मुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण ?

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हे एक न पचवता येणारे असले तरी सत्य आहे. गेल्या साडेतीन दशकात मुंडे काही केवळ एका अपक्षांचे नेते म्हणून महाराष्ट्रात स्थिरावले नव्हते तर एकाच वेळी ते राज्यातील बहुजनांचे आधार आणि पक्षाचा चेहेरा बनलेले होते. एक वाळकी काडी तोडता येते पण, अशा काड्यांची मोळी बांधली तर ती मोळी एक ताकद बनते हे मुंडे यांनी ख-या अर्थाने ओळखले होते. म्हणूनच सांसदीय लोकशाहीच्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या जाती-समुहांची मोट त्यांनी बांधली एक गेम चेंजर म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्थान निर्माण केले. मुंडे यांच्या या मोळीत आणखी काही नव्या काड्या बांधल्या जाणार होत्या आणि त्यांची नांवेही मुंडे यांनी खाजगीत काहींना सांगितलेली होती. पण, मुंडे आता हयात नाहीत त्यामुळे ती नावे न उच्चारनेच चांगले. त्यांची जागा घेणारा जो कोणी असेल तो या बड्या नेत्यांना बहुजनांच्या या मोळीत आणू शकतो का हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे स्वभाव वादळी आणि बेदरकारही असल्याने गणपतीने दुध पिण्याच्या कृतीचे अतार्किक आणि अवैज्ञानिक समर्थन करणा-या आपल्या ‘बॉस’ला म्हणजे मुख्यमंत्र्याला फटकारण्याचा बेडरपणा मुंडे यांच्यात होता. घुसमट झाली म्हणून पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात मोठ्या ऐटीत बंडखोरीचे निशाण फडकावण्याचे धाडस आणि बाळासाहेब ठाकरे यांना मध्यस्थीला टाकून ते निशाण खाली उतरवण्याचा धोरणीपणाही त्यांच्यात होता. राजकीय समन्वयवादी दृष्टी आणि लोकसंग्रह यामुळे ते लोकनेता झाले. त्यांचा पर्याय कोण अशी परिस्थिती निर्माण झालेली नसताना आता अचानक महाराष्ट्र भाजपत नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात भाजपचा अध्यक्ष कोणीही असो चेहेरा मात्र मुंडेच होते. त्यामागे होते गेल्या साडेतीन दशकांचे अखंड श्रम, दूरदृष्टी आणि दुर्दम्य जिद्द. वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारा) हे सूत्र स्वीकारून मुंडे यांच्या हाती १९८६साली प्रदेश भाजपची सूत्रे दिली तेव्हा बहुसंख्यांना हे फाजील धाडस वाटले होते. मराठ्यांनी सत्ताकारण म्हणजे सरकार आणि ब्राह्मणांनी प्रशासन चालवावे असा तो काळ होता. आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष ही काही उच्चभ्रूंची (ब्राह्मण, मराठा, सिंधी आणि मारवाडी) मक्तेदारी होती. उत्तमराव पाटील, रामभाऊ म्हाळगी, राम नाईक, राम कापसे, हशू अडवाणी, धरमचंद चोरडीया… असा पक्षाचा तोंडवळा होता. तोंडी लावायला सूर्यभान वहाडणे, अण्णा डांगे, मधू देवळेकर, गंगाधरपंत फडणवीस (देवेंद्र फडणवीस यांचे वडील) हे होते. मुंडे यांनी हा तोंडवळा बदलून पक्षाला सत्तेच्या दालनात नेले आणि ते स्वत: ‘गेमचेंजर’ बनले. एका दीर्घ राजकीय संघर्षाची आणि सामाजिक ध्रुवीकरणाचीही प्रदीर्घ कथा आहे आणि त्यां कथेचा नायक गोपीनाथ मुंडे आहेत. बहुजनांचे राजकारण आणि चेहेरा मात्र सर्व समावेशक अशी एकाच वेळी दोन तारेवरची कसरत मुंडे यांनी केली.अशी कसरत यशस्वीपणे करण्याचे आव्हान केवळ भाजपच्या नवीन नेतृत्वासमोर नसेल.

मुंडे यांच्या नंतर कोण या प्रश्नाचे उत्तर तीन स्तरावर द्यावे लागणार आहे. यातील पहिला स्तर भारतीय जनता पक्ष, दुसरा सेनेसोबत युती आणि तिसरा स्तर महायुती आहे. मुंडे यांची जागा घेणा-याला केवळ भाजपला सांभाळायचे नाही तर शिवसेनेशी युती नको असणा-या, भारतीय जनता पक्षातील राज ठाकरे यांची मोहिनी पडलेल्या दुस-या फळीतील नेतृत्वाला समजवावे लागेल. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या सेना-भाजप युतीचे शिल्पकार आहेत. बाळासाहेब आणि महाजन असतांना आणि नसतानाही अनेकदा सेनेशी असलेली भारतीय जनता पक्षाची युती तुटेस्तवर ताणली गेली पण तुटली नाही. खुद्द मुंडे यांचेही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीविषयी काही रिझर्व्हेशन होती पण ती उघडपणे न बोलण्याचा धोरणीपणा त्यांच्याकडे होता. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर, चिमूर विधानसभा पोटनिवडणुकीचे देता येईल. विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात सेना आणि भाजप दोघानांही उमेदवार द्यायचा होता आणि त्यावरून उद्धव ठाकरे तसेच नितीन गडकरी यांच्यातील तणाव टोकाला पोहोचला होता. या दोघांचाही उमेदवार रमेश गजबे हेच होते आणि ते ठाकरे-गडकरी या दोघांनाही खेळवत होते! गजबे आमच्यासोबत आहेत असा हवाला एका पहाटे तीन वाजता उद्धव ठाकरे यांनी तर नितीन गडकरी यांनी सकाळी आठ वाजता या पत्रकाराशी बोलतांना दिला आणि गजबे यांच्याशी बोलणेही करून दिले होते! म्हणजे रमेश गजबे यांनी पहाटे तीन वाजता मुंबईत मातोश्रीवर तर तेथून सकाळच्या विमानाने थेट नागपूर गाठून गडकरी वाडा गाठला होता. या तणावाच्या संपूर्ण काळात मुंडे मात्र कोठेच नव्हते, त्यांना हा वाद मुळीच रुचलेला नव्हता मात्र काहीच न बोलता ते पूरग्रस्त मराठवाड्याच्या दौ-यावर ‘गोदा परिक्रमा’ करायला निघून गेले.. इतका राजकारणाच्या विविध पातळीवर धोरणीपणा दाखवणारा नेता भारतीय जनता पक्षाला लगेच मिळणे कठीण आहे. आता मुंडे हयात नसल्याने सेनेशी युती राहणार किंवा नाही हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. केंद्रात स्वबळावर सत्ता संपादन केल्याने एनडीएतील घाटक पक्षांचा प्रभाव नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुगारून लावत सेनेच्या नेतृत्वाची डोकेदुखी वाढवली आहे यात शंकाच नाही.

गोपीनाथ मुंडे यांच्या तुलनेत नितीन गडकरी यांचा उदय नंतरचा पण त्यांची झेप वेग आणि उंची या निकषावर मोठी ठरली, ते राष्ट्रीय राजकारणात पोहोचले. प्रमोद महाजन यांच्या अनपेक्षित हत्येने मुंडे यांच्या वर्चस्वाला तडा गेला बंडखोरीची भाषा करून तो मुंडे यांनी बराचशा प्रमाणात परत मिळवला. नंतर मुंडे-गडकरी वाद महाराष्ट्राने पहिला, मिडियाने गाजवला आणि भाजपला त्याचा कसा फटका बसला हे सर्वज्ञात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात परतायचे नाही हे गडकरी यांनी ठरवल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंडे-गडकरी यांच्यातील मतभेदची दरी सूक्ष्म झाली होती. अनेक वादळे पेललेली आणि त्यांची किंमत चुकती केलेली असल्याने अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे समन्वयवादीही झालेले होते. निवडणुकांचे राजकारण हेच महत्वाचे आहे हे ओळखून त्यांनी काही नवीन समीकरणे लोकसभा निवडणुकीत जुळवली आणि महायुती आकाराला आली. या महायुतीने काँग्रेस-राष्ट्रवादीला धूळ चारली. (म्हणूनच शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना कॅबिनेट मंत्री करण्याची चाल खेळली नाहीये ना?) विधानसभा निवडणुकीआधी मुंडे यांची काही नवीन राजकीय जुळवाजुळवी फलदायी होत असल्याचे दिसत असताना आणि मुख्यमंत्री होण्याचे मुंडे यांचे स्वप्न नजरेच्या टप्प्यात असतानाच ३ जूनने राज्याच्या नेतृत्वाचा प्रश्न भाजप, युती आणि महायुतीसमोर उभा केला आहे.

मुंडे आता हयात नाहीत आणि नितीन गडकरी महाराष्ट्रात परत येण्याच्या मन:स्थितीत नाहीत शिवाय पक्षादेश म्हणून गडकरी राज्यात परतले तरी मुंडे गटाला ते स्वीकारार्ह राहणार नाहीत गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीच्यावेळी परळीत जो काही जनअसंतोष उफाळून आला किंवा ‘आणला गेला’ त्यातून हे सिद्ध झालेले आहे. सोशल साईट्सवर मुंडे यांच्या अपघाताबद्दल जी मोहीम चालवली गेली त्यामुळे मुंडे-गडकरी यांच्यातील मतभेदाची दरी सूक्ष्म झाली तरी कार्यकर्त्यात मात्र ती अद्याप तशीच रुंदावलेली आहे हे पुरेसे स्पष्ट झालेले आहे त्यामुळे गडकरी राज्यात परत येण्याची शक्यता पक्षादेश म्हणूनही धूसरच आहे. आता विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोणावर पक्षाचे नेतृत्व सोपवले जाते की महादेव शिवणकर, पांडुरंग फुंडकर अशी काही जुनीच नाणी पुन्हा चलनात आणली जातात का मुंडे यांच्या ‘जुळवणी योजने’तील एखादे नवीन नाव अनपेक्षितपणे पुढे येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यात एकनाथ खडसे यांचे नाव नाही हे बघून काहींना आश्चर्य वाटेल पण दिल्लीत मुंडे-गडकरी यांच्यानंतर पक्ष पातळीवर फडणवीस, मुनगंटीवार आणि तावडे हीच तीन नावे येतात हे लक्षात घेतले पाहिजे. मुंडे यांची कन्या पंकजा यांच्यासह मुंडे यांचा वारसदार म्हणून जी नावे घेतली जात आहेत त्यांना गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे बहुआयामी नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा  लागेल. भाजपच्या महाराष्ट्राच्या क्षितिजावर नवा ‘गेम चेंजर’ तयार होईपर्यंत महाराष्ट्र भाजपची सूत्रे दिल्लीतूनच हलतील असे आत्ता तरी दिसत आहे.

-प्रवीण बर्दापूरकर

मो. ९८२२०५५७९९
एफ १२ / चाणक्यपुरी / शहानुरमियां दर्गा रोड / औरंगाबाद ४३१००५

संबंधित पोस्ट