हार्मोनियमवर बंदी घालणारे बा. वि. केसकर !

( अजूग = एकाकी / एकटा / एकेरी / बेगुमान / आड-दांड अशा अनेक अर्थछटा असलेला आणि कालौघात बराचसा विस्मरणात गेलेला शब्द म्हणजे ‘अजूग’ . )

|| ३ ||

हार्मोनियमचे सूर कानी आले आणि तब्बल साडे तीन दशकं मनाच्या कुठल्या तरी सांदी कोपर्‍यात दडून बसलेली केसकर यांची   आठवण उसळी मारुन समोर आली .

हे केसकर म्हणजे बाळकृष्ण विश्वनाथ केसकर ; दिल्लीच्या राजकारणात ते बी. व्ही. केसकर या नावाने ओळखले जात असत .

खरं तर , बा. वि. केसकर ही आजवर न लिहून झालेली माझ्या पत्रकारितेतील एक नोंदच आहे .

२८ ऑगस्ट १९८४ ही तारीख अजूनही लख्ख आठवते .

भुरभुर पाऊस पडत होता आणि हलकासा गारवाही होता ; त्या दिवशीच्या कांही घटनाही  स्पष्ट तर कांही अस्पष्टपणे आठवतात .

कोणता तरी लेख संपादकीय पानासाठी द्यायचा म्हणून मी सकाळी साडेनऊच्या सुमारास नागपूर पत्रिका या दैनिकाच्या कार्यालयात येऊन कामाला लागलेलो होतो .

कामाच्या त्या तंद्रीत असतांनाच फोनची घंटी वाजली .

फोन घेतला तर आमचे मुख्य वार्ताहर दिनकर देशपांडे पलीकडून बोलत होते .

ते म्हणाले , ‘जसे असाल तसे उठा आणि निघा . केसकर वारले आहेत’ .

कोण केसकर , मला कांहीच माहिती नव्हतं .

दिनकररावांनी सांगितलं , ‘ते माजी केंद्रीय नभोवाणी मंत्री आहेत . लॉ कॉलेज चौकात , बनवारीलालजी पुरोहित यांच्या घराजवळ कुठल्या तरी एका बंगल्यात राहतात’ .

हे बनवारीलाल पुरोहित म्हणजे केरळचे विद्यमान राज्यपाल .

घर शोधून काढायला वेळ लागला नाही .

ज्या घरी मृत्यू झालेला असतो तिथल्या हालचाली लगेच कळतात .

शिवाय प्रत्येक मरणाला एक वेगळा गंध आणि रंग असतो असा माझा अनुभव आहे ; तो आलाच पण , त्या मरण गंध आणि रंगाबद्दल पुन्हा कधी तरी .

फार माणसं नव्हती , जेमतेम आठ-दहा असतील .

समोर एक बंगला होता आणि मागे एका रांगेत रचल्यासारखे फ्लॅट्स होते .

पहिल्या मजल्यावरच्या एक अत्यंत साध्या , मोजकं आणि कामचलाऊ फर्निचर असणाऱ्या फ्लॅटच्या समोरच्या खोलीत  देशाचं नभोवाणी मंत्रीपद सर्वाधिक काळ भूषविलेल्या केसकर यांच्या कृश कलेवरावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी अत्यंत मूकपणे सुरु होती .

पुन्हा खाली येऊन दबक्या आवाजात चौकशी सुरु केली ( अशा वेळी दबक्या आवाजातच बोलायचा तेव्हाचा संकेत होता ) पण , कुणाला फारसं कांहीच माहिती नव्हतं .

एवढा मोठा माणूस पण , कुणालाच फारसं माहिती नाही , गर्दीही नाही हे आश्चर्यजनक होतं पण , कोणतीही मोहमाया न जमवता , संस्थांचा पसारा न उभारता राजकारण आणि सत्तेच्या  मुख्य प्रवाहातून बाहेर फेकलं गेल्यावर हे असंच अनुभवयाला मिळतं , हा धडा तिथे मिळत होता .

थोड्या वेळानं आकाशवाणीतील निवृत्त अधिकारी आणि नागपूर पत्रिकेच्या संपादकीय पानासाठी काम करणारे भालचंद्र बूट आले .

त्यांच्याशी बोलतांना केसकर यांचे कांही धागेदोरे हाती लागले महत्वाचं म्हणजे , त्यांच्या बोलण्यात आलं की आकाशवाणीवर हार्मोनियमवर बंदी घालणारे हेच ते केसकर !

मात्र , त्या हार्मोनियम बंदी या संदर्भांपलीकडे बूटसाहेब कांही जायला तयार नव्हते ; त्यांच्या रेकॉर्डची पीन जणू तिथंच अडकून पडलेली होती .

कांही वेळातच आकाशवाणीच्या नागपूर केद्रावर काम करणारे आणखी कांही परिचित चेहेरे तिथे आले पण , त्यांनाही केसकर यांच्याविषयी  फार कांही माहिती नव्हतं .

अंबाझरी घाटावर अंत्ययात्रा पोहोचता-पोहोचता जिल्हाधिकाऱ्यांची कार आली , पाठोपाठ पोलीस आयुक्त आले आणि थोडी लगबग वाढली , गर्दी पन्नासच्या आसपास पोहोचली असावी .

बा. वि. केसकर यांच्या पार्थिवाला हार वगैरे अर्पण करण्याचा सोपस्कार आणि शासकीय  शिष्टाचार पाळला गेला .

उपस्थित दोन पोलिसांनी सलामी दिली आणि देशाच्या सत्तेच्या दालनात तसंच कॉंग्रेसच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असणाऱ्या बा . वि . केसकर यांचं पार्थिव अनंतात विलीन होण्यासाठी ज्वाळांनी वेढलं गेलं , गर्दी पांगली .

♦♦♦

तेव्हाची पत्रकारिता वेगळी होती ; तो काळ गुगलचा नव्हता , फोनचाही सुळसुळाट नव्हता .   त्यामुळे कोणतीही माहिती मिळवण्यासाठी बरंच फिरावं लागे-धावाधाव करावी लागे .

पुस्तकांचा-त्यासाठी ग्रंथालयांचा आधार घ्यावा लागे , त्या क्षेत्रातील बुझुर्गाना भेटावं लागे , यावर आजच्या माध्यमातील  पत्रकारांचा विश्वास बसणार नाही .

ललित कला विभागाचे सुनील सुभेदार  , विदर्भ साहित्य संघाचे मनोहर म्हैसाळकर , मधुकर आष्टीकर , आकाशवाणीचे अनंतराव अडावतकर यांना गाठलं आणि तुकड्या-तुकड्यात माहिती जमा होऊ झाली .

शासकीय ग्रंथालयात गेल्यावर केसकर यांच्या पुस्तकांची नावं समजली .

बातमीचा एक अस्पष्ट का होईना आकार दिसू लागला .

दुपारी साडे-चारच्या सुमारास कार्यालयात  पोहोचलो तेव्हा ‘हार्मोनियमवर बंदी घालणारे बा. वि. केसकर यांचे निधन’ ही बातमी लिहिण्याची तयारी झालेली होती .

♦♦♦

बाळकृष्ण विश्वनाथ केसकर .

जन्म १९०२ साली पुण्याला  .

बालपण , प्राथमिक शिक्षण पुण्यातच झालेलं .

नंतर पुढील शिक्षणासाठी काशीला गेले .

बनारस विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक असतांना धृपद गायनाचं रीतसर शिक्षण घेतलं .

वयाच्या २० व्या वर्षी काँग्रेस पक्षात प्रवेश केला , दिल्लीत शिफ्ट झाले आणि पक्षाच्या परदेश विभागाचे सचिव म्हणू काम पाहू लागले  .

कॉंग्रेस पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणूनही काम सांभाळलं .

देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्रीमंडळात उजवीकडून पहिले उभे असलेले बा. वि. केसकर- छायाचित्रात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु , सरदार वल्लभभाई पटेल , मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी मान्यवरही आहेत .

१९४८ ते ५२ या काळात केंद्र सरकारमध्ये आधी विदेश आणि मग रेल्वे या खात्यांचं उपमंत्री म्हणून काम केलं .

१९५२च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूर मतदार संघातून विजय संपादन केल्यावर  पुढचे सलग दहा वर्ष केंद्रीय नभोवाणी खात्याचं राज्यमंत्रीपद स्वतंत्रपणे सांभाळलं .

या खात्याचे मंत्री म्हणून एकाच व्यक्तीनं  इतकं प्रदीर्घ काळ काम सांभाळण्याचा हा विक्रम आहे . १९६२च्या लोकसभा निवडणुकीत प्रख्यात समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्याकडून पराभव झाल्यावर बा. वि.  केसकर यांचा राजकीय विजनवास सुरु झाला .

♦♦♦

विद्वता आणि हट्टीपणा यांचं ‘पुणेरी’ मिश्रण म्हणजे  बाळकृष्ण विश्वनाथ केसकर .

भारतीय आकाशवाणीला त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात आकार आला आणि त्यांच्या दुराग्रही हट्टीपणाचा जोरदार फटकाही बसला .

शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलेल्या बा. वि.  केसकर यांनी भारतीय शास्त्रीय आणि उपशात्रीय संगीताच्या कार्यक्रमांना आवर्जून प्रोत्साहन दिलं .

विविध गायन प्रकारांच्या संगीत सभा सुरु करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला .

आकाशवाणीचा वाद्यवृंदही त्यांच्याच काळात निर्माण झाला .

भारतीय आकाशवाणी प्रादेशिक भाषात पोहोचवण्यासाठी बा. वि.  केसकर यांनी सक्रिय पुढाकार घेतला .

मात्र हिन्दी चित्रपट गीते आणि क्रिकेट समालोचन याबद्दल त्यांची मतं दुराग्रही होती .

ब्रिटिश आणि मुस्लिम संस्कृती व कला भारतीय संस्कृतिक जगतासाठी मारक आहेत , असं केसकर यांच ठाम मत होतं .

प्र्त्यक्षात , हिन्दी चित्रपट गीतं आणि क्रिकेट समालोचन  हे तर नेमकं  भारतात बहुसंख्येनं असणार्‍या सामान्य भारतीय माणसाचं आकर्षण आणि ‘वुईक पॉइंट’ही त्यामुळे सामान्य माणूस आकाशवाणीपासून लांबच राहू लागला .

ही संधी साधून आताच्या श्रीलंकेत ‘रेडियो सिलोन’ सुरु करण्यात आलं .

त्या केंद्राचा आवाका भारतभर होता आणि रेडियो सिलोनने सुरु केलेले हिन्दी चित्रपट विषयक ( बिनाका गीतमाला हा कार्यक्रम त्यातलाच ! ) गीतांचे कार्यक्रम भारतात अफाट लोकप्रिय झाले .

अभिजन श्रोते भारतीय आकाशवाणीकडे आणि मोठ्या संख्येनं असलेला सामान्य माणूस रेडियो सिलोनकडे असा आजच्या भाषेत सांगायचं ‘टीआरपी’ तो ठरला .

आकाशवाणीला भारतातून मिळायला हवं ते महसुली उत्पन्न सहाजिकच  रेडियो सिलोनकडे वळलं .

अखेर बा. वि. केसकर मंत्री असतानाच भारतात विविध भारती सुरु झाली पण , तोवर बराच उशीर झालेला होता !

जे हिन्दी चित्रपट गीतांबद्दल घडलं तेच क्रिकेट समालोचनाच्या बाबतीत घडलं . त्यातच      बा. वि. केसकर यांनी हार्मोनियमवर घातलेली बंदी उठवायला ठाम नकार दिला त्यामुळे भारतीय सांस्कृतिक जगतात ते खूपच अप्रिय ठरले .

हार्मोनिययम हे पाश्चात्य वाद्य असून भारतीय संगीताला ते पोषक नाही असा केसकर यांचा दुराग्रह होता .

पुढे लोकसभा निवडणूक हरल्यावर बा. वि.  केसकर यांचं मंत्रीपद गेलं .

बाळकृष्ण विश्वनाथ केसकर हे दिग्गज नाव राजकारणाच्या दालनाच्या हळूहळू अडगळीत गेलं आणि त्याच अडगळीत त्यांचं देहावसान झालं .

पत्रकारितेच्या नंतरच्या काळात राजकारणातील अशी ‘समृद्ध अडगळ’ सर्वच राजकीय पक्षात पाहायला मिळाली .

बा. वि. केसकर नागपूरला का आले , त्यांना कुणी आणलं , हे तपशील मला तरी कधीच समजू शकले नाहीत , अर्थात माझं त्यामुळे कांही अडलं नाही हा भाग वेगळा .

===

रेडियोवर हार्मोनियम वादन ऐकू आलं , बा. वि.  केसकर पाठोपाठ हे सर्व आठवलं .

त्याच दिवशी ज्येष्ठतम समीक्षक डॉ . सुधीर रसाळ यांच्याशी बोलतांना हा विषय निघाला तर त्यांनी विशिष्ट सुरावट/श्रुती  ( मिंड ) वाजत नसल्याने हार्मोनियमला केसकर यांचा विरोध कसा होता , त्या संदर्भात ते हट्टी कसे होते आणि हार्मोनियमवरील बंदी उठावी यासाठी पु . ल. देशपांडे यांच्यापासून अनेकांनी कसे जोरदार प्रयत्न केले त्या संदर्भातल्या कांही आठवणी सांगितल्या .

बोलण्याच्या ओघात रसाळ सर म्हणाले , ‘औरंगाबादचं आकाशवाणी केंद्र पुण्याला पळवणारे ते हेच केसकर’.

-आणि साडेतीन दशकं मनातच अपूर्ण असलेली बाळकृष्ण विश्वनाथ केसकर नावाची एका पत्रकारच्या मनाच्या डायरीतली नोंद पूर्ण झाली !

-प्रवीण बर्दापूरकर

२४ मे २०२०

( केसकर यांची छायाचित्रे सहकार्य – नम्रता फलके , औरंगाबाद )

‘अजूगपणातल्या नोंदी ‘अक्षर लेखन- विवेक रानडे

 

संबंधित पोस्ट