हवे आहेत, अंधाराची तहान लागणारे…

//१//

वर्तमानाच्या मानगुटीवर इतिहास कायम विराजमान असतो आणि जुनं काही तरी उकरून काढून तो वर्तमानाला छळत असतो, असं जे म्हणतात त्याचा प्रत्यय गेला आठवडाभर महाराष्ट्रात जे काही घडलं त्यातून आला.

महाराष्ट्रात जे दुहीचं वातावरण गेला आठवडाभर निर्माण झालं ते काही वर्तमानाला कायम प्रेरणा देणाऱ्या इतिहासातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वप्नातही अपेक्षित नव्हतंच.

आपला संदर्भ असलेल्या एका व्यक्तीच्या निमित्तानं वस्तुस्थितीचं विपरितीकरण इतक्या व्यापक आणि उथळपणे होईल हे, छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा गृहीत नव्हतं.

विवेकाची कास धरणारा, सुसंस्कृत, समंजस आणि समाजाप्रती संवेदनशील असणारा अल्पसंख्य विरुद्ध उथळ, असमंजस, असंस्कृत, मग्रूर, असंवेदनशील बहुसंख्य अशी आता समाजाची वाटणी झालेली आहे हे अधोरेखित करणारे हे दिवस होते.

//२//

गेले काही दिवस बहुसंख्य असलेल्या प्रत्येकाला जे पाहिजे ते झालं.

निमित्त भूषणाचं होतं; त्या निमित्तामुळे कारण मिळालं आणि भूषण ठरायचं ते अ-भूषण झालं!

कारण मिळाल्यावर एक खेळ मांडला गेला आणि त्यामुळे आपण समाज म्हणून काही सुसंस्कृत नाही, समंजस नाही हे समोर आलं.

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं, सुशिक्षितांचं, विवेकवादाची कास धरणारं राज्य आहे, हा केवळ समज असल्याची लक्तरे धू-धू धुतली गेली आणि वेशीवर टांगली गेली.

‘लाज न लज्जा करेन मी कज्जा ( खटला )’ असं म्हणतच मनातील खदखद, वखवख, द्वेष व्यक्त झाला आणि महाराष्ट्राच्या  पुरोगामित्वाचा बुरखा अक्षरशः टराटरा फाटला गेला.

भारतात बहु भाषा-जाती-धर्म-संस्कृती आहेत आणि ही विविधता असली तरी आम्ही सारे एक आहोत; या एकतेचे सुंदर प्रतिक महाराष्ट्र आहे ही बाल वयापासून मिळालेली शिकवण कशी खोटी आहे; प्रत्यक्षात आपण जात-धर्म-पंथ यात कसे विभागलेलो आहोत याचा प्रत्यय आला.

प्रत्येकाला तोंडाची वाफ दवडण्याची पुरेपूर संधी मिळाली.

त्यामुळे परस्परांविषयी मनात मळमळ, असूया, मत्सर, द्वेष, अंगार कसा ठासून भरलेला आहे हे समजलं.

उखाळ्या पाखाळ्या झाल्या.

परस्परांची आणि इतर सगळ्यांची ‘आय-माय’ उद्धारून झाली.

कोणाकोणाचं खरं-खोटं अनौरसत्व काढलं गेलं.

शालिनता आणि उठवळपणा यांची सरमिसळ करून आततायीपणाची हद्द गाठण्यात आली.

आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा यातील सीमारेषा नेहेमीप्रमाणे पुसल्या गेल्या.

समोरच्याला प्रतिवादाचा हक्क असतो हे अमान्य ठरवत एकमेकाच्या उरावर कसं बसावं याचं ओंगळ प्रदर्शन घडवलं गेलं.

परस्परांचा आदर राखत मतप्रदर्शन करावं ही भान विसरलं आणि विसरवलं जाण्याइतपत पातळी गाठली गेली.

अनुभवी, सत्तर-ऐंशी उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या वयोवृद्ध जाणत्या राजापासून अजाणत्यापर्यंत सर्वांचा एकेरीवर उद्धार करण्याची एक मग्रुरी-सत्तेचा दर्प येणारी हुच्च संस्कृती यानिमित्ताने अनुभवायला मिळाली.

त्यातून चर्चा, संवाद, वाद-विवाद म्हणजे कर्कश्शपणे वचावचा आणि कचाकचा केलेलं भांडण अशी नवी व्याख्या उदयाला आली.

राजकारणातलं नेतृत्व संवेदनशील आहे , त्यांना जनतेच्या प्रश्नांची आंच आहे , असं जे म्हटलं जातं ते साक्षात खोटं आहे याचं दर्शन घडलं.

परदेशीत्वाचा मुद्दा काढून राजकीय निष्ठा मोडणारे आणि सत्तेसाठी पुन्हा त्याच मोडलेल्या निष्ठा जोडून घेणारे सोयीसाठी अजूनही तळ्यात-मळ्यात करतात आणि वादाला खतपाणी घालून भडका उडाल्यावर त्यावर पडदा टाकावा हे शहाणपण उशीरा सूचणाऱ्या नेतृत्वाचं पितळ उघडं पडलं.

हे म्हणजे – “प्रवीण बर्दापूरकर हे प्रवीण बर्दापूरकरांच्या संदर्भात जे काही बोलले ते त्यांचं वैयक्तीक मत असून प्रवीण बर्दापूरकर त्याच्याशी सहमत असतीलच असं नाही ; त्यामुळे वेशीवर लक्तरे टांगणारांना पाठिंबा तसंच विरोध कायम आहे,” या धर्तीवर झालं, मग भक्तांनी टाळ्या वाजवल्या !

सरकार एका राजकीय पक्षाचं असलं तरी अजेंडा ‘मातृसंस्था’ ठरवते हेही कळलं; आधीच्या राजवटीत अजेंडा ठरवणारे माय-लेक होते !

राज्यात एकेकाळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद होता आणि तो आता संपला आहे असं जे सांगितलं जातंय; ते दिशाभूल करणारं आहे हे, विदारकपणे तर समोर आलंच आलं पण, आता या वादाची व्याप्ती जाती-उपजाती-पोटजाती-पंथ-धर्म अशा विविध पातळ्यावर कशी वैपुल्याने खोलवर आक्राळविक्राळ विस्तारलेली आहे.

समाजात आता ब्राह्मण-मराठा-बहुजन-दलित-मुस्लीम असे आणखी पोट तसेच उप असे वाद/गट/प्रवाह असून सर्वच पातळीवर समाज दुभंग झालेला आहे आणि ते विभाजन तसंच कायम राहिलं पाहिजे, असं जे राजकारणात खाजगीत म्हटलं जात होतं, ते वास्तव असल्याचं प्रकट झालं.

या आठवडाभरात जाती, उपजाती, पोटजातींचं भरघोस पीक काढलं गेलं.

जातीसाठी माती खातात म्हणजे काय हे कळलं.

सांस्कृतिक क्षेत्र या संधिसाधूपणाला अपवाद नाही याचाही प्रत्यय आला.

आयुष्यभर लेखन आणि व्याख्यानांतून ज्यांची यथेच्छ टिंगलटवाळी केली त्यांच्याच नावे असलेले पुरस्कार/सन्मान उत्तरायुष्यात स्वीकारण्याचा कोडगेपणा ऐटीत दाखवला गेला.

सरकार(कोणत्याही पक्षाचं असो)कडून कमिट्या पदरात पाडून घेतल्यावर, सरकारी सन्मान स्वीकारून आत्मा सुखावून घेतल्यावर त्याच सरकारवर  राजकीय अस्पृश्यतेच्या दुगाण्या कशा झाडाव्यात हा ढोंगीपणा अनुभवायला मिळाला.

समाजात दुही माजवली गेली, काही भागात हिंसाचार झाला; दगडफेक करून काहींच्या मन आणि काहींच्या हाताला सुटलेली खाज शमवली गेली.

बेभान झालेल्या काहींनी आगीही लावल्या, तसे आदेश होते- म्हणे!

त्यांना  भडकवणारे शांतपणे त्या आगीवर राजकारण करत राहिले आणि मुद्रित माध्यमांना प्रतिक्रिया देऊन तसेच प्रकाशवृत्त वाहिन्यांच्या चर्चात सहभागी होऊन रात्री ए/सीच्या गारव्यात गाढ झोपले.

ज्या हातांना कायदा हाती घ्यायला लावण्याची फूस लावली गेली, त्या हातांचे धनी जेलमध्ये गेले.

सरकारला जे पाहिजे ते सरकारनं खमकेपणानं केलं.

विरोधकांना पाहिजे ते विरोधकांनी ताठरपणे करुन दाखवलं.

कोणीच सामंजस्याची भूमिका घेतली नाही.

“आता परिस्थिती नियंत्रणात असून वातावरणात निर्माण झालेला तणाव आतल्या आत धुसमुसत कायम आहे”.

//३//

समाजातला सर्वार्थाने विवेकी, समंजस, सुसंस्कृत, संवदेनशील अल्पसंख्य असणारा सर्व जाती-उपजाती-पोटजाती-पंथ-धर्मातील वर्ग अस्वस्थ आहे.

जाहीर झालेल्या पीक विम्याचे पैसे अजनही मिळाले नाही म्हणून बळीराजा चिंतीत आहे.

श्रावण सुरु झालाय पण, पावसाचा टिपूस नाहीये…

पावसाने सलग तिसऱ्या वर्षी डोळे वटारल्यानं डोळ्यांतले अश्रू दाटलेल्या शेतकऱ्यांची जराही आठवण न ठेवता भलत्याच विषयावर भांडणारे बेफिकीर राज्यकर्ते बघून आता पुढचे दिवस कोणाच्या आसवांवर काढायचे याचं मळभ दाटून आलेलं आहे.

ऐन ऑगस्ट महिन्यात उन्हांनी मार्चसारखे डोळे वटारलेले आहेत आणि चाऱ्याचा प्रश्न आताच निर्माण झाला आहे; खंगलेल्या, भुकेल्या गुरांसाठी वैरण कोठून आणायची या चिंतेने बळीराजाची झोप उडालेली आहे.

नदी-नाले यावर्षी वाह्यलेच नाहीत, विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दसरा-दिवाळी तर लांबच; ऐन पावसाळ्यात जाणवू लागली आहे.

या देशाचा कणा असलेल्या बळीराजाचे मुलभूत प्रश्न असे गंभीर आहेत, समस्या आक्राळ-विक्राळ झालेल्या आहेत आणि समाजातला बहुसंख्य वर्ग भलत्याच विषयावर लढण्यात गर्क आहे.

ज्याला स्वार्थ/सोय/स्वहितासाठी खेळल्या जाणाऱ्या राजकीय खेळीत कोणताही रस नाही , घेणं-देणं नाही.. असा तळहातावरचं जगणं असणारा  गोरगरीब माणसाचं कंबरडं महागाईनं मोडून पडलं आहे; उद्याची चूल कोणाच्या हाडानं पेटवायची याची भ्रांत त्याला लागली आहे.

सरकार कोणत्याही पक्षाचं असो- आयुष्यभर विवेकाची कास व्रतस्थपणे धरणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची भरदिवसा हत्या झाली पण, मारेकरी अजूनही सापडत नाहीत म्हणून अस्वस्थता आहे.

एकूण काय तर, शहरी आणि ग्रामीण समाजात सर्वत्र जगण्याचे प्रश्न गंभीर झालेले आहेत, घनगर्द अंधाराची चाहूल लागलेली आहे.

म.म. देशपांडे यांच्या एका कवितेचा आधार घेत सांगायचं तर- सारा अंधारच प्यावा, अशी लागावी तहान.

...विषमता-असमंजसपणा-असंवेदनशीलता-असांस्कृतिकपणा-धर्म आणि जाती द्वेष अशा सर्व समस्यांचा अंधार आपण प्यावा आणि सामान्य माणसाचं जगणं सुसह्य व्हावं, असं राज्यकर्त्यांना तसंच  समाजातील बहुसंख्यांना वाटत असल्याचं जाणवत नाहीये… हाच गेल्या आठवडाभरतील घडामोडींचा अर्थ आहे.

कोणाही संवेदनशील, समंजस, विवेकवादी, सुसंस्कृत माणसाचं मन विषण्ण होईल अशीच ही स्थिती आहे.

-प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट