आप’भी हमारे नही रहे !

आम आदमी पार्टीने केलेल्या सर्वसामान्य माणसाच्या राजकीय अपेक्षाभंगाचे दु:ख व्यक्त करणारा ‘जिस का डर था वही हुआ, ‘आप’भी हमारे नही रहे !’ हा लघुसंदेश दिल्लीच्या वर्तुळात मध्यंतरी जोरदार फिरला. साठी-सत्तरीतले औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राचार्य पॉलसर उर्दू साहित्यात ख्यातकीर्त होते आणि त्यांच्या एकेकाळी गाजलेल्या ‘जिस का डर था वही हुआ, आज भी कुछ नही हुआ’ या विलक्षण अर्थगर्भ कथेचा आधार, हा अपेक्षाभंग व्यक्त करताना घेण्यात आला आहे हे आता वयाच्या साठीत आलेल्या आणि साठीपार पोहोचलेल्याना वेगळे सांगायची आवश्यकता नाही. या कथेचा शेवट पुढे मला गुलझार यांच्या ‘एक अकेला इस शहर में या कवितेच्या ओळीत..दिन खाली खाली बर्तन है, रात है जैसे अंधा कुआ, जिने कि वजह तो कोई नही मरने का बहाना धुंढता है’.. (चित्रपट घरोंदा) या ओळीत सापडला, पण ते असो!

समकालीन राजकारणात जनतेच्या अपेक्षा आणि प्रचंड पसंतीला अल्पावधीत उतरलेला आणि सर्वात अल्पजीवी ठरलेला राजकीय पक्ष म्हणून आम आदमी पार्टीची नोंद इतिहासाला घ्यावी लागणारच आहे! यूपीए सरकारच्या अखेरच्या काळात गैरव्यवहाराची दलदल निर्माण झालेली असताना आणि महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले असताना अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम स्वच्छ राजकारण-भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यांचे स्वप्न जनतेला दाखवत दिल्लीच्या राजकीय क्षितिजावर उगवली. स्वातंत्र्य मिळवताना जे ‘रामराज्या’चे स्वप्न आपण पहिले त्या गावी केजरीवाल आणि त्यांची टीम आपल्याला घेऊन जाणार आहे असा जणू साक्षात्कार जनतेला झाला. हात घालत प्रस्थापित व्यवस्थेवर मुद्देसूद कोरडे ओढणारा अरविंद केजरीवाल नावाचा बकरा आयताच मिळाल्यावर मीडियाचा झोत स्वाभाविक तसेच अगतिक गरजेपोटीही केजरीवालांवर राहिला आणि भारताला जणू नवा मसीहा मिळाला असा भास निर्माण झाला. हा भास आहे हे कळण्याच्या आतच केजरीवाल नावाचा तारा दिल्लीच्या सत्ता दालनात मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाला आणि येथून सुरु झाली एका राजकीय नेता आणि पक्षाची एक वेगवान घसरण.

१६ ऑगस्ट १९६८ रोजी हरियाणातील सिवानी येथे गीतादेवी आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअर असलेल्या गोविंदरण या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या अरविंदचे बालपण सोनपत, गाझियाबाद, हिस्सार येथे गेले. आय आय टी खरगपूर सारख्या मातब्बर संस्थेतून इंजिनीयरची पदवी प्राप्त केल्यावर अरविंद केजरीवाल यांनी टाटा उद्योग समुहात काही काळ नोकरी केली. नंतर १९९२ साली त्यांनी भारतीय महसूल सेवेत प्रवेश केला. सहा वर्षाच्या आयकर खात्याच्या नोकरीत या देशातला पैसा सर्व सामान्य माणसासाठी खर्च न होता अन्यत्र कसा ‘मुरतो’ आहे आणि हाच भ्रष्टाचार आहे हे या हुशार, महत्वाकांक्षी (आणि एकारलेल्याही) अधिका-याच्या लक्षात आले आणि त्यातून भ्रष्टाचार मुक्तीसाठी माहितीचा अधिकार तसेच जनलोकपाल या चळवळीकडे अरविंद केजरीवाल नावाचा संवेदनशील अधिकारी आकृष्ट झाला.

या चळवळीसाठी त्याने रोल मॉडेल म्हणून अण्णा हजारे यांना निवडले आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किरण बेदी, कायदेतज्ज्ञ शांतीभूषण, योगेंद्र यादव अशी एक चमू जमवली. त्यातून अण्णा हजारे यांचे दिल्लीत दिल्लीच्या रामलीला मैदानावर जनलोकपाल नियुक्तीसाठी आंदोलन उभे राहिले, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद आणि त्यातून स्पष्ट झालेला भ्रष्टाचाराच्या विरोधात खदखदणारा असंतोष लक्षात येताच केजरीवाल यांच्यातील राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाली. केजरीवाल यांच्या राजकीय यात्रेत सहभागी व्हायला अण्णा हजारे, किरण बेदी यांनी नकार दिला आणि जमलेली टीम फुटली. त्याची फिकीर न करता आम आदमी पार्टीची स्थापना झालीच.. पाहता पाहता या पक्षाने दिल्लीच्या राजकारणात एक शक्ती निर्माण केली. भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारण्याची कळकळ, स्वच्छ प्रतिमा आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शीपणा ही आम आदमी पार्टीची शक्तीस्थळे होती. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यातले डावपेच वेगळे असतात. जात-धर्म-धन आणि गुंडशक्ती, पक्ष महत्वाचे असतात आणि लोकांचा प्रतिसाद, उमेदवाराचे चारित्र्य तसेच प्रतिमा हे मुद्दे नंतर येतात हे, केजरीवाल विसरले. आपणच केवळ स्वच्छ आणि बाकीचे घाणेरडे, आपण वगळता सर्व राजकीय विरोधक बेईमानांच्या कळपातले, ही भूमिका निवडणुकीपुरती ठीक असते सत्ता राबवताना अशी एकारली भूमिका सर्वात मोठी कमकुवत बाजू असते याचे विस्मरण केजरीवाल आणि टीमला झाले. त्यामुळे दिल्लीची सत्ता मिळाल्यावरही केजरीवाल आणि त्यांची टीम परफॉर्म करू शकली नाही. त्यातच केजरीवाल यांचा राजकीय विचार तुच्छतेचा होता, वर्तन लोकशाही संकेतांशी अनुकूल नव्हते, घटनेशी सुसंगत नव्हते त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी उपोषण करणे वगैरेसारखे विदुषकी चाळे करून केजरीवाल यांनी स्वत:चे आणि त्यांच्या पक्षाचे हसे करून घेतले. हसे करून घेण्यापुरते एक वेळ ठीक पण, पोलीस अधिका-याची बदली, वीज बिल माफी, पिण्याच्या पाण्याच्या बिलात सवलत यासारख्या योजनांची अंमलबजावणी करताना केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांनी ज्या काही कसरती केल्या त्यातून त्यांचा प्रशासकीय अडाणीपणा समोर आला त्यामुळे पक्षाची लोकप्रियता ज्या झपाट्याने कमी झाली ती लवकर भरून येणार नाही. शिवाय आता नव्याने सुरुवात करून सर्व डाव पुन्हा मांडावा लागणार असला तरी कोअर टीमच्या सदस्यांच्या मनातला एकजिनसीपणा विसविशीत झाला आहे, त्याची जागा परस्पर कटुतने घेतली आहे हे लक्षात घेता आम आदमी पार्टीचा डाव लवकर सावरला जाईल असे दिसत नाही.

एकदा सत्तेची भांग चढली की अनेक नवटंक्या सुचतात असे पूर्वी आमचे सिनियर म्हणत (सत्तेची भांग घेतली की पैसे खाण्याच्या नवनव्या कल्पना सुचतात, असे यूपीए २ पासून दिल्लीतील ‘बेरके’ जाणकार म्हणतात!) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या यशाने केजरीवाल यांची मती गुंग झाली. लोकसभा निवडणुकीत तर राजकीय वास्तवाशी आणि पक्षातीलही सहका-यांशी असलेला त्यांचा संबंध सुटला. दिल्लीची सत्ता हेच अंतिम लक्ष्य ठेवलेल्या अनेकदा तर केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांबाबत पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात कोणाला काहीच ठाऊक नसे! यावरून एक अनुभव आठवला — महाराष्ट्रात सेना-भाजप युतीचे सरकार मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झाल्यावर मनोहर जोशी यांचे भाचे आणि राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री सुधीर जोशी यांना एका दिवाळी अंकाच्या मुलाखतीच्या निमित्ताने एका पत्रकाराने प्रश्न विचारला, ‘मनोहर जोशी यांचा सर्वात महत्वाचा गुण कोणता?’

सुधीर जोशी म्हणाले, ‘अंतिम लक्ष्यावर डोळा ठेवणे’.
आणि ‘दुर्गुण कोणता’, त्या पत्रकाराने पुढे विचारले, तेव्हा विनाविलंब सुधीर जोशी उत्तरले, ‘तोच, केवळ लक्ष्यावर डोळा ठेवणे!’.
केजरीवाल आणि त्यांच्या बहुसंख्य टीमबाबत असेच घडले. राजकीय गुण आणि दुर्गुण कोणते याचा सारासार विचार बाजूला पडून त्यांचा अहंमन्य एकारलेपणा फणा काढून बसला.. मग लोकसभा निवडणुकीत जे काही पानिपत आम आदमी पार्टीचे झाले ते अपरिहार्य होते.

या निमित्ताने आणखी एक मुद्दा म्हणजे, केवळ भावनेच्या आधारावर निर्माण केलेले मुद्दे हा राजकीय पक्षाच्या भवितव्य तसेच स्थिरतेचा आधार ठरू शकत नाहीत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन हा एक मुद्दा म्हणून ठीक आहे. सत्तेत येणा-या राजकीय पक्षाला अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था, अर्थकारण, सामाजिक न्याय, परराष्ट्र, सरंक्षण असा विविधांगी आघाड्यावर देशहित तसेच सामाजिक विचार डोळ्यासमोर ठेऊन एकाचवेळी कधी काम करावे लागते तर कधी लढावे लागते. भारतीय समाज तर राजकीय-सामाजिक आणि भावनिक अशा कोणत्याच पातळीवर कधीच एकजिनसी नव्हता आणि नाहीही… संस्कार, संचित, धर्म-जाती-भाषा अशा विविध पातळीवर हा समाज गुंतागुंतीचा, घनदाट बहुपेडी आहे. त्यात फारच कमी समानता आहेत आणि परस्पर अंतर्गत सांस्कृतिक-धार्मिक-जातीय विरोध जास्त आहेत. आपण विविधतेतील एकता म्हणतो त्याचा खरा अर्थ आपल्या समाजाचे हे खरे स्वरूप आहे. म्हणून ते लक्षात घेऊन या समाजाच्या एकत्रित हिताचा राजकीय विचार मांडणारा पक्षच दीर्घकाळ टिकू शकतो. केवळ भावनेच्या आधारावर राजकारण करणा-या पक्षाला किमान आयुष्य नाही हे आम आदमी पार्टीच्या शीघ्र उदय आणि अस्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. हे सामाजिक हिताचा सर्वागीण विचार करणारे भान, ती राजकीय समज ‘आम आदमी पार्टी’ला लवकर यावी, या पक्षाच्या नेत्यांचे वर्तन तुच्छता आणि एकारलेपणाच्या सीमा ओलांडून पुढे जावे, अशा शुभेच्छा देणे एवढेच आज आपल्या हाती आहे. इतके सारे घडले तरच पुन्हा म्हणता येईल, ‘आप’ तो हमारेही है!

-प्रवीण बर्दापूरकर

संबंधित पोस्ट