ममतांचा (तात्पुरता ?) मुखभंग!

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तापलेल्या सध्याच्या राजकीय वातावरणात पंतप्रधानपादासाठी इच्छुक अनेकजण आहेत . नरेंद्र मोदी , राहुल गांधी , मुलायमसिंग , जयललिता , मायावती आणि आता ममता बँनर्जी ! शिवाय सुप्त इच्छा बाळगणारे पी.चिदंबरम तसेच डार्क हॉर्स राजनाथसिंह आहेत , नाही नाही म्हणत अरविंद केजरीवाल आहेत , स्पर्धेतून बाहेर पडलेले शरद पवार आहेत , हे वेगळेच . भाजपच्या ( की नरेंद्र मोदी यांच्या ? कारण दिल्लीत झळकलेल्या जाहिरातीत भाजप किंवा एनडीएचे नव्हे तर ‘मोदींचे सरकार’ असा उल्लेख आहे !) नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले तर तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार ; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला ( अगदीच शक्यता नसलेले ) बहुमत मिळाले तर राहुल गांधी पंतप्रधान होणार आणि या दोन्ही आघाड्या म्हणा की युती अल्पमतात असल्या तर वर उल्लेख केलेली नावे बाशिंग बांधून तयार आहेत . त्यासाठी तिसरी आघाडी , चौथी आघाडी तयार झालेली आहे . रोज काही जुनी समीकरणे तुटताना , नवी जुळताना दिसत आहेत . प्रत्येक जुन्या तुटण्या आणि नव्या जुळण्याला राजकीय स्वार्थ आणि स्वहितरक्षणाचे मुलामे दिले जात आहेत .

लोकसभा निवडणुकीच्या सध्याच्या धामधुमीत ममताबाई जोरात आहेत . त्यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेसने दिल्लीच्या सर्व लोकसभा जागा लढवण्याची घोषणा केली आहे . आम आदमी पार्टीचा एक आमदार ममताबाईंना गावला आहे . ममता एक ‘हट्टी मुलगी’ म्हणून राजकारणात ओळखली जातात . अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळात ममता बनर्जी होत्या ; तेव्हा ‘तुमची मुलगी खूप हट्टी आहे’ अशी तक्रार खुद्द वाजपेयी यांनी ममता यांच्या आईकडे केली होती . तेव्हापासून हे विशेषण ममताच्या नावासमोर चिकटले . हा हट्टीपणाच ममता यांचे राजकीय भांडवल आहे . या हट्टीपणाला खंबीर चिकाटी , संयम आणि अविश्रांत श्रम यांची जोड आहे म्हणूनच पश्चिम बंगालमधले डाव्यांचे साम्राज्य उध्वस्त करण्यात ममता यांना यश आलेले आहे . स्वतंत्र तेलंगण राज्य हे जसे के.चंद्रशेखर राव यांच्या प्रदीर्घ लढ्याला आलेले फळ आहे तसेच ममता बँनर्जी यांच्या बाबत पश्चिम बंगालमध्ये घडलेले आहे . ५ जानेवारी १९५५ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या एका ‘हट्टी मुली’ने मार्क्सवादी कम्युनिस्ट विरोधात सलग दोन दशके पूर्णपणे लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाला आलेल्या राजकीय यशाची कथा म्हणजे ममता बँनर्जी यांचा भारतीय राजकारणातला प्रवास आहे .

ममता बँनर्जी यांचा जन्म कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला . ममता नऊ वर्षाच्या असतांना त्यांचे वडील वारले . आईने काबाडकष्ट करून ममता यांना शिकवले . इतिहास विषय घेऊन ममता यांनी आधी ऑनर्स आणि मग एम ए केले , नंतर इस्लामिक हिस्ट्री या विषयातही पदवी संपादन केली . शिक्षण आणि विधी या शाखांतही प्राविण्य संपादन केले . शाळकरी वयापासून ममता यांना राजकारण , चित्रकला आणि कवितेची ओढ होती . वयाच्या पंधराव्या वर्षी त्या काँग्रेसच्या वाटेवर चालू लागल्या . अनेक पदे त्यांनी भूषवली . युवक काँग्रेसचे काम करताना पश्चिम बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट सरकारकडून मिळालेल्या अपमानास्पद आणि हिंसक वागणुकीने ममता नावाची तरुणी दुखावली आणि मार्क्सवाद्यांची सत्ता उलटून टाकण्याची प्रतिज्ञा तिने केली . सत्ताधारी सोमनाथ चटर्जी यांच्यासारख्या मातब्बराला हरवून त्या लोकसभेवर निवडून आल्या नंतर १९८९चा अपवाद वगळता पुढच्या सलग सहा निवडणुका त्यांनी दक्षिण कोलकाता लोकसभा मतदार संघातून जिंकल्या . लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला आणि केंद्रात मंत्री झाल्या तरी ममता दिल्लीच्या राजकारणात मात्र रमल्या नाही . त्यांचे लक्ष्य पश्चिम बंगालमधील सत्ता सनदशीर मार्गाने उलटवून टाकणे हेच होते आणि त्यामुळेच त्यांचा एक पाय कायम पश्चिम बंगालमध्येच असे .

एका क्षणी ममता यांच्या लक्षात आले की , पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालट करण्यात काँग्रेसचा परिणामकारक वापर होऊ शकत नाही . त्याची कारणे तीन होती ; एक तर सिद्धार्थ शंकर रॉय यांच्यानंतर त्यांच्यासारखा तोलामोलाचा नेता काँग्रेसकडे नव्हता त्यामुळे तसेच डाव्यांच्या आक्रमकतेमुळे काँग्रेस संघटना तळापासून खिळखिळी झालेली होती . डाव्या पक्षांनी पंचायत ते लोकसभा असा जम पश्चिम बंगालमध्ये बसवला होता आणि महत्वाचे म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील अनेक नेत्यांशी ममता यांचे मतभेद निर्माण झालेले होते . ममता यांना ताकद मिळवून द्यावी आणि काँग्रेस वाढवावी ही दृष्टी असणारे कॉंग्रेसमध्ये राहिले नाहीत . मग ममता यांनी तृणमुल काँग्रेस काढून कम्युनिस्टांविरुद्ध लढण्याची उमेद कार्यकर्त्याना दिली . तळागाळापासून संघटना बांधणीसाठी पुढाकार घेतला आणि पैसा नाही , कार्यालय नाही , कार्यकर्त्यांची पुरेशी फौज तयार झालेली नाही तरीही पहिल्याच लोकसभा निवडणुकीत सात जागा जिंकून तृणमुल आणि पर्यायाने ममता यांनी देशाच्या राजकीय वर्तुळाला आचंबित केले . नंतर तर केंद्रात भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करून ममता यांनी राजकीय भूमिकेत किंचित बदल केला म्हणा की तडजोड तरी पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट हे त्यांचे ध्येय कायम राहिले .

एव्हाना ममता एक राजकीय ब्रान्ड झालेला होता . त्यांचे अत्यंत साधे राहणे , जाडी-भरडी वस्त्र आणि पोलिसांचा कोणताही बंदोबस्त न घेता झेन या कारने फिरणे , हा कौतुकाचा आणि प्रतिमा उजळवून टाकण्याचा विषय ठरला . या सध्या राहणीचा अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे ममता यांनी कधीही गाजवजा माजवला नाही की त्याकडे मिडियाचे लक्ष वेधून प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न केला नाही . अखेर तो क्षण आला . विधानसभा निवडणुकीत स्वबळावर आणि एकहाती जनमताचा कौल मिळवून पश्चिम बंगालमधील डाव्यांची राजवट उलथवण्यात ममता यांना मोठे यश आले . कवी आणि चित्रकार असण्यामुळे ममतांचा स्वभाव मनस्वी होताच , ठरवून केलेल्या अविरत संघर्षामुळे त्यांच्यात अतिआक्रमकता आली आणि यशामुळे आततायीपणाही आला . ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती अंगी भिनली . ही वृत्ती आणि एकारलेपणामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले , अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत त्या लोकशाहीवादी नाहीत असेही काही घटनांत समोर आले आणि त्यामुळे आरोपांच्या फैरी झडल्या , तीव्र टीकेलाही त्यांना सामोरे जावे लागले . मात्र , एव्हाना एक राजकीय शक्ती म्हणून उद्याला आल्याने ममता यांनी कशालाच भीक घातली नाही . बेडरपणे त्या आरोप आणि टीकेला सामोरे गेल्या .

याचवेळी त्यांच्यातला राजकारणी अधिक प्रगल्भ झालेला होता . त्या राजकारण्याचे भान आणि दृष्टी विस्तारलेली होती . देशात आता बहुपक्षीय सरकारे ही अपरिहार्यता आहे आहे याचे भान ममता यांना वैपुल्याने आलेले होते आणि म्हणूनच पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली . लोकसभेत ३०-३५च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त जागा संपादन केल्या तर देशाचे नेतृत्व लांब नाही असे त्यांना वाटू लागले . दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा लढवण्याची आस बाळगून त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आणि नेमक्या याचवेळी अण्णा हजारे यांचा आशीर्वाद मिळवण्यात त्याना बहुप्रयत्ने यश आले . मात्र अण्णा हजारे ही एक केवळ प्रतिमा आहे शक्ती नाही हे , अरविंद केजरीवाल यांनी जसे लक्षात घेतले तसे ममता यांनी घेतले नाही . महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी केवळ प्रतिमा पुरेशी नसते तर सर्व प्रकारची शक्ती लागते हे वास्तव ममता विसरल्या . अण्णा हजारे नावाच्या प्रतिमेचा वापर करून अरविंद केजरीवाल-योगेंद्र यादव आणि सहका-यांनी प्रभावी राजकीय संघटन कसे उभारले आणि नंतर अण्णा हजारे यांना अलगदपणे दूर सारले , अण्णा हजारे यांच्या मर्यादा काय आहेत , लोकलढ्यातील गोविंदभाई श्रॉफ , बाबा आढाव , अविनाश धर्माधिकारी असे अनेक मोहोरे अण्णा हजारे यांनी का गमावले , याचा नीट अभ्यास न केल्याचा परिणाम म्हणून ममता यांना सध्या तरी मुखभंग सहन करावा लागला आहे . पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील ममता यांचे नाव ती शर्यत सुरु होण्यापूर्वीच बाद झाले आहे ! त्यांनी त्यांची मूठ पश्चिम बंगालपुरती बंद ठेवली असती तर त्यांचा हा मुखभंग झाला नसता . अर्थात राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम नसते त्यामुळे त्यांचा हा मुखभंग तात्पुरता असेल असे समजू यात आणि ममता या तर न खचणा-या झुंझार लढवय्या आहेत त्यामुळे त्यांच्या राजकारणाकडे यापुढेही लक्ष ठेवावे लागेल यात शंकाच नाही .

-प्रवीण बर्दापूरकर /

०९८२२०५५७९९

१५ लाख ९४ हजार !
सहज म्हणून माझ्या ब्लॉगचा ताळेबंद बघितला आणि सुखद धक्का बसला कारण आजवरच्या
९४ पोस्टना १४ मार्चच्या सकाळपर्यंत चक्क १५ लाख ९३ हजार ११ हिट्स !
हा प्रतिसाद अनपेक्षित आणि थक्कही करणारा आहे .
आधी वेबसाईट आणि नंतर ब्लॉग सुरु केला तेव्हा अधूनमधून लिहिले .
‘दिव्य मराठी’साठी लेखन सुरु केल्यावर आधी तिथे आणि नंतर
सात महिने ‘लोकमत’मध्ये प्रकाशित दिल्ली दिनांक स्तंभ या ब्लॉगवर पोस्ट करत असे .
नवे माध्यम आणि वाचकही बरेच नवे असणार !
असो …

www.praveenbardapurkar.com/blog
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट