लेट मी जॉईन द मेजॉरिटी….

“कोणाला हे मृत्युपूर्व डोहाळेसदृश्य रुपक वाटेल, कोणाला ती एक सांकेतिक कथा भासेल
तर कोणाला समकालाविषयी व्यक्त झालेली ती अस्वस्थता वाटेल.
नैराश्य डोकावतंय-नकारात्मकता आहे त्यात, असंही काहीना वाटू शकेल.
बहुसंख्यांना मात्र तो आपणच व्यक्त केलेला एक पारदर्शी संवेदनशील हुंकार आहे,
असं वाटेल, इतका सच्चेपणा त्यात आहे”

आपण एका विलक्षण शांत, अत्यंत ममत्वदायी शीतल पोकळीत प्रवेश केलेला असून आता कोणतीही वेदना आपल्याला जाणवत नाहीये अशी सुखद जाणीव त्याला झाली. अलिकडच्या काही दिवसात असा वेदनारहित सौख्य, समाधान शांतपणा त्याला लाभलेलाच नव्हता.

अंगभर गच्च भरून होता तो अति-अति ताप – हाय फिव्हर आणि कोणत्याही क्षणी डोक्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करणारा स्फोट होईल असं वाटणारी डोकंदुखी. प्रत्येक क्षणी असह्य ठसठसणारी वेदना गेल्या काही दिवसात त्याच्या कायम सोबतीला होती. त्या पार्श्वभूमीवर आताची स्थिती सुखदायी होती.

गारवा जरी बोचरा होता तरी वेदनारहित असण्याची उब जास्त असल्यानं मजेत शीळ घालत तो पुढे चालू लागला.
काही वेळातच त्याला कुणी तरी स्नेहार्द स्वरात विचारलं, ‘डू यू वॉन्ट टू जॉईन द मेजॉरीटी ?’
क्षणभर तो दचकला आणि ठामपणानं ‘नो. नॉट नाऊ ’ म्हणाला.

कारण, एक तर ‘टू जॉईन द मेजॉरिटी’ म्हणजे मरण, हे त्याला शालेय जीवनापासून ठाऊक होतं. वयोमानानुसार शब्द विसरले जातात, वापर न झाल्यानं अनेक शब्द विस्मृतीत जाणं ही एक अपरिहार्य प्रक्रिया असते. शब्दांचे अर्थ विसरण्याच्या शक्यतांच्या वयातच महेश एलकुंचवार यांचा ‘नेक्रोपोलीस’ हा लेख वाचनात आला आणि ‘टू जॉईन द मेजॉरिटी’ हा शब्द त्याच्या मनावर पुन्हा बळकट मांड ठोकून बसलेला असल्यानं त्याच्या विचारण्याचा नेमका अर्थ त्याला कळलेला होता.
‘मला वाटलंच’, तो आवाज पुढे म्हणाला, ‘वेळ झालीये म्हणून तू आलेलाच नाहीयेस तर चुकून इकडे आलायस’. हा आवाज, त्याच्या काहीसा परिचयाचा होता.

एकदा हार्टनं थोडी गडबड केली आणि एकदा एका अपघातात डॉक्टर्सची प्रचंड धावपळ सुरु होती तेव्हा, हा आवाज त्याच्या कानात गुणगुणला होता, ‘डॉक्टर्सना करु देत त्यांचे प्रयत्न. तुला काही न्यायला आलेलो नाहीयेत, आम्ही’.
आता, स्थळ-काळ-वेळेचं काहीही भान नसण्याच्या त्या स्थितीत त्याला ते फार गमतीचं वाटत होतं आणि त्यातही महत्वाचं म्हणजे तो आवाज आपल्या कोणी ध्यानस्थ, संत मित्राचा असल्यासारखं वाटत होतं.
मेंदूला खूप ताण दिल्यावरही त्याला, त्याचा ‘या श्रेणी’तला कोणी मित्र आठवेना; मग त्यानं तो मित्र शोधून काढण्याचा विचार सोडून दिला आणि आवाज फक्त कानात, मनात पुन्हा एकदा साठवून ठेवला.

‘माझं जर शेड्यूल नाहीये तर, जरा फिरव नं मित्रा इकडं’, त्यानं विनंती केली.

‘एक लक्षात ठेव मी मित्र नाही तुझा; मी आहे एका निसर्ग मोहिमेवरचा दूत’, हे जरबेच्या ठाम स्वरात स्पष्ट करुन तो पुढे म्हणाला, ‘ तू चुकून आलेला पाव्हणा आहेस इकडे म्हणून जुन्या ओळखीतून तुला एंटरटेन करतोय.

‘असो, वेळ कमी आहे. मी तुला केवळ दहा मिनिटं समोर नेईन आणि मग परत दहा मिनिटं मागे आणत इथेच सोडून देईन. एक आणि तेवढीच महत्वाची अट म्हणजे इथे तू कोणालाही दिसणार नाही आणि त्यामुळे अर्थातच तुला कोणाशीही बोलता येणार नाही’.

मग त्या आवाजानं सांगायला सुरुवात केली, ‘या प्रांताचं नाव ‘मेजॉरीटी’ आहे. म्हणजे या जगात मर्त्यांपेक्षा अमर्त्य प्रचंड जास्त संख्येने आहेत. त्या अमर्त्यांचा हा प्रांत आहे. प्रत्येक शतकाची एक टाऊनशीप आणि प्रत्येक टाऊनमध्ये एकच वस्ती. वस्ती निर्माण करताना देश,धर्म, पंथ, जात-ऊपजात, पोटजात, लिंग, वर्ण, आकार, सांपत्तिक स्थिती असा पृथ्वीवर असतो तसा कोणताही भेदभाव इथे सापडणार नाही. इथं भाषा, प्रांत, देश, अशा कोणत्याही सीमा नाहीत आणि सीमा नसल्यानं सैनिक नाहीत- सैनिक नाहीत म्हणून बंदुका नाहीत आणि बंदुका नाहीत म्हणून रक्तपातही नाही. राजकारण नाही कारण राजकीय पक्ष आणि राजकीय विचार नाही. त्यामुळं मतांचं आणि त्यातून येणाऱ्या गटातटांचं, वेगवेगळ्या रंगांचं, त्या वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्यांचं राजकारण नाही. माणूस आणि माणूस हाच इथला केंद्रबिंदू आहे. माणूस हाच इथला धर्म आहे आणि माणुसकी जात आहे. माणूस असणं हेच त्याचं नागरिकत्व आहे. सार्वत्रिक समानता आणि शांतता हा जगण्याचा आधार आहे इथला.’

‘यातला एक जरी गुण इथे येऊ इच्छीनाऱ्यात नसेल तर ?’ त्यानं शंका विचारली. पत्रकारच ना तो, प्रश्न तर विचाणारच.

‘तर मग त्याचा आत्मा सरळ नष्ट केला जातो’, दूतानं कठोर शांतपणे उत्तर दिलं.
त्याचीची नजर गेली तर चितळकर अण्णांसमोर मोहम्मद रफी, मायकल जाक्सन, किशोर कुमार. मन्ना डे यांचा सांगीतिक ‘गोंधळ’ तारस्वरात सुरु होता आणि डोळे मिटून अण्णा तो ऐकत होते.

त्यांच्याच बाजूच्या दालनात बालकवी ठोंबरे, बाकीबाब बोरकर, चि. त्र्यं. खानोलकर ( म्हणजे आपले आरती प्रभू हो ), ना. घ. देशपांडे, मा. म. देशपांडे,दया पवार, केशव मेश्राम, नारायण सुर्वे, निरंजन उजगरे, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, रॉय किणीकर, नामदेव ढसाळ, वामन निंबाळकर, न्यू जॉईननर नलेश पाटील यांची मैफिल रंगलेली होती. अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी समोरच्या मेजावर बोटांनी ताल धरलेला होता, राम शेवाळकर, निर्मलकुमार फडकुले, शिवाजीराव भोसले, श्रवनानंद घेत होते. हे छायाचित्र पहिल्या पानासाठी ‘फिट्ट’ होतं. त्यानं मोबाईलमधला कॅमेरा फोकस केला; लगेच त्या दुतानं खंबीरपणे ‘नाही’ असा इशारा केला.
नंतर लगेच लक्ष गेलं तर तिकडे प्रबोधनकार ठाकरे, भालाकार भोपटकर, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, रंगा वैद्य, ना. भि. परुळेकर, माधव गडकरी, गं. त्र्यं माडखोलकर, अनंत गोपाल शेवडे, अरुण टिकेकर आणि दुसरीकडे कोशकार केतकर, य. दि. फडके, भास्कर लक्ष्मण भोळे, रा. चिं. ढेरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नरेंद्र दाभोलकर अशा संपादक-विचारवंतांच्या बैठका रंगलेल्या होत्या. त्यांच्या सभोवताल सर्वत्र पुस्तकं इतस्तत: पहुडलेली होती.
त्याला संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या टाऊनशीपशीपमध्ये जाण्याची इच्छा झाली, त्यानं ते दुताला सांगितलंही. पण, तो फार लांबचा प्रवास आहे ‘, दुतांनं रुक्षपणाणं बजावलं.

पुढची आळी भारतीय राजकारण्यांची होती. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सुभाषचंद्र बोस, मोहम्मद अली जिना, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहेरु. लाल बहादूर शास्त्री, जगजीवनराम, गुलझारीलाल नंदा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ केशव बळीरामपंत हेडगेवार, राम मनोहर लोहिया, मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, पंजाबराव देशमुख, स्वातंत्रवीर विनायक दामोधर सावरकर, इंदिरा गांधी, राजीव गांधी, कर्पुरीप्रसाद ठाकूर, श्यामाप्रसाद मुखर्जी, एसेम जोशी, ग. प्र. प्रधान, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, ए. बी. बर्धन….अशा असंख्य नेत्याची मांदियाळी होती. उज्ज्वल भारत-समर्थ भारताची चर्चा सुरु होती. जेपीनी भ्रष्टाचार हा मुद्दा मांडला. भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय अशी कबुली राजीव गांधी यांनी मान खाली घालून दिली. सत्तेत आपल्यापैकी कोणीही येवो नोकरशाही कार्यक्षम नसेल तर काम होणार नाही आणि बदनामी आपल्याच वाटयाला येणार यावर सर्वांचं एकमत झालं. मात्र नोकरशाहीला वठणीवर आणणारा खमक्या नेता तसंच प्रशासकीय अधिकारी अद्याप पैदा न झाल्याचा उद्विग्नतेचा सूरही तिथे उमटला.
फतकल मारुन बसलेल्या बिनमेकअप मधल्या मधुबाला, मीना कुमारी, सुरैया, नूतन, बीना…. ओळखू येत नव्हत्या. पौगंडावस्थेत आभासी जगातल्या लाल्नांवर लुब्ध होणं किती कचकड्याचं असतं ही जाणवून देणारं ते दृश्य होतं. …तेव्हढ्यात हाताला हिसका बसला.

दूत म्हणाला, ‘चल! पटकन तुला सोडून येतो. माझी कामावर जायची वेळ झालीये’.
त्या थंड निर्वात पोकळीत प्रवेश करताना त्याची खात्री झाली, सर्वजण समान पातळीवर असण्याचं, केवळ माणूस हेच नागरिकत्व असण्याचं आपल्या स्वप्नपूर्तीचं, ते हेच ठिकाण आहे.

जाग आली तेव्हा त्याला जाणवलं; आपल्या शरीरातून खूप-खूप काही तरी शोषून घेतलेलं आहे… अतिशय मोठा शक्तिपात झालाय. स्वत:च्या बळावर उठून राहण्याचंही अंगात त्राण राहिलेलं नाहीये.

पत्नी; मंगला त्याला ऐकू न येईल अशा आवाजात काही तरी (बहुदा गजानन स्तोत्र) पुटपुटत त्याच्या चेहेऱ्यावरचा घाम पुसत आहे, त्याचे घामाने ओलेचिंब झालेले कपडे बदलण्यासाठी नर्सेसची गडबड सुरु आहे.

कोण जाणे किती वेळ तिथे बसून असलेला त्याचा यारदोस्त डॉ. मिलिंद म्हणाला, ‘कम ऑन यार, फायनली यू आर आऊट ऑफ डेंजर नाऊ!’
दुसरा दोस्तयार डॉ. प्रदीप मुळे थर्मामीटर झटकत निर्वाळा देत म्हणाला, ‘दोन तीन दिवस बॉडीएक सहन कर. मग पाहिजे तेवढं लिहायला, हवं ते वाचायला आणि बकबक करायला तू मोकळा आहेस!’

त्याला जाणवलं, सुमनांजली हॉस्पिटलच्या त्या खोलीत समाधानाचा भला मोठा सुस्कारा भरलेला आहे.
त्याला एकदम उदास वाटू लागलं.

राजकीय विचार बाजूला ठेऊन चांगल्याला चागलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याचं
स्वातंत्र्य नसणाऱ्या जगात राहण्याचा त्याचा इंटरेस्ट संपलेला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

स्फुंदत..स्फुंदत तो डॉक्टर मित्रांना म्हणाला, ‘थिस इज नॉट माय वर्ल्ड. लेट मी जॉईन द मेजॉरिटी, प्लीज डॉक्टर, प्लीज…’

(‘उद्याचा मराठवाडा’च्या २०१६च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख)

– प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
​9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com
वाचा – blog.praveenbardapurkar.com

To buy them download the Dailyhunt app from the google play store on your mobile. Select Marathi language.
search the books under – BHASYA or PRAVEEN BARDAPURKAR.

 

ई-प्रत मिळवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधा –

pratik.puri@dailyhunt.in

संबंधित पोस्ट