माझ्या (न बि)घडण्याची गोष्ट !

( दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’च्या  २०१९ च्या  दिवाळी  अंकात ,’आमच्या  घडण्याची गोष्ट’ या विषय विभागात प्रकाशित झालेला लेख . अक्षर लेखन- नयन बाराहाते  , नांदेड )

माझ्या घडण्याची गोष्ट सांगायची कशी ? आता मी वयाच्या पासष्टीत आहे पण , अजून  पत्रकार , लेखक आणि महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपली घडण पूर्ण झालेली  आहे , असं कांही वाटत नाही . एखाद्या माणसाची जडणघडण ही कांही एका विशिष्ट कालावधीत संपणारी प्रक्रिया आहे असं नसतं . ती अदृष्य प्रक्रिया कोणाही माणसाच्या जगण्यापासून सुरु होते आणि मृत्यूपर्यंत ती अपूर्णच राहते , असा किमान माझा तरी समज आहे . मी हयात आहे याचा अर्थ माझ्या अर्धवट घडण्याची गोष्ट आता तुम्हाला सांगावी लागणार आहे . हे म्हणणं वेगळ्या शब्दात सांगायचं तर , माझ्या न बिघडण्याचीही ही गोष्ट असू शकते .

बालपण अत्यंत अभावग्रस्त होतं . सातवी आठवी पासूनच जगण्याचा संघर्ष सुरु झाला . एक वर्ष जालना रेल्वे स्टेशनवर वृत्तपत्रे , साप्ताहिके , मासिके विकली आणि संध्याकाळी स्टेशनबाहेर मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठ्या लिहून देण्याचं काम केलं पण, मला कधी मटका किंवा अन्य कोणताही जुगार खेळावासा वाटला नाही . नंतर रोजगार हमी योजनेवर मजुराची रोजी घेऊन मुकादम म्हणून काम करतांना , दिवसाचं काम संपल्यावर मुकादम आणि बहुतेक सर्व बाप्ये मजूर एक तर हातभट्टीची मारत बसत नाही तर तीन पत्ती जुगार खेळत पण , खूप आग्रह होऊनही मला कधीच त्यांच्यात सहभागी व्हावसं वाटलं नाही . घराचे पाश तोडून मी फारच लवकर उघड्या आकाशाखाली आलो . पोट भरण्यासाठी तोंडात घालायला कांही तरी हातात यावं यासाठी संघर्ष सुरु झाला पण , तेव्हाही कधी भुरटी चोरी-मारी , उचलेगिरी करावी , कांही अवैध मार्ग अवलंबावे किंवा याचना करावी असं वाटलं नाही . पुढे पत्रकारितेत आल्यावर पहिली कांही वर्ष सडाफटिंगच होतो पण , कोणत्याही पाकीट संस्कृती किंवा फुकट मिळणाऱ्या पार्ट्यांची चटक मला लागली नाही . नोकरीचा एक भाग म्हणून अशा पार्ट्यात जावं लागलं तर मी जेवत नक्कीच असे पण , ज्याचा ‘मंतरलेलं पाणी’ असा उल्लेख मी कायम करतो त्या व्हिस्कीची चव कधी घेण्याची इच्छा झाली नाही . ( ती चव पुढे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी आणि विवाहानंतर चाखली पण, मंतरलेल्या या पाण्याबद्दलच्या माझ्या असोशीबद्दल नंतर कधी तरी . ) 

मी बिघडलो का नसेन किंवा जेवढा कांही बिघडलो तेवढाच का बिघडलो जास्त का नाही ; तर या प्रश्नाचं उत्तर एक म्हणजे झालेला वाचनाचा संस्कार , दोन-असलेलं माणसाचं व्यसन आणि तिसरं म्हणजे उत्सुकता कायम चाळवलेली असणं . वाचनाचा संस्कार माझ्यावर झाला तो आईकडून . तिला आम्ही माई म्हणायचो . माई नर्स होती आणि ती अवघ्या सत्तावीस किंवा अठ्ठावीस वर्षांची असतांना माझे वडील वारले . पदरी चार मुलगे  ,नर्स म्हणून पगार पासष्ठ का अडूसष्ठ  रुपये आणि नेमणूक अत्यंत छोट्या गावात . अनेकदा त्या गावात बसही जात नसे . त्यात माई अत्यंत देखणी होती . देखण्या , विधवा आणि चार मुलगे पदरी असलेल्या बाईनं जगणं अत्यंत कठीण असण्याचा तो काळ होता तरीही माई कायम शांत आणि सस्मित असायची . असह्य अर्धशिशी , पती अकाली गेला , पोटचा एक मुलगा अचानक गायब झाला आणि मी सर्व पाश सोडून घराबाहेर पडलो , असे एक ना अनेक आघात पचवूनही माई धाय मोकलून रडते आहे किंवा धीर गाळून बसली आहे , असं कधी दिसलं नाही . तिचे डोळे  क्वचित ओलावलेले दिसत पण , ते तेवढ्यापुरतेच . कोणत्याही परिस्थितीला शांतपणे तोंड दिलं पाहिजे हे मी शिकलो माईकडून . पुढे पत्रकारिता   करतांना टीम लीडर झाल्यावर कोणतीही मोठी घटना समोर उभी ठाकली तरी उत्तेजित    न होता , चीडचीड न करता , नियोजन करत प्रत्येकाला कामाला कसं लावायचं शिकलो , ते याच घडण्यातून .

दुसरा संस्कारही माईचाच आणि तो वाचनाचा . वयाच्या १०-११व्या वर्षीच तिनं आम्हाला वाचनाच्या संस्काराला जुंपलं . ती जर स्वयंपाक , वीणकाम करत किंवा गवले वळत असेल तर ती सांगेल ते पुस्तक वाचून दाखवण्याची जबाबदारी प्रामुख्यानं माझ्यावर असे . सुटीच्या दिवशी दररोज किमान दहा ओळी मराठी आणि इंग्रजी शुद्धलेखन लिहावंच लागे , त्याशिवाय सकाळचं खायला मिळत नसे . तिची शिक्षाही हटके असायची . अंगठे किंवा कान धरुन उभं करणं किंवा मारहाण तिला वर्ज्य होती . आमच्याविषयी तक्रार आली की पितळेच्या पाण्याच्या पिंपात उभ राहून वीरकरांच्या डिक्शनरीतले शब्दार्थ किंवा रेन अँड मार्टिनचं व्याकरण पाठ करावं लागे . हे सर्व तेव्हा फारच जाचक वाटायचं पण, त्याचा  उपयोग पुढे शिक्षण , पत्रकारीता आणि अन्य लेखनातही खूप झाला . म्हणूनच प्रचंड अभावाच्या त्या काळात मटक्याचे आंकडे लिहिण्याचं किंवा रोजगार हमी योजनेवरचं काम संपलं की मी वाचत सुटत असे ; तीच नशा मला पुरेशी असे .

माझी पत्नी मंगला ही माझ्यापेक्षा उच्चविद्याविभूषित . मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर तिची हुकमत . तिच्यामुळे मी इंग्रजी वाचनाकडे वळलो ; ज्याचा मला पुढे इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समुहात काम करतांना , इंग्रजी लेखन करतांना , देश विदेशात फिरतांना खूप फायदा झाला . ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात मंगला आणि मी सहकारी होतो . ती रविवार पुरवणीची प्रमुख तर मी मुख्य वार्ताहर ; शिवाय तिला रविवार पुरवणीच्या कामात सहाय्य करण्याची अतिरिक्त जबाबदारी माझ्यावर होती . आमची ओळखच मुळी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकासाठी चिपळूणहून मी करत असलेल्या लेखनामुळे झाली . मंगला आणि तिच्या आईमुळे शब्दकोडी सोडवायची संवय लागली आणि मग शब्दांशी खेळण्याचा छंदच लागला . मी पत्रकारिता करावी आणि बेगमनं ( हा मी करत असलेला मंगलाचा खास उल्लेख !) घर सांभाळाव असं तिनंच ठरवल्यावर शब्दकोडी कुणी सोडवायची यावरुन आमच्यात वाद सुरु झाले ; मग सकाळी वृत्तपत्र वाचतांना मनातल्या मनात कोडी सोडवण्याचा माझ्यापुरता मार्ग निघाला . याच छंदातून आमच्याकडे अगदी मोल्सवर्थ , वेबस्टर ते चाऊस अशा किमान १५ डिक्शनऱ्याचं आगमन झालं . थोडसं विषयांतर करून सांगतो , माझी मराठवाडी अनेकवचनं ‘कागदं’ नव्हे कागद , ‘लोकं’ नव्हे लोक , ‘केसं’ नव्हे केस अशा असंख्य दुरुस्त्या तिनं माझ्या बोलण्या आणि लेखनात केल्या . आजही प्रकृती अस्वास्थ असतांना ती माझ्या लेखनात झालेल्या चुका दुरुस्त करते ! अजूनही चुका निघतात याचा अर्थ माझी घडण पूर्ण झालेली नाहीये , हे स्पष्टच आहे . शब्द म्हणजे केवळ कांही अक्षरांचा समूह नसतो . प्रत्येक शब्दाला नाद , गंध , भावना आणि जन्म (व्युत्पत्ती) असतो हे बहुसंख्य लोक लक्षातच घेत नाही ; मी ते घेतो आणि त्यातून घडत जातोय अशी माझी भावना आहे . आपण शब्दांशी सलगी करत नाही , त्यांच्याशी गप्पा मारत नाही , मग शब्द लुप्त होतं जातात आणि आपण मात्र भाषा संपते आहे असं अरण्यरुदन करत बसलेलो आहोत , असं मला ठामपणे वाटतं  . 

माईचा भर प्रामुख्याने ललित साहित्यावर होता . आमची पिढी ​मॅट्रीक  झाली त्याच वर्षी कन्नड या तालुक्याच्या गावी महाविद्यालय सुरु झालं आणि पुढच्या शिक्षणाचा मार्ग खुला झाला ; अन्यथा जास्तीत जास्त रोड कारकून म्हणून निवृत्त झालो असतो ! वाचनात शिस्त यायला सुरुवात झाली ती इथे . महाविद्यालय नवीन असल्यानं सर्व जुळवाजुळाव सुरु होती . माझ्यासारख्या चांगलं हस्ताक्षर असलेल्या आणि धडपड्या विद्यार्थ्याला साहजिकच भरपूर वाव होता . माझं ग्रंथालयात रेंगाळणं वाढलं . त्यातून लिखापढीची कांही कामं माझ्यावर  सोपवली गेली . पुस्तकांच्या त्या दुनियेत मग मी रमून गेलो . नवीन अनेक लेखक आणि पुस्तकांची नावं समजली ; ते सगळं अदभूतच होतं . त्यातून वाचनाचा परीघ विस्तारला . पुढे औरंगाबादला आल्यावर दैनिक मराठवाडा वाचत असतांना ,  ग्रंथालय शास्त्राचा प्रमाणपत्र तसंच नंतर पुढचा अभ्यासक्रम करतांना आणि राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात आल्यावर  महात्मा गांधी , मार्क्स , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , दलित आणि ग्रामीण साहित्य असा वाचनाचा तो परीघ आणखी विस्तारला . मराठी आणि इंग्रजीतले अनेक लेखक त्यांच्या लेखनातून परिचयाचे झाले आणि वाचनाची हौस कधी फिटलीच नाही . त्यामुळे अन्य कोणत्या नशेची गरजच भासेनाशी झाली . रात्ररात्र वाचण्याची भूक याच काळात आणखी वाढली . पत्रकारितेच्या धबडग्यात आकंठ बुडालेलो असतांनाही वाचायला वेळ मिळत नाही अशी सबब मी शोधली नाही . आवर्जून सांगतो , वाचनाची माझी एक वेगळी शैली मधल्या  त्या २०-२२ वर्षांच्या काळात होती . कार , कार्यालय आणि घर अशा तीन ठिकाणी माझं समांतरपणे तीन वेगळ्या विषयांवरील पुस्तकाचं वाचन सुरु असे आणि एका पुस्तकावरुन दुसऱ्यावर शिफ्ट होतांना मला मुळीच त्रास होत नसे !

माझ्यातला ‘उत्सुक’ वाचनातूनच जागा झाला . नवीन नाव , संदर्भ आला की ते मिळवायचं आणि वाचायचं अशी संवय लागली . पत्रकारिता करतांना बातमी असो अन्य लेखन या उत्सुकतेचा फार उपयोग झाला . लेखनात नेमकेपणा आणि विश्वासाहर्ता आली . बातमीच्या विषयाची आधी माहिती करुन घेण्यामुळे बरच कांही नवीन डोक्यात जमा होऊ लागलं . कांही उदाहरण सांगतो- धनंजय गोडबोले आणि मी मिळून राज्याच्या उत्पादन खात्यावर एक मोठी वृत्तमालिका केली तेव्हा मद्याचे विविध प्रकार , त्यांचं उत्पादन कुठे आणि कसं होतं , त्यांची वैशिष्ट्ये , विक्री यंत्रणा , शासनाचा त्या व्यवहारात असणारा सहभाग आणि गैरव्यवहारासाठी त्यात शोधल्या जाणाऱ्या पळवाटा , याबद्दल सविस्तर अभ्यास केला ; तितका अभ्यास कदाचित त्या खात्यातील अनेकांनी केला नसेल . ( मद्य निर्मिती बाबतचा एक कोशही माझ्याकडे आहे ! ) तेव्हापासून त्या खात्याच्या आयुक्तपदी आलेले अनेक सनदी अधिकारी सूत्र हाती घेताच माझ्याशी चर्चा करतात ! बँक ऑफ इंडियाच्या  फायनान्स ( बायोफिन) एका घोटाळ्याचा चौकशी अहवाल माझ्या हाती विनासायास लागला कारण ते चौकशी कारणारे सनदी अधिकारी माझे मित्र होते ! पहिल्यांदा तो अहवाल वाचल्यावर जेमतेम समजला कारण बँकिंग व्यवहाराची माझी माहिती पैसे काढणे आणि धनादेश भरणे एवढीच मर्यादित होती . माझा मेव्हणा श्रीकांत विन्चुर्णे एका राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी होता . एक आठवडा त्याच्याकडून बँकिंग व्यवहार समजून घेतले आणि मग ती बारा भागांची  वृत्तमालिका लिहिली . ‘तरुण भारत’ या दैनिकात काम करताना रा. स्व. संघाच्या असाईनमेंट माझ्या वाट्याला येत . ते काम मला फारच कंटाळवाणं वाटे पण , मी वृत्तसंकलन करत असतांना कामाबाबत गंभीर असे . त्याच काळात मी मंगलाच्या नावावर ‘लोकसत्ता’चं काम करत होतो . ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी यांनीही तेच बीट करायला सांगितल्यावर रा. स्व. संघावरची मिळतील ती मराठी , इंग्रजी पुस्तकं वाचून काढली ; अनेकांशी बोललो . शिस्त , नियोजन , झोकून काम करण्याची वृत्ती आणि सेवा कार्ये या संघाच्या प्रशंसनीय बाबी आहेत तर त्यांचा धर्मांध उन्माद आणि कुजबुज करण्याची व कंड्या पसरवण्याची अफाट ताकद पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे , असं या अभ्यासाअंती माझं ठाम मत झालं . मग हा भेद लक्षात घेऊन मी लिहू लागलो . ते एकतर्फी लेखन नसल्यानं संघाचे लोकही त्याची गंभीरपणे दखल घेऊ लागले . राजकीय आणि विधिमंडळ व संसदेचं वृत्तसंकलन  करतांना विविध पक्षांचे इतिहास आणि बड्या राजकीय नेत्यांची चरित्रे-आत्मचरित्रे , असं भरपूर वाचन झालं . संसदीय परंपरा , प्रथा आणि शिष्टाचार यासंदर्भात बायबल समजला जाणारा कौल आणि शकधर यांचा ग्रंथ तर तीन वेळा वाचून काढला . उच्च न्यायालयाचं वृत्तसंकलन करतांना अविनाश गुप्ता आणि सुबोध धर्माधिकारी या प्रख्यात वकील असलेल्या दोस्तांकडून बातमी लिहिण्यासाठी याचिका किंवा न्यायालयीन आदेशातील नेमका कोणता भाग वाचायला हवा , न्यायालयाची कामकाजाची प्रक्रिया कशी चालते याचे पाठ गिरवले . माझ्या घडण्याच्या प्रक्रियेशी घनिष्ठ निगडीत असलेलं वाचन आणि त्यातून शिकणं अजूनही संपलेलं नाही . मला असं वाटतं की , ही उत्सुकता , हे वाचन ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी मीही संपलेला असेन…

माणसांना भेटणं हा माझ्या घडण्यातला म्हणजेच न बिघडण्यातला महत्वाचा घटक आहे . जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला चांगली आणि क्वचित वाईटही माणसं भेटली . यात अन्नेक  संपादक , लेखक , कवी , चित्रकार , राजकारणी , डॉक्टर्स , इंजिनिअर , सनदी अधिकारी आणि महत्वाचं म्हणजे राजकारणी आहेत . ती यादी सांगायची झाली तर फारच मोठी  होईल . कोणालाही भेटतांना जात-धर्म-राजकीय विचार बाजूला ठेऊन फक्त माणूस म्हणून भेटायचं , संवाद साधायचा आणि ते जे ‘ऑफ द रेकॉर्ड’ सांगतील ते लिहायचं तर सोडाच , कुणाला सांगायचंही नाही , हे पथ्य सांभाळल्यानं असंख्य मित्र लाभले ; महत्वाचं म्हणजे विश्वासार्हता मिळाली . यातल्या प्रत्येकाकडून कांही तरी शिकता आलं आणि त्या प्रत्येकाचा माझ्या घडण्यात महत्वाचा वाटा आहे ; त्यांच्याबद्दल म्हणून माझ्या मनात कृतज्ञतेची भावना कायम तेवती आहे . वाचनानं जी प्रगल्भता आली त्यामुळे प्रत्येक माणसात असणाऱ्या चांगलेपणाकडे बघण्याचा विवेक माझ्यात आला आणि तो लेखनात नकळतपणे डोकावत गेला .

अगदी अलीकडे बेगम आजारी होईपर्यंत दररोज किमान एका तरी नवीन माणसाला भेटायचं आणि त्याच्याशी बोलायचं व्रत मी सांभाळलं .  माणसाशी संवाद साधनं ही देखील माझ्या घडण्याची प्रक्रिया होती . कुणाच्याही कौटुंबीक चौकशा मी कधी केल्या नाहीत पण, तो किती , कसा आणि कुठे शिकला , काय करतो , काय वाचतो , काय पाहतो असा संवाद मी घडवून आणत असे . माणसं वाचण्याचा हा खेळ म्हणजे आपण घडण्याची प्रक्रिया आहे . मी संपादक असतांना ( म्हणजे तुच्छतेनं वागण्याचा परवाना मिळालेला असतांना ! ) एकदा एक माणूस ४/५ वर्षांच्या त्याच्या गोंडस मुलीला घेऊन प्रेसनोट द्यायला आला तेव्हा नेमका मी समोर होतो . त्यानं प्रेस नोट माझ्याच हातात दिली . सहज म्हणून त्या मुलीचं नाव विचारलं तर अभिधा होतं . अर्थ विचारला तर तो म्हणाला ‘अभिधा म्हणजे  मुळार्थ’ . मला हे माहिती नव्हतं ; म्हणजे हे शिकणं झालं ! त्यांना मी माझ्या केबिनमधे घेऊन आलो . त्या माणसाला चहा पाजला आणि अभिधाला ड्रॉवर मधून कडून चॉकोलेट दिलं . तो माणूस  एका संघटनेचा कार्यकर्ता आणि शासकीय सेवेत कारकून होता . गप्पाच्या ओघात त्यानं सांगितलं की त्याच्या घरात कटाक्षानं मराठीच बोललं-वाचली जाते आणि तेही अतिशय भक्तीभाव म्हणून . त्यातूनच ‘अभिधा’ हे वेगळं नाव कन्येसाठी सुचलं . मराठीसाठी टाहो फोडणारे मुलांना इंग्रजी शाळात घालतात , हे पदोपदी दिसत असातांना त्यानं जे सांगितलं ते उदबोधक होतं . गेल्याच महिन्यातली अशीच एक गंमत- फेसबुकवर अभिपर्णा भोसले असं नाव दिसू लागलं . नावाचा अर्थ विचारणारा मेसेज पाठवला तर त्या तरुणीनं कळवलं ‘अर्थ माहिती नाही ; वडीलांचं नाव अभिमन्यू आणि माझ नाव अपर्णा त्यातून असं नवीन नाव तयार केलं’ . त्याचा अर्थ झाडाचं पान असा होऊ शकतो ,असं मी तिला कळवलं तर तिचा मेसेज आला की, ‘नवं पान असा अर्थ मी समजू का ?’ त्यावर ‘ते स्वातंत्र्य तू घेऊ शकतेस’ असं मी कळवलं . ‘माणूस वाचना’चे असे किती तरी अनुभव आहेत .

शिकत राहणं ही एक अव्याहत प्रक्रिया आहे . शिकणं थांबलं की जगणं आहे त्याचं जागी थांबतं , जगण्याचं डबकं होतं अशी माझी धारणा आहे . पुस्तकं आणि माणसंच नाही तर प्राण्याकडूनही खूप कांही शिकता येतं असा माझा तरी अनुभव आहे . चांगलंसं घर , कार आणि जगण्यापुरता वगळता जास्त धनसंचय करायचा नाही हे माझं आणि मंगलाचं आधीच ठरलेलं होतं . जास्त शिल्लक राहण्याइतका पैसा येऊ लागल्यावर पुस्तकं , चित्र , शिल्प , आवडत्या गाण्याच्या कॅसेट्स वगैरे खरेदी सुरु झाली . मग एक डॉगी पाळण्याचा हट्ट लेकीकडून सुरु झाला आणि घरात कॅण्डी आला . ‘कॅण्डी पुराण’ हा मोठा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे . त्यानं लावलेला जिव्हाळा आणि त्यातून जे कांही शिकायला मिळालं ते शब्दातीत गर्भरेशमी आहे . कॅण्डी  लहान म्हणजे जेमतेम वर्षभराचा असतांना आम्ही औरंगाबादला होतो . औरंगाबादच्या भेटीवर येणारे मित्र असणारे सनदी अधिकारी , आमदार , खासदार , मंत्री आमच्या मठीत येत ; त्याला कारण बेगम मंगलाच्या हाताला असणारी बेजोड चव आणि मंतरलेल्या पाण्यावरील आसक्ती हे होतं . पार्टी संपली की आलेल्या मित्रांना सोडून मी लगेच बेडरुम गाठत असे आणि क्षणार्धात झोपी जात असे . एक दिवस पार्टी आटोपल्यावर मित्रांना कारपर्यंत सोडून परतलो आणि बेडवर पडलो पण , झोप येईना . उठलो आणि पायाशी नजर गेली तर कॅण्डी नव्हता . इतक्या रात्री लेकरु गेलं कुठे , याचं आश्चर्य वाटून बेडरुमच्या बाहेर आलो तर तो किचनसमोर बसलेला होता आणि बेगम आवरासावरी करत होती . आवाज दिल्यावर माझ्याकडे पाहत तो नाराजी व्यक्त करणारं गुरगुरला . मी बेगमशी गप्पा  मारु लागलो . तिची आवरासावरी झाल्यावर तिच्यामागोमाग तो आला आणि बेडच्या खाली मंगलाच्या पायाशी झोपला . आई इतक्या उशीरा एकटी जागते आहे , तिला सोबत केली पाहिजे हे कॅण्डीला समजतं आणि आपल्याला नाही हे जाणवून मला माझी खूपच लाज वाटली . बेगमला मदत म्हणून तेव्हाही मी घरातली बरीच कामं करत असे पण , त्या रात्रीपासून पूर्ण आवरासावर करण्यासाठीही बेगमला मदत करायला लागलो .

शेवटी- माझी बेगम मंगला गेल्या दोन वर्षापासून अंथरुणाला खिळलेली आहे आणि या काळात बाईचं ‘गृहिणी’ असणं हे किती कठीण आव्हान आहे हे मला उमगलं . बाई घरात आहे म्हणजे तिला कांही फार काम नसतं असा माझा समज कधीच नव्हता पण , तिला कित्ती आघाड्यांवर एकाच वेळी लढावं लागतं आणि किती कष्ट उपसावे लागतात याची पूर्ण कल्पना कांही मला नव्हती . जसजसं घरातली एकेक कामं अंगावर पडत गेली तेव्हा गृहिणीपणातल्या जबाबदाऱ्या समजत गेल्या . साधं टॉवेलचं उदाहरण घ्या , पावसाळ्यात लवकर वाळणारे पातळ टॉवेल हवे असतात तर टर्किश टॉवेल केवळ उन्हाळ्यातच वापरायचे असतात ; पुसल्यावर  टॉवेल बोळा करुन टाकला तर त्याला कुबट वास येतो म्हणून कुणी तसा टाकला असेल तर तो लगेच उचलायचं भान बाळगावं ; कोणत्या सीझनमधे कोणत्या चादरी वापरायच्या ; उन्हाळ्यात जाड आणि पावसाळा-हिवाळ्यात पातळ आणि कोणत्या रंगाचे पडदे वापरायचे असतात ; पडदे बदलल्यावर सोफा आणि त्यावरील उशांची कव्हर्स कोणत्या रंगाची ठेवावीत ; कोणत्याही फ्रेम्सवर नुसतं कापड मारुन भागात नसतं तर फ्रेमच्या मागेही हात मारायचा असतो नाही तर जाळी साठतात ; पिशवी फोडून दूध ओतण्यापूर्वी भांडं विसळून घ्यायचं असतं अन्यथा बुडाशी दूध लागतं ; फ्रीजमधून काढून थेट दूध तापवायला ठेवलं तर ते फाटतं ; कोणतं भांडं कोणत्या पदार्थासाठी वापरायचं अन्यथा वासांची सरमिसळ होते ; कोणत्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि त्यांचा क्रम कसा असतो ; कोणत्या कपड्याची घडी कशी घालायची याची एक विशिष्ट पद्धत ; कपड्यांचा क्रम कसा ठेवायचा ; विशेषत: सिंक आणि बाथरूममध्ये वास येऊ नये म्हणून कोणता कांटेकोरपणा बाळगायचा असतो…अशा हज्जारो बाबी आहेत आणि त्यापैकी एकही आपल्याला माहिती नसते . अन्न-पदार्थ आणि किराणा व्यवस्थापन हे तर एमबीए झालेल्या माणसालासुद्धा पटकन जमणारं काम नाही . कामवाली बाई नाही आली तर घर झाडतांना आणि पोछा मारतांना कमरेचे टांके कसे ढिले होतात याचा अनुभव प्रत्येक पुरुषानं एकदा तरी घ्यायला हवा , अशा निष्कर्षाप्रत मी आता आलेलो आहे . पहाटे उठल्यापासून ते रात्री गादीवर अंग टाकेपर्यंत काम करणाऱ्या गृहिणीच्या कामाचा मोबदला कमावत्या पुरुषाच्या वेतनाच्या किमान चौपट तरी द्यायला हवा असं माझं मत झालेलं आहे . एक ‘गृहिणी’ म्हणून होणारी ही जडणघडण आतापर्यंत केलेल्या पत्रकारितेपेक्षा जास्त मोठं आव्हान आहे आणि अजून तर मी किमान कुशल , नीटनेटकी गृहिणी या पायरीपर्यंतही पोहोचलेलो नाहीये शिकण्यासाठी अजून खूप मजल मारायची आहे बाकी आहे . 

खूप वाचायचं, कितीतरी लिहायचं राहिलं आहे आणि त्यातूनही पुन्हा नव्यानं घडायचं अजून शिल्लक आहे . म्हणूनच म्हटलं आजवरचं जगणं ही माझ्या ( अजून तरी ) न बिघडण्याचीही गोष्ट आहे , घडणं अजून पूर्ण झालेलंच नाहीये  ! 

 

 

सेलफोन- ९८२२०५५७९९ 

 

 

 

 

 

 

 

संबंधित पोस्ट