…पर्याय राहुल गांधीच !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त तसंच भाजप समर्थकांच्या पचनी पडणार नाही आणि काँग्रेसजनांना रुचणार नाही , तरी स्पष्टपणे सांगायलाच हवं- २०१४च्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीचा पराभव वगळता राहुल गांधी यांची कामगिरी चांगली…च राहिली आहे , असं माझं ठाम मत आहे . काँग्रेसच्या लोकसभेतील जागा ४४वरुन ५२वर पोहोचल्या म्हणजे कॉर्पोरेट भाषेत “राहुल गांधी यांचा केआरए ( key result area ) दर १८ टक्के आहे आणि तो पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे , xx पास हो गया” अशी राहुल गांधी यांची जी हेटाळणी भक्तांकडून समाज माध्यमांवरुन केली जात आहे , ती असुसंस्कृत आणि ती तशी करणारांची पातळी दर्शवून देणारी आहे .

मुळात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हा सामनाच विषम होता . एक तेल लावलेला ​,​जोशात असणारा जय्यत तयारीचा मल्ल तर दुसरा राजकारणाच्या आखाड्यात गेल्या पांच वर्षात जेमतेम तयार झालेला ; एक सत्ताधारी तर समोरचा विरोधी पक्षात ; एकाकडे विपुल साधन सामग्री आणि विजयाचा मोठ्ठा विश्वास तर दुसरीकडे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकात  मिळालेल्या विजयानं गाफीलपणा ठासून भरलेला . कांही नवख्यांची आणि मोठ्या प्रमाणात  बाजार बुणग्यांची फौज घेऊन राहुल गांधी एकटे लढत होते तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमित शहा , सुषमा स्वराज , नितीन गडकरी , राजनाथ सिंह अशी किमान ५०वर नेत्यांची आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची मोठी फौज होती . भाजपचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यांचा प्रचार आटोपून आणि अन्य राज्यात धाव घेत होते ; ( उदाहरणार्थ , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी  उत्तरप्रदेश , कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सभा ; खरं तर मराठी भाषकांच्या बैठका घेतल्या आणि भाजपचा प्रचार केला .) तर काँग्रेसचे नेते/मुख्यमंत्री मात्र त्यांच्या आप्तस्वकीयांच्या प्रचारात मग्न होते . वानगीदाखल उदाहरण द्यायचं तर मतदान आटोपल्यावर दोन तासातच अमित शहा , नितीन गडकरी , राजनाथ सिंह , सुषमा स्वराज असे भाजपचे ४०वर नेते अन्य राज्यात प्रचार सभा घेतांना दिसले ; इकडे राजीव सातव , अविनाश पांडे , ज्योतीरादित्य शिंदे , सचिन पायलट , रणदीप सुरजेवाला , रजनीताई पाटील​ ,​ प्रियंका गांधी-वड्रा अशा मोजक्या आणि तुलने​नं​ नवख्यांना हाताशी धरुन आणि अज्ञात समर्थकांच्या भरवशावर राहुल गांधी धावाधाव करत होते .

भाजपचे वेगवेगळे गट वेगवेगळ्या राज्यात काम करत होते आणि त्यांचं अत्यंत सूक्ष्म नियोजन होतं ; इकडे

प्रचाराच्या एका रोड शो मधे राहुल गांधी

अमेठीतून राहुल गांधी पराभवाला सामोरे जाणार आहेत याचा अंदाजच काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील कोअर टीमला नव्हता . काँग्रेसच्या नियोजनात तारतम्याचा अभाव कसा होता तो बघा- शरद पवार , सुशीलकुमार शिंदे यांना दिवसभरत जेवढे लोक भेटतात , जेमतेम तेवढे लोक ज्यांच्या सभेला जमतात अशा जनाधार नसलेले पण , सुशिक्षित , बुद्धीवंतात चांगली प्रतिमा असणार्‍या पृथ्वीराज चव्हाण , कुमार केतकर यांच्या सारख्यांना काँग्रेसनं त्या वर्गात बैठका घेण्याची जबाबदारी टाकायची सोडून ग्रामीण भागात सभा दिल्या ; केतकर यांनी फक्त ज्या गावांची नावं ऐकली असतील अशा उदगीर , शिरुर ताजबंद , उमरगा अशा गावात जाहीर सभा काँग्रेसनं लावल्या , असं हे गलथान नियोजन . तरी २०१४च्या निवडणुकीतला नवखेपणा आणि पक्षाच्या बुजुर्ग नेत्यांची साथ नसतांना ‘वेडात दौडले वीर सात’च्या चालीवर राहुल गांधी देशभर प्रचारासाठी फिरत राहिले . या काळात त्यांनी १४५ जाहीर सभा घेतल्या आणि किमान २० रोड शो केले . अहमद पटेल , दिग्विजय सिंह , कमलनाथ , चिदंबरम , मोतीलाल व्होरा , अशोक गहलोत , शीला दीक्षित , कपिल सिब्बल , मणीशंकर अय्यर , सलमान खुर्शिद , सुशीलकुमार शिंदे असे काँग्रेसचे एकापेक्षा एक दिग्गज (?) नेते कुठे होते , त्यांनी किती व कुठे प्रचार केला हा एक संशोधनाचा विषय आहे . पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाचा अपवाद एकमेव वगळता गांधी घराण्यातल्या अगदी कुणीही सत्ता मिळवून द्यावी आणि ती सुखनैव उपभोगावी ही बांडगुळी मानसिकता म्हणजे काँग्रेस असं समीकरण गेल्या सुमारे चार दशकात झालेलं आहे ; अशा आणि बहुसंख्य मतलबी ​तसंच​ खूषमस्कर्‍यांचा कळप म्हणजे काँग्रेस पक्षाचं विद्यमान स्वरुप असून या मतलब्यांनी काँग्रेसच्याच्या विचारावर श्रद्धा असणारा कार्यकर्ता पक्षातून कधीच हद्दपार केला आहे तर दुसरीकडे देशातील जनमनावर काँग्रेस आणि गांधी घराण्याची असणारी मोहिनी ​असं​ वास्तव आहे . आज अडचणीत असला तरी काँग्रेस पक्ष कधीच संपणार नाही हे चांगलं ओळखून असलेल्या या मतलबी काँग्रेसजनांना म्हणूनच राहुल गांधी हे नेता म्हणून हवे आहेत ;  अशी ही एकंदरीत काँग्रेस नावाची विद्यमान गुंतागुंत आहे . म्हणूनच  पक्षाध्यक्षपद/लोकसभेतील गटनेते आणि पर्यायानं लोकसभेतील विरोधीपक्षनेतेपदी असो वा नसो , या पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एक ‘गांधी’ हवा आहे आणि ती काँग्रेसची अपरिहार्य अगतिकताच आहे . म्हणूनच  राहुल गांधी यांना पर्याय कोण , या प्रश्नाचं उत्तर ‘राहुल गांधी’ , हेच आहे !

राहुल गांधी यांची कामगिरी तुलनेनं चांगली राहिली हे म्हणण्याचं आणखी कारण म्हणजे विरोधी पक्षांच्या महाआघाडीतील नेते आणि त्यांच्या ​पक्षांची​ पार निराशाजनक कामगिरी . ही विरोधी आघाडी सक्रियपणे अस्तित्वात आली नाही कारण त्या आघाडीचे कथित ​सू​त्रधार , ‘कन्या विजयी झाली नाही तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल’ फेम शरद पवार महाराष्ट्रात ( त्यातही बारामती आणि मावळ मतदार संघात ) अडकून पडले तरी त्यांची लोकसभेची एक जागा कमीच झाली . ‘थयथयाट’फेम ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालात तब्बल १८ जागा भाजपनं जिंकल्या , उत्तरप्रदेशात मायावती यांचा हत्ती पराभवाच्या चिखलात फसला तर अखिलेश यादव यांची सायकल पंक्चर झाली , विदूषकी चा​ळे​ करणारे ‘चारा घोटाळा’ फेम लालूप्रसाद यादव यांचा बिहारमधे धुव्वा उडाला , कर्नाटकात जनता दल युनायटेड या एका राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं , ‘मतदान यंत्र कांगावा​’​ फेम चंद्राबाबू नायडू आंध्रप्रदेशात साफ उताने पडले , गवगवा झालेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीला विजयाचा किरणही दिसला नाही आणि कम्युनिस्टांचा पार पालापाचोळा झाला…या सर्व थोर आणि अखिलेश वगळता पंतप्रधानपदाचं ( ती नावं दस्तुरखुद्द शरद पवार यांनी जाहीर केलेली असल्यानं शंकेला वावच नाही ! ) दिवास्वप्न पाहणार्‍या नेत्यांच्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षांच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी एका राज्यापुरते  मर्यादित राहिले नाहीत ; देशातील विरोधी पक्षात मीच एकमेव राष्ट्रीय नेता आहे ,  ही प्रतिमा या निवडणुकीत निर्माण करण्यात राहुल गांधी यांना यश आलं ; त्यांची कामगिरी किमान का होईना , देशभर चढती राहिली ; बोलण्यात कांही चुका झाल्या तरी एकमेव राहुल गांधी हेच नरेंद्र मोदी यांच्यासमोर जोशात उभे राहिले आणि यापुढेही उभे राहू शकतात हेच समोर आलेलं आहे . अपेक्षित विजय मिळाला नाही तरी लोकशाहीचा संकोच/अवमान होईल असं कोणतंही वक्तव्य न करता त्यांनी पराभव उमदेपणानं स्वीकारला .

राजकारणात निवडणुकांतील जय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात हे कोणी समजावून सांगण्याइतके राहुल गांधी आता कच्चे खिलाडी नाहीत . पराभवाची चाहूल त्यांना लागलेली नव्हती , असंही म्हणता येणार नाहीच ( पाचव्या फेरीच्या काळातच भाजपचा विजय असल्याचा ठाम संदेश फलोदी , आग्रा आणि सूरत सट्टा बाजारानं दिलेला होता . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंदाज भाजप २९८, मित्र पक्ष ४८, एकूण ३४६ असा असल्याचं संघातील एका सूत्रानं १२ मे रोजी पाठवलेल्या मेलमधे नमूद केलेलं होतं ! हे आंकडे अमेरिकेतील रवींद्र मराठे तसंच पत्रकार संजीव कुळकर्णी , श्रीकांत उमरीकर आणि डॉ. मिलिंद देशपांडे आशा कांही मोजक्या मित्रांशी मी शेअर केले होते )

काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी कामाला लागण्याचे मनसुबे राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहेत . २०२४च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर ३३३ जागा मिळवण्याच्या दृष्टीकोनातून( संदर्भ हिंदुस्तान टाईम्स या दैनिकाच्या २९ मे २०१९च्या अंकातील बातमी ) भाजपनं आखणी सुरु केलेली असतांना राहुल आणि काँग्रेस यांच्यासमोरील

मोठ्ठा प्रतिसाद मिळालेली तेलंगनातील राहुल गांधी यांची एका जाहीर सभा

आव्हानं मोठी आहेत . राहुल गांधी यांच्या सभांना देशभर मोठा प्रतिसाद ( त्यांच्या दक्षिणेतील एका सभेचं छायाचित्र सोबत दिले आहे ) मिळाला आहे ; राजकीय सभांना गर्दी ‘जमवावी’ लागते असा सरसकट युक्तीवाद कोणत्याही पक्षाच्या कुणाही नेत्याच्या बाबतीत खरा नसतो , असा गेल्या एक पत्रकार म्हणून चार दशकांचा माझा अनुभव आहे . ‘जमवलेली’ गर्दी जास्तीत जास्त ३० ते ४० टक्के असू शकते ; राज ठाकरे यांच्या सभेला तर १५/२० टक्केही लोक ‘आणलेले’ नसतात असं एका अत्यंत ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यांनं सांगितलं होतं . प्रतिसाद पाठिंब्यात बदलवण्यात राज ठाकरे अयशवी ठरले . देशभर मिळालेला प्रतिसाद पाठिंब्यात परावर्तीत करण्यासाठी राहुल गांधी यांनाही निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत . देशभरात काँग्रेसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील किमान १५०-२०० तरी तरुण गेले असावेत आणि पक्षानं दिलेल्या विविध जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या . अशा काहींच्या संपर्कात मी होतो . देशात नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल राहुल गांधी यांची क्रेझ आहे हे या तरुणांनीही सांगितलं ; त्या पार्श्वभूमीवर हा ‘प्रतिसाद ते पाठिंबा’ हा मुद्दा कळीचा आहे .

काँग्रेस पक्ष मागासवर्गीय आणि मुस्लिमांचे लांगुन-चालन करतो असे आरोप/दावे सातत्यानं करण्यात आलेले आहेत ; परिणामी हिंदू मोठ्या प्रमाणात काँग्रेसपासून दूर गेले ( आणि अखेर भाजपकडे वळले ) . इकडे प्रत्यक्षात आमच्यासाठी काँग्रेसनं केलं काय , असा सवाल उपस्थित करत हे समाजही म्हणजे मतदार काँग्रेसपासून दूर गेले . म्हणजे एकूण तीन जनाधार काँग्रेसपासून दुरावले . ते तिन्ही जनाधार पुन्हा काँग्रेससोबत जोडून घेणं हेही राहुल गांधी यांच्या समोरचं एक आव्हान आहे .

संघटनेची पुनर्बांधणी करणं आणि त्यासाठी खुर्च्या अडवून बसलेल्या मतलबी , खूषमस्कर्‍यांना कठोरपणे दूर करावं लागणार आहे . त्यासाठी ‘कामराज योजने’ची पुनरावृत्ती करायची वेळ आलेली आहे . राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयमवर उपाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताना कार्यकर्त्याला पुन्हा मानसन्मान , महत्व देण्याचा मनोदय व्यक्त केला होता ; त्यासाठी एक योजनाही जाहीर केली होती पण त्या योजनेला वर्षानुवर्षे सत्तेच्या खुर्च्या बळकावलेल्यांनी याच मतलबी आणि खूषमस्कर्‍यांनी  विरोध केला होता . अशा सर्वांना नारळ दिल्याशिवाय कार्यकर्त्याला प्रतिष्ठा मिळणार नाही आणि संघटनेची पाळंमुळं गाव-वाडी-तांड्यापर्यंत घट्ट होणार नाहीत .

चांगले सल्लागार निवडून मोजकं पण, नेमकं बोलण्याचं भान राहुल गांधी यांना बाळगावं लागणार आहे . निवडणूक आणि आधीच्या काळात राहुल गांधी यांची जीभ अनेकदा घसरली हे समोर आलं . एकीकडे द्वेष न बाळगता प्रेमाची भाषा करायची आणि दुसरीकडे न्यायालयानं न दिलेल्या निर्णयाचे हट्टीपणे हवाले देणं , पंतप्रधानांना चोर म्हणणं , नरेंद्र मोदी आणि भाजप फेकत असलेल्या आरोपांच्या जाळ्यात अलगद सापडणं…हा विरोधाभास आहे . त्यामुळे समोरच्याला हल्ला करण्याची संधी आपोआप मिळते .

गेल्या पांच वर्षात राहुल गांधी हे आश्वासक नेते म्हणून समोर आलेले आहेत . काँग्रेसचं निवडणुकीच्या खडकावर आपटून भरकटलेलं काँग्रेसचं जहाज राजकारणाच्या सागरात पुन्हा आपणच डौलानं हांकू शकतो अशी खात्री राहुल गांधी यांनी दिलेली आहे , याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही . सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी संसदीय लोकशाहीत प्रआणि प्रभावी बळ विरोधी पक्ष हवाच असतो . काँग्रेसला तसा प्रभावी , प्रबळ पक्ष म्हणून उभा करण्यासाठी राहुल गांधी यांना शुभेच्छा .

अधिक माहितीसाठी वाचा-

राहुल समोरील आव्हाने  लिंक- bit.ly/2IchzL4

राहुल गांधी आणि बिलंदर काँग्रेसजन ! लिंक-  ​bit.ly/2G12Jp2

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  ​+91982205579

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट