गजानन घोंगडेचं देखणं पत्र !

 

 

|| नोंद…८ ||

मच्या लहानपणी ‘मामाचं पत्र हरवलं’ असा एक खेळ  होता . आता तो खेळ , बहुदा खेळला जात नसावा . या खेळाची आठवण झाली ती शहर-ए-अकोलाच्या गजानन घोंगडे या बहुपेडी व्यक्तीमत्वाच्या चित्रकारानं पाठवलेल्या एक पत्रामुळे . सात-आठ महिन्यांपूर्वी गजानननं लिहिलेलं हे पत्र आलं आणि वेगळेपणामुळे मनावर ठसलं . एरवी आपल्याला पांढर्‍यावर काळं करणं माहिती . हे पत्र मात्र काळ्या कागदावर पांढर्‍या अक्षरात लिहिलेलं होतं . येणा-जाणार्‍या अनेकांना ते पत्र दाखवलं . मात्र झालं असं की , एक दिवस आमचे पुतणे डॉ . अनिरुद्ध देशपांडे आमच्याकडे प्रवेशले . लाडकोत्तम असल्यानं त्याचा घरभर संचार असतो . त्यानं ते पत्र पाहिलं . त्यालाही ते आवडलं आणि घरभर संचार करण्याच्या नादात त्यानं डाव्या हातानं ते पत्र कुठे तरी ठेवलं गेलं . मग डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांना ते पत्र सापडेना . हरवलं नव्हतं ते पण , कुठे तरी ठेवलं गेलं होतं . ते पत्र नुकतंच सापडलं म्हणून ही नोंद .      
गजानन हा नुसता चित्रकार नाही तर ते एक अवलिया प्रकरण आहे . तो व्यंगचित्र काढतो , व्यक्तिचित्र रेखाटतो , पुस्तकांची मुखपृष्ठ आणि मांडणी करतो , जाहिरातपटात अभिनय करतो , लिहितो , मल्टी मिडियात त्याचा सहज संचार असतो , सजावट करुन देतो…असं बरंच कांही तो एकाच वेळी करत असतो .  एका वाक्यात सांगायचं तर गजानन घोंगडे नावाचा हा चित्रकार अवलिया आहे आणि भर्राट सुद्धा ! मी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा संपादक असताना आमची ओळख झाली . एका वर्षी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ रंग या दिवाळी अंकाची सजावट त्यानं केली ; ती अर्थातच मस्त झाली .
गजानन मूळचा अमरावती जिल्ह्यातल्या जामगावचा . त्याचे आई-वडील शासकीय सेवेत होते . त्यामुळे घरात वातावरण वाचनानुकुल . भाराभर गावी त्याचं शिक्षण झालं . मात्र तो रुजला , अंकुरला आणि बहरला अकोला या शहरात . बालपणीपासूनच त्याचं अक्षर तसंच रंगभानही छान , चेहेरे रेखाटण्याची आवड आणि स्वभाव चळवळ्या . पुढे त्यानं नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला . इथं त्याच्या हाताला वळण लागलं . त्याच्या रेखाचित्रांना जीव गवसला . याच प्रवासात त्याला व्यंगचित्र काढण्याची हुन्नर    गवसली . घात झाला तो चळवळ्या स्वभावानं . त्या विद्यार्थी दशेत त्यानं इतकी आंदोलन केली की महाराज परीक्षेत नापास झाले . ‘नापास केलं गेलं’ , या गजाननच्या म्हणण्यात तथ्यही असू शकतं .

नापास झाला म्हणून गजानन निराश झाला नाही . अकोल्यात येऊन त्यानं जगण्याचा संघर्ष सुरु केला ; भांडवल होतं ते त्याची परिसस्पर्श झालेली बोटं आणि कल्पकता . लढता येतील त्या सर्व आघाड्यांवर त्याचा कुंचला फिरत राहिला . देशोन्नती , मातृभूमी या दैनिकात तो व्यंगचित्र काढू लागला . ती बोचरी व्यंगचित्र लोकांना आवडू लागली . देशोन्नती या दैनिकात कांही काळ त्यानं नोकरी केली आणि सोडली . त्याची जगण्याची धडपड चोहो बाजूंनी सुरु होती . गणपतीच्या मंडपाची सजावट ते आजचा मार्केटमध्ये स्थिरावलेला ‘गजानन घोंगडे’ नावाचा ब्रॅंड असा त्याचा यशस्वी प्रवास आहे . गुणवत्तेचं नाणं खणखणीत वाजणारं अकोल्यात आहे की मुंबई किंवा दिल्लीत कांही फरक पडत नाही . त्या नाण्याचं मूल्य कधीच कमी होत नाही ; शुद्धतेचा कस लागून त्या नाण्याची किंमत वाढतच जाते , हे गजानननं आता  सिद्ध केलेलं आहे .  

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्यावर त्यांचं मोजक्या रंगांचा वापर केलेलं एक मोठं देखणं पोर्ट्रेट गजाननं काढलं . वाजपेयी यांच्या त्या काळात प्रकाशित झालेल्या छायाचित्रांच्या गर्दीत ते पोर्ट्रेट एखाद्या राजहंसारखं ऐटबाज ठरलं . अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर लिहिलेल्या लेखात वापरण्यासाठी ते मी गजाननला मागितलं आणि कोणतीही खळखळ न करता ते पोर्ट्रेट त्यानं लगेच पाठवलं .
याच दरम्यान पुण्याच्या देशमुख आणि कंपनीतर्फे माझ्या ‘डायरी’ , ‘क्लोज-अप’ आणि ‘माध्यमातील ती’ या पुस्तकांच्या निर्मितीची तयारी सुरु होती . त्यात माझ्या छायाचित्रा ऐवजी रेखाचित्र वापरावं असं मनात होतं ; स्ट्रिपलिंग शैलीत ते असावं असं वाटत होतं . ( स्ट्रिपलिंग म्हणजे एकेक बिंदू उमटवत पूर्ण केलेलं चित्र . आता ही शैली खूपच दुर्मीळ झाली आहे आणि जी कांही तग धरून आहे ती बहुतांश संगणकीकृत झालेली आहे . ) एक दिवस  गजानन घोंगडे याच्याशी  फोनवर गप्पा सुरु असतांना त्याला ही कल्पना बोलून दाखवली तर तो म्हणाला , ‘तुमची दोन-चार छायाचित्र पाठवा’ .
छायाचित्र पाठवल्यावर २०१८च्या ऐन दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गजानननं माझं रेखाचित्र पाठवलं . अर्थातच ते तंतोतंत आहे . कॅनव्हासवरची त्याची फ्रेम आमच्या बैठकीच्या खोलीत तेव्हापासून विराजमान आहे . तेच रेखाचित्र पुढे माझ्या दोन पुस्तकांवर घेतलं आणि पुस्तकं प्रकाशित झाल्यावर ती भेट म्हणून गजाननला पाठवली . त्या भेटीदाखल गजानननं पाठवलेलं पत्र जसंच्या तसं खाली देत आहे . त्यात माझी जरा तारीफ आहे पण , त्याकडे दुर्लक्ष करावं कारण पत्र कसं देखणं लिहावं याचा नमुना म्हणून त्याच्याकडे बघावं अशी इच्छा आहे .
आजकाल कुणीकुणाला पत्र फारसं लिहित नाही . सगळा भर मेल किंवा एसएमएसवर . त्या शुष्क वातावरणात गजानन घोंगडेचं हे वळणदार हस्ताक्षरातलं , सुंदर लेणी ल्यायलेलं पत्र  ‘तारीफ-ए-काबील’ ठरणारच की !

( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत  )

-प्रवीण बर्दापूरकर

( १३ जुलै २०२० )

Cellphone  ​+919822055799

​praveen.bardapurkar@gmail.com​ / www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट