विश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…

शासकीय विश्रामगृहांचं लहानपणापासूनच एक सुप्‍त असं आकर्षण मनात होतं. आई आणि वडील दोघेही शासकीय नोकरीत असल्यानं त्यांचे वरिष्ठ गावी आल्यावर विश्रामगृहावरच उतरत असत. विश्रामगृहाच वातावरण कसं एकदम अ‍ॅरिस्टोक्रॅटीक, कव्हर घातलेले शिस्तबध्द सोफे, खानसामा आणि अन्य कर्मचारी युनिफॉर्ममध्ये, जेवणाच्या टेबलवर आकर्षकपणे मांडून ठेवलेला संरजाम मनात खोलवर तेव्हापासूनच रुतून बसला. तो बडेजाव बघून आपणही शासकीय नोकरीत अधिकारी व्हावं असच वाटायचं.

पुढे तरुण वयात युवक चळवळीत आणि युवक केंद्राचं काम करताना छोट्यामोठ्या नेत्यांसोबत विश्रामगृहांशी जवळीक वाढली; पत्रकारितेत आल्यावर तर गेल्या चार दशकात वर्षांत पक्‍की नाळ जुळली गेली. विश्रामगृह म्हणजे केवळ इमारती नाही तर तो निवास आणि खाद्य संस्कृतीचा एक वारकरी आहे असं लक्षात येत गेलं. या ईमारती म्हणजे केवळ दगड-माती, सिमेंट-विटा यांचा समुच्चय नाही तर अनेक विश्रामगृहांची नाळ त्या-त्या भागातील सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक घटनांशी तसंच मोठ-मोठ्या व्यक्तींशी जोडली गेलेली आहे, असं लक्षात येत गेलं.

गेस्टहाऊस, रेस्टहाऊस आणि सर्किटहाऊस हे शब्द आपण सरसकट एकाच अर्थाने वापरतो हे, काही खरं नाही हे पत्रकारितेत आल्यावर लक्षात उमजलं. रेस्टहाऊस म्हणजे केवळ काही तासांसाठीचा मुक्‍काम असलेलं तर गेस्टहाऊस म्हणजे जिथे एक-दोन दिवस वास्तव्य करायचं आणि सर्किटहाऊस म्हणजे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासासाठी असलेलं तात्पुरतं निवासस्थान. गेस्टहाऊस म्हणजे मध्यमवर्गीयांचा फर्निश्ड वन-बेडरुम फ्लॅट, रेस्टहाऊस म्हणजे मध्यम मध्यमवर्गीयांचा जरा सजवलेला-एखाद्या बेडरुमला एसी असणारा टू-थ्री बेडरुम फ्लॅट तर सर्किटहाऊस म्हणजे कलात्मकतेनं सजवलेलं उच्चवर्गीयांचं अलिशान घर; अशी ही उतरंड आहे. गेस्टहाऊस, रेस्टहाऊस आणि सर्किटहाऊस या तिघांना एका पंगतीत बसवणं हे विश्रामगृह संस्कृतीचं अवमूल्यन आहे; ‘साराभाई वर्सेस साराभाई’च्या भाषेत सांगायचं तर, पोळीचा पिझ्झा किंवा चायनीज मसाला डोसा असं टिपिकल मिडलक्लास आहे ते!

सर्किटहाऊसचा दिमाख काही वेगळाच. सर्वसामान्य माणसाला सर्किटहाऊसमध्ये राहण्याचं भाग्य सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी मंत्री, खासदार, आमदार, आय. ए. एस., आय. पी. एस. अधिकारी किंवा यापैकी एकाचा वशिला लावावा लागतो. सर्किट हाऊसची एक खोली म्हणजे मध्यवर्गीय माणसाचं अख्खं घर छोटेखानी कमी पडेल असं असतं. सुसज्ज बाथरुम आणि तीही अनेकदा १२x १२ किंवा १५ x १५ फूट आकाराची म्हणजे, मध्यवर्गीय पांढरपेश्या माणसाच्या पूर्णपणे अवाक्याबाहेर असणारी. बसण्याची खोली स्वतंत्र आणि प्रशस्त, शिवाय एक अलिशान बेडरुम असा हा एक स्यूट असतो. बाथरुम वगळता सर्वत्र अगदी वॉल टू वॉल, पाय कमीतकमी बोटभर तरी आत शिरेल असं उंची कारपेट आणि संपूर्ण स्यूट फुल एअरकंडिशन्ड. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात विश्रामगृह ही केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याची मिरासदारी होती. नंतर त्यात वन, सिंचन या खात्यांसोबतच एमआयडीसी, एमएसईबी, ही मंडळही शिरली.

गेस्टहाऊस आणि रेस्टहाऊस हे सर्किटहाऊसच्या तुलनेत एकदम कनिष्ठ, मेटाकुटीला आलेल्या मध्यमवर्गीय संसारासारखं. मुंबई, नागपूर, पुण्यात फर्निश्ड वन-टू बेडरुम, किचनची जी कन्सेप्ट आहे अगदी तस्सच. मात्र, एक ते दीड खोलीपुरता विस्तार असणारी गेस्ट हाऊसेस असतात मात्र सुसज्ज. गेस्टहाऊस असो की रेस्टहाऊस की सर्किटहाऊस या सर्वांना एका धाग्यात बांधणारं समान सूत्र असतं ते तिथे मिळणारं अतिशय रुचकर जेवण. नाश्त्याला मिळणारे मिळणारे साधे पोहे असो किंवा टोस्ट बटर, भोजन शाकाहारी असो वा मांसाहारी; प्रत्येक रेस्ट हाऊसची एक स्वतःची अशी चव असते; त्या चवीचा परिमळ त्या परिसरातच नव्हे तर ती चव चाखलेल्या प्रत्येकाच्या च्या बोलण्यातून दरवळत असतो; काही रेस्टहाऊसेस मधून जेवून बाहेर पडल्यावर तेथील मसाल्याचा बोटाला लागलेला सुगंध त्या अफलातून चवीच्या जायकेदार जेवणाची पुढचे आठ दिवस आठवण करून देत असतो.

रेस्टहाऊस, गेस्टहाऊस हे खरे तर इंग्रजांची देण. त्या काळात प्रवास जिकिरीचा होता, गावोगावी राहण्याची सोय नव्हती म्हणून इंग्रज अधिकार्‍यांसाठी ठिकठिकाणी गेस्ट हाऊसेस बांधली गेली. ती कमी पडू लागल्यावर एतद्देशीय अधिकार्‍यांसाठी रेस्ट हाऊसेस आली. प्रशासनातला आणि इंग्रज-इंडियनमधला भेद स्पष्ट झाल्यावर विश्रामगृहे आली; इंग्रज विश्रामगृहात आणि एतद्देशीय रेस्टहाऊस किंवा गेस्टहाऊसमधे अशी विभागणी झाली. स्वातंत्र्य मिळाल्यावर नंतरच्या १५-२० वर्षांनी अधिकारी आणि राजकारण्यांचा जो सुळसुळाट झाला त्यातून वैभवी सर्किट हाऊसेसची निर्मिती झाली.

सर्किटहाऊस, गेस्टहाऊस किंवा रेस्टहाऊस अशा कुठल्याही नावात न अडकणारं उत्तम ठिकाण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कोलखास येथील गेस्टहाऊस. १९७१ किंवा त्याच्या आसपास भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी हे गेस्टहाऊस जेमतेम १५-२० दिवसांत उभारण्यात आलं. इंदिरा गांधी यांनी या दीड खोल्यात चक्क तिथं दीड दिवस घालवला. मेळघाटात, उंच टेकडीवर ही साधीशी इमारत आहे. ऐश्‍वर्याच्या तशा कोणत्याही खुणा या इमारतीत आणि इमारतीवरही नाही पण, एकदा व्हरांड्यात येऊन बसलं आणि सभोवार नुसती नजर टाकली तरी निसर्गाची उधळण खिळवून ठेवते. खाली सिपना नदीचा प्रवाह खळाळत असतो. एकटा माणूसही इथे काही न खाता-पिता, वाचता-ऐकता स्वतःला अनेक तास गुंगवून ठेवू शकतो. त्यात दिवस कलतीकडे झुकू लागला असेल तर आकाशातले रंगविभ्रम मोहून टाकतात. साथीला तलत किंवा बेगम अख्तर किंवा मेहंदी हसन यापैकी एखादाजण असेल तर आपण त्या संध्याकाळमध्ये केव्हा विरघळून जातो, हे लक्षातही येत नाही. जशी रात्र चढत जाते तसं वातावरण इतकं नि:शब्द होत जातं की, पानांची सळसळही डिजिटल आवाजापेक्षा मोठी होऊन अंगावर कांटा उभा करते. त्यातच आपण जर पुरेसे सुदैवी असू तर व्याघ्र दर्शन होण्याचाही योग जुळतो.

वेरुळच्या लेण्यांच्या डोक्यावरच्या डोंगरावर खुलताबादचं सर्किट हाऊस आहे. हेही बहुदा इंग्रजांच्याच काळात बांधलं गेलं असावं आणि निझामाच्या राजवटीत त्याची देखभाल एखाद्या खानदानी वैभवासारखी केली गेली. सकाळी या रेस्टहाऊसवर सामान टाकावं, डोंगरावरच्या पायवाटेनी वेरुळच्या लेण्या पाहण्यासाठी खाली थेट लेण्यांच्या मांडीवरच उतरावं, दुपारी कैलास हॉटेलमध्ये झकास जेवण घ्यावं, मग कैलास लेणं बघावं. दिवस उतरणीला लागला की पुन्हा डोंगर चढायला सुरुवात करावी आणि सूर्य अगदी मावळण्याच्या क्षणी खुलताबादच्या रेस्टहाऊसच्या व्हरांड्यात असलेल्या सोफ्यावर स्वतःला झोकून द्यावं. सूर्य पूर्ण मावळल्यावर दिवसभराच्या श्रमाचा शीण मंतरलेल्या पाण्यात विरघळवून टाकावा आणि मग अविस्मरणीय जायकेदार जेवणाचा यथेच्छ आस्वाद घ्यावा. याच सर्किट हाऊसच्या परिसरात 2 -3 मशिदी आहेत. त्यापैकी एक खुलताबादच्या डोंगरावरच्या डोंगरावर आहे. सकाळी लवकर उठून तिथे ट्रेकिंगलाही जाता येतं; पहिला चहा घेऊन हा छोटा डोंगर टाकोटाक चढून लगेच उतरलं की नाश्त्यावर आडवा हात मारता येतो.

आम्ही कॉलेजात असताना याच खुलताबाद सर्किट हाऊसच्या परिसरात ‘पाकिजा’ चित्रपटाचं शुटींग झालेलं आणि त्याच्या मराठवाडा दैनिकात प्रकाशित झालेल्या बातम्या वाचल्या गेलेल्या असल्यानं या परिसराविषयी एक इमोशनल असं नातं माझ्या पिढीला आहे. कुठेही भटकायला नाही गेलं आणि अंधार दाटायला सुरुवात झाल्यावर या परिसरात भरपूर फिरलं तर लक्षात येतं की, एखाद्या अतिप्राचीन दाढीधारी गंभीर वृध्दासारखा हा परिसर आहे. या सर्किट हाऊसमधल्या वैभवातून अनेक वस्तू नंतरच्या काळात शासकीय अधिकार्‍यांनीच पळवल्या तरीही काही शिल्‍लक आहेत. नीट वशिला लावला तर त्या आजही बघायला मिळतात. खुलताबादचं रेस्टहाऊस मात्र सुरुवातीपासून आज अखेर दारू पिणार्‍यांचा एक अड्डा हेच बिरुद मिरवत उभं आहे. या दारुड्यांचे अनेक अवशेष सकाळी गेस्ट हाऊसमध्ये चक्‍कर मारतांना सहज नजरेला पडतात आणि माणसं ‘मद्याचा आस्वाद’ घेण्याऐवजी ‘दारू का ढोस- ढोस ढोसतात’ असा प्रश्‍न पडतो!

वाशीम म्हणजे दंगल होणारं गाव अशी या गावाविषयी लहानपणापासून एक प्रतिमा तयार झालेली होती. आजी-आजोबा आणि मामांनी ती मनावर कोरली होती. विदर्भात पत्रकारितेच्या निमित्ताने आल्यावर सुमारे २० वर्षांपूर्वी या गावाला पहिली भेट दिली तेव्हा या गावाविषयी उत्सुकता निर्माण झाली. एखादा अनमोल ग्रंथ वाचकाविना पडून असावा असा या गावचा वैभवी इतिहास आहे. वाशीम गांव पूर्वी तालुका होतं, आता जिल्हा झालं आहे. इथलं सर्किटहाऊस १८९९ साली ते बांधल्याची दगडाची पट्टी या सर्किट हाऊसच्या दर्शनी भागावर कोरलेली आहे. दगडी बांधणीच्या भक्‍कम अशा या सर्किटहाऊसला केवळ दोन स्यूट आहेत. एखाद्या भक्‍कम चिरेबंदी वाड्यासारखं हे सर्किटहाऊस आहे. भिंती एवढ्या भक्‍कम आहेत की खिळा ठोकण्यासाठी ड्रिलींग मशिनचीही दमछाक होते. सर्किट हाऊसचा लूक एकूणच पुराण पुरुषाचा आणि चिरेबंदी बांधणीचा आहे. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचा संपादक असतांना काही वर्षांपूर्वी काही कामासाठी वाशीमला गेलो होतो; तेव्हा सप्टेंबरच्या महिन्यात एका सायंकाळी या सर्किट हाऊसच्या व्हरांड्यात बसलो असतांना अचानक जोरदार वारं सुटलं, आभाळ भरून आलं आणि त्या सायंकाळच्या उतरणीला लागलेल्या उन्हात पाऊस धुवांधार सुरू झाल्यावर अद्भूत विलोभनीय रंगाचा मन तृप्त करणारा असा चमत्कार बघायला मिळाला की, वाशीमचं ते सर्किट हाऊस जीवाभावाचा सखा झालं. या सर्किट हाऊसला मिळणारं भोजन भल्या-भल्या अस्सल खवय्यांनाही आजही मोहात पाडतं.

एमआयडीसी -महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्याधिकारी म्हणून जयंत कावळे असताना एकदा असाच विश्रामगृहांचा विषय निघाला आणि त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या बारवी धरणावरच्या एमआयडीसीच्या विश्रामगृहाचं वर्णन केलं. एका ऑक्टोबरमधल्या रात्री उशीरा आम्ही; डॉ. रवींद्र जोशी, डॉ. मिलिंद देशपांडे अशी तीन कुटुंबे या विश्रागृहावर जंगलातून जातांना काळ्याकुट्ट निशब्द काळोखाचं साम्राज्य पसरलेलं होचं. विश्रामगृहाची इमारत मात्र प्रकाशमान होती. रस्ता चुकल्यानं आम्हाला तिथं पोहोचयाला अर्धी मध्यरात्र उलटून गेलेली होती पण, मुख्याधिकार्‍यांसह आम्ही पाहुणे असल्यामुळे खानसामा चौकीदार वगैरे प्रतीक्षेत होते. रात्री दोनपर्यंत जागूनही वातारणाचा काहीच अंदाज येत नव्हता आणि इथं येण्यात चूक झाली की काय असचं एकूण किर्र वातावरण होतं. सकाळी उठल्यावर बेडरूममधूनच बारवी डॅम आणि परिसराचं जे काही दर्शन झालं ते डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. भर दुपारीही धरणाच्या कामावर येणार्‍या वाहनांशिवाय अन्य काही आवाज नव्हता; मोबाईलची रेंज नव्हती आणि साथीला नजर पोहोचेल तिथपर्यंत जंगल मनसोक्‍त पसरलेलं होतं. हिरव्या रंगाच्या इतक्या अगणित छटा अन्य कुठल्याही जंगलात यापूर्वी पाहायला मिळालेल्या नव्हत्या. एमआयडीसीचं विश्रामगृहही सौंदर्याची जाण ठेवून बांधलेलं. दोन दिवस तिथं अतिशय चवीष्ट खाण्या आणि पिण्यात कसे गेले ते कळलंच नाहीत.

२८-३० वर्षांपूर्वी घन ओथंबून आलेल्या एका ओल्यागच्च संध्याकाळी वेंगुर्ल्याच्या विश्रामगृहावर पोहोचलो. मिन्‍नतवारी करून जागा मिळवली. रात्रभर कधी मंद, कधी मध्यम तर कधी द्रुत गतीत पडणारा पाऊस आणि समुद्राची अंगावर कांटा गाज अनुभवत, तलत मेहमूदची जवळजवळ सर्व गाणी ऐकत आमचा ग्रुप जागत राहिला. त्या रात्री तलत जितका उमजला आणि मनात रुतला तेवढा कधीच नाही आणि तेवढाच आजही कायम आहे. सकाळी उठल्यावर बघितलं तर समुद्राच्या अगदी माथ्यावर हे विश्रामगृह होतं. जणू काही आपण समुद्रावरच राहत आहोत असं वाटत होतं. पाउस थांबलेला होता, रात्री बरसलेलं आभाळही लख्ख होतं; उगवतीची किरणं समोरचा समुद्र पूर्ण चंदेरी करून गेलेली होती. नंतर कधीतरी पुन्हा एकदा या विश्रामगृहावर यायचं असं पक्‍क ठरवलं पण, ते आजवर तरी प्रत्यक्षात उतरलेलं नाही.

मेळघाटात शिरण्याआधी परतवाडा नावाचं गाव लागतं. मेळघाटात जर मुक्‍काम करायचा असेल तर खाण्यापिण्याचा सर्व बंदोबस्त पूर्वी याच गावातून करून घ्यावा लागत असे. अलिकडच्या १५-२० वर्षात मात्र दिवस बरेच बदललेत. चिखलदर्‍यात राहण्याची खूप चांगली सोय झालेली आहे, सर्व सोयीही तिथे आहेत. हे दिवस यायचे असताना एकदा रात्री उशीरा परतवाड्याला पोहचलो. जाणकरांनी इतक्या उशिरा चिखलदर्‍याला न जाण्याचा सल्‍ला दिला आणि राहण्याच्या जागेसाठी शोध सुरु झाला आणो तो गावाच्या बाहेर दोन एक किलोमीटरवर सर्किटहाऊसपाशी संपला. सागाच्या वनात लपलेलं हे सर्किटहाऊस १९११ साली बांधलेलं आहे. ऐसपैस व्हरांडा, भल्या मोठ्या खोल्या आणि त्याला साजेशा प्रशस्त बाथरुम्स शिवाय उत्तम अशा सोयी तिथे होत्या. माणसापासून काहीसं फटकून राहणारं असं त्याचं दर्शन मनाला लुभावणारं होतं. जेवणही उत्तम. सकाळी उठल्यावर गावापासून दूरही नाही आणि जवळही नाही; अलिप्त असं असणारं हे सर्किटहाऊस आणि तिथला परिसर मनावर एक अमीट छाया उमटवून गेला, आजही ती छाया कायम आहे. पुढचे दोन दिवस मग सर्किटहाऊसच्या त्या परिसरात आम्ही कवितांसोबत घालवले.

बुलढाणा हे तसं विदर्भातलं थंड हवेचं ठिकाण म्हणायला हरकत नाही. संपूर्ण विदर्भ ४५-४६ डिग्री सेल्सियस उन्हात होरपळत असला तरी बुलढाण्यात मात्र तापमान ३७-३८ से. एवढंच असतं. बुलढाण्याला गेलं की नवीन सर्किट हाऊसमध्ये थांबण्याची सवय लागलेली होती. अशाच एका उन्हाळ्यात एका लेखकानं माझ्या नावावर असलेला स्यूट बळकावल्याने जुन्या सर्किट हाऊसकडे वळलो. तिथे जाण्याआधीच तिथला एअरकंडिशनर बंद आहे असं सांगण्यात आलं होतं पण, नाईलाज होता. स्यूट उघडला आणि एकदम मनातच भरला. भिंती चिरे आणि चुन्यांनी बांधलेल्या, १०-१२फूट उंचीचा दरवाजा आणि तशाच भव्य खिडक्या, २०-२२ फूट उंचीवर छत, हवा खेळती राहण्यासाठी छताखाली आयाताकृती खिडक्या; एअरकंडिशनर तर लांबच, पंखा चालू नसूनही एकदम गारवा अंगावर आला. शेतातल्या विहिरीशेजारी असलेल्या चिंचेखाली ऐन उन्हाळ्यात असतो तसा तो अस्सल गारवा होता. एकूणच त्या स्यूटला एक खानदानी अशी अदब होती. बेडरुम, सिटींगरुम आणि बाथरुमही प्रशस्तपणे पण, अस्ताव्यस्त पसरलेले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी चाफ्याच्या मंद अशा गंधाने जाग आली. दरवाजा उघडून बाहेर पडलो तर सर्किट हाऊसच्या पोर्चमध्ये चाफ्याच्या गंधानं कवेतच घेतलं…कोपर्‍यावरचं चाफ्याचं झाड मोठ्या ऐटीत गच्च फुललेलं होतं. मन एकदम प्रसन्न झालं. तेव्हापासून बुलढाण्याचा हा पुरातन स्यूट मनात वसला.

वेरुळहून अजिंठ्याला जायला एक लहान पण पक्‍का रस्ता आहे. औरंगजेबाची कबर असलेल्या आणि आता निद्रिस्त अवस्थेत असलेल्या मारूतीच्या मूर्तीमुळेही (भद्रा मारुती म्हणून हा ओळखला जातो.) चर्चेत असलेल्या खुलताबादला वळसा घालून हा रस्ता अजिंठ्याला जातो. याच रस्त्यावर १०-१२ किमी. वर डोंगराची रांग आहे. प्रत्येक डोंगर सुटा, ताटात सुटे-सुटे मोदक ठेवल्यासारखे हे ४/५ डोंगर आहेत. घाट चढून डोंगरावर पोहोचलं की विस्तीर्ण पठार नजरेला पडतं. जमिनीपासून हजार एक फूट उंचीवर हे पठार असावं. म्हैसमाळ नावानं हा परिसर ओळखला जातो. याच पठारावर सार्वजनिक बांधकाम खात्यासोबतच वन विभागाचंही विश्रामगृह आहे. संध्याकाळी सहा-साडेसहा नंतर वनखात्याच्या या विश्रामगृहाच्या पायथ्याशी कन्नडपर्यंतचा परिसर न्याहाळत सूर्यास्त बघावा आणि मग खानसाम्यानं बनविलेल्या लज्जतदार खाण्याचा आस्वाद घ्यावा. दम की बिर्याणी, दम आलू या इथल्या खास डिशेस. मात्र, जेवणाची ऑर्डर किमान चार तास आधी द्यावी लागते तरच जीभेवर पुढचे सात-आठ दिवस रेंगाळणार्‍या या लज्जतदार खाण्याचा आस्वाद मिळू शकतो. उन्हाळा असेल तर बियर आणि हिवाळा असेल तर व्हिस्कीसोबत जेवण तयार होईपर्यंत तीन-चार तास घालवावेत; मग सट्ट जेवावं. सकाळी चिमण्यांच्या चिवचिवाटातच जाग येते, समोर उठून बघावं तर नजर जाईल तिथपर्यंत शेतांचे वेगवेगळ्या रंगाचे हिरवे पट्टे पसरलेले दिसतात. मात्र, हे विश्रामगृह मिळण्यासाठी बराच क्यू असतो; वशिला लावूनही उपयोग होत नाही.

२० वर्षांपूर्वी, विदर्भातलं एक अतिशय देखणं विश्रामगृह इटियाडोहच्या अगदी काठावर होतं. होतं म्हणायचं एवढ्यासाठी की, नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्यापासून ते विश्रामगृह जवळजवळ बंदच झालं आहे. विश्रामगृहाची बांधणी तशी आधुनिक पध्दतीची असली तरी त्याला एक डौल आहे. इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यानं नुसती तर्जनी जरी लांब केली तरी या विश्रामगृहाला लागते. विश्रामगृहाच्या परिसरात गुलाबांच्या अगणित जातींच्या कलमांची लागवड केलेली आहे. तुम्ही मत्स्यप्रेमी असाल तर इथला खानसामा लगेच सिंचन प्रकल्पातूनच ताजे मासे आणून प्रेमाने खाऊ घालायचा. त्याच्या हातच्या साध्या वरणाची चवसुध्दा एखाद्या सुगरणीला लाजवणारी होती. एका चांगल्या पर्यटन स्थळाला नक्षलवाद्यांनी कायमचं बंद करून टाकल्यानं माझ्या पाहण्यातलं हे एकमेव उदाहरण. अजुनही इटियाडोहचं विश्रामगृह आणि तेथील स्वाद आठवला की मन ‘हळवं’ होतं.

औरंगाबादचं जुनं सुभेदारी विश्रामगृह निझामी थाटाचं आणि तेवढंच ऐश्‍वर्याचंही. एअरकंडिशनर वगैरे लावून आणि इलेक्ट्रीक वायरींग करून या खानदानी सौंदर्याला देण्यात आलेला आधुनिकतेचा टच ‘बुढी घोडी, लाल लगाम’ सारखा विजोड आणि मनाला सतत खटकत ठेवणारा आहे पण, मांसाहारी विविध पदार्थांची चव घेण्यासाठी या अशा बाबींकडे दुर्लक्ष करायला हवं. जर कुणी महत्त्वाचा किंवा अतिमहत्त्वाचा सरकारी/शासकीय पाहुणा नसेल आणि आपण एकटेच असू तर निझामकालीन प्लेट्स, चमचे-काटे, ग्लासेस अशा खास ‘अय्याशी’ जाम्यानिम्यात जेवणाची लज्जत चाखता येते. जेवणाआधी मद्याचा आस्वाद घ्यायचा असेल आणि खानसामा पुरेसा पटवला गेलेला असेल तर खास मद्य प्राशनासाठी वापरले जाणारे अगदी निझामकालीन चषकसुध्दा मिळू शकतात. अर्थात हे सगळं जुळून यायला तुम्ही खूपच भाग्यवान वगैरे असावं लागतं. हा संपूर्ण परिसर औरंगाबाद शहराच्या काहीसा माथ्यावर वसलेला आणि पाठीशी सलिमअली सरोवर तर कवेत हिमायत बाग असणारा आहे. ज्यांना मद्याचा आस्वाद घ्यायचा नाही त्यांनी सलिम अली सरोवराभोवती फिरून यावं आणि मागच्या व्हरांड्यात बसून रात्रीच्या प्रकाशात चकाकणार्‍या औरंगाबादचं रूप डोळ्यात साठवत जेवणाचा शांतपणे आस्वाद घ्यावा असा हा सगळं सुंदर नजरा असतो.

कोल्हापूर ते सावंतवाडी रस्त्यावर गडहिंग्लजच्या जंगलात सिंचन विभागाचं एक विश्रामगृह आहे. दाट वनराईत लपलेलं आहे. अविनाश गुप्ता, प्रकाश देशपांडेसह आम्ही एकदा गोव्याला जात असताना या विश्रामगृहाचा आसरा घेतला. अविनाशला कोणीतरी या विश्रामगृहाबद्दल सांगितलं होतं आणि ते शोधण्यात आम्ही या परिसरात अडीच -तीन तास फिरलो त्यामुळे रात्र झाली. हा शोध प्रचंड वैतागजनक होता. चौकीदाराला पटवण्यातही भरपूर वेळ गेला पण, तिथलं मद्योत्तर जेवण खास कोल्हापूरी थाटाचं आणि झणझणीत चवीचं होतं. ती झणझणीत चव या विश्रामगृहाचं नाव जरी काढलं तर अजूनही ‘व्याकूळ’ करते. ऐन रहदारीच्या रस्त्यावर असूनही इतक्या दाट झाडीत लपलेलं माझ्यातरी पाहण्यातलं हे एकमेव विश्रामगृह आणि बहुदा त्याच वैशिष्ट्यामुळे गेली अनेक वर्षे ते मनात रुतून बसलेलं असावं.

एक वेगळा आणि तोही सुरेल अनुभव जळगावला आला. पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमासाठी जळगावला जाण्याची संधी मिळाली. सोबत लेक होती. रात्री खूप उशीरा रेल्वेनं जळगावला पोहोचलो. आयोजकांनी आम्हाला झोपेतच विश्रामगृहात नेऊन सोडलं. आम्हीही लगेच झोपलो. सकाळी पावणे-सातच्या सुमारास जाग आली ती लांबून आलेल्या ‘आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले, घेऊन एकतारी गातो कबीर दोहे’ या अत्यंत सुरेल स्वरांनी. बाहेर आलो तर, थोडं लांब रस्त्यावरुन ते सूर येत होते. त्याकडे ओढलाच गेलो. वातावरण मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांचा धनी असलेला धुवट पांढरं धोतर-सदरा घातलेला, कपाळावर गंध कोरलेला एक माणूस हातात एक हार घेऊन गात जात होता. न कळत दोन्ही हात जोडून सुरेल स्वरांच्या त्या धन्याला नमस्कार केला; त्यानंही हात वर करून प्रतिसाद दिला आणि गान मग्नतेतून बाहेर न येता तो पुढे चालू लागला; हळूहळू तो माणूस, तो आवाज आणि त्यात मीही विरघळत गेलो…आजवर कोणतंही विश्रामगृह अशा सुरेलपणे मनात विसावलेलं नाहीये.

एकूणच विश्रामगृह ही एक जरा वेगळी संस्कृती आहे. बहुतेक विश्रामगृह आता गावात आलेली असली तरी ती गावाशी मात्र फटकूनच राहतात. विश्रामगृहाचा आनंद घ्यायचा झाला तर सर्व काही शांतपणे घ्यायची सवय करून घ्यावी लागते. साधा चहा जरी सांगितला तरी तातडीने मिळणार नाही अशी परिस्थिती पूर्वी होती आणि आजही आहे. गेल्या १५-२० वर्षांत मात्र विश्रामगृहांची ‘संस्कृती’ धोक्यात आलेली आहे. त्यातही विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहांची अवस्था देखभालीअभावी दिवसेंदिवस एखाद्या बकाल गावासारखी होत चाललेली आहे; कारण देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पैसाच राहिलेला नाही. त्यामुळे राज्यातली सार्वजनिक बांधकाम खात्याची बहुसंख्य विश्रामगृह व्यसनाधीन झालेल्या वैभवशाली माणसाला त्याचं वैभव सोडून जावं अशा अवस्थेत आलेली आहे. बहुसंख्य ठिकाणी तर सर्किटहाऊस वगळता विश्रामगृह ही गावातील टपोरी तसेच राजकारणात नव्यानेच काहीतरी सत्तेचं फळ प्राप्त झालेल्या नवश्रीमंतांची संध्याकाळची बसायची सोय म्हणूनच आता शिल्‍लक राहिलेली आहेत. जी काही विश्रामगृहं आजही अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींसाठी मेन्टेन केली गेलेली आहेत त्या विश्रामगृहांची अवस्था सुखसोयी म्हणून बरी आहे पण, दर्शन मात्र अगदी खरं सांगायचं तर बेंगरुळच झालेलं आहे. ७५-१०० वर्षांपूर्वीचा वास्तुशास्त्रीय आराखड्याचा उत्तम नमुना असलेल्या या इमारती वीज, ए.सी., बाथरुममधील अत्याधुनिक सोय करताना त्यांचं मूळ सौंदर्य हरवून बसलेल्या आहेत आणि त्याचं हे रुपडं अक्षरशः दयनीय झालेलं आहे. भर गर्दीत सर्वसामान्य माणूस जसा बिन चेहर्‍याचा असतो तसंच स्वरूप त्यांना प्राप्त झालेलं आहे.

(‘ग्रंथाली’चे मुखपत्र असलेल्या’शब्द रुची’या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख.​रेखाचित्र​ हेमंत मानमोडे, नागपूर)

संबंधित पोस्ट