जिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…

‘पंत मेले आणि राव चढले’ असं सरळधोपटपणे राजकारणात कधीच होत नसतंम्हणूनच त्याला राजकारण म्हणतात. राजकारणात ‘दोन अधिक दोन’ ही बेरीज पूर्णपणे राजकारणाची तत्कालीन गरज म्हणून तसेच व्यक्तीसापेक्ष असते, तो हिशेब साडेतीन होऊ शकतो, चार होऊ शकतो, साडेचार होऊ शकतो… काहीही होऊ शकतो. म्हणूनच राजकारणात पंताला मरू द्यायचे नसते त्याचे केवळ पंख कापायचे असतात आणि जुने हिशेब चुकते करायचे असतात. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह सध्या पंख कापले गेल्याच्या अवस्थेतून जात आहेत आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे त्यांचे एके काळचे जुने हिशेब चुकते करत आहेत.

३ जानेवारी १९३८ ला राजस्थानच्या एका राजघराण्यात जन्मलेल्या जसवंतसिंह, उच्च शिक्षणानंतर तेव्हाच्या दरबारी अलिखित प्रथेप्रमाणे सैन्यात अल्पकाल सेवा बजावून परत आले. राजकारणातला त्यांचा ओढा लक्षात घेऊन आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधले धुरंधर नेते भैरोसिंह शेखावत यांना जसवंतसिंह राजकारणात आणले. मुळात राजघराण्यातील असल्याने जसवंतसिंह यांचे वागणे आणि शालीन तसेच सुखासीनही त्यातच नंतर सैन्यात राहिल्याने जगण्याला शिस्त आलेली. त्यामुळे जसवंतसिंह यांच्या जीवन शैली तसेच सवयीविषयी पक्षात कायम एकाचवेळी असुयापूर्ण आणि नवलाईचीही चर्चा असायची, आजही असते. उच्च शिक्षण आणि वावर परदेशात राहिल्याने जसवंतसिंह झापडबंद नव्हतेच. त्यांचा कल व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही कायम सुधारणावादी राहिला. शेखावत यांच्यामुळेच जसवंतसिंह १९८०साली राज्यसभेवर निवडून गेले. पक्ष आणि सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचा वावर सुरु झाला. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांना पक्षाचा प्रवक्ता म्हणून जसा ‘एलिट’ चेहेरा पाहिजे होता तो, जसवंतसिंह यांच्यामुळे मिळाला. पक्षाच्या ‘श्रेष्ठी’ गोटात सहज आणि फारच लवकर त्यांचा समावेश झाला. (आता, लोकसभा निवडणुकीत हवा तो मतदार संघ न मिळाल्याने पक्ष सोडल्यावर भारतीय जनता पक्ष संकुचित दृष्टीचा पक्ष आहे ! अशी टीका करणा-या ) जसवंतसिंह यांच्या वाट्याला केंद्रात अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर परराष्ट्र, अर्थ, सरंक्षण यासारखी महत्वाची खाती आली. केंद्रीय मंत्री म्हणून काम करतानाही त्यांचा सुधारणावादी आणि खुला दृष्टीकोन पाह्यला मिळाला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात घडलेल्या कंदहार विमान अपहरण घटनेत निरपराध प्रवाश्यांचे प्राण वाचावे यासाठी राजकीय विरोध मोडून काढत अतिरेक्यांना सोडण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ते स्वत: अतिरेक्याना घेऊन कंदहारला गेले आणि अपहरण झालेल्या प्रवाश्यांना घेऊन आले . अमेरिकेशी बिघडलेले संबध पुन्हा सुरळीत करण्यात जसवंतसिंह यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून बजावलेली भूमिका त्या काळात वाखाणली गेली. म्हणूनच केंद्रातून सत्ता गेली तरी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेतेपद पक्षाने त्यांच्याकडे सन्मानाने दिले.

२०२२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता गेलेली असली तरी त्यांच्या स्वत:च्या राज्यात म्हणजे राजस्थानात मात्र भारतीय जनता पक्ष सत्तेत होता , वसुंधरा राजे मुख्यमंत्री होत्या. त्या प्रमोद महाजन गटाच्या समजल्या जात. जसवंतसिंह आणि प्रमोद महाजन यांच्यात तर विस्तव जात नसे. त्यातच राजे आणि जसवंतसिंह दोघेही राजघराण्यातील त्यामुळे दोघांनाही केवळनेतृत्व करण्याचीच सवय . राज्यात मात्र स्वाभाविकपणे वसुंधरा राजे नेत्या. साहजिकच जसवंतसिंह यांनी वसुंधरा राजे याना विरोध सुरु केला. प्रमोद महाजन हयात होते तोपर्यंत वसुंधरा राजे यांचे राजकीय पंख कापणे जसवंतसिंह यांना काही जमले नाही . प्रमोद महाजन यांची हत्या झाली. जसवंतसिंह यांचा प्रभाव वाढला. दरम्यान झालेल्या विधान सभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. वसुंधरा राजे विरोधी पक्ष नेत्या झाल्या. जसवंतसिंह यांचा राजकीय जाच कमी झाला नाही.. उलट तो आणखी वाढलाच ! वसुंधरा राजे यांचे विधानसभेतले विरोधी पक्ष नेतेपद काढून घेण्याचा निर्णय श्रेष्ठींनी घेण्यापर्यंत वेळ जसवंतसिंह गटाने आणली . वसुंधरा राजे बंड करण्याची चिन्हे दिसू लागली आणि नेमक्या याच काळात पक्षातले वातावरण बदलण्यास सुरुवात झाली.

जसवंतसिंह यांनी त्यांच्या ‘जीना: इंडिया पार्टिशन इंडिपेंडन्स’ या पुस्तकात मोहोम्म्द अली जिना यांच्या कौतुकाचे शब्द लिहिले. ते इथे थांबले नाहीत तर त्यांनी पुढे जाऊन , भारताच्या फाळणीला बँरिस्टर मोहोम्म्द अली जिना नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहेरू जबाबदार असल्याचे प्रतिपादन केले. हे तर आगीत तेल ओतल्यासारखे होते आणि घडले तसेच… राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खवळला. हे अपरिहार्यच होते कारण स्वयंसेवकाने मुस्लीम युवतीशी विवाह केला ( किंवा उलट घडले ) तर एक वेळ प्रेम म्हणून ते क्षम्य पण , जिना यांची स्तुती मात्र शक्य नाही… कदापीही शक्य नाही. त्यातच लालकृष्ण अडवानी यांच्यापाठोपाठ जिना स्तुतीची ही कृती जसवंतसिंहकडून घडलेली होती. जिना यांची स्तुती केल्याबद्दल संघाने अडवानी यांचे लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपद काढून घेण्याची कडक शिक्षा ठोठावल्यावरही जिना स्तुतीची गुस्ताखी जसवंतसिंह यांनी केलेली होती . परिणामी अपेक्षित तेच घडले, १९ ऑगस्ट २००९ला जसवंतसिंह यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी झाली.

आता वेळ वसुंधरा राजे यांची आलेली होती. दरम्यान नितीन गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले . वसुंधरा राजे नावाची शक्ती पक्षातून गमावली तर राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा येणे कठीण आहे आहे ओळखून पक्ष श्रेष्ठींनी समजूत काढून वसुंधरा राजे यांना बळ दिले . पक्षाच्या राज्य शाखेतले मतभेद मिटवून ‘समज’ देऊन जसवंतसिंह यांनाही पुन्हा पक्षात प्रवेश दिला . राजस्थानात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अभूतपूर्व यश संपादन केले. जसवंतसिंह या निवडणुकीपासून असे लांब राहिले की जणू त्यांचा निवडणुकीशी काहीच संबध नव्हता . हेही एकवेळ क्षम्य ठरले असते पण पक्षाच्या विजयात त्यांचा काहीही हातभार लागला नाही उलट त्यांनी विरोधी पक्षांला मदत केल्याच्या घटना समोर आल्या ! मग जुने हिशेब चुकते करण्याची वेळ पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या वसुंधरा राजे यांची होती आणि त्यांनी बरोब्बर साधलीही. जसवंतसिंह यांना हवा तो लोकसभा मतदार संघ मिळू न देण्यात वसुंधरा राजे यशस्वी ठरल्या. राजकीय बदल्याचे एक चक्र असे पूर्ण झाले !! जसवंतसिंह यांनी बंडखोरी केली आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. अपक्ष म्हणून अर्ज दाखल करताना जसवंतसिंह यांनी एखादा दुखावलेला राजकारणी करतो तशी भाजपवर तुफानी टीका केली आहे . राजकीय हितसंबध दुखावल्यावर राजकारण्याचे पाय मातीचेच असतात, त्याला वस्तुस्थितीचे भान राहत नाही हे जसवंतसिंह यांच्या टीकेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

राजकारणात कोणामुळे कोणाची तरी सरशी आणि कोणामुळे कोणाची तरी माघार ही

अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. त्यालाच राजकारण म्हणतात. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आकड्याच्या खेळात भारतीय जनता पक्ष कमी पडला आणि नेमके जर जसवंतसिंह लोकसभा निवडणूक जिंकलेले असले तर पुन्हा त्यांना सुगीचे दिवस येतील यात शंकाच नाही. त्यालाच ‘राजकारण ऐसे म्हणतात’ याची पुन्हा एकदा प्रचीती भारतीयांना आलेली असेल !

-प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट