते काही काळ राज्यसभेचे उपसभापतीही होते . सहाजिकच त्यांच्या अत्यंविधीचं वृत्त संकलन ही एक मोठी न्यूज इव्हेंट होती . जेवण झाल्यावर त्याच रात्री उशिरा बाबासाहेब नंदनपवार आणि मी स्कूटरने चंद्रपूरकडे रवाना झालो .

इथे आणखी एक वळण आमच्या  प्रवासाला लागलं . दिवसभरांच्या श्रमानं थकलेलो असल्यानं आम्हा दोघांनाही झोप येऊ लागली आणि घनदाट जंगलातील रस्त्यावरुन एकट्यानं प्रवास करण्याची भीती वाटू लागली . अखेर आम्ही मध्यरात्री मूल या गावच्या विश्रामगृहात मुक्काम ठोकला आणि पहाटे लवकर उठून चंद्रपूरला रवाना झालो  .

दोन दिवस राहून  बॅरी. राजाभाऊ खोबतगडे यांच्या अन्त्यसंस्कारांची आणि त्या संदर्भातील कांही साईड सतिरीज पाठवल्यावर  पाठवल्यावर नागपूरला परतलो . एका दिवसासाठी घराबाहेर पडलेलो मी आणि बाबासाहेब नंदनपवार असे एकूण चार दिवस अंगावरच्या , एकाच कपड्यानिशी भटकत होतो आणि वृत्त संकलन करत होतो . एका दिवसासाठी जरी बाहेर पडायचे असेल तर आवश्यक कपड्याचा किमान एक तरी जादा जोड सोबत ठेवायचा हा धडा यानिमित्तानं मिळाला .

‘फील्ड’वर जाऊन वृत्तसंकलं करतांना अशी अनेक वळणं लागतात पण , ठराविक तासांची नोकरी न समजता पत्रकारिता पूर्ण झोकून देऊन केली तर येणारी नशा आणि मिळणारं  समाधान काही औरच असतं  !

( महात्मा गांधी मिशनच्या ‘गवाक्ष’ या त्रैमासिकाच्या अंकासाठी लिहिलेला आठवणीवजा लेख  .  )

प्रवीण बर्दापूरकर  

Cellphone- 9822055799

praveen.bardapurkar@gmail.com

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट