बिहारी फटाके !

निवडणुका जाहीर होण्याआधी आणि दिवाळी बरीच दूर असताना बिहारात फटाके फुटायला लागले आहेत. अर्थातच हे फटाके राजकीय आहेत. विकासाचे तथाकथित गुजराथी मॉडेल घेऊन देश चालवणारे नरेद्र मोदी आणि सर्वच बदलौकिकाच्या गटारगंगेतून बिहारला शुद्ध करणारे नितीशकुमार हे दोघे सध्या राजकीय फटाके फोडण्यात आघाडीवर आहेत आणि बिहारातील लढाई या दोघातच झाडणार आहे. बिहारच्या निवडणुकीत सत्ता संपादन केली तर देशातील जनतेला मोदी यांचे विकासाचे मॉडेल आणि राजकारण मान्य आहे असा अर्थ तर नितीशकुमारांनी बहुमत मिळवले तर देशात नरेंद्र मोदी यांना पर्याय मिळाला असा निष्कर्ष काढायला राजकीय विश्लेषक मोकळे होतील!

अगदी अलीकडच्या दहा वर्षापर्यंत दारिद्र्य, शोषण, कुप्रशासनाच्या हिमालयावर आणि त्यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब, कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात नसलेले अशा एक ना अनेक बदलौकिकात आकंठ बुडालेले बिहार हे राज्य होते. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांचा संस्कार लाभलेले आणि नालंदा सारख्या विद्यापीठाचा उज्वल वारसा असणारे हे राज्य भ्रष्टाचाराच्या खाईत खोलवर रुतलेले होते आणि हे कमी की काय म्हणून दिवसा उजेडीही स्त्रियांसाठी असुरक्षित समजले जात असे. सुमारे दहा वर्षापूर्वी नितीशकुमार सिन्हा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या बदलौकिकाच्या मोठ्या खाईतून बिहार राज्य बाहेर आले. ज्या राज्यात स्त्रिया असुरक्षित समजल्या जात तेच राज्य स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित आणि सुप्रशासित राज्य म्हणून कसे काय ओळखले जाऊ लागले ? असा प्रश्न एकदा खाजगी भेटीसाठी महाराष्ट्रात आलेल्या नितीशकुमार यांना प्रस्तुत पत्रकाराने विचारला तेव्हा ते म्हणाले होते, ‘एक म्हणजे, मी पोलिसांना सांगितले समोरचा माणूस गुन्हेगार आहे याची खात्री असेल तर कोणीही सांगितले तरी त्याला मोकळे सोडू नका आणि प्रत्येक गुन्हेगार गजाआडच असला पाहिजे. दुसरे म्हणजे मला गैरव्यवहारातून एकही पैसा नको. मी हे सांगितले तसेच वागतो याचा अनुभव आल्यावर जादूची कांडी फिरल्यासारखे झाले. राज्याची प्रतिमा उजळली. आता बिहार हे विकासाचे मॉडेल करायचे आहे मला’. ही घटना २००९च्या डिसेंबर महिन्यातली. त्यानंतर झालेल्या निवडणुकात नितीशकुमार यांना दणदणीत यश मिळाले. अर्थात त्यावेळीही नितीशकुमार आणि त्याच्या जनता दल युनायटेडची भारतीय जनता पक्षाशी युती होती.

lalu_rahul_090114

दिल्ली विधासभा निवडणुकीत नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडगोळीचा मुखभंग करून भाजपला चारीमुंड्या चीत करणाऱ्या अरविंद केजरीवालनंतर आता नितीशकुमार यांच्याकडे भाजपेतर पक्ष आशेने पाहत आहेत कारण बिहार विधानसभेचा कौल भाजपच्या विरोधात गेला तर तो मोदींना मोठाच सेटबॅक असेल आणि राजकारणातील नव्या समीकरणांची ती नवी नांदी असेल. १ मार्च १९५१ रोजी भक्तीआरपूर येथे परेश्वरीदेवी आणि कविराज रामलखन सिन्हा या दाम्पत्याच्या पोटी नितीशकुमार यांचा जन्म झाला. वडील कट्टर गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक होते, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. नितीशकुमार यांनी तो गांधीवादी वारसा तर जपलाच शिवाय डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, कर्पुरी ठाकूर, जॉर्ज फर्नांडीस, व्ही.पी. सिंग यांचा सहवास, संस्कार आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग या विषयात पदवी प्राप्त केल्यावर नितीशकुमारांनी काही काळ बिहार राज्य विद्युत मंडळात नोकरी केली पण, दिग्गजांचा राजकीय विचाराचा वारसा त्याना गप्प बसू देईना. त्यातच आणीबाणी आधी तसेच नंतर ते जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सक्रीय झाले आणि १९७७च्या विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन विधानसभेवर गेले. तेव्हापासून आतापर्यंत नितीशकुमार विधानसभा किंवा लोकसभेचे सदस्य सलग आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारात रेल्वे, कृषी खात्यांचा कारभारही नितीशकुमारांनी जबाबदारीने सांभाळला. ते बिहारमध्ये परतले ते थेट मुख्यमंत्री म्हणून पण, हे पदही त्यांनी भाजपशी आघाडी करूनच मिळवले. नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होईपर्यंत नितीशकुमार भाजपप्रणित ‘एनडीए’सोबत होते. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध करत नितीशकुमार, शरद यादव आणि त्यांचा जेडीयु पक्ष एनडीएतून बाहेर पडले, तेव्हापासून नितीशकुमार हे नरेंद्र मोदी आणि भाजपशी संघर्ष करत आहेत. २०१४च्या त्या लोकसभा निवडणुकीत भाजप पर्यायाने नरेंद्र मोदींकडून बिहारात जबर मार पडल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीशकुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र ही नैतिकता नितीशकुमार यांना खूपच ‘महाग’ पडली कारण, त्यांनी ज्यांना मुख्यमंत्री केले त्या जीतन राम मांझी यांनी नितीशकुमार यांच्याच साम्राज्याला धक्के देण्यास सुरुवात केली. जीतन मांझी हे आपले कळसूत्री बाहुले असतील अशीच त्यांना मुख्यमंत्री करण्यामागे नितीशकुमार यांची चाल आणि अर्थात पराभवाच्या नैतिकतेची झूल पांघरून केलेला तो राजकीय कावाही होता. (केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जाताना शरद पवार यांनी दिल्लीत जाताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यांनी सुधाकरराव नाईक यांच्याकडे सोपवले आणि कसे ‘हात पोळून’ घेतले, त्या राजकीय खेळीची आठवण करू देणारी ही घटना आहे-) पुढे काही महिन्यातच बिहारमध्येही अगदी ‘सेम टू सेम’ महाराष्ट्राचीच ‘पवार-नाईक’ राजकीय कलगीतुऱ्याची पुरारावृत्ती झाली.

सत्तेत पक्के बस्तान बसल्यावर जीतन राम मांझी यांनीही नितिशकुमार यांच्या गडाला हादरे देण्यास प्रारंभ केला. महत्वाचे म्हणजे, नितीशकुमार यांच्या गेली काही वर्ष बिहारची सत्ता आपल्याकडे कायम राखणाऱ्या ‘यादव अधिक महादलित’ या राजकारणावर मांझी यांनी मालकीहक्क मिळवण्याच्या हालचाली सुरु केल्यावर मात्र नितीशकुमार खडबडून जागे झाले आणि त्यांनी मांझी नावाचा धोका ओळखला. कारण जीन राम मांझीच्या चालींचा थेट फायदा भाजपचा मिळणार होता. नितीशकुमार यांना पर्यायी नेतृत्व अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यात मांझी यांना यश येऊ लागले असे दिसू लागल्यावर स्वाभाविकच नितीशकुमार अस्वस्थ झाले. मांझी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश नितीशकुमार यांनी दिला पण, मांझी बधले नाहीत. अखेर नितीशकुमार यांच्या गटाने मांझी यांचा पाठिंबा काढून घेतला. पुन्हा नितीशकुमार यांना नेता म्हणून निवडले. माझी यांचे सरकार अल्पमतात आले. काँग्रेसलाही भाजप अडचणीत येणे हवेच होते पण, पक्ष बिहारमध्ये गलितगात्र होता म्हणून काँग्रेसने आणि त्यापाठोपाठ लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांना पाठिंबा जाहीर करून सभागृहातील त्यांच्या बहुमताची सोय करून दिली. कितीही दावा केला तरी मांझी सरकार बहुमतात नव्हते पण, शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने मांझी यांना कुमक पुरवण्याचा भाजपने डाव आखला. भाजपचे हे कृत्य अनैतिकता असल्याचा कांगावा काँग्रेस आणि नितीश, लालूप्रसाद आणि मुलायम यांनी केला खरा पण, त्याबद्दल भाजपला दोष देण्याचा नैतिक अधिकार या सर्वानीच गमावलेला होता आणि आहे. कारण राजकारणातील नैतिकता, साधनशुचिता सत्तेसाठी खुंटीवर टांगून कशी ठेवावी हे मापदंड या देशात काँग्रेसनेच प्रस्थापित केलेले आहेत.
आता या निवडणुकीत जनता दल (सेक्युलर) म्हणजे लालू प्रसाद यादव आणि कॉंग्रेस यांची मोट बांधून नितीशकुमार यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. चारा घोटाळ्यात सक्तमजुरीची शिक्षा होऊन जामिनावर सुटलेल्या लालूंना १००, कॉंग्रेसला ४० आणि आपल्या जनता दल युनायटेडला १००, अशी जागांची वाटणी जाहीर झाली आहे. लालूप्रसाद आणि नितीशकुमार हे एकमेकाला कायम ‘पाण्यात पाहण्याचे सख्य’ असलेले एकेकाळचे मित्र, मग शत्रू आणि आता अगतिकता म्हणून पुन्हा मित्र झाले आहेत. हुकुमशहा कधीच पदाचा राजीनामा देत नसतात आणि एकत्र येण्याआधीच दोन समाजवाद्यांनी तिसऱ्या पक्षाच्या स्थापनेची नांदी रचलेली असते, असे जे म्हटले जाते, अगदी तस्साच लालू-नितीश यांच्या मैत्रीचा इतिहास आहे! पण, नितीश कुमार यांची मजबुरी आहे कारण ते स्वबळावर निवडणूक लढवूच शकत नाही आणि लालुंसमोर दुसरा पर्यायच नाही. गेल्या सलग चार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात कॉंग्रेसने बिहारात सपाटून मार खाल्लेला आहे, शहजादे राहुल गांधी आणि लालूप्रसाद यांच्यातून विस्तव जात नाही, नितीशकुमार डोईजड झालेले कॉंग्रेसला नको आहे अशी स्थिती आहे पण, नाईलाज आहे. एकूण काय तर, नितीशकुमार-लालूप्रसाद आणि कॉंग्रेस ही आघाडी हा या तिघांसाठीही जबरदस्तीने लागलेला ‘पाट’ आहे. टाकलेल्या जाळ्यात भाजपची ‘शॉट गन’ शत्रुघ्न सिन्हा घावणे, नरेंद्र मोदींनी कबूल केलेले पण गेल्या सव्वा वर्षात न आलेले ‘अच्छे दिन’, बिहारला दिलेल्या आश्वासनांचा पडलेला विसर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपत दिल्ली निवडणुकीच्या वेळी निर्माण झाला तसा दुरावा निर्माण होईल अशी आशा हे सध्या तरी नितीशकुमार यांचे निवडणूक लढवण्याचे संभाव्य भांडवल आहे. मोदींप्रमाणे नेतृत्वाचे देशव्यापी वलय आणि वक्तृत्व नितीशकुमार यांच्याकडे नाही पण, बिहारमध्ये केलेल्या स्वच्छ कामाची पुंजी त्यांच्याकडे आहे. राष्ट्रीय नरेंद्र मोदी विरुद्ध प्रादेशिक नितीशकुमार अशी ही नेतृत्वाची विषम धूमशान रंगणार आहे. या विषम लढाईत नितीशकुमार विजयी झाले तर मोदी नेतृत्वाचा ‘काउंट डाऊन’ सुरु झाला असे समजले जाईल. पराभव झाला तरी नितीशकुमार मात्र आहेत तिथेच राहतील.

आज ना उद्या नितिशकुमार आणखी दूर जाणार आणि बिहारात वेगळी चूल मांडणार हे ओळखून रामविलास पासवान यांना लोकसभा निवडणुकीत सोबत घेऊन भाजपने या निवडणुकीची जुळवाजुळव २०१४तच सुरु केली. लालूंपासून पप्पू यादव यांना आणि जीतन राम मांझी याना नितीशकुमार यांच्यापासून विभक्त करत भाजपने निवडणुकीच्या आधीच नितीश-लालू आघाडीची डोकेदुखी वाढवलेली आहे. आपल्या स्वतंत्र अस्तिवासाठी घसघशीत ‘पोटगी’ची जतीन राम मांझी आणि पप्पू यादव यांनी बाळगली आहे. त्यांची ही अपेक्षा भाजपची डोकेदुखी बनलेली आहे. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’, अशी भाजपची अवस्था या जोडगोळीने केली आहे. संघ आणि भाजप एकत्र आहेत ही या निवडणुकीतील समाधानाची बाब आहे तर, नरेंद्र मोदी यांच्याच नावावर ही निवडणूक लढवावी लागणार हे या पक्षाची मर्यादा स्पष्ट करणारे आहे.

एका नव्या राजकीय लढाईचे फटाके फुटण्यास सुरुवात झालेली आहे. बिमारू राज्य, ‘डीएनए’, शब्दवापसी ही केवळ सुरुवात आहे. मोठा आवाज करणारे फटाके अजून वाजायचेच आहेत!

-प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट