सेलफोन नसतांचे रंगकल्लोळ !

 

 

नोंद …१६

 ( मजकुरातील रंगचित्रे आदिती जोगळेकर-हर्डीकर यांची आहेत )

ठवण तशी बरीच जुनी आहे पण , विद्यमान ‘गॅजेट’मय काळात सांगायला हवीच .

हलकासाच धक्का देऊन रेल्वे हलली आणि त्याचवेळी सेलफोनने जीव जात असल्याचा टाहो ‘बीप’ असा आवाज करुन फोडला . रात्री चुकून सेलफोन चार्ज करायचा   राहिला , त्याची ‘आऊट ऑफ रिच’ राहण्याची शिक्षा  भोगावी लागणार होतीच . पटपट  तीन-चार कॉल केले आणि सेल फोन एकदाचा बंद पडला . एव्हाना रेल्वेने वेगही चांगला पकडला होता .

खुर्च्यांची बोगी असल्याने कंपार्टमेन्टसचा अडथळा नव्हता , सलग संपूर्ण डबा नजरेत  मावला . डबा पूर्ण भरलेला नव्हता तरीही , बऱ्यापैकी म्हणता येईल अशा गर्दी होती .   डब्याच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत चक्कर मारली . जी  काही गर्दी होती तिला महाराष्ट्र व आंध्रचा संमिश्र गंध होता . तेलगू मुळीच कळत नव्हतं मात्र मराठीला मुंबई , नाशिक आणि मराठवाडा असे वेगळे गंध होते . आपापल्या मातीचा लहेजा कायम ठेवून प्रवासी एकतर  आप-आपसांत किंवा सेलफोनवर बोलत होते . खरे तर सेलफोनवर बोलणाऱ्यांचीच संख्या जास्त होती . कोणकोणत्या नात्यातून बोलतोय याचा अंदाज कानावर आदळणार्‍या वाक्यातून सहज येत होता . बाप-लेक , माय-लेक , नवरा-बायको , मित्र-मैत्रीण , बॉस वगैरे नाती स्पष्ट होत होती . ‘दस लिया था , चार कल्ली बेचा , उस्सीमे दो छुटा ‘ या कानावर पडलेल्या वाक्यातून  व्यापारी नाते कळले . शेजारी तर ब्रेकफास्ट करता करताही सारख्या सूचना देत होता .  बहुधा कार्पोरेट सेक्टरमधल्या एखाद्या बँकेत टीम लिडर असावा . क्लायंटला कसं पटवायला हवं . त्याच्या गळ्यात कर्ज कसं मारायलाच हवं, हे समजावून सांगत होता . कर्ज देणाऱ्याची अपरिहार्य निकड त्यातून स्पष्टपणे जाणवत होती . घेणाऱ्याची गरज कळत नव्हती . एकूणच तो सगळा संवाद इंटरेस्टिंग होता , मार्केटिंगचा फंडा उलगडवणारा होता . बोलणारे सगळेच त्यांच्या तंद्रीत होते , इनकमिंग किंवा आऊटगोईंग तरी कॉलवर . त्यांना प्रवासाचं भान नव्हतं . किंबहुना प्रवास सुरू असल्याचं त्यांच्या देहबोलीतून जाणवतही नव्हतं . सेलफोननं केवढी सोय , किती जणांची , कशी कशी केली हे जाणवलं . सेलफोन ‘डेड‘ झालेल्या माझ्यासारख्याला त्यांच्या तंद्रीत कोणतंही स्थान नव्हतं . एक विलक्षण असं रिकामपण अंगावर धावून आलं .

रेल्वे लयीत आणि गतीत धावत होती . त्या लय आणि गतीचा एक भाग झालो . त्यावर सैल सोडून दिलेलं शरीर झुलू लागलं तेव्हा बरं वाटलं . खूप दिवसांनी रेल्वेचा प्रवास करण्याची  संधी लाभली होती आणि असं झुलणं तर खूपच वर्षांनी होत होतं . लहानपणी , तरुणपणी  रेल्वेचा प्रवास जनरल बोगीत खिडकीजवळच्या जागेवर येन-केन प्रकारे कसा मिळवता येईल त्या प्रयत्नाने व्हायचा .  रिझर्व्हेशन करुन प्रवास करण्याचे दिवस नोकरीत स्थिरावल्यावर आणि घाम न गाळता प्रवास करण्याचे दिवस अलीकडच्या दीडदोन दशकातले . त्यामुळे खिडकीतून पळणारं जग अनुभवण्याची गंमत आठवली . खिडकीबाहेर  नजर टाकली . काय आश्चर्य , एसी बोगी असूनही  काचेला फिल्म  नव्हती .  म्हणजे ती एकेकाळी असावी मात्र , आता खिडकीची काच आणि डोळे यात त्या फिल्मचा  पडदा नव्हता . पावसाचे दिवस असल्याने काचाही स्वच्छ पुसल्यासारख्या होत्या .

गाडी कसारा घाटात पोहोचली होती . ऋतूरंग अंगावरच कोसळला त्या खिडकीतून . हिरव्यारंगाचे अनेक विभ्रम होते ते . हटखोर हिरवा , समंजस हिरवा , नवखा आणि जुना जाणता हिरवा , फिकट आणि गर्द हिरवा , बावरा आणि धीट हिरवा , कोवळा आणि जरठ हिरवा , लाजरा आणि धीट हिरवा , तरुण आणि वृद्ध हिरवा , पिवळट पडलेला हिरवा , लोभस आणिउग्र हिरवा , उद्धट आणि नम्र हिरवा , हिरवाकंच आत्ममग्न हिरवा , हजारो-लाख्खो झाडं , महावृक्ष , लता , वेली आणि कवेत न येणारे  ते रंग संदर्भ प्रवासातला एकटेपण आणि अनोळखीपण बाजूला सारणारे ते केवळ हिरव्याच नाही तर असंख्य रंगांचे ते कल्लोळ ओळखीचे आणि ते  जगण्याच्या अखंड धावपळीत विस्मरणात गेले होते असं लक्षात आलं  . ते रंगकल्लोळ ती जुनी ओळख सांगू लागले . कांही तरी हरवलेलं गवसल्याची भावना तरुण झाली…

त्या हिरवाईत लपलेल्या करवंदांचीही ओळख पटल्यासारखं उगाच वाटलं आणि मन शाळेतून परततांनाच्या करवंदांच्या जाळीत गेलं . हात-पायच नाही तर अनेकदा चेहरा ओरबाडला गेला तरी करवंद खाण्याची भूक कशी भागत   नसे ते आठवलं . इतकं सख्खेपणी आठवलं की , करवंदाची तुरट – गोड चव जिभेवर  इतस्तत: पसरली . त्यातच पावसाची सर आली , खिडकीच्या सीलबंद काचेवरुन पाण्याचे नव्हे तर ते रंगकल्लोळ ओघळू लागले . ते  अंगभर पसरले आणि त्या स्पर्शाचं एक अवीट जाणीवेचं ऊबदार तेज अंगभर पसरलं  . एका विलक्षण अनुभूतीचा प्रत्यय तो होता . त्यात आत्मभानच हरवलं . रेल्वेचं पळत राहाणं , एकेक स्टेशन मागे पडत राहणं दुय्यम झालं . मागे पडणाऱ्या स्टेशनची नोंद होत राहिली , होतच राहिली फक्त , कारण त्यात जाणीव अशी ती काही नव्हतीच .

असंच मनमाड स्टेशन मागे पडलं . मराठवाड्यातली ओळखीची माती दिसली आणि –

खुणा गावाच्या दिसू लागल्या स्पष्ट मला लोचनी

उडे किती खळखळ हृदयातूनी

ही चवथी इयत्तेतील कविता आठवली ; गावच्या मातीचा गंधही जाणवला . महत्त्वाचं म्हणजे बाभळी  ( Acacia ) दिसल्या . मराठवाड्याच्या कोणत्याही भागात केव्हाही जा , बाभळी अंगावरचे काटे टरटरुन पिंजारवत उर्मटपणे उभ्या असतात . ) जमीन गावातली आहे की शेतातली , जिरायती आहे का बागायती , बंगल्यासाठी आहे की फ्लॅटसाठी याचा कोणताही विचार न करता , विवेक न बाळगता बाभूळ वाढते आणि वाढता – वाढताही माणसाकडे आपले करडे डोळे रोखून पाहत राहते . अशा मस्तवाल बाभळींची तटबंदी आहे , काय बिशाद आहे जित्राब – जनावर आडमार्गांनी  शिरायची ? ( अधूनमधून वेडी बाभुळही दिसत असे ; तिला वेडं का म्हणतात हे मला कधीच कळलं नाही ! ) गावात शिरण्याआधीच त्या जित्राबाला रक्तबंबाळ करण्याची हिंमत बाभळीच्या हिंस्त्र काट्यांजवळ असते . जित्राबाचं सोडा , आजवर न समजलेल्या निसर्गाच्या नियमांपैकी एखादा जरी मानवाकडून मोडला तर दंश करायला बाभूळ तयारच असायची तेव्हा .  धर्म – जात – रंग – लिंग असा कोणताही भेद न बाळगता बाभळींनी कठोरपणे अनेकांना शिक्षा केलेली आहे .

‘आपण काही तरी वंगाळ वागल्याबिना काटा पायात घुसणारच नाय‘, असं आपल्या  पायातला काटा गुळाचा चटका देऊन हलक्या हातानी काढून देता देता जाणते सांगत , ते आठवलं . त्याच तंद्रीत मोजे काढून तळपाय बघितले , बाभळीच्या दंशाच्या खुणा आता  तळव्यावर नाहीत .  आता बाभूळ शहरात दिसत नाही . कुठल्या तरी खेड्यात दिसते पण , तिचे काटे रुतत नाहीत . कसे रुतणार ? आपण आता सर्रास बूट वापरतो , वहाणा नाही ,  बाभळीच्या काट्यांचा वचक म्हणून कमी झालाय आणि म्हणूनच ऋतूचक्र बदलायला लागलंय ग्लोबल वॉर्मिंग हेच अशा बाभळींचा वचक कमी होण्याचं दुसरं नाव असावं का ? पावसानं उशीरा हजेरी लावली तरी बाभळींना त्याची फिकीर नव्हती . पावसानं आलेला  हिरवेपणा उर्मटपणे लेवून बाभळी उभ्या होत्या . रेल्वेकडे नजरा रोखून पाहात होत्या .

औरंगाबाद आलं . रेल्वेतून उतरुन बाहेरच्या कलकलाटात आलो आणि जे अनुभवलं त्याचा सुखद स्पर्श पुन्हा एकदा  झाला . सेलफोन असता तर हे अनुभवता आलं नसतं हे पटलं आणि सेलफोन ‘चार्ज्ड’ नसल्याच्या रंगकल्लोळाची एक शिरशिरी देहावर पसरली !

-तेव्हापासून चित्र बघणं , गाणं ऐकणं , वाचन , जेवण आणि मंतरलेल्या सोनेरी पाण्यासोबतच्या मैफिलीत रंगताना सेलफोनची संगत कटाक्षाने टाळायला शिकलो आहे .

( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत  )

प्रवीण बर्दापूरकर

( २ नोव्हेंबर २०२० )

Cellphone  +919822055799 / www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

 

‘ग्रेस नावाचं गारुड’ची नवी सुधारित आवृत्ती आता देशमुख आणि कंपनी या पुण्याच्या नामवंत प्रकाशनतर्फे  प्रकाशित झाली आहे .
प्रतिभावान चित्रकार/छायाचित्रकार विवेक रानडे याने सुधारित आवृत्तीचेही नवे मुखपृष्ठ तयार केलेलं आहे ; त्यासाठी त्याच्या खजिन्यातून एका दुर्मीळ आणि आजवर अप्रकाशित छायाचित्राची निवड करण्यात आलेली आहे .

‘ग्रेस नावाचं गारुड’च्या प्रतीसाठी देशमुख  आणि  कंपनीशी  संपर्क साधावा . deshmukhcompany@gmail.com
दूरध्वनी क्रमांक- ०२० २४४७६८४१ / २४४७८४२८
-प्रब

संबंधित पोस्ट