एका कवीच्या अकाली मृत्यूची इष्टापत्ती !

|| नोंद …१५ ||

ठवी – नववीत शिकत असल्यापासून कवितेत आणखी रस निर्माण झाला .

त्याचं एक कारण दादा गोरे ; तेव्हा ते शाळेत शिक्षक होते आणि ते सध्या साहित्य व्यवहारच्या संस्थात्मक राजकारणाच्या उलाढालीत बडं प्रस्थ तसंच ज्येष्ठ समीक्षक आहेत .

तेव्हा ते आमचे भाषेचे शिक्षक होते . विशेषतः कविता ते अतिशय रसाळपणे शिकवित .

त्यांच्यामुळे कवितेची जास्त ओढ निर्माण झाली .

पुढे हळूहळू कुसुमाग्रज , पाडगावकर , आरती प्रभू , सदानंद रेगे ,  ग्रेस , सुरेश भट, नारायण कुलकर्णी- कवठेकर, नारायण सुर्वे , यशवंत मनोहर असे अनेक दिग्गज या वाचनातून भेटले .

पत्रकारितेत आल्यावर यापैकी बहुतेक सर्वांच्या दिलखुलास भेटीगाठी झाल्या .

काही जणांशी तर ‘मंतरलेलं सोनेरी पाणी’ शेअर करण्याइतकी सलगी वाढली , पण ते असो .

कारण आजचा विषय तो नाही तर अकाली अस्तंगत पावलेल्या एका कवीचा आहे .

♦♦♦

तो अस्तंगत पावलेला कवी अर्थातच अस्मादिक आहेत , हे वेगळं सांगायला नकोच .

जसं वाचनाचं वेड वाढत गेलं तसं तसं कविता करण्याची ऊर्मीसुद्धा दाटून यायला लागली .

याच ऊर्मीतून किशोर पाठक , विलास शेळके , रेखा जोशी ,  नारायण कुलकर्णी-कवठेकर , अरुणा ढेरे आणि महत्त्वाचं म्हणजे कलंदर चित्रकार धनंजय गोवर्धने यांची भेट झाली .

अकाली निधन झालेला कवी …

 

त्या काळात अस्मादिकानी काही कविता लिहिल्या .

त्यातल्या काही प्रकाशितही झाल्या .

मित्रांच्या कट्ट्यावर ‘या कविराज’ म्हणून कधी स्वागत तर , कधी टांग खेचणंही सुरु झालं .

अर्थात हे सर्व १९८२ पूर्वीचं आहे .

त्या काळात केलेल्या कवितांपैकी एक डायरी अजूनही कपाटाच्या शेल्फमध्ये शाबूत  असल्याचं अलीकडेच लक्षात आलं .                                                                                                       ती डायरी चाळतांना आपण भाबडे होतो की मूर्ख , का गोड गैरसमजात जगणारा मनुष्यप्राणी असा प्रश्न पडला .

♦♦♦

१९८१ सालच्या जानेवारी महिन्यात पत्रकारितेच्या पुढील वळणावर पाय टाकला , त्या वळणाचं नाव आहे नागपूर .

‘नागपूर पत्रिका’ दैनिकात माझी निवड झाली ती त्या वृत्तपत्रासाठी चिपळूणहून लिहिलेल्या काही ललित लेखांमुळे .

शिवाय नागपूरच्या भरजरी सांस्कृतिक विश्वाची तशीही मला भुरळ होतीच .

त्यामुळेच कोल्हापूर का नागपूर असा ‘टाय’ निर्माण झाला तरी , नाणेफेक करण्याची काही गरज पडली नाही आणि माझा पडाव नागपुरात पडला .

♦♦♦

‘ नागपूर पत्रिका‘ दैनिकाची रविवार पुरवणी ‘साकवि‘ ( साहित्य कला आणि विज्ञानाचं लघुरुप ) आणि ‘तरुण भारत’च्या रविवार पुरवणीत तेव्हा स्पर्धा असे .

‘नागपूर पत्रिका’ची पुरवणी यमुनाताई शेवडे आणि मंगला विंचुर्णे तर ‘तरुण भारत’ची रविवार पुरवणी वामन तेलंग बघत असतं .

वामन तेलंग हे तेव्हा साहित्यिक उलाढालीशी संबंधित असलेलं एक दिग्गज नाव होतं .

ते स्वत: उत्तम लेखक होते ; त्यांनी आणि प्रभाकर सिरास यांनी मिळून ‘वामन प्रभू’ या नावानं केलेल्या लेखनाची साहित्य जगतात आवर्जून नोंद घेतली जात असे .

शिवाय आशा बगे , ग्रेस , द . भि . कुलकर्णी असे अनेक मान्यवर त्या रविवार पुरवणीत लिहित .

त्यामुळे ‘तरुण भारत’ची रविवार पुरवणी आणि वामन तेलंग हे त्या काळातलं एक मिथक होतं .

♦♦♦

नागपुरात रुजू झाल्यावर माझ्यातला कवी आणि कथा लेखक अर्थातच स्वस्थ बसलेला नव्हता , उलट दररोज येणा-या नव-नवीन , वेगळया अनुभवातून आणि दिग्गजांच्या भेटीतून माझ्या आकलनाच्या कक्षा विस्तारत होत्या .

अनुभवाची पोतडी वजनदार व्हायला सुरुवात झालेली होती .

एका रणरणत्या उन्हाळयात प्रसिद्धी खात्यातर्फे गोंदिया , भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात  सुरु असलेल्या विकास कामांना पत्रकारांच्या भेटीचा दौरा ठरला .

( तेव्हा माहिती आणि जनसंपर्क खात्यातर्फे असे दौरे पत्रकारांसाठी आयोजित करुन सरकारतर्फे सुरु असलेल्या विकास योजनांची माहिती देण्याची प्रथा होती . ती प्रथा कधीचीच बंद पडली आहे . )

त्या दौ-यात माझी वर्णी लागली ; रणरणती ऊन्ह आणि त्यामुळे रखरखीत होणारे डोळे असा तो अनुभव होता .

त्यात समाधान एकच होतं आणि ते म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा बहुसंख्येनी फुललेली  पळसाची फुलं .

तो जणू पळस फुलांचा उत्सवच होता .

लाल , केशरी आणि अधूनमधून पिवळ्या रंगाचे भडक , मध्यम आणि सौम्य असे ते संमोहित करणारे रंगकल्लोळ होते .

त्या फुलांनी वेडचं लावलं .

दुष्काळग्रस्त मराठवाडयात पळस फुलांचे असे रंग कल्लोळ कधीच बघायला न मिळाल्यानं मी कदाचित जास्तच संमोहित झालेला असू शकेल .

नंतर दोन-तीनवेळा एकटाच त्या प्रदेशात फिरुन त्या रंग कल्लोळात हरवून गेलो आणि परिणामी  ‘पळस फुलांच्या प्रदेशात‘ नावाची एक दीर्घ कविता आकाराला आली . रजिस्टरमधील दीडशे दोनशेपेक्षा जास्त पानं त्या प्रदेशाचा विस्तार होता .

पळस फुलांच्या प्रदेशातले कायदे–कानून , घटना , तिथली लोकशाही , सामाजिक स्थिती असं बरंच काही मी रंगवलं होतं .

त्यात बोचकारे होते , उपहास होता आणि सर्वसामान्यांचं दु:खही होतं , असा माझं ठाम मत होतं .

माझ्या दृष्टिकोनातून ती निर्मिती अर्थातच अत्यंत कसदार आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी काव्यातला तो तसा पहिलाच प्रयोग होता .

पुढचे काही महिने जगण्यासाठी ती धुंदी मला पुरेशी ठरली .

♦♦♦

त्या प्रदीर्घ कवितेच्या संदर्भात मी , मंगला विंचुर्णेशी काहीच बोललो नाही  ; कारण ते वाचून लग्नाचा बेत ती बदलणार तर नाही , ना अशा एक धारदार भीती का , कोण जाणे मनात दाटून आलेली होती .

मात्र , एका संध्याकाळी विदर्भ साहित्य संघाच्या धनवटे रंग मंदिराच्या कट्टयावर रंगलेल्या मैफिलीत ‘पळस फुलांच्या प्रदेश’ विषयी मी वामन तेलंग यांना सांगितलं .

हे प्रदेश ‘नागपूर पत्रिका’ नव्हे तर ‘तरुण भारत’च्या रविवार पुरवणीत प्रकाशित व्हावेत ही इच्छा , कोणताही संकोच न बाळगता वामनरावांना सांगितली .                          वामनराव त्यांच्या शैलीत मंदसे हंसले .

हंसण्यातून होकार किंवा नकार व्यक्त न होऊ देणं म्हणजे ‘नॉन कमिटल’ राहणं ही वामनरावांच्या हंसण्याची खासियत होती .

मग थोडं फार इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर परस्परांचा निरोप घेतांना , ‘दे , तुझे ते पळस फुलांचे की काय ते प्रदेश’ वाचायला , असं वामनरावांनी सांगितलं आणि लुनावर बसून ते निघून गेले .

पुढे दोन – चार  दिवसांनी तरुण भारतात फोन करुन रीतसर भेटेची वेळ ठरवून एक दिवस वामनरावांना भेटलो .

मी गेलो तेव्हा योगी ध्यानमग्न असावा तसे कोणत्यातरी लेखावर संपादकीय संस्कार करण्यात वामनराव मग्न होते .

त्यांची मग्नता संपल्यावर मी अतिशय भक्ती भावानं शबनम बॅगमधून काढून ते रजिस्टर वामरावांना दिलं .

उघडूनही न पाहता ड्रावर उघडून त्यात ते ‘पळस फुलांचे प्रदेश’ ठेवून ड्रावर पुन्हा बंद करुन वामनराव म्हणाले , ‘ठीक आहे . सावकाशीनं वाचेन मी हे आणि कळवेन तुला .’ मी थोडावेळ घुटमळलो पण , ‘मी आता कामात आहे , तू निघ’ असं वामनरांवांनी स्पष्टच सांगितलं .

त्यानंतर दिवस , महिने आणि वर्ष उलटलं तरी वामनराव पळस फुलांच्या  प्रदेशाबद्दल काहीच बोलले नाहीत .

मग मी त्यांना आधी आडवळणांनी आणि एकदा थेट विचारायला सुरुवात केली .

एक दिवस त्यांनी धनवटे रंग मंदिराच्या समोरच ‘तुझं बाड हरवलं ब्बुवा माझ्याकडून’ असं आणि हातातल्या सिगारेटची राख झटकत ; तो विषय आणि ती राख एकदमच झटकून टाकली .

♦♦♦

एव्हाना मीही कथा – कवितेपासून दूर जाऊ लागलो होतो .

कारण , आपलं अनुभव विश्व फारंच तोकडं आहे आणि भाषेची समजही प्रौढ झालेली नाही असं जाणवू लागलेलं होतं .

त्यातच राजकीय वृत्तसंकलनाकडे वळल्यामुळे एका नव्या , कवेत न  येणा-या दालनात प्रवेश झालेला होता .

त्या दालनात मी रमू लागलो होतो तरी , अधूनमधून मला ‘पळस फुलांच्या प्रदेश’ची आठवण येत असे .

पुढे पाच – सहा वर्षांनी एकदा मी वामनरावांना त्याबददल थोडं टोकलं तेव्हा , चष्म्याआडून डोळे रोखून माझ्याकडे नजर रोखून बघत वामनराव म्हणाले , ‘गड्या, तुझ्या  त्या निर्मितीत की काय ते , मन लावून वाचावं असं काहीच नव्हतं , हे एकदा सांगून टाकायला हवं तुला !’

पण , मला वामनरावांचा राग आला नाही ; कारण कविता हा आपला प्रांत नाही हे तोवर मी मनोमन स्वीकारलेलं होतं .

दरम्यान सभोवताली कवीतेचं अत्यंत कसदार पीक तरारुन आलेलं होतं .

जगण्याचा श्वास झाला  तरच कवितेची निर्मिती करता येते हे तोवर मला चांगल आकळलेलं होतं आणि तोवर पत्रकारिता माझ्या  जगण्याचा श्वास झाली होती .

मला स्वप्नही बातमी , लेख आणि ले–आऊटची पडत .

अशा परिस्थितीत कविता माझी होऊच शकणार नव्हती .

जे माझं होणारचं  नाही त्याची असोशी बाळगण्यात काहीच हंशील नाही , हे भान तोवर प्रबळ झालेलं होतं .

एक मात्र खरं वामनराव तेलंगांमुळे मराठी साहित्य जगतात एका कवीची भर पडली नाही .

♦♦♦

याचा शेवट आणखी शोकात्म होता…

एकदा बोलता बोलता ही दर्दभरी हकीकत मी बेगम मंगलाला , ‘तुम क्या जानो तुम्हारी याद मे हम कितना रोये’ च्या चालीवर सांगितली आणि म्हटलं , ‘एका कवीचं अशा प्रकारे आकस्मिक निधन झालं…’

ऐकून घेतल्यावर बेगम शांतपणे म्हणाली , ‘तुझी ती दीर्घ आणि अन्य कविता मी वाचल्या आहेत . तुझ्या कविता एकूणच बेकार आहेत . वामनरावांच्या निर्णयामुळे एका कवीचं आकस्मिक  निधन झालं हे खरं पण , त्यामुळे दु:ख होण्याचं कारण नाही आणि आपत्ती तर मुळीच कोसळलेली नाही . हे निधन ही एक इष्टापत्ती समजते मी . तू पत्रकारिता कर नीट , कारण तेच तुझं भवितव्य आहे…’

पळस फुलांची ही छायाचित्रे पहिली आणि हे सारं आठवलं .

( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत  )

प्रवीण बर्दापूरकर

( १९ ऑक्टोबर २०२० )

Cellphone  +919822055799 / www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट