चाळीशी रंगभानाची !

गेल्या ३५/३६ वर्षात बसोलीच्या या वर्षीच्या शिबिरात सर्वार्थाने प्रथमच माझा कोणताही सहभाग नसेल. १९८० ते २०१५ या काळात देशात (किंवा काही वेळा परदेशातही) असलो तरी बसोलीच्या शिबिरात आवर्जून एक दिवस तरी सहभागी होऊन किमान चार-सहा तास घालवणे मला मनापासून आवडत असे; खरं तर अजूनही आवडेल. मधली काही वर्ष पत्रकारितेच्या निमित्ताने औरंगाबादला होतो तेव्हाही एकदा खामगाव आणि नंतर नागपूरला झालेल्या शिबिरात हजेरी लावली होतीच. एकूण काय तर बसोलीचे होणारे वार्षिक शिबीर ही एक वार्षिक सवय झालेली होती.

1525134_732891956723441_1550704182_n

बसोलीच्या यंदाच्या वर्षीची सृजनशीलतेची संकल्पना ‘रंग नात्याचे, रंग पोताचे’ही आहे; त्या पार्श्वभूमीवर बसोलीशी माझं नातं काय? या प्रश्नाचं उत्तर ‘खूप काही’आणि तरी ‘काहीच नाही’ असं द्वयर्थी देता येईल. रूढार्थाने मी काही बसोलीचा कलावंत नाही; तेथे राबणारा कार्यकर्ताही नाही आणि आयोजकांपैकी एक किंवा मार्गदर्शक वगैरे तर मुळीच नाही तरीही; तरी माझं एक घनिष्ठ नातं बसोलीशी आहे, अशी ही गुंतागुंत आहे. म्हणजे बसोलीच्या अनेक शिबीर/कार्यक्रमात माझा सहभाग प्रमुख पाहुणा, नियोजित न आल्याने ऐनवेळचा पाहुणा, वक्ता ते सतरंजी उचलणारा कार्यकर्ता असा आहे. बसोलीच्या सत्कारास पात्र ठरणारा आणि बसोलीचे सत्कारार्थी ठरवणारा अशा दोन्ही भूमिकात अनेकदा वावरलो आहे. बसोलीच्या निवासी शिबिराची ‘रसद’ जमा करताना उन्हां-ताणात वणवण फिरणाऱ्या चंद्रकांत चन्नेसोबत एक सहकारी म्हणून अनेकदा फिरलो आहे. याशिवाय अनेक वर्ष बसोलीच्या कार्यक्रमाचं वृत्तसंकलन करणं, बसोलीच्या उपक्रमावर लेख लिहिणं, पाहुणे इकडून तिकडे पोहोचवणं आणि हे किंवा यापैकी एकही काम असेल/नसेल तरी एक श्रोता म्हणून तरी मी आनंदाने सहभागी होणं, अशा विविध भूमिकात मी वावरलो आहे. म्हणजे, जरा वेगळ्या शब्दात सांगायचं तर कोणतंही नाव नसलेलं नातं आमच्यात आहे.

प्रकाश देशपांडे या अकाली दिवंगत झालेल्या जीवलग मित्राने नागपूरच्या पत्रकार भवनात चंद्रकांत चन्ने याची ओळख करून दिली त्याला आता ३५/३६ वर्ष उलटून गेली आहेत. म्हणजे भावनांच्या बहराचा काळ उलटून आमची मैत्री आता बऱ्यापैकी पक्व झालेली आहे. आमच्यातल्या मैत्रीच्या आणि बसोलीच्या पुलाखालून या काळात बरंच पाणी वाहून गेलंय.

सगळ्या मुलाना असते तशी रंगांची ओढ लहानपणी मलाही होती. कळत्या वयात मुलं कविता आणि चित्रांच्या प्रेमात पडतात तसा मीही पडलो. रेखाचित्रे हा माझा प्रांत होता आणि त्यात बऱ्यापैकी गती होती. चित्रकलेचा विद्यार्थी नसलो तरी चित्रकला महाविद्यालयातील मित्रांसोबत भटकत रेघा ओढत राहण्याचा नाद लागलेला होता आणि त्यासाठी अनेक रात्री बस स्थानक, रेल्वे स्टेशनवर चहाचे कप फस्त करत कशा जागवल्या हे आजही लख्खपणे आठवतं. पुढे पत्रकारितेत आलो आणि विशेषत: रिपोर्टिंगच्या धबडग्यात गुरफटून गेल्यावर रंगाच्या बाटल्या, ब्रश केव्हा अडगळीत गेले हे कळलंच नाही. मात्र असं असलं तरी, रविवार पुरवणी करताना सहकारी जागा भरण्याच्या समस्येत सापडला किंवा ऐनवेळी आर्टिस्टने दांडी मारली तर एखाद-दुसरं रेखाटन काढून सहकाऱ्याची अडचण भागवायला हिरीरीनं पुढे सरसावणं माझा आवडता उद्योग असे . अनेकदा तर रिपोर्टिंग करताना भाषण किंवा कार्यक्रम अपेक्षेबाहेर कंटाळवाणा झाला तरी जागा न सोडता कार्यक्रमाची टिपणे घेण्यासाठी असलेल्या स्पायरल बाईंडिंगच्या नोंदवहीत रेखाटणं करत त्या कंटाळवाणेपणावर मात करण्याच्या कलेत मी अवगत झालेलो होतो. २००३ मध्ये‘लोकसत्ता’चा निवासी संपादक झाल्यावर एकदा या नोंदवह्या निकालात काढण्याआधी चाळल्या तेव्हा लक्षात आलं की आपल्या नोंदवहीत टिपणं कमी आणि रेघोट्याच जास्त आहेत. पत्रकारांच्या वाट्याला कंटाळवाणे कार्यक्रम जास्तच आलेले असतात याची साक्षच जणू ती रेखाचित्रे देत होती!

नागपुरात माझ्या पिढीने १९८०च्या दशकाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे ८०-८१ साली पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा पत्रकारितेला फारसं काही सांस्कृतिक भान नव्हतं. सांस्कृतिक कार्यक्रमाचे वृत्तसंकलन म्हणजे फार फार तर पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या आणि धनवटे नाट्य मंदिरात ( त्या जागेवर विदर्भ साहित्य संघाची नवी आता वास्तू उभी आहे ) सादर होणाऱ्या राज्य नाट्यस्पर्धेत सादर होणाऱ्या प्रयोगाचे परीक्षण; असा समज दृढ आणि सार्वत्रिक होता. सांस्कृतिकता म्हणजे यापेक्षा इतर काही कला असतात आणि त्या कशासोबत खायच्या असतात याबद्दल पत्रकार जमात फारशी काही जागरूक नव्हती. शिवाय मिडिया म्हणजे केवळ मुद्रित माध्यमे ,म्हणजे वृत्तपत्रे होती आणि त्यात बातम्या, राजकीय लेख, पुस्तक समीक्षण, कथा-कविता यांना अग्रहक्काचं तसंच प्रभावी स्थान होतं. त्यात मुद्रित माध्यम रंगीत नव्हते त्यामुळे रंगभान असणं मुळीच गरजेचे नव्हतं. विजय फणशीकर ,वामन तेलंग असा एखाद-दुसरा पत्रकार वगळता कला वृत्तसंकलन हे स्पेशलायझेशन आहे हे माहिती नव्हतं. अन्य कला हे; कलाविषयक नियतकालिकांचे आणि त्यांच्या मर्यादित वाचकांपुरते हे उपक्रम आहेत असाच समज तेव्हा होता. त्यात महत्वाचे म्हणजे, ही काही केवळ मुद्रित माध्यमांचीच धारणा नव्हती तर बहुसंख्येने समाजालाही तसंच वाटायचं. अशा प्रतिकूल वातावरणात चंद्रकांत चन्ने नावाचा कोणी तरी शिक्षक बालकात असलेले रंगभान शोधण्याचा प्रयत्न करतो आहे हा बहुतेकांसाठी वेडेपणाच होता! त्या काळात श्रीकांत दाभाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यानी ( आता त्यांची नावे आठवत नाहीत, सॉरी ) भरवलेली छायाचित्र प्रदर्शने किंवा प्रकाश बिसने याची छायाचित्रे किंवा बसोलीच्या उपक्रमाचे वृत्तसंकलन करणे हा, आमच्या मुख्य वार्ताहराच्या दृष्टीकोनातून वेळ आणि जागा अडवण्याचा ‘आदर्श उद्योग’ होता. नामवंत छायाचित्रकार प्रकाश बिसने याने टिपलेले एक स्त्री एका कडेवर हाताच्या टेकूवर मान कलती पेलत कलंडून निवांत पहुडलेली आहे हे कृष्णधवल छायाचित्र आम्ही ( म्हणजे मी आणि रविवार पुरवणीची सहकारी, माझी तत्कालिन भावी पत्नी मंगला विन्चुरणे ) नागपूर पत्रिका या दैनिकाच्या रविवार पुरवणीच्या मास्ट-हेडवर घेतले तेव्हा आमच्या वरिष्ठांना बसलेला शॉक आणि त्यानंतर न्यूजरूममध्ये आम्हा दोघांच्या विरोधात उसळलेली ‘दंगल’ अजूनही आठवली.. वरिष्ठांनी त्यावेळी दिलेला मेमो आठवला की हंसू येते. पत्रकार आणि समाज अशा दोन्ही पातळ्यावर कलाविषयक भान असे टोकाचे विपरीत असल्याच्या पार्श्वभूमीवर कलाविषयक जाणीव आणि रंगभान ओंजळीत घेऊन चंद्रकांत नावाचा एक ‘वेडा’ दौडत निघालेला होता.

चंद्रकांत चन्ने हा चित्रकार आहे, त्याने चित्रकलेचे रीतसर-शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले आहे, रवींद्रनाथ टागोरांच्या कर्मभूमीत; शांतिनिकेतनमध्ये जाऊन तो त्याच्यातल्या सर्जनशीलतेचा झेंडा रोवून आला आहे… वगैरे वगैरे काहीही तोपर्यंत नागपूरकरांना माहिती नव्हते. उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुलांना जमवून रंग ,मातीशी हवे तसं खेळू देणारा ‘चित्रकलेचा एक शिक्षक’ असंच अदखलपात्र काहीसं चंदकांतबद्दल पत्रकारांसकट बहुतेकांना वाटायचं. मुलं रंगून जातात त्या बसोली नावाच्या त्या खेळात म्हणून पालक पाठवून द्यायचे; अशीच तेव्हाची सर्वसाधारण मानसिकता होती. मी मात्र त्याच्या बसोली नावाच्या रंगवेडात नकळत सहभागी झालो ते माझ्यात असलेल्या चित्रकलेच्या ओढीने. त्यात नंतर प्रकाश देशपांडे ,विजय फणशीकर, सिद्धार्थ सोनटक्के असे आणखी काहीजण ओढले गेले आणि आता पाहता पाहता बसोली नावाचे रंगभान व्रतस्थपणे केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भात पसरले आहे. ‘बसोलीयन्स’नी मिळवलेली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची हजारो पारितोषिके, रंगाच्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम यातून बसोलीची मुलं हा एक नंतरच्या काळात नागपूर शहरात कौतुकाचा विषय ठरला हे तर महत्वाचे आहेच पण त्याहीपेक्षा मोलाचे आहे ते; हे कौतुक पुढे कलेच्या क्षेत्रात नागपूरची ओळख ठरले. मिडिया आणि समाजातही रंगभान, रंगजाणीव आणि रंगजागृती निर्माण करणारी अव्याहत चाळीस वर्ष सुरु असलेली बालकलावंतांची अशी चळवळ देशात आणखी कुठे एवढ्या सुरु असल्याचं माझ्या तरी वाचनात आणि पाहण्यात नाही. ज्ञानेश्वरीतील दोन ओळींचा आधार घेत सांगायचं तर- चांगली वाटते, आपल्या मनात मावत नाही आणि ती मग ती इतर अनेकांना सांगावीशी वाटते अशी चळवळ म्हणून स्थान मिळवण्याचा लौकिक बसोलीने मिळवला. अशी ही बसोली नावाची चळवळ रुजली.. अंकुरली.. बहरली आणि ती आता डेरेदार झाली याचा एक साक्षीदार मीही आहे; सकृतदर्शनी गुंतागुंतीचं वाटणारं हे साक्षीदाराचं नातं मला मोठं सार्थ अभिमानाचं.. ममत्वाचं वाटतं, अतूट वाटतं.

धर्म-जात-उपजात-पोटजात-पंथ असा कोणताही भेद करता-न बाळगता बसोली आज नागपूर-विदर्भाच्या हज्जारो घरातल्या बैठकीच्या खोलीत मोठ्या डौलदारपणे विराजमान झालेली आहे. असं ऐटीत विराजमान होतानाच या हज्जारो घरात आणि लाख्खो मनात या चळवळीने रंगजागृती निर्माण केली आहे, समाजात रंगभान पसरवलं आहे. बसोलीच्या यशाचे रंग यापुढेही असेच उधळत राहोत अशा वत्सल शुभेच्छा !!

( बसोलीच्या २०१५च्या शिबिराच्या स्मरणिकेतील तसेच दै.’तरुण भारत’च्या १० मे २०१५च्य अंकात प्रकाशित लेख )

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / 9011557099

संबंधित पोस्ट