भय इथले संपावे…

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्राची घुसमट झालेली आहे, असं भाष्य तीन आठवड्यापूर्वी केलं होतं पण, आता राज्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती त्यापेक्षा जास्त चिघळली आहे. धर्म आणि जात-पोटजात-उपजात अशी समाजाची मोठी विभागणी सुरुच आहे. मराठा, दलित, बहुजन, धनगर, मुस्लीम अशी ही दरी आहे आणि ती दिवसागणिक रुंदावतच चालली आहे, असं अलिकडच्या काही घटनातून दिसतंय. समाजातला प्रत्येक घटक दुसऱ्या घटकाकडे संशयाच्या नजरेनं बघतो आहे. कोपर्डी असो की आता नासिकजवळच्या तळेगावची घटना; बहुसंख्य लोक ज्या भाषेत समाज माध्यमावर व्यक्त होताहेत, ते तर फारच चिंताजनक आहे कारण, त्यातून समाजातील अनेकांच्या मनात खोलवर रुजलेला पण आजवर अप्रकट असलेला जातीय विखार प्रकट होतोय. त्यातून माणसांनी घातलेले ‘माणूस’पणाचे बुरखे टराटरा फाटले जाताहेत.

हा महाराष्ट्र कधी समतेचा विचार मांडत होता, सामाजिक सौख्याचा आग्रह धरत होता यावर विश्वास न बसण्यासारखी आणि त्यामुळे कोणीही संवेदनशील माणूस भयकंपित व्हावा, अशी ही आजची स्थिती आहे. हे कमी की काय म्हणून, शेतकरी गांजला आहे, प्रशासनात भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला आहे, शिक्षक प्रक्षुब्ध होऊन हातात दगड घेताहेत, पत्रकार मोर्चे काढताहेत, लोक पोलिसांवर हात उचलताहेत आणि पोलिसांना संरक्षण कोण देणार अशी हतबलता व्यक्त होते आहे. कथित/स्वयंघोषित उजवा असो की डावा, कथित/स्वयंघोषित पुरोगामी असो की प्रतिगामी, कुणीही विवेकानं वागायला तयार नाही. सगळ्या गोष्टींकडे राजकीय रंगाच्याच चष्म्यातून बघण्याची/वाद घालण्याची/प्रतिवाद करण्याची घातक प्रथा रुढ होतेये. समाजाच्या सर्वच क्षेत्रात झुंडशाही फोफावताना दिसते आहे. बलात्कार झालेली स्त्री आपल्या जातीची नाही याबद्दल समाधानाचा सुस्कारा सोडण्याची अभद्र मानसिकता अनुभवायला मिळू लागली आहे. आपण सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील म्हणून दिवसेंदिवस अधिक समंजस होतोय, हा भ्रम असून एका विचित्र अराजकाकडे आपली वाटचाल सुरु आहे का अशी निराशा दाटून यावी, असं हे सामाजिक वातावरण आहे.

अशा वेळी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या राजकारण्यांनी अत्यंत जबादारीनं वागावं, अशी रास्त अपेक्षा असते. महाराष्ट्रात तेही घडत नाहीये. असंस्कृत, असभ्य आणि बेताल वागण्याची कुरुप अहमहमिका जणू बहुसंख्य राजकारण्यात लागलेली आहे. आपल्या अशा बेताल वागण्याचं समर्थन करतांना समोरचा पूर्वी कसा असंस्कृत/रासवट वागला होता याचे असमर्थनीय दाखले दिले जाताहेत. पुण्याच्या राजगुरुनगरच्या मिलिंद शिंदे यांनी दिलेली एक बोधकथा अतिशय चपखल आहे. ती अशी-“ एका गावात, अत्यंत गजबजलेल्या बाजारपेठेतून एक मनुष्य अंगावर कोणतेही वस्त्र न घालता चालला होता. लोकांनी फुलून गेलेल्या त्या बाजारपेठेत असा विवस्त्र फिरणारा मनुष्य बघून इतर लोक त्याला नावं ठेवत होते, शिव्या घालत होते.

एका ‘सदगृहस्था’ने हा प्रकार पाहिला. या सदगृहस्थाच्या अंगावरही जवळजवळ कपडे नव्हते. फरक इतकाच की त्याच्या अंगावर लज्जा रक्षणापुरती फक्त एक लंगोटी होती! भर गर्दीत असा विवस्र फिरणारा तो माणूस पाहुन या सदगृहस्थाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.

त्या दिगंबर अवस्थेतील माणसाच्या पुढ्यात उभा राहुन हा सदगृहस्थ ओरडला, ‘अरे लाज नाही का वाटत, असा भर बाजारपेठेत नागडा फिरतो आहेस? काहीतरी शरम बाळग. ही घे, कमीतकमी हे तरी नेस, लज्जारक्षणाला,’ असं म्हणत त्या सदगृहस्थानं कमरेची लंगोटी सोडून त्याच्या अंगावर फेकली आणि तो गर्दीत चालू लागला. टिप – शिवराळ भाषा वापरली म्हणून एकमेकांचे कपडे फाडू पाहणाऱ्या राजकारण्यांशीच या कथेचा संदर्भ आहे, इतर कोणाशीही नाही.”

महाराष्ट्रात बहुसंख्य राजकीय नेते ज्या पध्दतीनं सध्या बरळत आहेत आणि त्या वागण्याचं समर्थन करत आहेत ते उद्वेगजनक आहे. मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक नळावर भांडण करणारा संबोधनं काय किंवा दस नंबरी नागीण काय, हे सुप्रिया सुळे यांच्या तोंडून ऐकल्यावर मी सुन्नस्तंभितच झालो. आशिष शेलार काय किंवा किरीट सोमय्या काय, त्यांना कायम आचरटेश्वराच्या भूमिकेत जगायला आवडतं; जितेंद्र आव्हाड, अबू आझमी यांचा जन्मच कर्कश्श एकारलेपणासाठी झालेला आहे, स्वतंत्र विदर्भासाठी वाचाळवीरपणा करण्यासाठी आपल्याला राज्याचा महाधिवक्तापद मिळालेलं होतं, असा श्रीहरी अणे यांचा गैरसमज होणं हे समजण्यासारखं आहे. कारण, त्यासाठीच हे सर्वजण भूतलावर प्रकट झालेले आहेत! कधी कधी शरद पवार यांनीही सुसंस्कृतपणा सोडून टीका केलेली आहे, असे दाखले देऊन सुप्रिया सुळे यांच्या या भाषेचं समर्थन करता येणार नाही. कारण शरद पवार यांचं राज्य आणि देशातल्या राजकारणातलं योगदान मोठं आहे. त्यांची जीभ क्वचित घसरली असेल तर, तो काही शिष्टाचार होऊ शकत नाही.

पंकजा मुंडे यांनी ‘मी तुमची नेता नाही, माता आहे’ हे म्हणणं आणि महादेव जानकर यांचं बेताल वक्तव्यही सुसंस्कृतपणाच्या सर्व सीमा ओलांडणारं आहे. जानकर स्वत:ला गोपीनाथ मुंडे याचे मानसपुत्र म्हणवतात, पंकजा यांचा भाऊ असल्याचा ते दाखला देतात. त्या गोपीनाथ मुंडे यांच्या सार्वजनिक जीवनातील सुसंस्कृत वागण्याच्या अनेक आठवणी मनात कायमच्या वसलेल्या आहेत. अंबाजोगाई यथील प्रतिभावान कवी, लेखक बालाजी सुतार यांनी नमूद केलेली मुंडे यांची एक आठवण अशी- “ या आधीचं युती सरकार येण्यापूर्वी गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले. तेव्हा, शरद पवार यांच्यावर एकामागोमाग एक जबरदस्त राजकीय आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या दरम्यान किनवटकडे त्यांच्या यात्रेवर एक हल्ला -आता नीट आठवत नाही, पण बहुधा गोळीबार- झाला होता. त्यावेळी, ‘हा हल्ला शरद पवार यांनी घडवून आणला असेल काय?’ अशा अर्थाचे प्रश्न पत्रकारांनी मुंडेंना विचारले.

या प्रश्नाच्या होकारार्थी उत्तराने तेव्हाच्या वातावरणात मुंडेंना कदाचित जबरदस्त राजकीय लाभ झाला असता. पण मुंडे म्हणाले, ‘राजकीय विरोधकावर असले हिंसक हल्ले करण्याची महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. या हल्ल्यात पवारांचा किंवा कॉंग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही.’

मुंडेंची ही प्रगल्भता हे कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी असलेल्या मतभेदांपार राजकीय सौहार्दाचं शेवटचं उदाहरण असेल. त्यानंतर असं चित्र कधीही दिसलेलं नाहीय.”

पत्रकार म्हणून या घटनेचा मीही साक्षीदार आहे पण, बालाजी सुतार याना मुद्दाम ‘कोट’ केलंय कारण, समोरच्याच्या सुसंस्कृत वागण्यानं समाज कसा प्रभावित होतो याचं बालाजी सुतार यांचं हे कथन एक चपखल उदाहरण आहे.

पावणेचार दशकांपेक्षा किंचित जास्तच काळ महाराष्ट्राच्या पत्रकारितेत वावरत असतांना राजकारण्यांचा सुसंस्कृतपणा वैपुल्यानं अनुभवता आलेला आहे. याच सदरातील लेखनात त्याची उदाहरणं अनेकदा दिलेली आहेत. शरद पवार यांचा बोलतांना काही मोजक्या वेळा तोल गेलेला आहे हे खरंय पण, पवार यांची प्रतिमा असंस्कृत राजकरणी अशी मुळीच नव्हती. पंतप्रधानपदाचं स्वप्न भांग्ल्याव्र त्यांच्यात हा असा कडवटपणा वाढला. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात जबरदस्त मोहीम उघडलेली होती तरी, या दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी येत आणि त्या कटू वातावरणातही ते दोघे परस्परांना न चुकता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा सुसंस्कृतपणा दाखवत असत, हे बहुदा महादेव जानकर यांना माहिती नसावं; नसणारच! ते माहिती असतं तर अजित पवार यांचा उल्लेख अश्लाघ्य शब्दात करण्याचा आणि त्यासाठी ‘ग्रामीण रुढ शब्द वापरला’, असं म्हणत वाटल्यास शब्दकोशात तो शब्द तपासावा असा हट्टीपणा जानकर यांनी दाखवला नसता. त्याच कोशातून चमचा या शब्दाचाही अर्थ जानकर यांनी नीट समजून घेतलेला नाही असं दिसतंय. मराठी भाषेत जे अनेक शब्दकोश आहेत, त्यात शिव्यांचाही एक कोश आहे आणि त्यात खूप साऱ्या इरसाल, अर्वाच्य शिव्या खच्चून नमूद केलेल्या आहेत. त्या कोशात आहेत म्हणून राजकीय विरोधकासाठी त्या शिव्या वापरणं समर्थनीय मुळीच नाही, हे जानकर आणि त्यांच्या सल्लागारांना समजत नाही, असा याचा अर्थ आहे. अशी भाषा वापरायची असेल तर अजित पवार यांच्या ‘धरण भरण’ प्रयोगावर टीका करण्याचा अधिकार महादेव जाणकारच काय राजकारणातील कुणालाच नाही शिवाय, अजित पवार असंस्कृत वागले म्हणून मीही तसंच वागणार हा तर राजकीय उद्दामपणाच झाला!

गोपीनाथ मुंडे यांनी प्रदीर्घ काळ संघर्ष करत निर्माण केलेली राजकीय पुण्याई पंकजा मुंडे यांना वारसा म्हणून मिळालेली आहे. त्यावर स्वकर्तृत्वाचा मुकुट पंकजा यांनी चढवायचा आहे. ते असलेलं कर्तृत्व सिध्द करण्याच्या आतच भावनात्मक आवाहन करत पंकजा सत्तेत आल्यापासून वागत आहेत. मुख्यमंत्रीपदानं हुलकावणी दिल्याची टोचणी त्यांना आहे; राजकारणात ती असायलाही हवी पण, भाजपतील ‘सर्व मान्य’तेचा विषय रा. स्व. संघाच्या संमतीच्या पथावरून जातो, हे अजून पंकजा यांना उमजलेलं दिसत नाहीये. भगवान गडाच्या पायथ्याशी दसऱ्याच्या दिवशी पंकजा यांनी, त्यांच्या मागेच लोकशक्ती आहे हे दाखवून दिलं आहे पण, ते यश त्यांना पचवता आलेलं नाही, हेच त्यांच्या भाषणातून सतत जाणवत होतं. आता भावनाप्रधानता बाजूला ठेऊन कर्तृत्व सिध्द करण्यावर पंकजा यांनी शांतपणे आणि संयमाने लक्ष केंद्रित करावं. ‘समय से पहले और तकदीर से जादा कभी-कुछ नाही मिलता’ हे गोपीनाथ मुंडे यांचे परममित्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं प्रसिध्द विधान कायम स्मरणात ठेवावं म्हणजे बड्या पदाकडे जाणारे मार्ग कसे सुकर होतात हे त्यांना उमजेल.

संयुक्त महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण, एसेम जोशी, श्री. अ. डांगे, आचार्य अत्रे, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, ग. प्र. प्रधान, मारोतराव कन्नमवार, शेषराव वानखेडे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर……. अशा कित्ती, कित्ती तरी सुसंस्कृत नेत्यांची परंपरा आहे. वर उल्लेख केलेल्या विद्यमान वाचाळवीरांनी ती परंपरा माहिती करुन घेणं गरजेचं आहे.

सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर असलेलं सध्याचं, भयकंपित करणारं वातावरण सामाजिक समता, सलोख्यासाठी मुळीच हिताचं नाही, याचं भान राजकारण्यांनी ठेवायलाच हवं. संवेदनशील माणसाच्या मनात ‘भय इथले संपत नाही’ ही भावना निर्माण न होण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाचीच आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे!

प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या – www.praveenbardapurkar.com
वाचा – blog.praveenbardapurkar.com

To buy them download the Dailyhunt app from the google play store on your mobile. Select Marathi language.
search the books under – BHASYA or PRAVEEN BARDAPURKAR.

 

ई-प्रत मिळवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधा –

pratik.puri@dailyhunt.in

संबंधित पोस्ट