केशवराव धोंडगे – ‘मन्याड’चा थकलेला वाघ !

( छायाचित्र – महात्मा गांधी मिशन रुग्णालयात केशवराव धोंडगे , सोबत  त्यांच्या पत्नी सौ . प्रभावती . )

जाणीव-नेणिव आणि स्मरण-विस्मरणाच्या सीमा रेषेवर असलेल्या वयोवृद्ध केशवराव धोंडगे यांची नुकतीच भेट झाली . महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणारे केशवराव धोंडगे यांचं वय १०५ आहे ; दस्तुरुखुद्द केशवराव आणि त्यांच्या कुटुंबियांचाही दावा आहे. मात्र , विधिमंडळाच्या सदस्य परिचय पुस्तिकेत त्यांची जन्म तारीख २५ जुलै १९२२ असल्याची नोंद आहे ; वयाचा वाद सोडून देऊ यात पण , आंध्रप्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकेकाळी वेधून घेतलेलं होतं यात शंकाच नाही .
केशवरावांचं व्यक्तिमत्त्व अस्सल मराठवाडी  ग्रामीण ढंगातलं . ते राजकारणात आले तेव्हा महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचा बोलबाला होता . याच पक्षाचे विधानसभा सदस्य म्हणून ते सहा वेळा आणि नांदेड लोकसभा मतदार संघातून एक वेळा विजयी झालेले आहेत .  ( आजच्या माध्यमांच्या भाषेत सांगायचं तर ते ‘विधानसभेचे आमदार’ होते .  विधिमंडळाचा सदस्य म्हणजेच आमदार आणि संसदेचा सदस्य म्हणजे खासदार असतो , हे आपल्या माध्यमांना जणू ठाऊक नाही . जर प्रकृतीनं ठणठणीत असते तर माध्यमांच्या या भाषक दारिद्रयाबद्दल केशवराव धोंडगे यांनी चांगलंच बोचकारुन काढलं असतं ! ) शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांची होती तशीच केशवराव धोंडगे यांचीही साम्यवाद , मार्क्सवाद एकाच वेळी श्रद्धा आहे . एकाचे वेळी महात्मा गांधी आणि क्रांतीवर श्रद्धा असणारा पाहण्यात आलेले केशवराव धोंडगे हे माझ्या पत्रकारीतेतले एकमेव राजकारणी आहेत !
मध्यम चणीचे , किचिंत गव्हाळ वर्णाचे आणि बंड केलेल्या म्हणजे विस्कटलेल्या डोईवरच्या केसांचे , धोतर आणि साधारण किचिंत ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता घातलेले , डोईवर टिळा लावलेले , असं केशवरावांचं व्यक्तिमत्त्व तब्बल तीन दशकं विधानसभेत गाजलं . खणखणीत आवाज , बोलण्याची बोचरी शैली , त्या शैलीला मराठवाडी बोलीची ‘भरजरी’ किनार आणि जे काही बोलायचं ते रोखठोक , असं केशवरावांचं वागणं असायचं .

शिवाय कुणी अंगावर आलं की शिंगावर घेतल्याशिवाय त्यांनी कुणालाच सोडलं नाही  . किती बोचरं आणि किती रोखठोक असावं तर त्याची एक आठवण सांगतो- केशवरावांचा वयाची शंभरी पार केल्याचा सत्कार ( बहुधा नांदेडला ) देशातले एक ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्या हस्ते झाला . तेव्हा शरद पवार यांची–‘शरदरावांची बारामती म्हणजे भानामती’, ‘माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल’, ‘नारदमुनीही पवारांची बरोबरी करु शकणार नाही’, ‘पवार म्हणजे बिन चिपळ्यांचे नारद’ , अशा इरसाल शब्दांत केशवरावांनी ‘स्तुती’ केली होती आणि पवारांनीही केशवरावांच्या म्हणण्याला भरभरुन दाद दिली . आलेल्या माणसाचं स्वागत उजव्या हाताच्या पालथ्या मुठीवर अत्तर लावून आणि समोरचा जास्तच जवळचा असेल तर त्याच्या भालप्रदेशाचा मुका घेऊन करायचं , हेही केशवरावांचं एक वैशिष्ट अनेकांना ठाऊक असेल , अनेकांना नाहीही . अत्तर लावून आणि प्रेमभरे मुका घेऊन स्वागत झालेले शरद पवार केशवरावांच्या या इरसालपणावर  तसंही काय बोलणार होते म्हणा ! छगन भुजबळांची मफलर सध्या राजकारणात एक सिंबॉल झाली आहे पण , आमदार असताना केशवराव धोंडगेही अनेकदा गळ्यात मफलर घालत आणि ती बहुधा प्लेन किंवा प्रिंटेड  लाल रंगाची असे . हा लाल रंग त्याची क्रांतीवर असणारी श्रद्धा दर्शवत असे .  थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मफलर संस्कृतीचे खरे जनक केशवराव धोंडगे आहेत .
पत्रकारितेतली माझी पिढी खरंच भाग्यवान होती . बहुसंख्य लोकप्रतिनिधी वर्तन आणि व्यवहारात साधे होते , धन संचय करण्याची वृत्ती त्यांच्यात नव्हती आणि जनतेच्या प्रश्नाबद्दल त्यांना डोहखोल तळमळ होती . याच  तळमळीपोटीच विधिमंडळात हे बहुसंख्य लोकप्रतिनिधी केवळ एक रुपयाची कपात सूचना मांडून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढत जनतेचे प्रश्न मांडत असत . शिवाय स्थगन प्रस्ताव आणि शून्य प्रहरातही सरकारची सालटी सोलण्याची एकही संधी तेव्हाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी कधीच सोडत नसत . विधिमंडळाचं अधिवेशन पूर्ण मुदतभर आणि अनेकदा तर रात्री  उशिरापर्यंत चालत असे . अधिवेशन सुरु होण्याआधीच ‘कामकाज चालू देणार नाही’ अशी सरकाराच्या सोयीची भूमिका घेणारे विरोधी पक्ष तेव्हा जन्मालाच यायचे होते  . त्यामुळे सभागृहाचं  कामकाज ‘उरकून’ टाकण्याची हिंमत सत्ताधारी पक्षाला मुळीच होत नसे कारण  विरोधी पक्षातील या बहुसंख्य सदस्यांचा नैतिक आणि सात्विक धाक सरकारला वाटत असे . ही मंडळी साधी होती म्हणजे किती साधी होती तर , ते चक्क एस टी महामंडळाच्या साध्या बसनं सर्वसामान्य माणसांसोबत प्रवास करत . ( तशाही तेव्हा वातानुकूलित बसेस आणि कार नव्हत्याच म्हणा . ) केशवराव धोंडगे ‘त्या’ जातकुळीचे लोकप्रतिनिधी म्हणून कायमच वावरले . या पार्श्वभूमीवर विद्यमान बहुसंख्य लोकप्रतिनिधी एकतर भोंगे वाजवतात , नाही तर चालीसा म्हणतात , नाही तर सत्ता लोभासाठी मुंबई ते सुरत-गुहाहाटी-गोवा-मुंबई असा प्रवास करताना दिसतात . अशा वेळी केशवराव धोंडगे आणि त्यांच्या पिढीच्या लोकप्रतिनिधींमधल्या तळमळ आणि साधेपणाला  सलाम केल्याशिवाय पर्यायच उतरत नाही  .
या व्यतिरिक्त केशवराव धोंडगे यांचा  वाचन व्यासंगही भरपूर होता . ते एका साप्ताहिकाचं प्रकाशनही करत .  गुराखी साहित्य संमेलनासारखी एक वेगळी वाट त्यांची चोखाळली . वृत्तपत्र आणि ग्रंथ वाचनामुळे केशवरावांचं भाषण म्हणजे संदर्भाचा मसाला असे . खणखणीत आवाजात , चुरुचुरुपणे ते बोलत आणि प्रतिस्पर्ध्यांचे वाभाडे काढत . चौफेर वाचन , जीभेला धार आणि कष्टकरी तसंच तळागाळातल्या  जनतेशी जोडलेली नाळ , या मिलाफातून प्रसिद्धी मिळवण्याची विलक्षण हातोटीही  केशवराव धोंडगे यांनी प्राप्त केलेली होती . बोलण्याच्या या असोशीतून वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून केशवराव  स्वत:ला अनेकदा आवरु  शकले नाहीत .
महात्मा गांधी मिशन रुग्णालयात त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली . डिस्चार्ज मिळण्याआधी त्यांना भेटायला गेलो . रुग्णशय्येवर पडलेल्या केशवरावाचा आवाज याही वयात तेवढाच खणखणीत आहे  . या वयात ही शस्त्रक्रिया जोखमीची होती पण ते आव्हान महात्मा गांधी मिशनमधील डॉक्टरांनी यशस्वीपणे पेललं . शस्त्रक्रियेनंतर  प्रकृती सुधारली आणि केशवरावांनी त्यांच्या सवयीला साजेसं बंड , गावी जाण्यासाठी पुकारलं . बारा तास ते चक्क मौनात गेले . आरोग्यविषयक सर्व निकष योग्य पण , केशवराव मात्र मौनात . अखेर रात्री उशिरा मौनभंग करुन गावी जाण्याची आस त्यांनी व्यक्त केली . भाषेबद्दल केशवराव याही वयात किती आग्रही आहेत तर डिस्चार्जपूर्वी उपचारांबद्दल महात्मा गांधी मिशनच्या कमलकिशोर कदम , अंकुशराव कदम , डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्याप्रती त्यांनी ऋण  व्यक्त करतांना आभार हा शब्द त्यासाठी कसा योग्य नाही हे आवर्जून सांगितलं .
दोन एक महिन्यापूर्वी आजारी होईपर्यंत ‘म्हातारा न तुका’ या बाण्याला स्मरुन केशवराव जगत होते . दूध आणि रस यावर ते ठणठणीत असत . श्रवणवशक्ती क्षीण झालेली आणि स्मरणशक्ती विस्मरणाशी खेळत असलेली तरी , सकाळी वृत्तपत्रांचं नियमित वाचन , मग त्यांच्या पुढाकारानं सुरु झालेल्या गावातील संस्थांचा फेरफटका , लोकांच्या गाठीभेटी असा त्यांचा दिनक्रम  राहिला . या वयात स्मरण-विस्मरणाचा ऊन-सावलीचा खेळ अपरिहार्यच असतो पण , काही नाव मेंदूत किती पक्की रोवलेली असतात याचा अनुभवही आमच्या या भेटीत आला . माझ्यासोबत प्राचार्या  डॉ. रेखा शेळके आणि प्रा . जयदेव डोळे होते  . जयदेवचं ‘डोळे’ हे आडनाव ऐकताच केशवरावांच्या डोळ्यात एकदम चमक आली आणि ते ना. य. डोळे समजून जयदेवशी बोलू लागले . ना. य. डोळे म्हणजे तळमळीचा शिक्षक , मोठा माणूस , क्रांतीकारक , महापुरुष असं  बरंच काही केशवराव म्हणाले . बाय द वे , प्रा. जयदेव डोळे हा ना. य. डोळे यांचा पुत्र आहे .
सुपरकॉप म्हणून ओळखले जाणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांच्या ‘बुलेट फॉर बुलेट’ या पुस्तकात केशवराव धोंगडे यांचा उल्लेख असल्याचं आठवतं  . रिबेरो हे १९६९ साली नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते , तेव्हाची ती एक आठवण आहे .  त्यावेळी मन्याड खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी केशवराव यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं . ते आंदोलन कसं आटोक्यात आणावं असा प्रश्न सरकारला पडल्याचं रिबेरो यांनी नमूद केलं आहे .  ते आंदोलन अखेर यशस्वी ठरलं . तेव्हापासून केशराव धोंगडे  यांना ‘मन्याड खोऱ्याचा वाघ’ म्हणूनही ओळखलं जात असे . तेव्हा केशवराव  आमदार होते . एखादा आमदार आपल्या मतदारसंघातील जनतेच्या जगण्याबद्दल किती संवेदनशील असतो याचं नेमकं उदाहरण म्हणजे ते आंदोलन होतं .  .
त्यांचा मुलगा पुरुषोत्तम  यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं ? हा  माझा प्रश्न मोठ्ठ्या आवाजात विचारला  आणि  केशवरावांनी तत्परतेनं  साभिनय उत्तर दिलं . ‘राजकारणाबद्दल बोलण्यासारखं आता काहीच नाही . बोलणं बंदच करायला पाहिजे . उत्तर एकच .  तोंडावर हात आणि कानावरही हात , हेच आजच्या राजकारणावरचं उत्तर आहे’ , असं केशवराव म्हणाले . अन्यही कांही विषयावर ते बोलले पण , त्यात संगती नव्हती शिवाय  कांही वेळ  बोलल्यामुळे त्यांना थकवा जाणवू लागला असल्याचं जाणवलं आणि आम्ही रुग्णालयाच्या त्या  खोलीतून बाहेर पडलो .
एकूण काय तर , मन्याड खोऱ्यातील एकेकाळचा वाघ आता वृद्धत्वामुळे थकला आहे .

विद्यमान राजकारणात असे वाघ आहेत कुठे ?

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट