नरेंद्र मोदी आणि ‘डार्क हॉर्स’

लोकसभेच्या पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील उमेदवार सर्वच राजकीय पक्षांकडून जवळ-जवळ निश्चित झालेले आहेत. उमेदवारीसाठी सर्वात जास्त रस्सीखेच भारतीय जनता पक्षात झाली आणि दमछाकही याच पक्षाच्या श्रेष्ठींची झाली. ते स्वाभाविकही आहे कारण याच पक्षाच्या नेत्यात एकमेकावर कुरघोडी करण्याची स्पर्धा जास्त होती शिवाय याच पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ( एनडीएचे ) सरकार केंद्रात सत्तेत येणार अशी हवा आहे, याच पक्षाने सर्वात आधी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर करून निवडणुकीचे वातावरण इतके तापविले आहे की मोदी नावाचा ब्रांडचा बाजार झालेला आहे. त्यामुळेच बहुदा  पक्ष मोठा की नरेंद्र मोदी अशी चर्चा भाजप आणि मिडियाच्या काही गोटात सुरु झाली आहे. ‘मोदी सरकारला मत द्या’ अशी घोषणाबाजी करून आपण पक्षापेक्षा मोठे आहोत हे मोदी यांनी दाखवून दिले आहे लालकृष्ण अडवाणी यांना अडगळीत टाकून नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे रेटणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेसरकार्यवाह मोहन भागवत यांनी ‘नमो, नमो करणे हे संघाचे काम नाही’, असे जाहीर करून टाकले असले तरी मोदी यांना मात्र त्याची फिकीर नाही. भागवत यांचे म्हणणे एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडून देण्याचेही सौजन्य मोदी यांनी अजून तरी दाखवलेले नाही इतका मोदी यांचा वारू सध्या बेगुमानपणे अतिवेगाने देशाच्या राजकीय क्षितिजावर दौडतो आहे. बेगुमान हा शब्द एवढ्यासाठी की, आत्ताच मोदी यांनी पक्षात सर्वाना, सर्व त-हेने आणि सर्व पातळीवर वेठीला धरलेले आहे.

मोदी यांची कार्यपद्धती सर्वस्वी ‘त्यांची’ आहे आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी तसेच विद्यमान नेत्यांना फारसा काही वाव नाही. सोशल मीडियावरचा प्रचार असो की जाहीर सभा की कोणासोबत युती करायची हे सर्व सर्वाधिकार मोदी यांनी त्यांच्याकडे -व्हाया अमित शहा- राखून ठेवले आहेत. मोदी यांच्यासमोर कोणी काही बोलायचे नाही असा एक अलिखित नियम आहे म्हणूनच रामविलास पासवान काय किंवा येडीयुरप्पा काय किंवा राज ठाकरे काय यांच्याशी सुरु असलेलीबोलणी अंतिम टप्प्यात आणि तीही मिडियात बातमी म्हणून प्रकाशित झाल्यावरच भारतीय जनता पक्ष तसेच अन्य पक्षाच्या नेत्यांना कळली. ( नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंशी गुफ्तगू करणे ही भाजपची रणनीती होती आणि त्याबाबत मोदी तसेच गोपीनाथ मुंडे यांना सार काही माहिती होते! गडकरींच्या भेटीचा बभ्रा जास्त झाला आणि मुंडेंची मुठ बंद राहिली एवढाच काय ते फरक !! ) कर्नाटकातील श्रीरामलू या खाणसम्राटांशी झालेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी एकेकाळीपंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणा-या सुषमा स्वराज यांना पक्षाचे व्यासपीठ नव्हे तर सोशल मिडियाचा आश्रय घ्यावा लागला… पक्षाचे बहुसंख्य उमेदवार  निश्चित करतानाही मोदी यांनी अशीच दादागिरी केली आहे. वाराणशीतून त्यांनी मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कापताना किंवा नवज्योतसिंग सिद्धू यांचा मतदार संघ अरुण जेटली देताना कोणाचे काहीही म्हणणे ऐकलेले नाही. यातही उल्लेखनीय म्हणजे, जेटली यांना लोकसभेची निवडणूक लढवायचीच नव्हती कारण ते राज्यसभेत खूषहोते पण, भाजपात  ‘आले मोदींच्या मना तेथे कोणाचे चालेना’ अशी स्थिती आहे. पक्षात मोदी यांना विरोध म्हणजे साक्षात देवालाच विरोध असा समज  आणि त्यावर काही बोलावे तर संघ डोळे वटारून लक्ष ठेऊन, असे वातावरण आहे. पंतप्रधानपदाचे कायमचे दावेदार लालकृष्ण अडवानी, एकेकाळचे महत्वाकांक्षी सुषमा स्वराज, अरुण जेटली किंवा संघाचे लाडके नितीन गडकरी असे सर्वच नेते सध्यातरी मनातल्या मनात धुमसत आहेत, ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’, अशीकोंडी त्यांची झालेली आहे.

सत्ताप्राप्तीसाठी निकराची लढाई खेळण्यास सज्ज झालेल्या भारतीय जनता पक्षाला या लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळतील याविषयी पक्षातच एकमत नाही. १९० पेक्षा जास्त जागा मिळवून ( निवडणूकपूर्व पाहणीत बहुतेक सर्व अंदाज १९० ते २१० च्या दरम्यान आहेत ) भारतीय जनता पक्ष जर लोकसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, पंतप्रधान होण्यापासून त्यांना कोणीच रोखू शकणार नाही असा पक्षातील अनेकांचा होरा आहे. मात्र अनेकांना भारतीयजनता पक्षाला २००च्या काठावर जागा मिळणे हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ वाटते. भाजपा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष होईल पण, जागा मात्र १६० ते १७० मिळतील असे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षातील अनेकांना वाटते.

भारतीय जनता पक्षाला १७०च्या आसपास जागा मिळाल्या तर काय होईल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे . अशा परिस्थितीत भाजपाला जास्तीत जास्त मित्र पक्ष जोडून सत्ता स्थापने एव्हढे संख्याबळ जमा करावे लागेल. ही कसरत म्हणा की घोडे बाजार, अवघड नाही कारण त्यासाठीची किंमत देण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी तसेच क्षमता आहेही! आणि लहान राजकीय पक्षांची अशी आघाडी करणे अपरिहार्य मजबुरी असेल. हे लहान पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व नरेंद्रमोदी यांच्याऐवजी अन्य कोणाकडे द्यावे असा आग्रह धरतील. आपली पुरोगामी प्रतिमा जपण्यासाठी एव्हढा आग्रह त्यान धरावाच लागेल अन्यथा तोपर्यंत केलेला मोदी विरोध तकलादू आणि बिनबुडाचाही ठरेल .सत्ता येण्याआधीच डोईजड झालेल्या नरेंद्र मोदी यांचे नाव मागे टाकण्यासाठी पक्ष आणि संघ अशा दोन्ही पातळ्यावर ती अनुकुल परिस्थिती असेल. मात्र असे असले तरी नरेंद्र मोदी यांच्याऐवजी लालकृष्ण अडवाणी हे नाव नसेल हे नक्की कारण, त्या नावावर संघाने आधीच फुलीमारलेली आहे. सुषमा स्वराज किंवा अरुण जेटली हाही मोदी यांच्या नावाला पर्याय नसेल आणि नितीन गडकरी यांचे वय त्यापदाआड येईल. असे असले तरी हे काही चिंतेचे, गोंधळाचे किंवा पक्ष पंतप्रधानपदापासून वंचित राहत असल्याचे  वातावरण मात्र मुळीच नसेल कारण राजनाथसिंह नावाचा ‘डार्क हॉर्स’ भारतीय जनता पक्षाकडे तयार असेल आणि कदाचित तो संघाचा खरा पत्ता असेल !

उत्तर प्रदेशातल्या चंदौली जिल्ह्यात १० जुलै १९५१ ला एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजनाथसिंह वयाच्या १४व्या वर्षापासून  संघाच्या संपर्कात आले. ‘खूष रहो, कभी सर नही झुकाना, क्षत्रिय के बेटा हो’ हा आईने केलेला संस्कार राजनाथसिंह यांच्या जीवनाचा मंत्र आणि संस्कार आहे. गोरखपूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यावर फिजिक्सचे प्राध्यापक असणारे राजनाथसिंह यांनी जनसंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून वयाच्या अवघ्या २४ वर्षी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. उत्तरप्रदेशात प्रथमच सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या  मंत्रिमंडळात ते शिक्षण मंत्री होते . कॉपीविरोधी कायदा त्यांनीच देशात सर्वात प्रथम आणला आणि वैदिक गणित हा विषयही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे राजनाथसिंह हे पहिलेच तसेच वादग्रस्त ठरलेले तरी निर्णयावर ठाम राहिलेले शिक्षण मंत्री. नंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, केंद्रातही दोन वेळा मंत्री झाले.

राजनाथसिंह दुस-यांदा राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत आणि दोन्ही वेळा मराठी माणसाला पर्याय म्हणून त्यांचे नाव समोर आले हा  हाही एक योगायोग आहे ! २००५ मध्ये पक्षाध्यक्ष होताना प्रमोद महाजन यांचा  तर गेल्यावर्षी नितीन गडकरी यांचा पर्याय म्हणून त्यांचे नाव समोर आले. सर्वाना सोबतीला घेऊन चालत असल्याचे दाखवणे आणि स्वत:ला पाहिजे तेच शांतपणे करणे हा त्यांचा स्वभाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीनुसार आणि पक्षातील अनेकांचा विरोध डावलूनपंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना पुढे आणण्यात राजनाथसिंह यांची भूमिका मोठी, कळीची आणि निर्णायकही आहे. भारताच्या उत्तर भागातील ‘ठाकूर’ हा राजकीय घटक राजनाथसिंह यांच्या सोबतीला आहे. ठाकुरांचे ते सध्या तरी राष्ट्रीय पातळीवरील एकमेव नेते आहेत. त्यामुळेच जर या लोकसभा निवडणुकीत २००च्या आसपास जागा न मिळताही भारतीय जनता पक्ष लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला तर राजनाथसिंह यांच्या नावाला संघाचा जसा विरोध नसेल तसाच तोजोडल्या जाणा-या नवीन ‘मित्र’पक्षांचाही नसेल.

संयमाने दबा धरून चिकाटी न सोडता संधीची वाट पाहणे आणि ती येताच कोणतीही घाई-गडबड न करता, कोणालाही चाहूल लागू न देता झडप घालणे हे चतुर आणि दूरदृष्टीच्या राजकीय नेत्याचे खणखणीत गुण आणि कौशल्य मानले जाते. राजनाथसिंह यांच्यात हे गुण आणि कौशल्य दोन्ही आहे म्हणूनच, त्यांचे नाव आज फार चर्चेत नसले तरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील हा ‘डार्क हॉर्स’ आहे.
-प्रवीण बर्दापूरकर

संबंधित पोस्ट