सत्ताधुंद आणि आचरटेश्वरांच्या देशा !

‘राजीव गांधी यांनी नायजेरियन (म्हणजे काळ्या वर्णाच्या) मुलीशी लग्न केले असते तर त्या मुलीला कॉंग्रेसने नेता म्हणून स्वीकारले असते का ?’ अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सोनिया गांधी यांच्या वर्णाच्या संदर्भात केलेली टिप्पणी कोणाही सुसंस्कृत आणि सभ्य माणसाला असभ्य, अश्लाघ्य आणि निर्लज्जपणाचा कळस वाटणारी असली तरी जी ‘विचारधारा’ गिरीराज ‘जीवनशैली’ मानतात, ती विचारधारा किती विखारी आहे त्याचे ते निदर्शन आहे. गेल्या वर्षी याचा काळात देशाला लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढलेला असताना भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणारांनी पाकिस्तानात जावे असे वादग्रस्त विधान करणारे हेच ते गिरीराज सिंह आहेत. ‘भारतीय संस्कृती म्हणजे आपण आणि आपण म्हणतो तीच भारतीय संस्कृती’ अशा अविर्भावात संस्कृतीचा ठेका या देशात काहींनी घेतला आहे. त्याच ठेकेदारांच्या कळपातील गिरीराज एक आहेत. आता तर सत्ता आणि धनप्राप्त झालेली ही ठेकेदार मंडळी संस्कृतीच्या नावाखाली इतर जाती-धर्मातील लोकांवर विखारी, विकृत आणि नासकट-कुजकट टीका-टिप्पणी करण्यात कायम आघाडीवर आहेत. गिरीराज या अशा टोळीचे म्होरके आहेत. अशी बेताल वक्तव्ये करताना आपण सत्तेत आहोत आणि ज्या लोकशाहीच्या व्यापक उदात्त संकल्पनेतून ही सत्ता प्राप्त झाली आहे त्या उदात्ततेचा तसेच सत्तेच्या जबाबदारींचा विसर या ठेकेदारांना पडलेला आहे. गिरीराज हे काही या पंक्तीतले एकमेव उठवळ नाहेत. या यादीत त्यांच्या पंथातील साक्षी महाराज, साध्वी प्राची असे बरेच आहेत. या उठवळांच्या यादीत आता गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचीही भर पडली आहे! उपोषणकर्त्या महिला नर्सला ‘फार वेळ उन्हात बसल्याने काळ्या पडाल आणि मग तुमच्या विवाहात अडचणी येतील’ असा सल्ला देतांना लक्ष्मीकांत पार्सेकर यांना ते मुख्यमंत्री आहेत याचा विसर पडावा यात आश्चर्य काहीच नाही कारण अशा विखारी संस्कृतीचे तेही एक ठेकेदार असल्याने त्यांच्याकडून वेगळ्या वर्तन आणि व्यवहाराची अपेक्षा ठेवताच येणार नाही. सरकारात असताना सभ्यता आणि जबाबदारीचे भान कसे बाळगावे याचा जो आदर्श त्यांच्या पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या नेत्यांनी घालून दिला तो आता इतिहासजमा झाला आहे कारण संस्कृतीचे कथित हे ठेकेदार आणि एक राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष यांच्यातील सीमारेषा अलीकडच्या काळात फारच धूसर झालेल्या आहेत.
मात्र ‘डिफरंट’ असल्याचा दावा करणाऱ्या पक्षातच असे उठवळपणा करणारे असभ्य, असांस्कृतिक लोक आहेत आणि अन्य पक्ष सोवळे आहेत असे समजण्याचे मुळीच कारण नाही. तसे समजणे हा एक तर निव्वळ भाबडेपणा तरी ठरेल किंवा राजकीय सोयीचा चष्मा लावलेला झापडबंदपणा तरी, म्हणूनच ती निर्भेळ आत्मप्रतारणाच असेल. सोनिया गांधी यांच्यावर गिरीराज यांनी अश्लाघ्य शेरेबाजी केली म्हणून ज्या कॉंग्रेस पक्षाचे नेते ते-कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत त्या कॉंग्रेस पक्षातही केवळ स्त्रियांच्या संदर्भातच नाही तर एकूण सर्वच पातळीवर अशी उठवळ शेरेबाजी करणारे ‘आचरटेश्वर तसेच वाचाळवीर’ ढिगाने आहेत. ‘शान-ए-आचरटेश्वरां’च्या या यादीत बेनीप्रसाद वर्मा, दिग्विजयसिंह, राज बब्बर अधूनमधून कपिल सिब्बल, मनीष तिवारी, संजय निरुपम अशी अनेक नावे घेता येतील. ‘बलात्कारासारख्या चुका तरूण वयात होतात’, असे म्हणणारे मुलायमसिंह यादव तसेच त्यांच्याच पक्षाचे आझम खान हेही याच पंथातले आघाडीवीर आहेत. ‘सावळा वर्ण असणाऱ्या दाक्षिणात्य महिला सुंदर असतात’ असे विधान करणारे आणि नंतर ‘मी चूक काय बोललो’ असे त्याचे हेकेखोर समर्थन करणारे शरद यादवही याच यादीत मोडतात. ‘बिहारातील रस्ते हेमा मालिनी (तेव्हा त्या केवळ अभिनेत्री होत्या) यांच्या गालासारखे गुळगुळीत करून दाखवतो’ असे म्हणणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री ‘चारा घोटाळा फेम’ लालूप्रसाद यादव यांचा विसर अजून जुन्याजाणत्या पत्रकारांना तरी पडलेला नाही. लालूप्रसाद, मुलायम आणि शरद हे तीन यादव महिलांना आरक्षण देण्याला संसदेत जीव तोडून विरोध करतात तेव्हा त्यांच्यातील महिलांबाबत अशी अवमानकारक विधाने करण्याची मानसिकता किती खोलवर आणि घट्ट रुजलेली आहे हे सहज समजते. आणखी मागे गेले तर अशा ‘आचरटेश्वर तसेच वाचाळवीर’ विकृतीची मुळे थेट राजनारायण यांच्यापर्यंत जातात हे पत्रकारितेतील माझ्या पिढीला तरी पक्के ठाऊक आहे. हे असे ‘आचरटेश्वर तसेच वाचाळवीर’ देशाच्या सर्वच भागात आहेत आणि ते जसे राष्ट्रीय स्तरावर आहेत तसेच ते राज्य आणि अगदी जिल्हा पातळीवरही मुबलक आहेत. त्यांचे पीक इतके उदंड आहे की, कधी कधी वाटते आपल्या लोकशाही म्हणजे अशा आचरटेश्वर तसेच वाचाळवीरांचाच कंपू आहे.

‘धरणात काय मी…’ असे म्हणणारे अजित पवार, विधीमंडळाच्या एका सभागृहाच्या प्रमुखाची हेटाळणी ‘बारचे सभापती’ करणाऱ्याचाही समावेश याच यादीत करावा लागेल. (नारायण राणे, सतीश चतुर्वेदी यांचे एकट्याचे नाव घेऊ नका) वर्तन, भाषा तसेच मग्रुरीच्या निकषावर जिल्हा पातळीपर्यंत अनेक आर्थिकदृष्ट्या ‘धष्टपुष्ट’ राजकारणी आणि त्यांचे वारसदार या यादीत आपोआप समाविष्ट होतात! पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाल्याने उन्मादित झाल्यासारखे वागत मूक आणि बधिरां विद्यार्थ्यांच्या शाळेत कमरेला रिव्हॉल्व्हर लाऊन जाणाऱ्या राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांनाही या यादीत ‘सन्माना’ने समाविष्ट करायला हवे आणि विशेषाधिकाराचा तोऱ्यात वागत पोलिस, टोल नाक्यावरचे कर्मचारी तसेच उठ-सुठ शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या खासदार-आमदारांनाही या यादीत ‘आदरपूर्वक’ सामील करून घ्यायला हवे, इतका अशा निर्लज्ज प्रकारांनी आता कळस गाठला आहे.
या यादीत केवळ राजकारणी आणि त्यांच्या सत्तेने धुंद झालेले त्यांचे निकटचे आप्तस्वकीयच आहेत असेही समजण्याचे कारण नाही. परंपरेने धनिक असलेल्या आणि अलीकडच्या काळात नागरीकरणाच्या रेट्यात रियल इस्टेटचे व्यवहार करून तसेच शिक्षणाचा बाजार मांडून झालेले नवश्रीमंत आणि त्यांच्या (टेलर मेड कपडे वापरणाऱ्या, मनगटावर सोन्याचे ब्रेसलेट लाऊन, अलिशान कार्स उडवणाऱ्या) वारसदारांचे प्रत्येक शहरातले कळप, अभिनेते आणि अभिनेत्र्या तसेच काही सत्ताधुंद बड्या शासकीय अधिकाऱ्यांना या यादीतून वगळता येणारच नाही. या गटातील अनेकजण कसे मस्तवालपणे वागतात वागतात याचा अनुभव पदोपदी येतच असतो. साक्षात पत्नीला मारण्यासाठी उन्मादित होऊन मंत्रालयाच्या लॉबीत धावणारे आणि त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘आप सबको जेल में डाल दुंगा’ असे धमकावणारे अधिकारी अजून विस्मरणात गेलेले नाहीत. अशा अनेकांचे अनेक ‘प्रताप’ गेलाबाजार नित्यनियमाने मिडियात झळकत असतातच. आपण महाराष्ट्रात राहत असल्याने राज्यातील अशा सत्ताधुंद, मस्तवाल, वाचाळवीर आणि आचरटेश्वरांची यादी आपापल्या वकूब तसेच अनुभवाच्या आधारे पाहिजे तितकी लांबवता येईल. सत्तेच्या आणि पैशाच्या मस्तीमुळे आपण कसेही वागले तरी ते समर्थनीय असे वाटणारा हा फार मोठा वर्ग समाजात निर्माण झाला आहे. मनमानीपणे जगण्यासाठी या लोकांनी सभ्यता तसेच नीतीमत्तेचे सर्व संकेत गुंडाळून ‘सत्ताधुंद, मस्तवाल, वाचाळवीर आणि आचरटेश्वर’ हा नवीन पंथच स्थापन केलेला आहे. कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या नव्याकोऱ्या कारने पेडर रोडवरून भरधाव जाताना अन्य वाहनांना ठोकरणारा लक्ष्मीपुत्र काय किंवा मद्यधुंद अवस्थेत कार भरधाव चालवून काही लोकांना चिरडणारा आणि तो खटला वर्ष-नऊ-वर्ष रेंगाळवून आता ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेणारा अभिनेता असो की बंदी असतानाही शिकारीची मुजोरी करणारे नेते-अभिनेते असोत की ‘माझा पती थोडीच पद्म पुरस्कार मागायला सरकारकडे गेला होता’, असे उद्दामपणे म्हणणारी अभिनेत्री असो की बेताल-असभ्य बडबड करणारे वर उल्लेख केलेले राजकारणी किंवा एका अभिनेत्रीच्या सौंदर्याचा उल्लेख करून तिला देशाचे राष्ट्रपती करा अशी मागणी करणारे सेवानिवृत्त न्यायमूर्ती ‘कोहिनूर-ए-वाचाळवीर’ मार्कंडेय काटजू किंवा गिरीराज सिंह, पार्सेकर काय.. हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत!
पण, नव्या जीवन शैलीत हेच सत्ताधुंद, मस्तवाल, वाचाळवीर तसेच आचरटेश्वर जगण्याचे आदर्श ठरत आहेत ही शोकांतिका आहे. अशा लोकांची आणि त्यांच्या बेताल वर्तनाच्या घटनांची वाढती संख्या लक्षात घेता सभ्यपणाचे सर्व संकेत विसरलेल्या सत्ताधुंद, मस्तवाल, वाचाळवीर तसेच आचरटेश्वरांच्या देशातच आपण राहत आहोत ; असे सभ्य आणि सुसंस्कृत माणसाला वाटू लागले तर तर तो त्याचा दोष कसा बरे म्हणता येईल?

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट