पवारांना अडचणीत आणणारा कॉम्रेड !

 || देशातील एक दिग्गज नेते शरद पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारा माणूस एक कॉम्रेड आहे आणि ते लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जेवरी या गावचे रहिवासी आहेत . कॉम्रेड माणिक जाधव हे त्यांचे नाव . माणिक जाधव हे समाजवादी , पुरोगामी विचाराचे . ते  जनता दलाच्या चिन्हावर  ते विधानसभेवर विजयी झालेले होते . सध्या ते कॉंग्रेस पक्षात आहेत . लोकांनी त्यांना कॉम्रेड ही सन्माननीय उपाधी दिलेली आहे .

     चौकशीचा एक मोठा राजकीय इव्हेंट उभा करुन माध्यमे आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यात शरद पवार यशस्वी झालेले असले तरी या कॉम्रेड विषयी फारशी माहिती असंख्यांना नाही . माझ्या पिढीच्या नंतरचे पत्रकार संजय जेवरीकर यांनी कॉम्रेड माणिक जाधव यांच्या संदर्भात लिहिलेला मजकूर नुकताच वाचनात आला तोच मजकूर त्यांच्या संमतीने माझ्या मजकुराऐवजी प्रकाशित करत आहे . या विषयाच्या संदर्भात अनेकांचे असलेले अनेक (गोड) गैरसमज हा मजकूर दूर करेल याची खात्री आहे . संजय जेवरीकर हे सध्या जेवरी या गावचे सरपंच आहेत . ||

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माझे गाव जेवरी ( पिंपळवाडी ) गावचे रहिवासी कॉम्रेड माणिक जाधव यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्रभर शेतकरी आणि कामगाराच्या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे . महाराष्ट्रातील बुडत चाललेली साखर कारखानदारी हा मागच्या पाच वर्षांपासून त्यांच्या चिंतनाचा विषय होता . जेवरी गावाच्या मातीत बंडाची बीजे पेरली असावीत आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात या गावाच्या मातीतील तरुणाने अनेक पर्याय दिले आहेत . माणिक जाधव याच जेवरीच्या  मातीतील आहेत  .

साखर कारखाने , सूतगिरण्या आणि सहकारी संस्थांच्या बाबतीत एखाद्या वकीलापेक्षाही जास्त अभ्यास असलेला हा माणूस  कधीच डगमगला नाही , लाचार होवून कधी कुणासमोर त्याने शरणागती पत्करली नाही . कामगारांच्या प्रश्नावर कायम बोलणारा , कधीही कुणाला याबद्दल भिक न घालणारा हा लढवय्या कामगार नेता आजही कामगारांच्या एक एक पैशातून उभारलेल्या कामगार भवनात राहतो . आमदार झाला म्हणून कधी माजला नाही , पैसे नाहीत म्हणून कधी थकला नाही .

एखादा लढा उभारला की त्याला शेवटपर्यंत न्याय देणारा हा मनुष्य मागच्या पाच दहा वर्षांपासून फारसा कुणाला भेटत सुद्धा नव्हता . अज्ञातवासात राहून त्यांनी न्यायालयात  हा लढा लढला , महाराष्ट्र पिंजून काढून ,सगळे बुडीत कारखाने धुंडाळून त्यांनी हा लढा यशस्वी केला . कांही वर्षांपूर्वी मी आणि ते दोघेही मिळून किल्लारी साखर कारखान्याचा लढा उभारत असताना ते  मला नेहमी लढा कसा लढावा याविषयी  बोलले आहे . सगळे मोठे मासे गळाला लागणार असल्यामुळे यावर न्यायालयात व्यापक तपशीलाने  विचारविनिमय झाल्याचे ते म्हणायचे . या याचिकेला पुरावे म्हणून जी कागदपत्रे लागणार होती ती सगळी माणिक जाधव यांनी पुरवली आहेत . ते म्हणायचे,’मी खूप मेहनत करतोय मात्र प्रशासन यात लक्ष घालत नाही , इतके दिवस न्यायालयात जात आहेत  , मला यश मिळावे .

कॉम्रेड माणिक जाधव

आज पुन्हा त्यांच्याशी बोललो,ते म्हणाले संजय हे सगळे चुकीचे सुरु आहे . कार्यकर्ते रस्त्यावर काय येत आहेत , निषेध काय करत आहेत . खरे काय घडले आहे , हे यांना कुणीही सांगायला तयार नाही , यात सध्याच्या सरकारचा काय दोष आहे . दोन्ही न्यायालयांनी  शरद पवार यांना दोषी धरले आहे , त्यामुळे कितीही आंदोलने झाली तरी  यातून त्यांची सुटका नाही . यात अनेकजण money laundring मध्ये अडकणार   आहेत . करोडो रुपयांचे कर्ज असताना हे कारखाने कवडीमोल विकली गेली आहेत , यात आलेला पैसा कुठेही जमा नाही . आम्ही कोर्टाला सगळे पुरावे दिले आहेत . इतके सगळे असताना राजकारण करून प्रकरणाची दिशा बदलणार नाही .शरद पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने त्यांच्या बगलबच्यांच्या घशात घातले आहेत . ज्या कारखान्याच्या जीवावर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेकवार सत्ता हस्तगत केली , त्याच कारखान्याचे बळी देवून शेतकऱ्यांचे जीव घेतले गेले . अनेक कामगार देशोधडीला लागले . कारखाने सहकारात तोट्यात चालवायचे आणि तेच कारखाने खाजगी झाले की विक्रमी उत्पादन करायचे याचे गणित काही आजपर्यंत समजले नाही . हजारो एकर जमीन घशात घालायची , कर्जाचे डोंगर चढवायचे , अख्खी एक बँक संपून गेली तरी कोणत्याही नेत्याला त्याचे सोयरसुतक असू नये , याचे उत्तर कोण देणार ?आज शरद पवार यांच्यावर कारवाई होते तर सगळ्यांना त्यांचा पुळका आला . मात्र एकालाही असे वाटले नाही की , इतकी करोडोंची रक्कम कुठे गायब झाली?
माणिक जाधव खऱ्याअर्थाने हा लढा लढत आहेत,अण्णा हजारे . अॅड सतीश तळेकर ही सगळी मंडळी अत्यंत हिमतीने हं लढा यशस्वी करण्यासाठी सहाय्य करत आहेत , त्यांचे मन:पूर्वक  अभिनंदन करायला हवे . इतक्या सगळ्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात  लढायचे ही काही छोटी गोष्ट नाही . सगळेच दिग्गज , टोळीने कारखाने आणि बँक संपवणारी ही मंडळी भ्रमात राहिली  . आमचीच सत्ता असल्याने कोण काय करेल असे त्यांना वाटले , मात्र न्यायदेवता आंधळी आहे असे म्हटले जात असले तरीही तिने डोळे उघडे ठेवून न्याय दिला.
माणिक जाधव म्हणतात , आम्ही गेल्या 20 वर्षांपासून कायदेशीर लढा लढत आहोत . राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळेच आम्ही कायदेशीर लढाई लढत होतो . आता त्या लढाईला यश आले आहे. याबाबतीत उच्च न्यायालयाने सर्व कागदपत्रांची तपासणी करुन २२ ऑगस्ट २०१९ रोजी ८४ पानाचे निकालपत्र दिले आहे . या निकालपत्रात पान ६८ व ७९ वर शरद पवार यांच्या नावाचा ४ ठिकाणी उल्लेख आहे. त्यामुळे कलम १०९ , १२० ब नुसार शरद पवार यांना दोषी ठरविण्यात आले आहे . याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने योग्य निर्णय दिलेला आहे. न्यायालय योग्य कारवाई करत आहे . त्यामुळे या प्रकरणात कुणीही ढवळाढवळ करण्याची गरज वाटत नाही , असे जाधव यांनी स्पष्ठ केलं . दिल्लीच्या तख्तापुढे कधीही न झुकलेल्या शरद पवार यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवणाऱ्या जेवरीच्या या कॉम्रेडला माझा लाल सलाम…

– संजय जेवरीकर
ज्येष्ठ पत्रकार

( संपर्क +91 788 730 7789 )

संबंधित पोस्ट