‘गोड’ ग्लानीतले कॉंग्रेसजन…

‘सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेस हा एकमेव पक्ष असून, हा पक्ष कधीच संपणार नाही’, असं पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी इथं झालेल्या युवक कॉंग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करतांना राज्याचे माजी सहकार मंत्री, कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले असल्याची बातमी वाचली आणि कॉंग्रेस नेते गोड गैरसमजाच्या ढगात राहतात याची खात्री पटली. हर्षवर्धन पाटील यांची सत्तेच्या राजकारणातील सुरुवात अपक्ष आमदार म्हणून झाली. सुरुवातीच्या काळात ते सेना-भाजपच्या युती सरकारात राज्यमंत्री होते. नंतर राजकीय हवा बदलताच ते कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य झाले, कॅबिनेट मंत्री झाले. नंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये रीतसर प्रवेश केला. या प्रवासात सुमारे वीसएक वर्ष ते मंत्री होते. प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यावर वास्तवाबाबत एक बधीरपण येतं; ते आलेलं असल्यानं हर्षवर्धन पाटील यांना कॉंग्रेस पक्षाच्या विद्यमान स्थितीची नेमकी जाण नसणं स्वभाविक आहे. असे ‘बधीर’ हर्षवर्धन पाटील कॉंग्रेस पक्षात बहुसंख्येनं आहेत, हीच या पक्षाची खरी अडचण आहे!

सव्वाशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेस पक्ष (खरं तर, विद्यमान कॉंग्रेस पक्ष हा २८ डिसेंबर १८८५ला मुंबईच्या गोवालिया तलावाशेजारच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत स्थापन झालेला पक्ष नाही. १९६९च्या फुटीनंतर अस्तित्वात आलेल्या ‘कॉंग्रेस आय’ म्हणजे इंदिरा कॉंग्रेसला नरसिंहराव यांनी दिलेलं रुपडं आहे; त्यामुळे हा पक्ष १३० वर्ष वयाचा नाही हा एक युक्तीवाद आहेच पण, ते असो!) गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या एवढ्याही जागा मिळवू शकलेला नाही. देशात ३२ राज्य असून विधानसभेच्या सुमारे ३५०० जागा असून त्यापैकी केवळ ८८१ म्हणजे एक चतुर्थांशपेक्षा कमी जागा सध्या कॉंग्रेसकडे आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील आजवरचे कॉंग्रेसचे देशातील विधानसभांत हे सर्वात कमी संख्याबळ आहे. अगदी जनता पक्षाच्या लाटेत पानिपत झाल्यावरही कॉंग्रेसचं हे संख्याबळ इतकं कमी झालेलं नव्हतं. तरीही कॉंग्रेस लगेच संपणार नाही हे खरं असलं तरी, दिवसेदिवस कॉंग्रेसचा होणारा संकोच ही चिंतेची बाब आहे, हे कॉंग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांना समजत नाही किंवा समजून न समजल्याच्या गोड ग्लानीत आहेत, ही खरी शोकांतिका आहे. या पार्श्वभूमीवर आणखी काही दशकांनी (?) कॉंग्रेस एखाद्या तरी राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून उरेल किंवा नाही अशी भीती राजकारणाच्या अभ्यासकांना वाटू आहे.

एकाच्या पराभवात दुसऱ्याचा विजय असतो याची प्रचीती कॉंग्रेसच्या अलिकडच्या अनेक निवडणुकात सतत होत असलेल्या पराभव आणि आक्रसण्यातून येत आहे. म्हणूनच, एक राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा देशात होणारा विस्तार म्हणजे कॉंग्रेसचा एक न थांबणारा संकोच आहे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. राजकीय पक्षाचा विस्तार आणि संकोच ठरवण्याचा एक निकष म्हणून लोकसभा तसंच विधानसभांतील संख्याबळाकडे पाहिलं जातं. भारतीय जनता पक्षाच्या उदयानंतर झालेल्या पहिल्या (१९८४) विधानसभांच्या निवडणुकांनंतर देशात कॉग्रेसकडे २०१३ तर भाजपकडे केवळ २२४ जागा होत्या. १९९९ मध्ये कॉंग्रेसकडे १२८० तर भाजपने ७०७ जागा अशी मजल मारली. २००४मध्ये हे संख्याबळ कॉंग्रेस ११२९ आणि भाजप ९०९ झालं तर २०१४मध्ये हे संख्याबळ कॉंग्रेस ९०९ आणि भाजप १०५८ जागा असं झालं. नुकत्याच-२०१६मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर कॉग्रेसची देशातील विधानसभा सदस्य संख्या ८१८ झालेली आहे. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा मिळवणाऱ्या भाजपने २०१४च्या निवडणुकीत २८३ जागा; म्हणजे स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवलं; तर नेमक्या याच काळात ३०० पेक्षा जास्त जागांवरून ४३, असा कॉंग्रेसचा लाजीरवाणा उतरता आलेख आहे. तरीही कॉंग्रेस संपणार नाही, असं जे म्हणतात, ते कोणत्या तरी ग्लानीत आहेत असंच म्हणण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही.

विधानसभा सदस्य कमी होण्याचा फटका कॉंग्रेसला कसा बसतोय हे पाहणं म्हणजे कॉंग्रेसचा नाकर्तेपणा वेशीवर टांगण्यासारखं आहे पण, त्याला नाईलाज आहे. देशातील उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजराथ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र आणि महाराष्ट्र या सारख्या महत्वाच्या तसंच केंद्रात सत्ताप्राप्तीच्या दृष्टीनं मध्यम ते मोठं संख्याबळ असलेल्या एकाही राज्यात कॉंग्रेसचं सरकार नाही. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधासभेत तर औषधालासुद्धा कॉंग्रेसचा एकही सदस्य नाही… अरुणाचल प्रदेशात नबम तुकी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध इतकी नाराजी दाटून आली की पक्षाचे आमदार फुटले; त्यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला आणि या पक्षाने भाजपसोबत युती करून तुकी सरकार पदच्युत केलं. आसामातील पक्षातील असंतोष लक्षात घेतला न गेल्यानं आधी सरबंदा सोनोवाल (आता हे आसामचे मुख्यमंत्री आहेत); नंतर निवडणुकीच्या तोंडावर हेमंत बिस्व सारखा ‘मास्टरमाइंड’ भाजपात गेला आणि पक्षाची विधानसभा निवडणुकीत हार झाली. ए.के. अंटोनी यांच्या रमेश चेन्नीथाला यांच्याशी असलेल्या हटवादी मतभेदातून केरळातील सत्ता गेली. त्रिपुरात सुदीप बर्मनसारख्या बड्या नेत्यानं पक्षाचा राजीनामा दिलाय तर, छत्तीसगड मध्ये माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी कॉंग्रेसमध्ये बंड करून नवा पक्ष स्थापन केलेला आहे. गुरुदास कामत यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचं फुसकं का होईना बंड करून मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली तरी मुंबई कॉंग्रेसमध्ये सर्व आलबेल नाही याची दवंडी पिटली आहे. म्हणजे कॉंग्रेसची सत्ता असलेली केवळ सहा राज्ये उरली असून येत्या निवडणुकीत कर्नाटक आणि उत्तरांचलची सत्ता कॉंग्रेस गमावणार अशी हवा दिल्लीत आतापासूनच आहे. १९८४साली देशातील २७-२८ राज्यात असणाऱ्या कॉंग्रेसच्या हाती जेमतेम तीन-चार राज्य राहण्याची शक्यता आता दिसू लागली आहे. आता भाजपकडे स्वबळ आणि युती मिळून 15 राज्यांची सत्ता आहे तर येत्या निवडणुकीत आणखी २/३ राज्ये भाजपच्या प्रभावाखाली येतील. कोणाचा विस्तार झाला आणि कोणाचा संकोच होतोय हे स्पष्ट करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.

आतापर्यंत झालेली पडझड कमी की काय म्हणून पंजाबच्या प्रभारीपदी कमलनाथ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊन कॉंग्रेसमध्ये कुणी समंजस नेता नाही असाच संदेश दिला गेलाय. कॉंग्रेस पक्षात सध्या बहुसंख्य राज्यांच्या राजधान्या आणि दिल्लीत स्थायिक झालेल्या नेत्यांचं नेतृत्व उरलेलं आहे! भरमसाठ नेते आणि अल्पसंख्य कार्यकर्ते अशी कॉंग्रेसची विद्यमान अवस्था आहे. अहमद पटेल ते अंटोनी, दिग्विजयसिंह ते चिदंबरम, कपिल सिब्बल, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन त्रिवेदी, मोहन प्रकाश, गुलाम नबी, मुकुल वासनिक या आणि अशा अन्य कोणाही नेत्याला राज्याच्या राजकारणात मुळीच रस उरलेला नाही. सत्तेत रमणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असून संघटना गेली उडत अशी त्यांची पक्की धारणा झालेली आहे. कोणत्याही राज्यात संपूर्ण राज्याला मान्य असणारं नेतृत्व कॉंग्रेसमध्ये उरलेलं नाही. ‘असल्या-नसल्या’ कॉंग्रेस निष्ठेचं भांडवल करून एकट्या दिल्लीत या नेत्यांचे गट आणि राज्या-राज्यात उपगट आहेत. याशिवाय सोनिया गांधी यांना मानणारा आणि राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे जाऊ नये याची डोळ्यात तेल घालून काळजी घेणारा तसंच, राहुल यांच्या हाती पक्षाची सूत्रे तातडीनं यावीत असं वाटणारा अशी मुख्य दुफळी आहे. डोक्यावर बर्फ, जिभेवर खडीसाखर आणि चेहेऱ्यावरची सुरकुती हळू न देता वर्षानुवर्षे दिल्ली दरबारची चटक लागलेली ही सर्व ‘अर्क’ मंडळी असून त्यांच्या दृष्टीकोनातून पक्ष नव्हे तर पक्षामुळे (म्हणजे खरं तर, गांधी नेतृत्वाच्या कृपेने) मिळणारं सत्तेचं पद अंतिम आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांना डावलून चिदंबरम यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेवर आणि कपिल सिब्बल, जयराम रमेश अशा अनेकांची राज्यसभेवर वर्णी लागणं हे आहे. (सुशीलकुमार शिंदे यांना तर ना धड राज्यात ना केंद्रात स्थिर राहू दिलं गेलं; एक प्रकारे त्यांची फरपटच करण्यात आलेली आहे.) यापैकी कोणीही सत्तेची पदं न उबवता पक्ष विस्तारासाठी चार थेंब तरी घाम गाळल्याचा इतिहास नाही.

0c6c1025-f42a-46f4-ab3c-a6bbd7847e88सोनिया गांधी यांचे प्रकृती अस्वास्थ्य आणि राहुल गांधी यांना लिहून दिलेलं भाषण वाचण्यापलीकडे काही येत नाही अशी कॉंग्रेस श्रेष्ठींचं अस्तित्व आहे. कॉंग्रेसची इतकी वाईट्ट अवस्था गेल्या १३० वर्षात आजवर कधीही झालेली नव्हती; अगदी सीताराम केसरी अध्यक्ष असतानासुद्धा कॉंग्रेस पक्ष इतका दुबळा आणि ‘न-नायकी’ झालेला नव्हता. त्यामुळेच निवडणुकातील सलग पराभव ही भरुन न येणारी भळभळती जखम झालेली आहे. सुरु आहे ते सुमारे सात दशकापूर्वी मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यातील योगदान आणि १३० वर्षांच्या वयाचे गीत गायन ! कथित १३० वर्ष वयाच्या तुलनेत केवळ चाळीशीत असणाऱ्या भाजपने सत्ता आणि देश पादाक्रांत केला याबद्दल फुसके बार उडवण्याव्यतिरिक्त अभ्यास नाही, झालेल्या चुकांतून शिकण्याची तयारी नाही की पुन्हा संघटनेत जान फुंकण्याचा देशव्यापी कार्यक्रम नाही. असं म्हणतात, चंद्र कलेकलेनी वाढतो; त्याच धर्तीवर कॉंग्रेसचा कलेकलेनं संकोच होत आहे… (एक वाचक नागपूरचे दयाराम अमलानी यांनी ‘नारायणागमन’ या लेखावर प्रतिसाद म्हणून पाठवलेलं चित्र सोबत देत आहे, ते पुरेसं बोलकं आहे)

congresscongress

भाजपचा विस्तार हीच काही या संकोचाची एकमेव बाजू नाही तर कॉंग्रेसचा त्यातील एक धोका आणखी वेगळा आहे. गेल्या साडेतीन पावणेचार दशकात शिवसेना, तेलगु देसम, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष, तृणमूल कॉंग्रेस हे प्रादेशिक पक्ष प्रबळ होत गेले तर, अद्रमुक सारखे पक्ष आणखी बळकट झाले. देशाचे संरक्षण तसंच परदेश धोरण कसं असावं, मासेमारीची आंतरराष्ट्रीय सीमा कुठ्पृंत असावी, याविषयी प्रादेशिक पक्ष दिग्दर्शन करू लागले. सेनेसारखे पक्ष तर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळवायचा नाही किंवा गुलाम अलीच्या गजल गायनाचा कार्यक्रम देशात होऊ द्यायचा की नाही याबद्दल आक्रमक भूमिका घेऊ लागला; केंद्र सरकार या प्रादेशिक पक्षांच्या ‘दादागिरी’ समोर नमतं घेत असल्याचं अनेकदा अनुभवायला आलं. प्रादेशिक पक्षांचा वाढलेला प्रभाव देशाचा भावनात्मक एकजिनसीपणा विसविशीत करतो आहे, सैल करतो आहे आणि त्यासाठीही बऱ्याचअंशी जबाबदार गेल्या २५-३० वर्षात कॉंग्रेसचा झालेला संकोच आहे. स्वत:च्या डोळ्यातील नाकर्तेपणाचं मुसळ लक्षात न घेता कॉंग्रेस मात्र भाजपच्या डोळ्यातील कुसळ कसं दिसतं हे सांगण्यात मग्न आहे.

झाल्या तेवढ्या बाता पुरे झाल्या, ‘गोड’ गैरसमजाच्या ग्लानीतून बाहेर या, जागे व्हा आणि पक्षाला सावरा; अन्यथा आज संकोच होतोय, उद्या पक्ष संपायला वेळ लागणार नाही. तो उद्या फार लांब नाही, हे कॉंग्रेसजनांना कुणी तरी खडसावून सांगण्याची हीच वेळ आहे.

– प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या – www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट