(महा)राष्ट्रवादी निराशा !

मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमच्या गप्पा सुरु होत्या. राष्ट्रवादीचे स्वच्छ समजले जाणारे हेवीवेट जयंत पाटील यांनी, ते राज्याचे मंत्री असताना केलेल्या संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराची माहिती राज्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी आनंद कुळकर्णी आमच्याशी शेअर करत होते; तेव्हाच मुंबईत षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा १७ वा वर्धापन दिन साजरा होत होता. आनंद कुळकर्णी देत असलेल्या माहितीवर पटकन विश्वास बसत नव्हता. पण, प्रशासनातील त्यांचा दांडगा अनुभव, केंद्र व राज्य शासनात त्यांनी भूषविलेली पदं आणि माहितीच्या अधिकारात जमवलेली माहिती हा स्त्रोत लक्षात घेता, रा.स्व.संघाच्या भाषेत सांगायचं तर राष्ट्रवादीचा आणखी एक मंत्री नापास होताना दिसतोय, हाच या गौप्यस्फोटातून मिळणारा संकेत होता. एकूण काय तर, षोडशवर्ष ओलांडेपर्यंत राष्ट्रवादी नावाच्या बाळांनं बरेच ‘रंग’ उधळल्याचं आणि त्याचं सावट अधिवेशनावर दाटून आल्याचं दिसत होतं; पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणातही त्या सावटाचे पडसाद उमटले असल्याचं प्रकाशित झालेल्या बातम्यातून दिसलं. अर्थात, जयंत पाटील यांनी आर्थिक गैरव्यवहार (मी भ्रष्टाचार हा शब्द जाणीवपूर्वक टाळतो आहे) केला असल्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये, पण ते असो.

शरद पवार अतिशय अनुभवी, मुत्सद्दी असल्याचं आवर्जून अजूनही सांगितलं जातं पण, त्या अनुभव आणि मुत्सद्दीपणाचा लवलेशही कुठे त्यांच्या भाषणात किंवा अधिवेशनाच्या कामकाजात दिसला नाही. मुलगी/मुलाने सोळावं वर्ष पार केलं केलं की तो तरुण झाल्याचं मानलं जातं; मग पालक त्याला रीतीरिवाज कसे पाळावेत, समाजात कसं वागावं, कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल चार युक्तीच्या गोष्टी सांगतात, मार्गदर्शन करतात अशी पद्धत आहे. सरकारात असताना राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले, अजूनही होताहेत; त्यातील काहींची चौकशी सुरु आहे; छगन भुजबळ, रमेश

​कदम​ यांच्यासारखे दिग्गज याच आरोपाखाली तुरुंगात आहेत तर आणखी काहीजण तुरुंगाच्या वाटेवर आहेत, असं प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकारी मित्रांकडून खाजगीत सांगितलं जातंय; लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाचा (महा)राष्ट्रात दारूण पराभव झालेला आहे; नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुका बिनविरोध झाल्या नसत्या तर राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार निवडून येणं कठीण होतं… या पार्श्वभूमीवर एखाद्या समजदार समंजस पालकाची भूमिका शरद पवार यांच्याकडून अपेक्षित होती पण, त्यांचं भाषण म्हणजे वर्गातल्या दांडग्या मुलाबद्दल एखाद्या दुबळ्या मुलानं, त्या दांडग्या मुलाच्या गैरहजेरीत शिक्षकाकडं किरकिर करण्यासारखं झालं!

विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढले असते तर, आघाडीचं सरकार आलं असतं, असं शरद पवार म्हणाल्याचं बातम्यात म्हटलं आहे. पण, तिकडे सेना-भाजप युती तुटताच आघाडी तोडण्याची घाई शरद पवार यांना कशी झाली आणि निकालानंतर सरकार स्थापनेसाठी भाजपला विनाअट एकतर्फी पाठिंबा पवार यांनी लगबगीनं कसा जाहीर करून टाकला, हे महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. तरी, आघाडी तोडण्याचं व्हाऊचर कॉंग्रेसच्या नावावर फाडून पवार यांनी नेमकं काय साधलं, हा प्रश्नच आहे. ‘नालायकांसोबत का बसता’ हा त्यांनी शिवसेनेला विचारलेला सवालही असाच इतिहासाचा विसर पाडण्याचा प्रयत्न आहे. हे ‘नालायक’ म्हणजे भाजप म्हणजे, पूर्वाश्रमीचे जनसंघाचे लोक जनता पक्षाचा एक घटक होते; तेव्हा वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडून (ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात खंजीर खुपसण्याचा प्रयोग म्हणूनही ओळखली जाते) आणि कॉंग्रेस फोडून याच शरद पवार यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद वयाच्या ३८व्या वर्षी मिळवलं तेव्हा, याच भाजपच्या पूर्वावताराचे (पक्षी: जनसंघाचे) उत्तमराव पाटील, हशू अडवानी असे अनेकजण पवार यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेले होते. म्हणजे पवार आणि त्यांचा पक्ष भाजपसोबत गेले तर ते लायक आणि अन्य गेले तर ती ना-लायकी असाच अर्थ झाला! सत्ताप्राप्तीसाठी या कथित नालायकांसोबत आधी पवार गेले होते याचा विसर न पडलेली किमान पत्रकारांची तरी पिढी अजूनही हयात आहे, हे पवार कसे काय विसरले ?

कॉंग्रेसच्या नाकर्तेपणामुळे आसामात भाजपची सत्ता आली, असं पवार म्हणाल्याचं बातम्यात म्हटलं आहे. पवार यांचा सोनिया आणि राहुल यांच्या नेतृत्वाला असलेला विरोध जगजाहीर आहे तरी, त्यांना कॉंग्रेसच्या नाकर्तेपणाची चिंता वाटते हे भारतीय लोकशाही आणि शरद पवार राजकीयदृष्ट्या प्रगल्भ असल्याचं सुलक्षण आहे, असं समजायला हरकत नाही. मात्र कॉंग्रेसच्या नाकर्तेपणाची चर्चा पवार यांच्या राजकीय नाकर्तेपणाशी निगडीत आहे याचा विसर पडू देता कामा नये. सोनिया गांधी यांनी राजकारणात यावं अशी विनवणी करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात शरद पवार होते. अशा विनवण्या करण्याऐवजी त्यांनी कॉंग्रेसमधलं नाकर्तेपण घालवण्यासाठी काही प्रयत्न केले असते तर कॉंग्रेसवर ही-नाकर्ते होण्याची वळ आली नसती. पक्षात गांधी घराण्याला सक्षम पर्याय म्हणून स्वत:ला उभं करण्यात पवार यशस्वी झालेले नाहीत. उलट सोनिया यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करुन पवार कॉंग्रेसबाहेर पडले आणि नंतर त्याच सोनिया यांचे नेतृत्व असलेल्या कॉंग्रेससोबत त्यांनी सत्तेसाठी केंद्र आणि राज्यात घरोबा केला. भारतीय राजकारणातला ‘तुम ही से मोहोब्बत, तुम ही से लढाई’चा इतका सत्तातूर रोमहर्षक प्रयोग दुसरा कोणता नसेल.

म्हणजे, कॉंग्रेसमध्ये असताना नेतृत्वाला पर्याय निर्माण करणं नाही, स्वत: वेगळं झाल्यावर कॉंग्रेसला पर्याय निर्माण करू शकणं नाही; कॉंग्रेस आणि आता भाजपला म्हणजे नरेंद्र मोदी यांचा पर्याय म्हणूनही उभं राहणं नाही. (मोदी यांना कॉंग्रेसेतर पर्याय म्हणून स्वत:चं नाही तर नितीशकुमार यांचं नाव पुढे करुन ‘तो’ पर्याय आपण नाही हे पवार यांनीच नुकतंच स्पष्ट केलंय.) याचा एक अर्थ असा की, आधी कॉंग्रेसला आणि आता भाजपला तिसरा पर्याय आपण कधीच नव्हतो हे शरद पवार यांनी जाहीरच करून टाकलेलं आहे आणि दुसरं म्हणजे, आजवरच्या साठ वर्षांच्या राजकारणात केलेल्या आपल्या सर्व खेळी (खरं तर, कोलांटउड्या) चुकलेल्या आहेत याची कबुलीच पवार यांनी दिली आहे!

नावात जरी राष्टवादी असला तरी हा पक्ष पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे आणि पवार यांना आजवर त्यांच्या पक्षाची ताकद ७०-७२ पेक्षा आमदारांच्यावर वाढवता आलेली नाही; आता तर या संख्येने जेमतेम चाळीशी कशीबशी ओलांडता आलेली आहे. आधी पुलोदच्या प्रयोगाच्या वेळी आणि मग राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वेगवेगळ्या तरुण पिढ्यांना सोबत घेतलं; ‘पुलोद’च्या काळात पवार अफाट लोकप्रिय झाले तर राष्ट्रवादीच्या गेल्या १६ वर्षांच्या काळात शरद पवार यांचं राजकारण आणि सत्ताकारण अनेक मंत्र्यांच्या वादग्रस्त कारभारामुळे भ्रष्टाचाराचं प्रतीक झालं. त्यामुळेच पवार आणि राष्ट्रवादीचा जनाधार घटला.

सहा दशकांच्या दीर्घ राजकीय खेळीत राष्ट्रीय राजकारण लांब राहिलं, शरद पवार यांना महाराष्ट्रातही कॉंग्रेस आणि भाजप-सेनेचा पर्याय म्हणून स्वत:ला तसंच त्यांच्या पक्षाला उभं करण्यात यश आलं नाही; परिणामी नाव राष्ट्रवादी असलं तरी हा पक्ष महाराष्ट्र त्यातही प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रापुरता आणि मराठ्यांचा पक्ष म्हणून उरला. याच काळात भाजप आणि शिवसेनेची महाराष्ट्रातील ताकद वाढली असं विधानसभा सदस्यांच्या वाढलेल्या संख्येवरुन स्पष्ट दिसतंय! एक माणूस म्हणून शरद पवार हे चांगले खूप चांगले आहेत, समोरच्याला विस्मयचकित करणारा जात-धर्म-पंथ-राजकीय विचार विरहित जनसंपर्क ही त्यांची खणखणीत आणि न आटणारी पुंजी आहे, त्यांचं प्रशासकीय कौशल्य आणि आकलन अफाट आहे.मात्र असं असलं तरी या दीर्घ राजकीय खेळीत शरद पवार हे मुलायम, लालू, मायावती, जयललिता किंवा ममता यांच्याप्रमाणे स्वबळावर सत्ता प्राप्त करण्यासारखं संघटन कधीच निर्माण करु शकले नाहीत; परिणामी राष्ट्रीय राजकारणात ‘पॉवर’ म्हणून त्यांना मान्यताच मिळाली नाही. तशी केवळ हवा किंवा आजच्या भाषेत बोलायचं तर आभासी प्रतिमा (व्हर्च्युअल इमेज) निर्माण करण्यात त्यांनी आणि त्यांच्या भक्तांनी स्वत:ला धन्य मानलं.

वयाचं सोळावं आणि धोक्याचं वळण पार करण्याच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला (महा)राष्ट्रवादी पक्ष प्रत्यक्षात गैरव्यवहाराच्या दलदलीत बुडाल्याच्या आणि जनाधार गमावत असल्याच्या पार्श्वभूमीवर परखड विवेचन करून; कार्यकर्त्यांना बळ देणारा कार्यक्रम देऊन, नवी दिशा शरद पवार देतील ही आशा आणि अपेक्षा फोल ठरली. पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात कॉंग्रेसचं नाकर्तेपण, पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य करण्यात आणि केसाचा भांग वगैरेसारखी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात करण्यात शरद पवार यांनी धन्यता मानली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आणि तिथलं शरद पवार यांचं भाषण ही एक (महा)राष्ट्रवादी घोर निराशा ठरली आहे!

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com​

संबंधित पोस्ट