फडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा!

पत्रकारितेत १९७८ साली आल्यानंतर नागपूर शहरात २६ वर्ष वास्तव्य झाले. या शहराने वार्ताहर ते संपादक असा माझा प्रवास पहिला. सुख-दुखाच्या क्षणी या शहराने भावना मोकळ्या करण्यासाठी मला आधार दिला. हे शहर, तेथील अगणित भली-बुरी माणसे, रस्ते, झाडे, अनेक संस्था, वास्तू, असह्य टोचरा उन्हाळा, बोचरी थंडी, बेभान पाऊस… इत्यादी इत्यादी माझ्या जगण्याचे-अस्तित्वाचे अभिन्न अंग आहेत. शहर-ए-औरंगाबादला जरी आम्ही दोघेही साठीच्या उंबरठ्यावर स्थायिक झालो तरी नागपूरने घातलेली साद वेळोवेळी ऐकू येते. आमचे वास्तव्य कायम पश्चिम नागपूर भागात राहिले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदार संघ. आमच्या पिढीने विधिमंडळ वृत्तसंकलन सुरु केले तेव्हा त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस विधानपरिषदेचे सदस्य होते. मोठ्या ममत्वाने ते आम्हा तरुण पत्रकारांशी वागत. गंगाधरराव एका स्कूटरवर नागपूरभर फिरत. त्याच स्कूटरणे ते विधान भवनानातही येत. विधानभवनाच्या जुन्या इमारतीपर्यंत तेव्हा सगळेच आपापली वाहने नेत. त्या इमारतीलगत दीड ढांगेच्या रुंदीची बोळ ओलांडली की विधिमंडळ सदस्यांसाठी तेव्हा एक उपाहारगृह होते. सोबत विधिमंडळ सदस्य असल्याशिवाय त्या उपाहारगृहात अन्यांना प्रवेश नसे. या बोळीत पत्रकार त्यांच्या सायकली किंवा मोपेड किंवा स्कूटर पार्क करत. या पार्किंग लॉटमध्ये त्यांचे स्कूटर लाऊन अनेकदा गंगाधरराव आमच्याशी गप्पा मारत, भुकेल्यावेळी किंवा सभागृहाचे कामकाज सायंकाळनंतरही सुरु असेल तर ते आम्हाला त्या उपाहारगृहात उदरभरणासाठी घेऊन जात. गंगाधरराव यांच्या मृत्यूनंतर तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार आणि तत्कालिन सभापती जयंतराव टिळक यांनी केलेली भाषणे विलक्षण चटका लावणारी झाल्याचे आजही आठवते… गंगाधरराव यांचा मुलगा असलेले देवेंद्र फडणवीस तेव्हा शाळकरी होते. काही काळाने ते आधी नागपूर महापालिकेच्या आणि नंतर राज्याच्या राजकारणात आले. आता तर राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. पिता-पुत्राची राजकीय कारकिर्द अनुभवणा-या पिढीतला मी एक पत्रकार असल्याने देवेंद्र यांचे राजकीय यश कौतुक आणि ममत्वाचे आहे. अनेकांचा विश्वास बसणार नाही.. अनेकाना चकित करणारे वाटेल पण देवेंद्र यांचे माझ्याशी असलेले वर्तन अत्यंत आदबशीर राहिले. राजकीय यशाचा माज, त्याचा तोराही त्यांनी बाळगल्याचे स्मरत नाही. आमचे वास्तव्य असलेल्या वसंतनगरशी संबधित किंवा अन्य काही काम निघाले तर फोन केल्यावर देवेंद्र घरी येत. सार्वजनिक ठिकाणी किंवा एकाच व्यासपीठावर भेटलो तरी आपण राज्यातील एक ‘प्रमुख नेता आहोत’ असा अविर्भाव त्यांच्यात चुकुनही नसे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात विदर्भ तसेच उर्वरीत महाराष्ट्रातील मित्र-चाहत्यांना आवडणार नसले तरी टीकात्मक लिहिण्याआधी सांगतो – राजधानी दिल्लीच्या सत्तादालन, प्रशासन आणि मराठी वर्तुळात फडणवीस यांच्याविषयी सकारात्मक दृष्टीकोनातून बघितले जाते आहे. गुढीपाडव्याच्या आसपास दिल्लीचा कानोसा घेतला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लोक कसे आशेने पाहतात हे जाणवले आणि छान वाटले. विश्वचषक क्रिकेटचा ज्वर असल्याने त्याच भाषेत सांगायचे तर, “ देवेंद्र फडणवीस हे खेळपट्टीवर स्थिरावलेले फलंदाज आहे, त्याने एकेरी-दुहेरी धावा काढण्यास सुरुवात केलेली आहे. आता या फलंदाजाकडून मोठे फटके आणि मोठ्या धावसंख्येची उमेद आहे,” असे दिल्लीत असलेल्या महाराष्ट्राच्या एका बड्या शासकीय अधिकाऱ्याचे म्हणणे आहे आणि ते प्रातिनिधिक तसेच याआधीच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सरकार स्थापन करून सुमारे पाच महिने होताहेत म्हणून फडणवीस आणि त्यांच्या सरकारविषयी काय जनभावना आहेत त्या फडणवीस यांना राग आला तरी स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. या सुमारे पाच महिन्यात देवेंद्र फडणवीस ‘गंभीर मुख्यमंत्री’ आहे असे मत अजून तरी राज्याच्या प्रशासन आणि सत्ता वर्तुळात झालेले नाही. मंत्रालयात दररोज पाच-सहा तास बसून प्रशासनावरील मांड फडणवीस यांनी अजून पक्की केलेली नाही. दररोज सकाळी मुख्यमंत्र्याचे दिवसभराचे जे कार्यक्रम अन्य पत्रकारांप्रमाणे मलाही मिळतात ते बघितले तर विधिमंडळाचे अधिवेशन वगळता खरेच मुख्यमंत्री म्हणून फडणवीस सलग आठवडाभर मंत्रालयात ठिय्या देऊन बसलेले आढळून येत नाही. वसंतराव नाईक, शरद पवार, शंकरराव चव्हाण, अंतुले, विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री किंवा गोपीनाथ मुंडे, अजित पवार हे उपमुख्यमंत्री ठिय्या देऊन बसत आणि जास्तीत जास्त कारभार मंत्रालयातून चालवत, हे आम्हीही बघितले आहे. मंत्रालयात बसल्याने मुख्यमंत्री सर्वसामान्य लोकांना उपलब्ध असतात आणि त्यांच्याकडून बित्तंबातम्या त्याना सहज कळतात, त्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नसते हे जसे महत्वाचे आहे तसेच मंत्रालय म्हणजे प्रशासनाचे हृद्य आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हे हृद्य कसे चालते, त्याला रक्त आणि प्राणवायूचा पुरवठा शुद्ध तसेच वेळेवर होतोय की नाही, या पुरवठ्यास कोण खीळ घालत आहे का आहे हे जसे कळते तसेच मुख्यमंत्री कारभाराबाबत गंभीर आहे हा संदेश जातो आणि मंत्री तसेच अधिकाऱ्यांनाही मंत्रालयात बसून काम करण्याची सवय लागते. मुख्यमंत्र्यांप्रमाणे सर्व मंत्री आणि अधिकारी घरी बसून काम करू लागले तर जनतेने गाऱ्हाणे मांडण्यासाठी जायचे कोठे? राज्यशकट हाकणे म्हणजे हाताखालच्या अधिकाऱ्यांनी केव्हाही-कोठेही पुढे केलेल्या फाईल्सवर सह्या करणे नसते. याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वसुरींचा आदर्श नसेल ठेवायचा तर किमान त्यांचे ‘आयडॉल’ नरेंद्र मोदी यांचा तरी आदर्श समोर ठेवायला हरकत नसावी! दौऱ्यावर असतानाही फडणवीस यांच्यापर्यंत लोक पोहोचू शकत नाहीत इतके सुरक्षेचे कडे असते. मनोहर जोशी काय किंवा अशोक चव्हाण काय, गावात लोकांना आवर्जून भेटत, दोन का असेना शब्द बोलत, त्यांची निवेदने स्वीकारत. सुरक्षाव्यवस्था जर मुख्यमंत्र्याना रयतेपासून दूर ठेवत असेल तर ती फडणवीस यांनी बाजूला सारली पाहिजे. आणखी एक स्पष्टपणे सांगितलेच पाहिजे- देवेंद्र फडणवीस हे केवळ ‘नागपूरचे मुख्यमंत्री’ आहेत ही जी कुजबुज मोहीम मंत्रालय आणि राज्याचा सत्तेच्या दालनात सुरु झालेली आहे ते काही चांगले नाही. विलासराव किंवा शरद पवार यांच्याप्रमाणे महिन्यातून दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार-रविवार नागपूरचा दौरा करण्याची सवय फडणवीस यांनी कटाक्षाने लावून घेतली पाहिजे. ते मुख्यमंत्री आहेत, त्यांची त्यांच्या गावातील तसेच मतदारसंघातील कामे एका फोनवर करून घेण्याची शिस्त त्यांनी घालून दिली पाहिजे.

प्रशासनाला समांतर अशी स्वत:ची माहिती देणारी यंत्रणा असेल तर अधिकारी वचकून राहतात आणि तसे नाही घडले तर डोक्यावर बसतात, हे फडणवीस यांना सांगावे असे काही ते राजकारणात नवखे नाहीत. वसंतदादा, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ , अजित पवार यांच्या कार्यकाळात भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्याच्या कानाशी लागण्याचे धाडस प्रशासकीय अधिकाऱ्यांना कधी झाले नाही कारण, या सर्वांची माहिती मिळवण्याची समांतर यंत्रणा तसेच प्रशासनावरची मांड मजबूत असे. इतके वर्ष विरोधी पक्षात राहिल्याने अशी हुकमत निर्माण करणे एव्हाना फडणवीस यांना सहज शक्य होते. (गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी या संयोजनाची जबाबदारी शरदभाऊ कुळकर्णी पार पडत असत. आताही माधव भंडारी यांच्यासारखे काही कामाचे मोहोरे आहेत.) मात्र तसे घडलेले आणि घडतानाही दिसत नाहीये. अधिकारी देतील त्या माहितीवर विसंबून राहणारा मुख्यमंत्री अशी तयार होणारी प्रतिमा फडणवीस यांच्यासाठी चांगली नाही. जीवन गौरव सन्मान कोणाला द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार सरकारचा आहे पण, त्यासाठी जमलेल्या सदस्यांना सौजन्य म्हणूनही न भेटणे किंवा मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी वेळ न मिळणे समर्थनीय नाही. अनेक बाबींचा विचार मुख्यमंत्र्याला राजकीय चौकटीबाहेर येऊन करावा लागतो. कॉम्रेड गोविंदराव पानसरे राजकीय विचाराने नक्कीच वेगळे पण, त्यांच्या हत्येनंतर कोल्हापूरला न जाणे-त्यांच्या कुटुंबियांची भेट न घेणे यातून पक्षीय मानसिकतेतून फडणवीस अजून बाहेर पडलेले नाहीत हाच संदेश गेला. गोपीनाथ मुंडे असे नक्कीच वागले नसते. त्यादिवशी उत्सवी कार्यक्रमात सहभागी होणे तरी फडणवीस यांनी टाळायला हवे होते. पण, अधिकाऱ्यांचे ऐकले आणि फडणवीस यांच्यातल्या जन्मजात सुसंस्कृतपणावर शिंतोडे उडाले. आज शिंतोडे आहेत, त्याचे डाग व्हायला नकोत, ‘सब दाग अच्छे नही होते’, हे भान फडणवीस यांनी बाळगायलाच हवे. ‘खुशमस्करे पगारी’ सल्लागार आणि ‘होयबा’ अधिकारी यांच्यावर जर फडणवीस असेच विसंबले तर चेंगराचेंगरीत ठार झालेल्या गोवारींच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी न जाण्याची शिक्षा कशी मिळाली हे फडणवीस यांनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारचा कारभार हाकताना ज्यांचा नियमितपणे फोनवर सल्ला घेतात त्या) शरद पवार यांना विचारून घ्यावे! साहित्य संस्कृती मंडळापासून ते पत्रकारांच्या अधिस्वीकृती समितीपर्यंत, सर्वच महामंडळावरील नियुक्त्या रेंगाळल्या आहेत, ‘अजून माहिती आलेली नाही’ असे प्रशासन त्यावर म्हणत असल्याचे सांगितले जाते. असे दफ्तरदिरंगाईचे घासून गुळगुळीत झालेले बहाणे सांगणाऱ्या प्रशासनावर चाप लावणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. नाही तर फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या फरक तो काय? फडणवीस यांनी रयतेचे मुख्यमंत्री व्हावे, प्रशासनाचे नाही!

मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेतेपद यात अंतर असते. आक्रस्ताळे, समोरच्या विरोधकाला डिवचणारे, नाहक धारदार बोलणे विरोधी पक्ष नेत्याला शोभते. मुख्यमंत्र्यांनी मात्र संयम दाखवत आणि शांत स्वरात प्रतिवाद करत किंवा ‘लोण्याच्या’ सुरीने वार करून विरोधकाना गारद करायचे असते. प्रतिवार जर कठोर आणि जखम करणारा असेल तर इतरांकडून करवून घ्यायचा असतो, त्यालाच राजकारण म्हणतात. अनेक प्रसंगात फडणवीस कर्कश्शपणे मागील सरकारवर जबाबदाऱ्या टाकताना-वार करताना दिसतात. आज त्यांना यात कुरघोडी केल्याचे समाधान मिळत असले तरी उद्या हेच अस्त्र त्यांच्यावरही उलटू शकते त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

स्वच्छ चारित्र्य, विकासाची दृष्टी, काम करण्याची उमेद आणि पक्षश्रेष्ठींचा वरदहस्त ही बलस्थाने असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राज्यात परिस्थिती प्रतिकूल आहे. संघाचा अंकुश आहे , ब्राह्मण्य आड आहे, पक्षात मुळीच आलबेल नाही, शिवसेनेसोबतची युती ही अवघड कसरत आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ असे त्रांगडे आहे, तिजोरीत खडखडाट आहे त्यात हे कमी काय म्हणून दुष्काळ आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडले आहे, शिवाय एखाद्या सरकारसाठी १५० दिवस हा काही मोठा अवधी नाही हे सुज्ञांस कळते, सामान्य माणसाला नाही. त्या सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना स्वच्छ-गतिमान प्रशासन, खायला अन्न, शेती आणि पिण्यासाठी पाणी, सुरळीत वीज पुरवठा, टोलविरहित गुळगुळीत रस्ते, हाताला काम… अशा अनेक आशा दाखवत सत्तेत आला आहात. त्या आशा पूर्ण होतील अशी पावले उचलली जात नाहीयेत अशी भावना लोकात निर्माण होऊ लागली आहे..ती प्रकटही होऊ लागली आहे. तुमच्या प्रतिकूल परिस्थितीशी रयतेला काहीही घेणे-देणे नाही. फडणवीस, तुम्ही(च) दाखवलेल्या सुखी महाराष्ट्राची त्याला आस आहे. म्हणून कामाला लागा. सामान्य माणूस आशेने आणि अश्रू आटलेला शेतकरी शुष्क डोळ्यांनी वाट पाहतो आहे… म्हणून सांगतो, महाराष्ट्रातील रयतेच्या मनात निराशा दाटेल असे वागू नका. रयतेचे मुख्यमंत्री व्हा!

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट