‘आई’ , माई आणि गिरीश कर्नाड…

अजूगपणातल्या नोंदी …१

केबिनबंद आणि वाचकांपासून फटकून राहणारी पत्रकारिता मला कधीच जमली नाही . लोकात मिसळावं , त्यांचा कल जाणून घ्यावा . विशेषत: तरुण मुलांशी गप्पा माराव्यात , त्यांना काय वाचायला आवडतं , राजकारणाविषयी त्यांना काय वाटतं , त्यांची भाषा , फॅशन , गाण्यांची आवड जाणून घ्यायला आवडत असे . हा फिडबॅक थेट मिळत असल्यानं त्यानुसार लेखनात आणि पुढे संपादक झाल्यावर अंकात बदल  करण्याचे प्रयत्न आपोआप होत असत . स्वत:ला अपडेट ठेवण्याची ती माझी संवयच होती . विद्यार्थी मंडळाचे संचालक म्हणून प्रा . प्यारेलाल सूर्यवंशी असताना संत गाडेगबाबा अमरावती विद्यापीठात वर्षातून  एक चक्कर व्हायचीच . तरुणांशी भरपूर गप्पा त्यावेळी होत असत . दहा-बारा वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे- प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात ‘सरस कोण ? तुमच्यातला संपादक का  लेखक ?’ असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मी गोंधळून गेलो . आधी वृत्तसंकलन करताना आणि मग संपादक झाल्यावरही मला स्वप्नही पडत ती बातम्या , लेख , अंकाचं नियोजन , मांडणीची .  पत्रकारिता करत असतानाच अन्य लेखन सुरु होतं तरी , हा प्रश्न कधी स्वत:ला विचारलाच नव्हता .

तोवर पत्रकारितेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि परदेशातही भरपूर भटकंती झालेली होती . राजकारण , सत्ता , प्रशासन , समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक नामवंताना भेटता आलं . त्यातले कांही अति उच्चपदस्थ होते , कांही ज्ञानी , कांही मोठा प्रातिभ आवाका असणारे तर कांही चक्क अवलिया होते . अक्षरश:  हजारो माणसं भेटली . या सर्वांकडून कांही ना कांही शिकायला मिळालं . त्यांच्याकडे देण्यासारखं खूप होतं  पण , मी मात्र जेवढा वकूब होता तेवढंच घेऊ शकलो ; त्याबाबत माझीच झोळी फाटकी म्हणायची ! अनेक अनुभवांना कधी कोडगेपणा , कधी बेडरपणा तर कधी हळवा होऊन सामोरा गेलो . शिवाय बातमीत सर्व तपशील आणि सर्व खरं लिहिता येत नाही ; लिहिण्याजोगा तोही साठा मोठा होता . आठवणींची पोतडी जडशीळ झालेली होती . स्वाभाविकच माझ्याकडे सांगण्यासारखं खूप काही होतं . मी ते लिहित होतो . पत्रकारितेतले अनुभव ललित शैलीत लिहित होतो . लेखन ब-याच वाचकांना आवडत होतं , काही जणांना आवडत नव्हतं , असा तो एकूण प्रपंच होता . काही पुस्तकंही प्रकाशित झाली . तरीही माझ्यातला लेखक सरस की संपादक , या एका विद्यार्थ्यानं विचारलेल्या प्रश्नामुळे गोंधळलो होतो , हे मात्र खरं.

नंतरच्या काळात ‘आई’, ‘ग्रेस नावाचं गारुड’ आणि ‘माध्यमातील ती’ ही मी संपादित केलेली तीन पुस्तकं प्रकाशित झाली . यातील ‘आई’ हे साधना प्रकाशनानं तर ‘ग्रेस नावाचं गारुड’ आणि ‘माध्यमातील ती’ देशमुख आणि कंपनीनं  प्रकाशित केलं आहे . ‘आई’वर असंख्य प्रतिक्रिया आल्या . ‘‘आई’च्या सहा आवृत्त्या आता पर्यंत निघाल्या आहेत . ‘आई’ वाचल्यावर सद्गदित होऊन अशात एका वाचकाचा फोन आला . ‘हे कदाचित तुमचं सर्वोत्कष्ट संपादन असावं कारण त्यात मातृत्व , स्त्रीत्व आणि अश्रूंचाही ओलावा आहे’…असं वगैरे ते बरंच काही बोलत राहिले . ‘आई’वर आलेल्या प्रतिक्रियांवर  विचार करताना जाणवलं , लेखनानं आपल्याला व्यक्त होण्याचा खूप सारा आनंद दिला , तर संपादनाच्या कामानं अपार समाधान मिळालं . मग लक्षात आलं , समाधानाची टक्केवारी ५१ तर आनंदाची ४९ टक्के असणार . ही तफावत कमी असली तरी समाधान किंचित का जास्त आहेच  .

पत्रकारितेतर लेखन करताना भाषा , शैली , आकलन याबाबतीत स्वत:ला तपासून पाहता येत होतं . संपादन करताना मात्र ज्यांचा प्रातिभ आवाका आपल्या कवेत मावणार नाही , अशा अनेकांशी संपर्क आला . एकीकडे या प्रतिभावंतांची शैली , शब्दकळा , त्यांची एखाद्या विषयांकडे पाहण्याची दृष्टी , त्यांच्या लेखनातील आशयघनता , त्यांचा त्यांच्या लेखनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण तर दुसरीकडे वाचकांचा त्यांच्याकडे  पाहण्याचा असलेला अपार कौतुक आणि आदराचा भाव , असे अनेक पैलू उलगडत गेले . त्यामुळे आपण उजळून निघतो आहोत , अशी भावना तीव्र होत गेली . हे उजळून जाणं म्हणजेच निबिड अरण्यात अंधाराच्या वेलींवरची फुलं प्रकाशमान व्हावीत , असं काहीसं होतं . शिवाय या संपादनांचं ज्या पद्धतीनं वाचकांकडून स्वागत झालं तो प्रतिसादही स्तिमित करणारा होता , आहे आणि यापुढेही तो असाच राहिल असं दिसतंय .

‘माध्यमातील ती’ चा जन्म कसा झाला हे याआधी सांगितलं ; आज विषय निघालाच आहे तर , ‘आई’ बद्दल लिहितो  . आई हा विषय कळत्या वयापासून माझ्या मनात कोंब धरुन होता . कारण साठीच्या दशकात अनुभवलेली , माईच्या म्हणजे माझ्या आईच्या जीवाची होणारी घालमेल , तिला खाव्या लागणा-या खस्ता

माई

आणि बहुसंख्य समाजाची तिच्या   गो-यापान देहाकडे बघण्याची बुभूक्षित नजर मला तेव्हाच नाहीतर अजूनही कुरतडते . ती नर्स होती असं मी म्हणतो पण , ते तसं खोटं आहे , हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवं . प्रत्यक्षात तिचं पदनाम ‘एएनएम’ म्हणजे ‘ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ’ असं होतं . यातल्या ‘मिडवाईफ’ या शब्दाची मला प्रचंड शिसारी होती . पदरी चार मुलं असताना वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी माई विधवा झाली . आधीच आयुष्यात असणारी अभावग्रस्तता , खाव्या लागणा-या खस्ता आणि बुभूक्षित नजरा आणखी काटेरी झाल्या . ( माईच्या संदर्भात ‘आई’ या पुस्तकात विस्तारानं  लिहिलं आहे . )

मी वयानं वाढत गेलो . वयाच्या तिशीनंतर विवाह झाला . माईपासून दूरदेशी आमचा संसार सुरु झाला आणि एक स्त्री म्हणून माईनं काय काय गमावलं असेल याची जाणीव एकांतात कल्लोळ माजवू लागली . डॉ . रुपा कुलकर्णी , डॉ . सीमा साखरे यांचा सहवास लाभला आणि स्त्रीत्वाच्या वेगवेगळ्या दाहक पैलूंची आच पोहोचली . ‘’स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता’’ या बेडीत पुरुषी वृत्तीनं स्त्रीला जखडून आणि मारुनही टाकलं , ही जाणीव ठाम होत गेली . या पलीकडे जाऊन स्त्रीच्याही गरजा असतात . तिचं काही भावजीवन असतं , केवळ मानसिकचं नाही तर शारीरिक भूक आणि गरजा असतात ,  तिला अन्य नात्यांचीही तीव्र आस असते पण , हे सगळं त्या ‘आई’पणासोबत  अंधा-या कोठडीत आपण ढकलून दिलेलं असतं तरी ती जगत असते पण ते जगणं म्हणजे काय असतं ही आपल्याला कधीच समजलेल नसतं . त्यातच मुंबईत घडलेल्या एका भीषण प्रसंगानं जवळ जवळ कोलमडूनच पडलो .  ( तो प्रसंग ‘आई’च्या भूमिकेत नमूद केलेला आहे .)  ‘आई’  या विषयाच्या जन्माची बीजं अशी रोवली गेली.
विचारांचा हा कल्लोळ अनेक वर्ष मनात धुमसत राहिला . एकदा एका उन्हाळयात यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड या गावी तेव्हा तिथे स्थायिक असलेल्या मामाकडे गेलो होतो . त्याचं नाव अशोक खोडवे . आता त्यानं वयाची ऐंशी पार केलेली आहे . दुपारची वेळ होती . घरी अक्का म्हणजे माझी आजी . माईची आई , तेव्हा ( बहुदा १९८५ साल असावं ते )  तिचं वय वर्ष ८७ का ८९ असं कांहीसं होतं . वाकेलेली पण , ठणठणीत होती . उन्हाळ्याचे दिवस होते . आम्ही दोघंच घरी होतो . दुपारी अचानक जोरदार वारं सुटलं आणि वळिवाचा पाऊस सुरु झाला . हा पाऊस सुरु झाला की , बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या-

वळिवाचा पाऊस पडून ओसरला

भावाला झाल्या लेकी बहीण विसरला

या ओळी कातर आवाजात म्हणत डोळे पुसणारी माई आठवली . ते मी अक्काला सांगितल्यावर तिचे डोळे भरुन आले , घळाघळा वाहूही लागले . ते अश्रू माझ्या आजीचे नव्हते . माईच्या आईचे होते . वयाच्या ४७व्या वर्षी मृत्युच्या अधीन झाली त्या लेकीशी  असलेल्या मातृत्वाच्या अश्रुंची ती नाळ होती . त्या अश्रूंच्या स्पर्शानं स्त्रीत्वाचा आणखी एक अर्थ मला उमगला . जीव कासावीस झाला…

‘लोकसत्ता’ सोडल्यावर लेखनात व्यग्र असताना एक दिवस नागपूरचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी स्मिता स्मृती वार्षिक अंकाचं संपादन करण्याची ऑफर आणि सर्व स्वातंत्र्य दिलं .  त्यावेळी ‘मातृत्वाच्या पलीकडची स्त्री’ हाच विषय घेतला आणि त्यात मातृत्वाच्या मुद्याचा विस्तार ठिपक्याएवढा मर्यादित ठेवला . त्या अंकाला अतिशय हळवा प्रतिसाद मिळाला . पुढे ज्येष्ठ मित्र डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पुढाकार घेऊन साधना प्रकाशनातर्फे ‘आई’ हे पुस्तक प्रकाशित केलं .

‘आई’ या प्रकल्पाच्या निमित्तानं माझ्या कवेत न मावणारा प्रातिभ आवाका असणा-या अनेकांशी संपर्क झाला आणि आकलनाच्या कक्षा आणखी विस्तारल्या . त्यातल्या नामवंत लेखक, नाटककार, अभिनेते , दिग्दर्शक , आचंबित करणारं बहुपेडी व्यक्तीमत्व असलेले ,  सुसंस्कृत , आश्वासक आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे अत्यंत धारदार लोकशाहीवादी असलेले डॉ. गिरीश कर्नाड यांच्या संदर्भातील आठवण मनोज्ञ आहे-

गिरीश कर्नाड यांच्याशी अल्पसा संपर्क आला तो या पुस्तकाच्या निमित्तानं . त्याच
दरम्यान ; आता नाव आठवत नाही पण , कोणत्या तरी इंग्रजी वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीत गिरीश कर्नाड यांनी त्यांच्या बालपणाविषयी लिहिलेला मजकूर वाचण्यात आलेला होता . त्यात त्यांनी त्यांच्या आईच्या संदर्भात जे कांही लिहिलेलं होतं ते मनाला भिडलेलं होतं . तो मजकूर मिळावा अशी खूप इच्छा होती . अखेर एक दिवस ती इच्छा ( खरं तर गळ ) आमचे प्रिय ‘सर’ , महेश एलकुंचवार यांच्या कानी घातली . कारण त्या दोघांमधला परस्परांविषयी असलेला घनगर्द स्नेह मला ज्ञात होता .
एक दिवस ‘तो’ बहुप्रतीक्षित मजकूर चक्क मराठीत माझ्या हाती आला . गिरीश कर्नाड यांच्या आत्मचरित्रातलं ते एक प्रकरण होतं आणि पुण्याच्या सरोज देशपांडे यांनी तो अनुवाद अत्यंत आत्मीयतेनं केलेला होता . तो मजकूर अर्थातच अंकात पहिला लेख म्हणून मी घेतला आणि अंक गिरीश कर्नाड यांना पाठवला . अंकासोबत पाठवलेला मानधनाचा धनादेश परत करतांना त्या अंकातील मजकुराची आणि मांडणीची प्रशंसा करणारं गिरीश कर्नाड यांचं एक पत्र आलं . अर्थात मांडणीचं सर्व श्रेय विवेक रानडे या कलावंताचं होतं . आज ते पत्र शोधलं पण, सापडलं नाही ; बहुदा नागपूरच्या संदुकीत असावं…
‘आई’ हे पुस्तक साधना प्रकाशनानं लगोलग प्रकाशित केलं . ते पुस्तक देण्यासाठी मी एकदा गिरीश कर्नाड यांना पुण्यात भेटलो . त्यावेळी अंकातील जवळजवळ प्रत्येक लेखातील एखादा तरी संदर्भ त्यांच्या बोलण्यात आला ; माझ्या ‘माई’ या लेखावरही ते बरंच   बोलले . विषय म्हणून पुस्तक महत्वाचं आणि तेही एका वेगळ्या जाणीवेनं तुम्ही काढलं असल्यानंच मानधनाचा धनादेश परत केला , असं गिरीश कर्नाड यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं . आभाळभर कर्तृत्व पसरलेली माणसं किती वैपुल्यानं सुसंस्कृत असतात हा अनुभव गिरीश कर्नाड यांच्याशी झालेल्या त्या भेटीत आला .
दिल्लीत असतांना इंडिया हॅबिटॅट सेंटर ( India Habitat Centre )ला एकदा झालेली एक ओझरती वगळता नंतर गिरीश कर्नाड यांची नंतर कधीच भेट झाली नाही ; कळली ती , ते मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात प्रवेश करते झाल्याची बातमी . त्यांच्या लेखाचा तन्मयतेनं अनुवाद करणार्‍या सरोज देशपांडे ( बी-२, अनुपम पार्क , बावधन , पुणे-२१ ) यांचीही कधीच भेट नाही , बोलणंही झालेलं नाही .

‘आई’ या पुस्तकाच्या निमित्तानं केवळ एकटी माईच नाही तर , अशा अनेक प्रतिभावंतांच्या  आईंचा हात माझ्या माथ्यावरुन ममत्वानं फिरत असल्याचं अनेकदा वाटत असतं…

( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत  )

महितीसाठी- ‘आई’ या पुस्तकात गिरीश कर्नाड , महेश एलकुंचवार , आशा बगे , यशवंत मनोहर , सुशीलकुमार शिंदे , सुरेश द्वादशीवर , ह. मो. मराठे , रुपा कुळकर्णी-बोधी , उर्मिला पवार , प्रवीण बर्दापूरकर , इंद्रजित भालेराव , सदानंद देशमुख , श्रद्धा बेलसरे , राजा शिरगुप्पे , अशोक पवार , विवेक रानडे , आसाराम लोमटे , अरुणा साबने यांचे लेख समाविष्ट आहेत .

-प्रवीण बर्दापूरकर

( १७ ऑगस्ट २०२० )

Cellphone  +919822055799 / www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट