सदा डुम्बरेचं नसणं…

|| नोंद …२४ ||

( केवळ माहितीसाठी- सदाचं आडनाव डुम्बरे आहे , डुंबरे नाही ! )

■■

दा डुम्बरेच्या मृत्युच्या बातमीनी हृदयात कालवाकालव झाली…

अलिकडच्या काही महिन्यात आमच्यात ‘ना कोई बात , ना कोई संदेश ’ असं काहीसं झालेलं होतं . खरं तर , गेल्या आठवड्यातच जी अजुगपणाची नोंद धनंजय गोवर्धने आणि परीक्षित बीडकर यांच्या निमित्तानं लिहिली त्यात सदा डुम्बरेचा उल्लेख होता . सदा आजारी होता हेही मला तरी माहिती नव्हतं . आपण आत्ममग्न झालो की इतरांची खबरबात कळण्यात जरा उशीरच लागतो , तसंच काहीसं आमच्या बाबतीत झालं होतं .

सदा आपल्यात नाही या वाक्यातील ‘नाही‘  लिहितांना खूपच दाटून येतयं…

■■

सदाची माझी ओळख १९७९-८० मधली तेव्हा तो  ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचा संपादक होता आणि मी चिपळूण च्या ‘सागर‘ या दैनिकात उमेदवारी करत होतो . काहीबाही लिहित होतो . ते प्रकाशितही होत होतं . ते कुठेतरी काहीतरी पाहण्यात आलं असावं म्हणून ‘सकाळ’चा वृत्तसंपादक असलेल्या किशोर कुलकर्णी आणि माझ्यात संपर्क झाला . मग मी ‘सकाळ’चा  चिपळूणचा वार्ताहर म्हणून मी काम करु लागलो . वार्ताहरांच्या पहिल्या बैठकीसाठी कोल्हापूरला गेलो . तेव्हा संपादक सदा डुम्बरेची भेट झाली . नवोदित वार्ताहर आणि प्रस्थापित संपादक हे अंतर फार मोठं असतं पण , का कोण जाणे बैठक आणि नंतर  दैनिकाचं काम संपल्यावर किशोर कुलकर्णी आणि मला घेऊन ज्या हॉटेलमध्ये राहात होता त्या हॉटैलच्या खोलीवर सदा आम्हाला घेऊन गेला . मग तिथे मंतरलेल्या सोनरी पाण्यासोबत जी मैत्री आमच्यात सुरु झाली ती कधी खंडित झालीच  नाही . त्या भेटीतच आम्ही ‘अरेतुरे’वर आलो .

सदा माझ्यापेक्षा वय , पद आणि अनुभवानं मोठा होता . आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांना सांभाळून घेण्याची एक वडीलधारी वृत्ती त्याच्यामध्ये होती .  त्याच वृत्तीतून एक जबाबदारी म्हणून त्यानं आमच्यातली मैत्रीही सांभाळून घेतली . पुढे , ‘Chiplun is not cup of my tea’ ही वेळ आली तेव्हा , माझ्यासमोर कोल्हापूर , नागपूर की पुणे असा पर्याय होता . नागपूरची भुरळ मला जास्त पडलेली होती . मी नागपुरात डेरेदाखल झालो . नागपुरात आल्यावर सदा आणि माझ्यात मोठं भौगोलिक अंतर निर्माण झालं पण , ते अंतर मैत्रीत नव्हतं . क्वचित फोनाफानी असे . पत्रोपत्री असे . त्याकाळात मी पुण्याला तेव्हा नियमित जात असे . तेव्हा आमच्या नियमित भेटी होत असत . एकदा तर सदाच्या पत्रकार कॉलनीतल्या घरी मी मुक्कामाला होतो . अतिशय नीट-नेटकं , नैसर्गिक प्रकाशात लख्ख न्हाऊन निघालेलं ते घर . पुस्तकं आणि शोभेच्या अनेक चोखंदळ वस्तू . त्यांची देखणी मांडणी . सदाच्या अभिजात वृत्तीला साजेसा तो फ्लॅट मनात भरला . घरी कुणीच नव्हतं . सदानं स्वत: स्वयंपाक करुन खिलवलं होतं . अशा असंख्य आठवणी आहेत .

■■

सदाचं व्यक्तिमत्त्व लोभस होतं . डोईवरचे स्वच्छंद केस , गुबगुबीत चेहरा , गव्हाळ वर्ण , कांहीशी स्थूल पण नेटकी शरीरयष्टी , अत्यंत नीटनेटकी राहणी , सतत वाचन , श्रवण , बोलण्यात मार्दव आणि कायम सस्मित असणारा चेहरा , ही सदाची वैशिष्ट्ये . गुणवत्तेच्या भरवशावर जे मिळायला हवं ते मिळालं नाही तरी , उसासे , उमाळे नाहीत . वचावचा

सदाचं देखणं हस्ताक्षर

बोलणं नाही , स्वत:ची टिमकी , बढाया नाही की फुशारक्या नाहीत . जे बोलायचं ते अभ्यासोनी ही सदाची वृत्ती . सदाचं अक्षर देखणं आणि ऐटबाजही . कागदावर मोती रेखीवपणे मांडून ठेवावेत तशी त्याची कॉपी होती .

सदामुळे माझ्या मित्रपरिवारात खूप मोठी भर पडली . आधी विलास शेळके आला , मग धनंजय गोवर्धने आला मग किशोर पाठक . मग अशा पुण्यातील अनेकांशी माझ्या ओळखी झाल्या , मैत्री झाली त्याला कारणीभूत सदा होता . अनेक प्रसंगी आम्ही एकत्र होतो . अनेक विषयांवर गप्पा झाल्या . तरी आमच्यात कौटुंबिक नातं नाही निर्माण झालं . म्हणजे बोलणं होत असे पण , तेवढ्या पुरतं तेवढं . सदाच्या त्या लोभस हसण्यामागे कांही तरी सल असावी असं मला कायम वाटे . दोन-तीन वेळा मी ते बोलूनही दाखवलं पण , तस्सच वरचा ओठ दुमडत लोभस हंसत त्यानं माझं म्हणणं टोलावून लावलं .

■■

सदाचा  पुण्यातला आणि माझा नागपुरातला पत्रकरीतेतला प्रवास समांतर होता .

सदा निश्चितच मोठा संपादक होता . त्याचं आकलन, त्याचा संपादकीय आवाका , त्याचं वाचन आणि महत्त्वाचं म्हणजे मला मोह पाडणारी त्याची वाणी . त्या काळात शरद पवार , शरद जोशी आणि सदा डुम्बरे या तिघांच्या बोलण्याची मला खूप भुरळ पडलेली होती . याचं कारण त्यांची उच्चार पद्धती . सदाच्या बोलण्यातले जे उच्चार होते , त्याची नजाकत काही औरच होती .

माझ्या लिखाणाकडे त्याचं बारीक लक्ष असायचं . त्यात काही सुधारणा असल्या तर तो सांगायचा आणि आवडलं तर तेही आवर्जून भेट झाल्यावर सांगायचा पण , हे सगळं अधूनमधून घडत होतं . दररोज , साप्ताहिक किंवा मासिक अशा आमच्या भेटी नव्हत्या . भेट व्हायची तेव्हा असं लक्षात यायचं की , एक वडीलधारी असणारी सदाची नजर आपल्यावर आहे . पुढे मी राजकीय वृत्तसंकलनात आलो आणि तिकडेच स्थिरावलो . ते काही सदाला फारसं आवडलं नव्हतं . राजकीय वृत्तसंकलानात गेलेला माणूस एकदा का सत्तेच्या दरबारात रमला , तिथे त्याचा वावर वाढला की , कितीही नाही म्हटलं तरी  त्याचं वाचन , लेखन जरा थांबूनच जातं , त्याचं डबकं होतं असं त्याच म्हणणं होतं आणि झालंही तस्सच खूपशा प्रमाणात . १९८४ नंतर २००० पर्यंत माझ्या ललित  लेखनाचं गाडं पुढे काही सरकलंच नाही . माझ्यातला कथा लेखकही संपून गेला . कवी तर कधीचाच संपला . माझं वाचनही प्रामुख्यानं राजकारणाभोवती केंद्रीत झालं  . भेट झाली की , हे मी सदाला मोकळेपणाने सांगत असे आणि मग तो प्रतिसाद म्हणून दो अस्फुट स्माईल देत असे आणि   माझ्या पाठीवर थाप मारत असे .

■■

सदाचं बहुसंख्य लेखन मी वाचलं . पण , सदा लेखक असण्यापेक्षा संपादक म्हणून थोडा का असेना जास्त मोठा होता , असं माझं मत आहे .  कुणाला कसं लिहितं करावं ,  कुणाकडून काय लिहून घ्यावं ,  याचं त्याच्यातलं संपादकीय भान फार मोठं होतं . तो ‘सकाळ’च्या रविवार पुरवणीचा संपादक असतानाची आठवण आहे- कवीश्रेष्ठ ग्रेस यांचा स्तंभ रविवारच्या सकाळसाठी सुरु करण्याचा आमचा एक प्रयत्न तेव्हा खूपच प्रदीर्घ काळ चालला होता . ग्रेस जितके प्रतिभावंत होते तितकेच  त्यांच्या प्रतिभेला साजसे ‘मुडी’

सदाचं आडनाव ‘डुम्बरे’ होतं , ‘डुंबरे’ नाही हे अनेकांना कधी  कळलंच  नाही ; या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघा !

होते . अनेकदा चर्चा आणि फॉलो-अप घेतल्यावर त्या स्तंभाचे दोन मजकूर मिळाले पण , दरम्यान  ग्रेस यांचा स्तंभ  लिहिण्यातला  उत्साह संपला . किमान पांच-सहा लेख हाती आल्याशिवाय स्तंभ सुरु न करण्याबद्दल सदा ठाम होता आणि अखेर तो स्तंभ सुरु झालाच नाही . तरी नागपूरला आल्यावर सदा मात्र ग्रेस यांना आवर्जून भेटायला गेला . सदाचा संपादक म्हणून आवाका खूप मोठा होता .हे त्यानं साप्ताहिक सकाळ ज्या पद्धतीनं प्रस्थापित केलं , त्यावरुन सिद्ध करुन दाखवलं . त्याची संपादकीय नजर तीक्ष्ण होती आणि त्यामध्ये कोणताही पंक्तीप्रपंच नव्हता .

‘नागपूर पत्रिका सोडल्यावर कांही वर्ष अशी आली की ,  ‘मुंबई सकाळ’ सोबतच पुणे ‘सकाळ’चंही काम मी  करत असे . रविवार पुरवणीसाठी अगदी शिवाजीराव पटवर्धनापासून ते  कांही विषयांवर सदानं माझ्याकडून लिहून घेतलं . तो माझा लिहिण्याचा सुरुवातीचा काळ होता . त्यामुळे लिहिण्यात फार काही सफाई नव्हती ( म्हणजे अजूनही आहे , असा माझा दावा नाही ! ) पण , ते सगळं लेखन सदानं संपादकीय संस्कार  करुन प्रकाशित केलं . शिवाजीराव पटवर्धन यांच्यावरचा मजकूर तर सदानं  तीन वेळा लिहायला लावला होता !

सदाला खरं तर , ‘सकाळ’ या दैनिकाची जबाबदारी मिळाली असती तर ‘सकाळ’ आज एका वेगळ्या उंचीवर असता यात काही शंकाच नाही . पण , ‘सकाळ’च्या राजकारणामध्ये ते शक्य झालं नाही .  त्याची जेवढी निष्ठा ‘सकाळ’वर होती तेवढी त्याची टोकदार जाणीव व्यवस्थापनाला कधीच नव्हती , असं माझं मत आहे . खरं तर , माधव गडकरी आणि गोविंदराव तळवळकर  यांच्यासारख्या संपादकांनी सदाला ‘सकाळ’ सोडून ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये येण्याची ऑफर तेव्हा दिल्याची चर्चा होती . ( याची  माधवराव गडकरी यांच्याकडून एकदा खातरजमा करुन घेतलेली आहे . ) पण , ‘सकाळ’ संस्था  किंवा दैनिकामध्ये म्हणा सदा खूप गुंतलेला होता . त्याचं हे गुंतणं व्यावहारिक असण्यापेक्षा भावनिक जास्त होतं त्याच्यामुळे त्यानं ‘सकाळ’ कधीच सोडलचं नाही .  सदाच्या मृत्युच्या बातमीत ‘‘सकाळ’च्या नि:स्पृह आणि नि:पक्षपाती पत्रकारितेचे सदा डुम्बरे हे पाईक होते ,” असा उल्लेख वाचला तेव्हा ‘सकाळ’च्या व्यवस्थापन आणि सदाच्या काही सहकाऱ्यांनी केलेल्या राजकारणामुळे सदाचं संपादकपद कसं हुकलं याची साद्यंत हकिकत आठवली ; अगदी नकळत विषादायुक्त सुस्कारा सोडला गेला  .

■■

वेगवेगळ्या विषयावर सदाची मत स्पष्ट होती .  तो वृत्तीनं राजकीय नव्हता पण , लोकशाहीवादी होता आणि समोरच्याचा मताचा आदरपूर्वक प्रतिवाद करण्याचा त्याचा स्वभाव होता  . त्याच्यात जर थोडसं राजकारण करण्याचं कौशल्य असतं तर आज कदाचित सदा मोठ्या एका उंचीवर पोहोचलेला असता .

माझ्या ई-पुस्तकांच्या  प्रकाशन समारंभात डावीकडून गिरीश लाड , सदा डुम्बरे आणि अस्मादिक .

अशात माझी आणि सदाची प्र्त्यक्ष भेट २०१६ मध्ये झाली . माझ्या  सात ‘ई‘ पुस्तकाचं प्रकाशन पुण्यामध्ये गिरीश लाड आणि त्याच्या मित्रांनी ठेवलेलं होतं . त्यानिमित्तानं माझ्या गप्पांचा एक कार्यक्रम होता . त्या कार्यक्रमाला ‘प्रमुख पाहुणा कोण असावा ?’ असा प्रश्न जेव्हा गिरीश लाड यानं विचारला तेव्हा मी त्याला त्वरित प्रतिसाद दिला की , सदा डुम्बरे ! सदा डुम्बरे हे नाव गिरीश लाड याला अर्थातच  ठाऊक होतं .  मी सदाचं नाव उच्चारताच आमच्या दोघांच्या वय , अनुभव आणि विद्ववता याच्यातली जी दरी आहे ती त्याला जाणवली असावी आणि माझ्यासारख्या लहान असणाऱ्याच्या कार्यक्रमाला तो येईल का नाही अशी शंका त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली . तेव्हा मी त्याला आश्वस्त केलं , ‘सदा नक्की येईल . तो माझ्या गप्पा ऐकण्यासाठी येईल की नाही हे मी सांगत नाही . पण , तो गप्पा मन लावून ऐकेल . तितका तो सहृदयी आहे पण , त्यापेक्षा त्याला जास्त कौतुक असेल ते माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाचं’ . सदा त्या कार्यक्रमात आला आणि वडिलधार्‍या भूमिकेतून मनापासून  सहभागी झाला .

■■

असा सदा , त्याला काव्यात रुची होती , चित्रात रस होता , ललित लेखनात रमण्याची आवड होती ,  त्याचं वाचन अतिशय दांडगं होतं , मराठीसोबत इंग्रजीही . त्याला पर्यटनाची खूप आवड होती . बदल आणि नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबत तो सकारात्मक असायचा . पत्रकारीतेकडे पाहण्याचा ‘थर्ड आय’ जो म्हणतात , तो त्याच्यातल्या संपादक आणि लेखकात होता .  तो  ‘थर्ड आय’ त्याच्या लेखनामध्ये उमटत असे . त्याच्या पुस्तकांची आपण नावं जरी बघितली तरी सदाचा चकित करणारा आवाका  स्पष्ट होतो .  असा हा अभ्यासू , निगर्वी , हंसतमुख  मित्र अचानक जेव्हा आपल्यातून कायमचा  निघून जातो तेव्हा काळजाचा लचका तुटल्याचं फिलिंग येतं .

सदा आता आपल्यात नाही . यातला  ‘नाही‘ लिहिताना म्हणूनच मी खूप व्याकूळ झालेलो आहे …

© या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत 

■ प्रवीण बर्दापूरकर

( १ मार्च २०२१ )

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट