गावाकडचा ‘हरवलेला’ गणपती…

औरंगाबाद जिल्ह्यातलं कन्नड तालुक्यातलं अंधानेर, वैजापूर तालुक्यातलं लोणी आणि खंडाळा, बीड जिल्ह्यातलं नेकनूर, पाटोदा, डोंगरकिन्ही, धोंडराई… यापैकी एकही आमचं मूळ गाव नव्हे पण, आईच्या (तिला आम्ही माई म्हणत असू) नोकरीच्या निमित्तानं या गावात (त्यातही अंधानेरला जास्त) आमचं वास्तव्य झालं. माई नर्स होती. त्या काळात ग्रामीण भागात वैद्यकसेवा दुर्लभ होती. नर्स म्हणजे देवदूत वाटत असे. तेव्हा नर्सला ‘डॉक्टर’ असंच संबोधलं जायचं. हायस्कूल ते कॉलेजचं दुसरं वर्ष असं दीर्घ वास्तव्य झाल्यानं अंधानेर या गावातच आपली पाळं-मुळं रुजली आहेत, असं अजूनही वाटतं. मी अंधानेर सोडल्यावरही माई नंतर, ७/८ वर्ष जास्त अंधानेरला राहिली. आमच्यापुरतं जरी गाव म्हणजे अंधानेर असं समीकरण झालेलं असलं तरी, गाव म्हणजे त्या काळात जगण्यात आलेली अनेक गावं असा व्यापक संदर्भ आहे.

सणावाराचे दिवस आले की या सर्व गावांचा गंध अजूनही मनात दरवळतो.

गणेशोत्सव आला की, संध्याकाळची आरती आणि धूप-उदबत्ती-कापराचा वास पिंगा घालतो. एखाद्या प्रौढ, ओल्या संध्याकाळी चुकून एकटा असलो की हा वास गारुड करतो आणि ओंजळ नकळत प्रसादासाठी पुढे होते. भजन कीर्तन ऐकू आलं की खंडाळा, अंधानेरची आठवण हमखास येतेच. एखाद्या तालुक्याच्या गावी मुक्कामाला असताना दूरवरून काकड आरती ऐकू आली तर गावच्या नदी किनारी असणा-या देऊळात मनाने लगेच पोहोचणं होतं. गावाशी असलेलं नातं उजळतं दिवस-महिने-वर्ष भराभरा मागे पडतात. जात-धर्म, विचारसरणी, आस्तिक-नास्तिक, श्रद्धा-अंधश्रध्दा अशा काही भूमिका निश्चित नसण्याच्या त्या वयात गाव मनात जे विस्तीर्ण पसरलं ते तस्सच पसरलेलं आहे अजून.

तीन मुलग्यांसह राहणारी विधवा माई पंचक्रोशीतल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यायची. रात्री-बेरात्री कोणाही सोबत अडलेल्या बाईची सुटका करायला माई जायची; इतकं विश्वासाचं वातावरण असण्याचे गावा-गावातले ते दिवस होते, एकोणीसशे साठ-सत्तरच्या दशकातले. घरातल्या नवीन आगमनाची, दुखण्या-खुपण्याची, सुख-दु:खाची, सणवारांची चर्चा सार्वजनिक असायची.

गणपतीची चाहूल महिना-दीडमहिना तरी आधी लागायची ती दवंडीवरून. कुंभार आळीत मूर्तीच्या कामाचा शुभारंभ होण्याची ती दवंडी असायची. अण्णासाहेब सरपंच आणि पाटीलही होते; भाऊसाहेब हे गावातले दुसरे महत्वाचे प्रस्थ. दोघेही तालेवार; या दोघांच्या उपस्थितीत पन्नास-शंभर जाणते आणि आम्ही पाच-पन्नास हुंदडणारी गावातली मुले, असे तिथे जमायचो. मूर्तिकार सखाराम कुंभाराच्या घराच्या ओसरीत मातीचा एक मोठ्ठा गोळा, उदबत्त्या-धुपाचा श्रावणातला ओलसर धूर, त्याचा सुवास आणि एक श्रीफळ ठेवलेलं असायचं.

अण्णासाहेब टिकासवर (कुदळ) श्रीफळ फोडायचे आणि ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गावाची शांतता भेदणारा गजर व्हायचा. (हा गजर ऐकू आला की तिथं हजर नसलेले लोक असतील तिथंच, दोन्ही हात जोडून करून नमस्कार करत!) भाऊसाहेब त्या मातीच्या गोळ्याची रीतसर पूजा करायचे आणि सखाराम त्या गोळ्यावर आकृती कोरायला सुरुवात करायचा, ‘गणपती बाप्पा मोरया’चा गावाची शांतता भेदणारा गजर पुन्हा व्हायचा. प्रसाद म्हणून खोब-याचा मोठा तुकडा त्यावर गुळाचा खडा ठेवून मिळायचा.

अशा वेळी अनेकदा पावसानेही हलकासा सूर लावलेला असायचा आणि पोरा-टोरांचा धिंगाणा मग जो सुरु व्हायचा तो कोणी वडीलधारा ओरडेपर्यंत सुरु राह्यचा, ओरडा झाला की आम्ही गप्प व्हायचो. ‘पोरं धिंगाणा करणार नाही तर काय गाढवं?’ असं त्यावर कोणी तरी म्हणत त्या शांततेचा भंग करायचा आणि आम्ही पोरं पुन्हा चेकाळायचो. गावात सार्वजनिक गणपती एकच आणि तोही चौकातल्या भाऊसाहेबांच्या घरातल्या व्हरांड्यातच बसे. व्हरांडा कसला अख्खं गाव बसू शकेल एवढा मोठा हॉलच तो.

भाऊसाहेब तेली तर अण्णा पाटील मराठा; गावाच्या राजकारणात ते दोघे स्वत:चे गट राखून होते पण, गणपतीतच काय किंवा एकदा ग्रामपंचायत, सोसायटी आणि अशा काही निवडणुका संपल्या की, ही जोडी गावावर माया पाखरत असे. जिल्हा परिषेदेचे सदस्यही असलेले अण्णासाहेब पूर्ण गणेशोत्सवात भाऊसाहेबांच्या व्हरांड्यात ठाण मांडून बसत, हवं-नको ते बघत.

आम्हा पोरांच्या आग्रहावरून पदरमोड करून अण्णांसाहेबांनीनी एकदा गावच्या गणेशोत्सवात ‘दो आंखे बारा हाथ’ दाखवला. गावातला तो पहिला सार्वजनिक सिनेमा. अख्खं गाव वेडं झालं सिनेमा पाह्यल्यावर. ‘दो आंखे..’चे पडसाद गावभर पुढे उमटत राहिले, अण्णासाहेब आम्हा पोरां-टोरासाठी हिरो ठरले.

गणेशोत्सवात पदरमोड हा शब्द चूक. अण्णासाहेब आणि भाऊसाहेब सांगतील ते साहित्य गणपतीसमोर येऊन पडायचं! गायी-गुरांचे आटोपून आणि घरच्या गणपतीची आरती आटोपून गाव भाऊसाहेबच्या वऱ्हांड्यात संध्याकाळच्या सार्वजनिक आरतीसाठी रात्री आठ-साडेआठला जमे.

एखादा पेट्रोमॅक्स पेटलेला असे आणि आरत्यांचा कल्ला सुरु होई.

एकदा का चोट (म्हणजे स्पर्धा) सुरु झाली तर आरत्यांचा हा कल्ला चांगला तासभरही रंगत असे. आरतीचे सकाळ-संध्याकाळचे मानकरी ठरलेले असत. तेच प्रसादाची सोय करत. प्रसादही आमची ओंजळ ओसंडेपर्यंत मिळे, आजच्या सारखा अर्धा किंवा पाव पेढा वगैरे हिशेबी वागणं नसे तेव्हा. वातावरणही खूपच मोकळं, जाती-धर्माच्या तटबंदी तर सोडाच किनार आणि किनाराही नसलेले वातावरण असायचे. ‘बामन गेला कुठे… घालायला? ए… भटाच्या पोरा, जा बापाला बोलाव पूजेसाठी’, किंवा ‘वाजवायसाठी काय मुहूर्त सांगायला पाह्यजे का मांगाला? जा रे धरून आण त्याला, पूजेची वेळ झाली’ किंवा कासाराला उद्देशून ‘ बांगड्या भरायसाठी कोणाचे हात धरून बसलाय गुणवंत एवढा वेळ? जारे, बोलावलंय म्हणून सांग त्याला’, असे होणारे जाहीर उद्देश कोणालाच जातीवाचक वाटत नसत, गहरी आत्मीयता व्यक्त करण्याचा तो उद्गार वाटत असे सर्वाना. हा आवाज वरच्या टिपेतला असला तरी त्यात ओतप्रोत भरलेला जिव्हाळा लपून राहत नसे.

+++

गणपतीत एक गाव जेवण असे. त्याचे तपशील मोठ्या पद्धतशीरपणे ठरत. आदल्या दिवशी ‘जेवणाचं ठरवू’ असं भाऊसाहेब किंवा अण्णासाहेब म्हणत, हे म्हणणं म्हणजे आज्ञाच असे. मग संध्याकाळची आरती संपली की पोरंही कल्ला न करता तिथे घुटमळत.

अण्णासाहेब आणि भाऊसाहेब कोणाच्या शेतात कोणती भाजी लावली आहे याची चौकशी करून कोणी कोणती भाजी, किती पाठवायची याचे थेट ‘आदेश’च देत. आदल्या वर्षी ज्यांच्या शेतात चांगला गहू पिकला त्याच्याकडे गव्हाची जबाबदारी सोपवली जाई. मारवाडी खुशालचंद शेठकडे किराणा मालाची जबाबदारी देताना अण्णासाहेब, ‘मारवाड्या गणपतीची सेवा नीट कर म्हणजे पीकपाणी चांगलं राहील आणि तुझी उधारीही वसूल होईल’, असा प्रेमळ दम हमखास देत. पीक निघाल्यावर वर्षातून एकदाच कापड-चोपड, किराणा मालाचे पैसे देण्याची प्रथा तेव्हा होती.

स्वत:च्या कानाच्या पाळीला स्पर्श करत, ‘जय श्रीराम’ म्हणत खुशालचंद शेठ तो आदेश स्वीकारत. स्वयंपाक कोण करेल, वाढप कोण करेल, मदत कोण करेल असे बारीक-सारीक तपशील ठरत. जे काही आणि जेवढं काही कमी पडणार असेल ते कोणताही गाजावाजा न होता, या कानाची खबर त्या कानाला न लागता, भाऊसाहेब आणि अण्णासाहेब यांच्या घरून पोहोचतं होत असे!

अनेकदा तर भाऊसाहेबांच्या व्हरांड्यातच आम्ही अनेक पोरं झोपी जात असू पण, कोणी हाकलत नसे, तशी रीतच नव्हती तेव्हा. मूल गावाचं आणि सूनही ‘गावाची इज्जत’ अशीच धारणा असायचा काळ होता तो.

+++

दोन दिवसांनी दुपारपासूनच आम्ही पोरं स्वयंपाकाच्या ठिकाणी मदतीच्या नावाखाली जमत असू.मिळेल ते, हाताला लागेल ते तोंडात टाकत असू. हे जरा अति झालं तर एखादा वयस्क रागावत असे पण, त्या रागावण्यात दम नसे. सर्वात महत्वाचा पदार्थ असे बुंदी! बुंदी पाडायला सुरुवात झाली की तो गोडसर, तुपाचा वास गावभर पसरे आणि तोपर्यंत इकडे न डोकावलेलं किंवा रुसून दूर बसलेले एखादं पोर त्या वासाने जेवणाच्या जागी ओढलं जाई.

+++

घरून ताट-वाटी घेवून प्रत्येकजण जेवायला येई.

पंगती उठत, रात्री उशिरापर्यंत मांडीला मांडी लावून गाव जेवण होई.

पुरुष आणि स्त्रियांच्या पंगती वेगळ्या बसत.

पुरुषांच्या पंगतीत पुरुष वाढपी असत तर स्त्रियांच्या पंगतीत स्त्रिया.

गाव जेवणाचा एक दिवस वगळता गणेशोत्सवात करमणुकीचे कार्यक्रम म्हणजे भजन, कीर्तन, गावातल्या मुलांनी बसवलेलं नाटक; यात पुरुषच स्त्री पार्टीचा रोल करत. नकला, गोंधळ अशी कार्यक्रमाची रेलचेल असे. गावातल्या गुणांची आरास गणेशोत्सवात मांडली जात असे; आजच्यासारखा प्रायोजकांचा सुळसुळाट, फ्लेक्सचा भडीमार, डीजेचा कलकलाट आणि पुढारी किंवा सेलिब्रिटी स्टारची गणपतीपेक्षा जास्त असणारी चलती कधीच नसे.

संपूर्ण गाव एकसंध, एकाच गावात वेगवेगळ्या घरात राहणारे या निमित्ताने एकत्र कुटुंब म्हणून समोर येत असत. त्या एकत्र येण्याला पावित्र्य असे, मांगल्य असे, त्यात उत्कट आणि अकृत्रिम जिव्हाळा असे. कटुता वैरभाव विसरून गेलेले असत. जाती धर्माचे रंग तर गावच्या क्षितिजावरही तरळताना दिसत नसत.

+++

नागपूर-मुंबईनंतर मध्यंतरी काही वर्ष औरंगाबादला होतो.लेकीला घेवून मुद्दाम गावात गेलो. तिला गाव दाखवलं, शेत दाखवलं. ‘शेत म्हणजे चिखलाचं ग्राउंड की!’ जन्मापासून शहरातच असलेली लेक म्हणाली. शहरी माणसं शेतीपासून कशी तुटताहेत याची ती चुणूक होती!

गावाला मी नव्यानं स्वत:ची ओळख करून दिली. स्वाभाविकच होतं ते कारण, मी २७/२८ वर्षांनी गेलो होतो. अनेकांशी बोललो, काहींना ओळख लागली, बहुतेकांना लागली नाही. गावात ४/५ चकरा मारल्या. लेक कंटाळली; कारमध्येच बसून व्हिडीओ गेम खेळण्यात रंगून गेली.

लक्षात आलं; आता गावात प्रत्येक समाजाचं वेगळं ‘समाज भवन’ झालंय. प्रत्येक जाती-धर्माच्या मंदिरांची संख्या वाढली आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फ्लेक्स आणि झेंडेही प्रत्येक गल्लीत दिसले. शाळेतला सोबती असलेला, आता रामराव झालेला, तेव्हाचा राम मानकर, विषण्णपणे म्हणाला, ‘आता प्रत्येक आळीत वेगळा गणपती बसतो. गणपतीच काय, प्रत्येक आळीचे देवही स्वतंत्र बसतात. तगडा पोलीस बंदोबस्त असतो…’ त्याला पुढे बोलणं होईना. तो गप्प झाला..त्याची तगमग कळून मग मीही…

+++

गावी जाण्याआधी कवीश्रेष्ठ ना.धों. महानोरांच्या पळसखेडला गेलो होतो. गावातला वाद खूपच वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून वातावरणाचा अदमास सरकारला देण्यासाठी गेलो होतो. अनेकांना भेटलो, अनेकांशी बोललो. छटाकभर पळसखेडला किलोभर पोलीस बंदोबस्त होता. महानोरांच्या चेहे-यावर खिन्नता होती. निरोप देताना डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत महानोर म्हणाले, ‘वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्यांमुळं आपली गावं पूर्वीसारखी एकजिनसी राहिली नाहीयेत. गाव तुटलं, माणसंही विभागली, एकमेकापासून दूर गेली. आता गावं आपलं वाटत नाही’. महानोर यांचे अश्रू म्हणजे तळघरात डांबून ठेवलेल्या वेदनांचं रुदन वाटलं, काहीच प्रतिक्रिया देता आली नाही. खरं तर त्यांच्या डोळ्यात अश्रू बघून भांबावूनच गेलो मी…

माझ्या कळत्या वयाशी नाळ जोडलं गेलेलं गाव त्या दिवशी सोडताना महानोरांच्या डोळ्याच्या कडा ओलावण्याचे गाव तुटण्याशी-माणसं दुरावण्याशी असलेले संदर्भ मला उत्कटतेनं कळलं, डोळ्यांच्या कडा ओलावल्या, आवाज जड झाला. तेव्हापासून आताचे गणेशोत्सव बघताना मला एकमेकापासून दूर गेलेली माणसं दिसतात. त्यामुळे खिन्न झालेल्या असंख्य चेहेऱ्यांची आकाशात झालेली गर्दी दिसते. साहजिकच आताचे गणेशोत्सव मला माझे वाटत नाहीत.

हा काही टाहो नाही, तक्रार नाही. गावानं हरवलेल्या संदर्भाचा तो मूक हुंकार आहे आणि आजच्या गणेशोत्सवाला दिलेला अव्यक्त नकार आहे.

हेच चित्र सर्व गावात आहे…गावं आणखी किती तुटणार आहेत? माणसं एकमेकापासून आणखी किती दुरावणार आहेत?

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या- www.praveenbardapurkar.com

 

मराठी पत्रकारितेतील ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापुरकर यांची मोबाईल   ई-बुक्स

भाष्य – भाग १ ते ८ 

‘डेलीहंट’ एप्लिकेशनवर लवकरच प्रकाशित होत आहेत. 
ई-प्रत मिळवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधा –

– pratik.puri@dailyhunt.in

संबंधित पोस्ट