उतावीळ नाना पटोळे !

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररची डॉमिनिक केफ्फर याच्या विरुद्धची लढत पाच सेटसपर्यंत आणि जवळजवळ सुमारे अडीच तासावर चालली . फेडरनं हा सामना ७-६ , ६-७ , ७-६ , ७-५ असा जिंकला . म्हणजे दोन्ही खेळाडूंची  किती दमछाक झाली असेल हे लक्षात घ्या . पण , त्यातही कौतुक  रॉजर फेडररचं ; गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झालेल्या शिवाय वय ३९ , सामन्यात तीन ट्राय ब्रेक तरी फेडरर जिंकला . आश्चर्यस्तंभित करणारी ही फेडररची कामगिरी आहे . म्हणून कायमच जिद्द आणि प्रेरणा यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे फेडरर आहे . अर्थात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे यांना फेडरर माहीत असण्याची शक्यता नाही आणि फेडरर सारखा संयम तसंच जिद्दही नाना पटोळे यांच्यात आहे , असं काही दिसत नाही .

एकूणच नाना पटोळे यांची राजकीय कारकीर्द म्हणजे ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशा पद्धतीची दिसतेय . १९९० साली भंडारा जिल्हा परिषदेवर झालेली निवड ते २०२१ असा नाना पटोळे यांचा राजकीय प्रवास आहे आणि अपक्ष ते काँग्रेस ते भाजप ते पुन्हा काँग्रेस अशी वळणं , या प्रवासात नाना पटोळे यांनी घेतलेली आहे. या काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही त्यांनी जिंकलेल्या आहेत . २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपाचे उमेदवार म्हणून जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्याशी पंगा घेऊन पक्ष सोडणं हे नाना पटोळे यांच्या राजकीय कारकिर्दीतलं दुसरं शिखर होतं . २०१४ची निवडणूक जिंकतांना ज्यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण संस्थेत महाविद्यालयीन शिक्षण झालं त्या प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ( महा)राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा नाना पटोळे यांनी केलेला  पराभव हे पहिलं शिखर होतं . त्या निकालानंतर ‘जायंट किलर’ ठरलेले नाना एकदम प्रकाशझोतात आले आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले . प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केल्याच्या मोबदल्यात जर केंद्रात मंत्रिपद मिळालं असतं तर नाना पटोळे यांनी भाजपचा त्याग केला नसता , हे उघड आहे . पण , ते असो  कारण राजकारणात  अनेकांच्या वाट्याला  असे ‘जर तर’ खूप येतात आणि जातात ; कधी त्या येण्या-जाण्याला मोल मिळतं तर कधी मिळत नाही .
नाना पटोळे बहुजन समाजातले आहे आणि राजकीय प्रवासाची सुरुवात  स्वबळावर सुरु केलेली आहे . त्यामुळे आजवर त्यांनी जे काही मिळवलं त्याचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे , यात कोणतीही शंका नाही . मात्र , अशात नाना पटोळे यांनी बरेच  ‘लूज बॉल्स’  टाकले आहेत . त्यामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील स्थैर्यांबाबत चर्चांना नाहक पेव फुटलं . राजकारणात आलेल्या प्रत्येकाला राज्यात आमदार , केंद्रात खासदार , मंत्री , मुख्यमंत्री व्हावसं वाटण्यात काहीच गैर  नाही . मनातल्या मनात असे मांडे भाजणं  प्रत्येकाचाच स्वाभाविक अधिकारच आहे . एकदा तर ‘आपण या राज्याचे सर्वांत सक्षम मुख्यमंत्री आपण कसे होऊ शकतो’ , याची स्वप्न पाहत असल्याचं  नगरसेवकपदी कसाबसा निवडून आलेला एक राजकारणी गप्पा रंगवत असताना बघायला मिळालेलं आहे . नाना पटोळे यांचा दर्जा त्या नगरसेवकापेक्षा मोठा आहे हे नि:संशय पण , त्यासाठी ( पक्षी : मुख्यमंत्रीपद ) जरा कळ सोसणं आणि उतावीळपणा न दाखवता रॉजर फेडररसारखं जिद्दीनं काम करणं आवश्यक आहे , हे कांही नाना पटोळे यांच्या लक्षात येत नाहीये  .
स्पष्टवक्तेपणा आणि बेतालपणा , आक्रमकता आणि आतातायीपणा यातल्या सीमारेषा लक्षात घेऊन जो राजकारणात वावरतो त्याची पावलं यशाच्या मार्गावर कायमच पडत असतात , याचा विसर नाना पटोळे यांना पडलेला दिसतो आहे . अन्यथा , ‘आपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाळत ठेवून आहेत.’ अशी बेताल बडबड नाना पटोळे यांनी केलीच नसती . खणिकर्म महामंडळातील एका कंत्राट प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना आपण आपल्याच पक्षाच्या ऊर्जा मंत्र्यावर निशाणा साधतो आहे याचाही विसर नाना पटोळे यांना पडला . विधानसभेच्या सभापतीपदावर असताना राज्याच्या मुख्य सचिवाला सभागृहात हजर होण्याचा हुकूम देण्याचं (आततायी ) धाडस नाना पटोळे यांनी दाखवलं होतं . शिवाय ते भाजप आणि शिवसेनेवरही अधूनमधून गुरगुर करत असतात . भंडारा जिल्ह्यासारख्या अरण्य प्रदेशातून नाना पटोळे आले आहेत .
त्या अरण्यात अनेक वाघ आणि बिबटे आहेत .  त्या वाघांपासूनच ही गुरगुर करण्याची सवय नाना पटोळे यांना लागली , असं कुणी म्हणेलही पण , राजकारण करताना एकाच वेळेस सर्व स्व आणि विरोधी पक्षालाही एकाच वेळी अंगावर ओढावून घेण्यात कोणताही शहाणपणा नसतो . त्यात पुढे जाऊन देशातले एक ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्यावरही एक उसळता चेंडू भिरकावण्याचा उतावीळपणा नाना पटोळे यांनी केला . शरद पवार यांचं वय , अनुभव आणि त्यांच्या राजकारण करण्याची शैली याची कोणतीही पोच न ठेवता केलेला हा स्वैर मारा येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला महाग पडू शकतो याची जाणीव नाना पटोळे यांना नसावी , हे केवळ त्यांचंच नाही तर काँग्रेस पक्षाचं दुर्दैव म्हणायला हवं . योग्य वेळी ‘धडा’ शिकवणं ही शरद पवार यांची शैली आहे आणि ती योग्य वेळ निवडणूक असते , ही कांही नांच्या लक्षात आलेलं नाही .  विधानसभेचं अध्यक्षपद सोडून         नाना पटोळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँगेसचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे ( किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना ते स्वीकारायला लावलं आहे ) . काँगेस पक्षाचा गाडा देश आणि राज्यातही  सध्या सर्व बाजूने चिखलात रुतलेला आणि मोडकळीसही आलेला आहे . एके काळी स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेसला १९९९ पासून  (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचा सहारा घ्यावा लागत आहे .

आता तर (महा)राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेलाही सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी तिघांची आघाडी काँग्रेसला करावी लागली आहे . राज्यात  विधानसभेतलं संख्याबळ पन्नासच्या खाली उतरलं आहे . अनेक जिल्हा परिषदा , पंचायत समित्या ,नगर पंचायती , नगर परिषदा , महापालिका आणि ग्रामपंचायतीही काँग्रेसच्या हातून अन्य पक्षांनी खेचून घेतल्या आहेत . महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची वाणवा पडावी इतक्या केविलवाण्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष सापडलेला आहे . तरीही काँग्रेस पक्षाची पाळंमुळं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही रुजलेली आहेत , काँग्रेसचे सहानुभूतीदार शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात आहेत , हे न विसरता हा मोडून पडलेला गाडा आधी चिखलातून काढून आणि मग दुरुस्त करुन चालवावा याचं भान नाना पटोळे यांना राहिलेलं नाही , असंच त्यांच्या या उतावीळ आणि आततायी विधानावरुन स्पष्ट होतं . मोडून पडलेल्या या गाड्याला नव्या दमाचे घोडे किंवा बैल जोडून कुशलपणे सारथ्य नाना पटोळे करतील अशी अपेक्षा  होती . थेट राहुल गांधी यांचा वरदहस्त लाभल्यामुळे संघटनात्मक पातळीवर डागडुजी करुन नाना पटोळे काँग्रेस पक्षात चैतन्य निर्माण करतील असं वाटत होतं  पण , तसं काही घडताना दिसत नाहीये . गावोगाव मेळावे घेणं आणि सर्वांना एकाच वेळी अंगावर ओढवून घेणं , हेच पक्षकार्य असतं असा बहुधा नाना पटोळे यांचा समज झालेला  असावा . त्यात नाना पटोळे यांच्या अशा भडकावू वक्तव्यांना मोठी प्रसिद्धी मिळते . ती प्रसिद्धी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आणि काडीमात्र उपयोगाचीही नाही हे नाना पटोळे यांनी लक्षात घ्यायला हवं . अशी प्रसिद्धी देणं ही माध्यमांसाची आहे ,हेही पटोळे यांनी विसरता कामा नये .

माझी एक आवडती मांडणी आहे – माध्यमं ही ‘नाच्या’ असतात . त्यांना बॅंड कोण वाजवतंय आहे  , याच्याशी काही घेणं-देणं नसतं ; वाजवण्याचे आवाज आले की, नाच्या जसा नाचायला सुरुवात करतो तसं चटपटीत किंवा भडकावू वक्तव्य हाती आलं   की , ते करणाऱ्या व्यक्तीला प्रसिद्धी देण्यात माध्यमांना रस असतो . कारण ती व्यक्ती नव्हे तर पद माध्यमांसाठी महत्त्वाचं   असतं .  पक्षाचं संघटन मजबूत होतं किंवा नाही , कोणाचं कुठे तरी स्थान मजबूत होतंकी नाही  याच्याशी माध्यमांना काही सोयर सूतक नसतं आणि ती माध्यमांची मजबूरी असते  . नाना पटोळे यांनी हे कायम लक्षात ठेवावं की , ते सांगडी मतदारसंघातून भंडारा जिल्हा परिषदेवर निवडून आलेले सदस्य आजही असते तर   त्यांना आज मिळते तेवढी प्रसिद्धी कधीही मिळाली नसती . ते प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून माध्यमांचे कथित लाडके आहेत आणि माध्यमांचं लाडकं असण्यापेक्षा नाना पटोळे पक्ष संघटन कसं मजबूत करतात यात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीं तसंच  समर्थक आणि हितचिंतकाना रस आहे . उतावीळपणे वागून आणि बोलून भलेही मोठी प्रसिद्धी मिळत असेल   पण , त्याचा पक्षवाढीसाठी काडीमात्र उपयोग नाही हे , नाना पटोळे यांनी लक्षात घ्यावं .

प्रवीण बर्दापूरकर  

Cellphone- 9822055799

praveen.bardapurkar@gmail.com

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट