काँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप !

आपल्या करिष्म्यावरच पक्षाचे अस्तित्व अवलंबून आहे आणि हा करिष्मा नसेल तर पक्षाचे बहुसंख्य उमेदवार नगर पालिकांच्या निवडणुकीतही विजयी होऊ शकत नाहीत हे लक्षात आल्यावर म्हणजे; साधारण १९७१नंतर इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल कॉंग्रेसमध्ये सुरु झाला. केंद्र सरकार आणि पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची सूत्रे दिल्लीत एकवटली असणे स्वाभाविकच होते पण, राज्य पातळीवरची पक्ष संघटना आणि काँग्रेसप्रणित राज्य सरकारांची सूत्रे मग दिल्लीत केंद्रीत झाली. विधिमंडळ पक्षाचा नेताही निवडण्याचा अधिकारही ‘एकमताने’ ठराव करून आधी इंदिरा गांधी, मग राजीव गांधी आणि नंतर सोनिया गांधी यांच्याकडे देण्याची प्रथा काँग्रेसमध्ये सुरु झाली. (राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची एवढी अनिर्बंध सत्ता येण्याआधीच म्हणा की राहुल गांधी यांनी पक्षावर तेवढे नियंत्रण मिळवण्याआधीच काँग्रेस पक्षाची वाताहत झाली. त्यामुळे या यादीत राहूल गांधी यांचे नाव नाही!) राज्य पातळीवरची सत्ता जेवढी अस्थिर तेवढे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे म्हणजे गांधी कुटुंब आणि त्यांच्या ‘किचन कॅबिनेट’ची पकड पक्की हे समीकरण पक्के रुळले आणि मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री विरुद्ध अन्य काही ज्येष्ठ मंत्री, यांना झुंजवत ठेवण्याचा प्रघातच इंदिरा गांधी हयात असतानाच काँग्रेसमध्ये सुरु झाला.. तो आजवर सुरु आहे. अगदी अलिकडच्या वीस वर्षातील महाराष्ट्रापुरती उदाहरणे द्यायचीच झाली तर; मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांच्याविरुद्ध सुशीलकुमार-विलासराव प्रभृतींनी केलेला अल्पजीवी उठाव, विलासराव देशमुख विरुद्ध रणजित देशमुख, विलासराव देशमुख विरुद्ध माणिकराव ठाकरे, विलासराव विरुद्ध नारायण राणे, अशोक चव्हाण विरुद्ध कधी नारायण राणे तर कधी माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध कधी नारायण राणे कधी बाळासाहेब थोरात तर कधी माणिकराव ठाकरे अशी देता येतील. उदाहरणाचा हा संदर्भ १९७१ पर्यंत मागे नेता येईल. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीने काँग्रेसने निर्माण केलेल्या आणि मळवून ठेवलेल्या ‘याच’ वाटेवर चालायचे भारतीय जनता पक्षाने ठरवले आहे असेच म्हणावे लागेल.

रावसाहेब दानवे यांच्या नियुक्तीच्या संदर्भात अनुकूल असलेल्या बाबींवर नजर टाकायची तर- दानवे मराठा आहेत. त्यामुळे राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री आणि मराठा प्रदेशाध्यक्ष असे कॉम्बिनेशन साधले गेले आहे, जे की महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणासाठी अनुकूल आहे. दानवे यांची राजकीय पार्श्वभूमी ग्रामीण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरी आहेत, म्हणजे ग्रामीण आणि शहरी असे संतुलन भाजपने योग्यपणे सांभाळले आहे असे म्हणण्यास वाव आहे. पक्ष संघटनेसाठी आवश्यक असणारा अघळपघळ आणि लाघवी स्वभाव हे रावसाहेब दानवे यांचे एक वैशिष्टय आहे. अगदी दुर्गम भागातीलही खेड्यातल्या रस्त्यावरून पायी चालणाऱ्या फाटक्या माणसाशी सहज संवाद साधण्याची त्यांची लकब वाखाणण्यासारखी आहे. त्यांचे वक्तृत्व पल्लेदार आणि शहरी शब्दबंबाळ नाही पण, समोरच्याचा वेध घेणारे आहे. पदाचा तोरा नाही की स्वभावात गुर्मी नाही. इतके चतुराईने आणि मनात काय सुरु आहे याचा थांगपत्ता लागू न देता ते राजकारण करतात की, कोणताही गाजावजा न करता मुलग्याला भाजपकडून आणि जावयाला शिवसेनेकडून आमदारकी त्यांनी कशी मिळवून दिली हे भाजप-सेनेतील भल्या-भल्यांना कळले नाही! तरी घराणेशाहीचा शिंतोडाही त्यांनी स्वत:च्या अंगावर उडू दिला नाही अशी त्यांची कामाची शैली आहे. दोन वेळा विधानसभेवर आणि चार वेळा लोकसभेवर निवडून येण्यात त्यांच्या या गुणांचा फार मोठा वाटा आहे.

ग्राम पंचायत सदस्य-सरपंच ते आता प्रदेशाध्यक्ष मार्गे आमदार-खासदार, असा गेल्या तीन दशकातला राजकीय प्रवास असेलल्या रावसाहेब दानवे यांची मराठवाड्याचे नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा जुनीच पण, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे दानवे यांच्या या महत्वाकांक्षेला पंख लाभले नाहीत, अर्थात त्यांनी त्याचे वैषम्य त्याकाळात वाटू दिले नाही. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर ही महत्वाकांक्षा लपवूनही ठेवली नाही. नितीन गडकरी यांच्या गोटातले म्हणून पक्षात ओळखले जाणारे दानवे यांनी अतिशय नियोजनबद्ध पाऊले उचलत आधी केंद्रात राज्यमंत्रीपद आणि आता प्रदेशाध्यक्षपदावर मांड ठोकली आहे. या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाची पाळेमुळे राज्यात सर्वत्र किमानही पसरलेली नाहीत, मतदार संघाबाहेर कार्यकर्त्यांचे नेटवर्क नाही, खासदारकीच्या सलग तीन टर्ममुळे त्यांचा राज्यभर वावरही कमी झालेला आहे, हे त्यांचे मायनस पॉइंट आहेत. अर्थात त्यांच्यातला हा संघटनात्मक गुण सिद्ध करण्याची संधी त्यांना आजवर मिळालेली नव्हती हेही तेवढेच खरे आहे. येत्या काही महिन्यात त्यांना त्यांच्यातले हे संघटनात्मक कौशल्य सिद्ध करावे लागणार आहे आणि तेही एकदम राज्याच्या व्यापक पटावर. त्यासाठी रावसाहेब दानवे यांना सर्वात आधी राज्य पातळीवर पाळेमुळे खोलवर रुजवून बसलेल्या मातब्बर नेते आणि त्यांचे गट-उपगट यावर वर्चस्व निर्माण करावे लागेल. हे एक आव्हान असेल आणि त्यात जर रावसाहेब दानवे यशस्वी झाले तर पक्षाच्या राज्यातील या प्रस्थापित नेत्यांना एक पर्याय निर्माण होईल तसेच पक्षातील आणि भाजपत प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या मराठा समाजाला भारतीय जनता पक्षात एक भरभक्कम आधार निर्माण होईल.

khadaseरावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा सोप्या शब्दात दुसरा राजकीय पैलू सांगायचा झाला तर नितीन गडकरी यांना पाठिंबा असणाऱ्या महाराष्ट्रातील आमदारांना (हा आकडा ४० ते ७० अशा रेंजमध्ये असल्याचा दावा केला जातो!) आता बळ, आवाज आणि मुख्यमंत्र्याच्या समकक्ष राज्य संघटनेतील वजनदार पद असलेला नेता मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी एक प्रकारे रावसाहेब दानवे यांचे नियुक्ती करून दिलेला हा एक शह आहे. देवेन्द्र फडणवीस यांच्यासमोर आज असलेल्या आव्हानांची यादी खूपच मोठी आहे. एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याने आधीच पक्षातल्या तसेच पक्षाबाहेरच्याही मराठा आणि बहुजन समाजात नाराजी तसेच पोटदुखी आहे. पक्षातल्या एकनाथ खडसे यांनी ती लपवून ठेवलेली नसली तरी ते सध्या एका सीमारेषेबाहेर जाऊन फडणवीस यांना ते विरोध करणार नाहीत कारण, कितीही नाही म्हटले तरी फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ आहेत. पण, याचा अर्थ खडसे गप्प बसतील असे मुळीच नाही. या-ना-त्या मार्गाने ते वार करतच राहतील आणि फडणवीस यांची झोप उडवत राहतील. मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता अशी वक्तव्ये किंवा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना केलेल्या विरोधातून खडसे यांनी खदखद व्यक्त करून ते शांत राहणार नाहीत हे दाखवून दिले आहेच. पंकज मुंडे सध्या ‘आस्ते कदम’ धोरणात आहेत कारण अजून त्यांचा तसा पक्षात जाम बसलेला नाही पण, गोपीनाथ मुंडे नावाचे वलय आणि त्यांचे समर्थक पंकजा यांच्याच सोबत राहतील, त्यामुळे नजिकच्या भविष्यात मुंडे गट प्रबळ झालेला असेल. सध्या विनोद तावडे आघाडीवर शांतता दिसत असली तरी ती वरवरची आहे. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्याही मराठा लॉबीचा पाठिंबा असलेले तावडे वेळ येताच फडणवीस यांच्या नेतृत्वासमोर आव्हान उभे करतील यात शंकाच नाही. शिवाय वय साथीला असल्याने ती वेळ येईपर्यंत शांतपणे स्वत:ची राजकीय ताकद वाढवत ठेवण्याची कला तसेच संयम तावडे यांच्यात आहे. नितीन गडकरी यांच्या गटाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तावडेंच्या साथीला आता दुसरा मराठा गडी दानवे यांच्या रुपाने रसद म्हणून आला आहे. त्यामुळे भाजपच्या राज्याच्या राजकारणात यापुढच्या काळात दानवे-तावडे युती पहायला मिळाली तर फार आश्चर्य वाटायला नको! खरे तर, महाराष्ट्र भाजपत दिसतात किंवा चर्चेत आहेत त्यापेक्षा जास्त गट, उपगट, त्या उपगटाचे आणखी उपगट आहेत गडकरी आणि मुंडे (पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचा असलेला गट आता पंकजा मुंडे यांचा झालेला आहे) याव्यतिरिक्त विनोद तावडे, महादेव शिवणकर, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे असे उपगट आहेत शिवाय विकास मठकरी, भाई गिरकर, किरीट सोमय्या, असे उपउपगट आहेत. देवेंद्र फडणवीस यापैकी कोणत्याही गटाचे नाहीत असा दावा केला जातो (म्हणजे हा आणखी एक गट झाला!) हे कमी की काय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवाराशी निष्ठ, पूर्वाश्रमीच्या जनसंघ आणि नंतर भाजपशी एकनिष्ठ, अन्य पक्षातून भाजपत आलेले..असेही गट भाजपत आहेत. वर्ष-नु-वर्ष सत्तेचे कोणतेही पद न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेला, सर्वच पक्षात असलेला कार्यकर्त्यांचा असतो तसाही एक गट भाजपत आहे. याशिवाय जात-धर्म तसेच बहुजन-अभिजन-दलित-अल्पसंख्य असेही राजकारण आणि त्यांचे गट आहेतच. या सर्व गट आणि उपगटांचे एखाद्या राजकीय पक्षात असतात तसेच राजकारण, महत्वाकांक्षा, सत्तास्पर्धा मत्सर, हेवे-दावे भारतीय जनता पक्षात आहेत.

हे सर्व गट-उपगट लक्षात घेत देवेंद्र फडणवीस फार न बोलता, सावधपणे सरकारची घडी बसवण्यात मग्न असताना पक्षाच्या राज्याच्या राजकारणात आता रावसाहेब दानवे यांची एन्ट्री झालेली आहे. त्यामुळे पक्षाच्या राजकीय आघाडीवर वाजणाऱ्या आपटबारात भरच पडणार आणि त्यांचे पडसाद सरकारात अपरिहार्यपणे उमटणार असल्याने, अब आयेगा मजा! हे सर्व लक्षात घेता, पक्षांतर्गत राजकारणावर मात करून देवेंद्र फडणवीस सरकार खंबीरपणे चालवत स्वत:चा ठसा उमटवतात की काँग्रेसने मळवलेल्या वाटेवर चालताना त्यांचा ‘पृथ्वीराज चव्हाण होतो’ हे पाहणे उत्सुकतेचे आहे…

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट