आम्ही पदवीधर ‘लढवल्या’ची कथा !


नोंद …१८

दवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर सदस्य निवडून देण्याच्या निवडणुकीची महाराष्ट्रात सध्या धुमधाम सुरु आहे . त्यानिमित्ताने आम्हीही लढवलेल्या अशा एका निवडणुकीची धमाल आठवली . आम्ही म्हणजे प्रकाश देशपांडे , सिद्धार्थ सोनटक्के आणि मी . आम्हा तिघांचं तेव्हा त्रिकूट होतं ( तोवर धनंजय गोडबोले आमच्या गोटात सामील व्हायचा होता ) आणि तेव्हा ते नागपूरच्या पत्रकारितेतं प्रसिद्ध होतं . प्रकाश तरुण भारतात , सिद्धार्थ सोनटक्के लोकमतमध्ये आणि मी नागपूर पत्रिका या दैनिकात . अर्थात नागपूर पत्रिका या दैनिकासोबतच सकाळच्या पुणे आणि मुंबई या आवृत्तीचा वार्ताहर आणि मंगलाच्या नावावर लोकसत्ताचा वार्ताहर म्हणून मी काम करत होतो . आमच्या तिघांशिवाय १९८९ मधल्या या हकिकतीचा आणखी एक नायक आहे नितीन गडकरी .

नितीन गडकरी हे तेव्हा नागपूरच्या तरुण नेतृत्वापैकी एक नाव आणि आम्हा तिघांशीही नितीन यांचेचांगले संबंध . अर्थात नितीन यांच्याशी असणारी माझी दोस्ती जरा जास्तच होती .  ( आमचे परस्पर संबंध अस्सल दोस्तीचे म्हणजे ‘अरे-तुरे’चे आहेत . मात्र अलीकडच्या तीन-चार वर्षात जाहीररीत्या एकमेकाचा उल्लेख तसा ‘अरे-तुरे’ न करण्याचा शिष्टाचार पाळायला आम्ही सुरुवात केलेली आहे पण , ते असो . ) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची जी हकिकत मी जी तुम्हाला सांगणार आहे , त्या आधी पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांनी निवडणूक लढवलेली होती आणि त्यांचा पराभव झालेला होता . दरम्यानच्या काळात पक्षाचं कार्य जोमाने करत भावी दमदार नेतृत्व अशी ख्याती नितीन यांनी संपादन केलेली होती आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे नितीन भविष्यात राजकारणातील बडी आसामी बनणार अशी लक्षण तेव्हा दिसू लागलेली होती .

याच दरम्यान गंगाधरराव फडणवीस यांचं निधन झालं आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त झाली . ( गंगाधरराव फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे वडील . आधी जनसंघ आणि भाजपचे ते निष्ठावंत होते आणि सर्व पक्षात त्यांचे अतिशय छान संबंध होते . एक उमदा आणि दिलदार नेता अशी त्यांची ख्याती होती . ) या जागेसाठी तसे बरेच दावेदार त्याकाळामध्ये होते . तरी भाजयुमो आणि अन्य आघाड्यांवर जी प्रशंसनीय कामगिरी नितीन गडकरी यांनी बजावलेली होती त्यामुळे त्या मतदारसंघातून नितीन गडकरी यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होतं आणि झालंही तसंच .

एक गोष्ट सांगितली पाहिजे की , वैयक्तिक संबंध आणि आपल्या राजकीय भूमिका याची कोणतीही गल्लत न होऊ देण्याची काळजी मैत्रीत आम्ही तेव्हा घेत होतो आणि अजूनही घेतोच . आमच्या मैत्रीतही जात , धर्म , लिंग असे अडथळे कधीच नसतात . नितीन गडकरी भाजपचे आणि मी समजावादी सिद्धार्थ आंबेडकरवादी तर प्रकाश तसा सेक्युलर  तरी , आमची मैत्री घट्ट , नितळ आणि निरपेक्ष होती . अगदी आजवर आम्ही दोघांनीही एकेमेकाला कांहीही मागितलेल नाही ;  अमुक एक बातमी घे असं नितीन यांनी मला कधीही सांगितलं नाही , हे इथे आवर्जून सांगायला हवं . आमच्यात केवळ नितळपणे खळाळणार मैत्र आहे .

निवडणुकीचे वारे वाहू लागले ( म्हणजे नेमका काय होतं हे आजवर कधीच समजलं नाही पण , असं लिहायचा प्रघात म्हणा कि पत्रकारितेतलं शास्त्र आहे म्हणा  ! ) आणि एक दिवस नागपूर पदवीधर मतदार संघाची यादी चाळत असताना आपणही निवडणूक लढवावी असा विचार सिद्धार्थ सोनटक्के याच्या मनात आला . आमचं त्रिकूट असल्यामुळे जो विचार  सिद्धार्थच्या मनात आला तो आमच्या मनातही येणार हे स्पष्ट होतं . त्याप्रमाणे प्रकाश आणि मी सिद्धार्थच्या या निवडणूक लढण्याच्या निर्णयाला ताबडतोब पाठिंबा जाहीर केला . इतकंच नाही तर पुढे जाऊन प्रकाशनं त्या निवडणुकीच्या प्रचाराची आखणीही सुरु केली .

निवडणूक लढवणं हा काही पोरखेळ नव्हे , हे समजण्याचं ते वय नव्हतं . आम्ही तिघंही तिशी –पस्तीशीतले होतो . आम्ही बरं लिहितही होतो , त्यामुळे पत्रकारितेत बऱ्यापैकी नाव होतं . शिवाय त्या मतदार यादीतले असंख्य आमच्या ओळखीचे होते आणि ते आपल्याला मतदान करतील असा ( भाबडा ! )  विश्वास होता . त्या भांडवलाच्या आधारे ही निवडणूक लढवू शकतो असं आम्हाला वाटत होतं तरी ‘खिशात नाही दमडा आणि बाजारात निघाला कोंबडा ’अशी आमची अवस्था होती हे मात्र नक्की . एकदा निवडणूक लढवायची ठरवल्याच्यानंतर मग आम्ही तयारीला लागलो . सर्वांनी थोडे-थोडे काढत आठ-दहा  हजार रुपये जमाही केले . काही मित्रांना आवाहन करुन प्रवास आणि भोजनाची सोय केली आणि आम्ही प्रचाराला बाहेर पडलो . एव्हाना आम्ही निवडणूक लढवण्याच्या बेत पत्रकारितेत चांगलाच पसरलेला होता . काही जण आमची टवाळी करत होते तर काही जणांना आम्ही निवडणूक लढवतोय याचं कौतुक होतं तर काही जणांचं म्हणणं मात्र ते ‘वेडं साहस’ आहे असं होतं . पण , कोण काय म्हणतं  याची फिकीर आम्हाला नव्हती आणि तोपर्यंत ते म्हणणं लक्षात घेण्याइतकं भानही आम्हाला तेव्हा उरलेलं नव्हतं .

यशावकाश आमचाही प्रचार सुरु झाला . सुरुवातीला आम्ही तिघं जण एकत्र फिरत    असू . आमच्यासोबत नेताजी राजगडकर , प्रभाकर पावडे वगैरे अशी अनेक मंडळी त्यात सहभागी होत असत . जेमिनी कडूही चार-पाच वेळा आमच्यासोबत प्रचारासाठी आल्याचं आठवतं . असं अनेकांचं सहकार्य मिळत होतं . नागपूर शहरात आम्ही आपापल्या स्कूटरवरुन  तर बाहेरगावी बसनं , असं आम्ही प्रचारात रंगून गेलेलो होतो . पण अवघ्या सात-आठ दिवसांतच आमच्या लक्षात काही बाबी आल्या , पदवीधरची निवडणूक अन्य सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे नसते . एक तर इथला मतदार आधी ‘बांधावा’ लागतो . ‘मतदार बांधणं’ म्हणजे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्यानी त्याच्या समर्थक पदवीधराची नोंदणी मतदार म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात करुन घ्यायची असते कारण समर्थक दुसर्‍या उमेदवाराला मतदान करत नाही ( हे आमच्या नंतर लक्षात आलं ! ) . जो जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करुन घेईल त्याचा मार्ग विजयाच्या दृष्टीकोनातून प्रशस्त होत जातो . वरवर पाहता हे समीकरण सोपं वाटतं पण , ते प्रत्यक्षात सोडवायला ते तितकं सोपं नसतं . कारण आपले समर्थक शोधणं त्यांच्याकडून मतदार यादीत समाविष्ट होण्याची आवश्यक ते फॉर्मस् भरुन घेणं , त्याचं शुल्क भरणं , ते नाव मतदार यादीमध्ये आल्याची खातरजमा करणं , यासाठी एक फार मोठी यंत्रणा उभारावी लागते . शिवाय हे काम अतिशय चिकाटीचं असतं ; ते खूप आधीपासून करावं लागतं . भाजपाकडे तशी यंत्रणा होती . आधी जनसंघापासूनच्या निवडणुकीचा अनुभव होता . त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपनं अतिशय पक्का बांधून ठेवलेला होता आणि त्या मतदारसंघात भाजपाला तोडीस तोड उमेदवार निर्माणच होऊ शकत नव्हता .

शिवाय मतदार नोंदवून घेण्यासोबतच भाजपाची प्रचाराची  यंत्रणाही अतिशय मोठी होती ; अगदी गल्ली पातळीवर त्यांचं नियोजन होती .  त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक फार काही अवघड नव्हतीच . आम्ही मात्र ही निवडणूक या दृष्टीकोनातून लढवण्याचा विचारच केला नव्हता . किंबहुना खरं सांगायचं तर निवडणुकीचा प्रचार सुरु

निवडणूक लढवली तेव्हाचा सिद्धार्थ सोनटक्के

झाल्यावर मतदार नोंदवणं , मतदारसंघ बांधणं प्रचार प्रत्यक्ष कसा करणं या ज्या बाबी आहेत त्या आमच्या लक्षात येत गेल्या . नागपूर पदवीधर मतदारसंघातला प्रत्येकच मतदार हा पुरोगामी आणि संवेदनशील आहे आमच्यासारख्या पत्रकारांना तर तो हमखास मतदान करणार हे आम्ही गृहीत धरलं होतं .  प्रचाराला बाहेर पडल्याच्या नंतर आम्हाला ‘बांधणी’चं गणित लक्षात आलं . ओळखीचे मतदार आम्हाला टाळू लागल्यावर , जाणकार पत्रकार आपल्याला का हसले हे  आम्हाला कळलं आणि आमचा निवडणुक लढवण्यातला  उत्साह हळूहळू कमी होऊ लागला , मात्र ते आम्ही कुणालाच दर्शवू दिलं नव्हतं . हिंमत हरुन चालणार नव्हतं  कारण , एक वेडं का असेना धाडस करण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं होतं आणि आम्ही नेटानी प्रचार सुरुच ठेवलेला होता .

नागपूर व पूर्व  विदर्भात फिरुन प्रचार करणं हे किती अवघड आहे हे आमच्या नंतर नंतर लक्षात येत गेलं . केवळ पाच –सात जणांची टीम आणि तेही एसटीच्या बसनं फिरुन संपूर्ण विदर्भभर प्रचार करु शकत नाही ;  दिवसभरात पाच –सातपेक्षा जास्त मतदारांना भेटूही शकत नाही , हेही आमच्या लक्षात आलं . खरं तर हे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही पूर्ण निराश व्हायला पाहिजे होतं ; परंतु तसं निवडणूक लढवताना घडत नाही . कोणतीही असो निवडणूक लढवण्यातली एक गंमत असते . खरं तर ,  जो उमेदवार निवडणूक लढवतो त्याला निवडणुकीच्या निकालाचा अंदाज पूर्णपणे आलेला असतो . म्हणजे आपण पराभूत होणार हे त्याला शंभर टक्के ठाऊक असतं . मात्र , विजय मिळणार ही उमेद त्याला कायम तेवती ठेवावी लागते . ती केवळ त्याच्याच मनात आणि कृतीत तेवत असली पाहिजे , असं नाही तर, कोणत्याही परिस्थितीत आपणच विजयी होणार हा विश्वास त्याला त्याच्या समर्थकालाही द्यावा लागतो . जोपर्यंत अशी विजयाची प्रबळ इच्छाशक्ती ‘जागृत’ नसेल तोपर्यंत निवडणूक लढवण्यात काहीच मतलब नसतो . हा खरं तर एक भाबडेपणा असतो . पण , निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला तो भाबडेपणा शोभून दिसतो हे मात्र खरं .

तर , त्या शोभून दिसणाऱ्या भाबडेपणाला अनुसरुन आम्ही ती निवडणूक लढवत होतो . या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे आठ – दहा दिवस राहिले असताना एक दिवस नितीन गडकरींचा फोन आला आणि त्यांनी विचारलं , ‘ मित्रा , तुमची निवडणूक कशी चालली आहे ?’

तेव्हा मी त्यांना अतिशय ठामपणे सांगितलं की , ‘या निवडणुकीत आमचा विजय नक्की आहे…’ मग सावध होऊन मी उत्तर दिलं की , ‘आम्ही किमान दुसऱ्या नंबरची तरी मतं मिळवणार हे निश्चित आहे’ . नितीन तिकडून त्याच्या मोकळ्या-ढाकळ्या शैलीत गडगडाटी हंसला . हंसणं आवरल्यावर त्यांनी ‘तुमचा प्रचार कसा चालू आहे ?’ असं अतिशय आस्थेनं असं विचारलं .

त्यावर मी, ‘या चौकशा का ?’ असा प्रतिप्रश्न विचारला .

तेव्हा ते म्हणाले की, ‘आपण सर्व मित्र आहोत . मित्रांनी मित्रांची काळजी घेतली पाहिजे . आपण जरी निवडणूक लढवत असलो तरी आपण शत्रू नाहीत . आपण केवळ प्रतिस्पर्धी आहोत . निवडणूक सुरु होण्यापूर्वी , निवडणूक सुरु असतांना आणि निवडणूक संपल्यावरही मित्र म्हणून कायम राहणार आहोत . तेव्हा मला तुमची चौकशी करणं आणि तुम्हाला काही हवं असेल तर देणं अतिशय आवश्यक वाटतं .’

मी त्यांना विचारलं की, ‘मदत म्हणजे नेमकं काय करणार आहात ? ’ तेव्हा नितीननी सांगितलं की , ‘तुमच्याकडे प्रचारासाठी एकही गाडीसुद्धा नाही असं मला कळलेलं  आहे . तेव्हा पेट्रोल टॅंक पूर्ण भरुन . एखादी गाडी पाठवण्याच्या विचारात आहे .’

दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडे एक अॅम्बेसडर कार ड्रायव्हर आणि एका ‘वुईथ लव्ह फ्रॉम नितीन’ अशा एका पाकीटासह हजर झाली . प्रतिस्पर्धी उमेदवाराला स्वत:च्या प्रचारासाठी ‘रसद’ पाठवणारा नितिन गडकरी हा एक एकमेव उमेदवार आजवरच्या आयुष्यात माझ्या तरी पाहण्यात आहे . मैत्रीची ही एक अनोखी मिसाल म्हणूनही याच्याकडे बघायला हवं . मग ती कार घेऊन पुढचे चार-पाच दिवस आम्ही प्रचार केला . कारनं प्रचार करतानासुद्धा आमच्या तिघांच्या सहज लक्षात आलेली बाब ही होती की , आपण दिवसांतून जास्तीत जास्त दोन किंवा तीन गावांना भेटी देऊ शकतो आणि जास्तीत जास्त आठ किंवा दहा मतदारांना भेटू शकतो . शिवाय कारमधूनही फिरलो तरी आपण प्रचाराची सभा वगैरे घेऊ शकत नाही कारण एखाद्या गावात प्रचाराची सभा घेण्यासाठी जी काही यंत्रणा उभारावी लागते तसं मनुष्यबळ आणि ती प्रचाराची यंत्रणा आपल्याकडे नाही . तरी आम्ही नेटानं प्रचार सुरुच ठेवला .

दिवसभराचा प्रचार संपला की आम्ही तिघं मठातील वृद्ध साधूला ( म्हणजे ओल्ड मॉन्क हो ! ) शरण जात आमच्या निवडणूक लढवण्याच्या बेताबद्दल गंभीरपणे चर्चा करत असू . त्या मंतरलेल्या सोनेरी पाण्यासोबत रात्री घालवलेले ते  क्षण त्या काळातले आमच्यासाठी सगळ्यात चांगले ठरले हे वेगळं कांही सांगायला नकोच . अशी ती निवडणूक आम्ही लढवली . निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला . आमच्या उमेदवाराला साडेतीनशे  चारशेही मत मिळालेली नव्हती आणि जी काही साठएक हजार मतदारांची नोंदणी झालेली होती त्यापैकी चाळीस का बेचाळीस हजार मते मिळवून पहिल्याच फेरीत नितीन गडकरी विजयी झाले होते . नितीन गडकरी यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्वात आधी पोहोचलेल्यात आणि नंतरच्या भोजनात आम्ही मित्र म्हणून अत्यंत आनंदानं सहभागी झालो , हे वेगळं सांगायची गरज नाहीच  .

पुढे नितीन गडकरींनी राजकारणाच्या क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली . आता तर केंद्रीय मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत पण , विरुद्ध निवडणूक लढवल्यामुळे आमच्या मैत्रीत कोणतेही किमान मतभेद की किंचितही कडवटपणा निर्माण झाला नाही . आमच्या मैत्रीचा प्रवाह आहे अजूनही तस्साच तसाच खळाळता आहे . मात्र या कथेतले प्रकाश देशपांडे आणि सिद्धार्थ सोनटक्के आता मृत्यू नावच्या प्रदेशात गेलेले आहेत…

आता जी पदवीधर मतदार संघाची जी निवडणूक चालू आहे त्यामुळे हे सर्व आठवलं आणि आमच्या राजकीय भूमिकेच्या पल्याडची नितळ मैत्री कायम राखणारी त्या  एका निवडणुकीतली धमालही आठवली . या निवडणुकीत विजय होणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा ! आणि पराभूत होणाऱ्या आणि पराभूत होणार्‍या उमेदवारांना  पुन्हा पुढची निवडणूक लढवण्यासाठीही शुभेच्छा

प्रवीण बर्दापूरकर

( ३० नोव्हेंबर २०२० )

Cellphone  +919822055799 / www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट