सुरेखा ठक्कर नावाची जिजीविषा

|| नोंद …५ ||

कांही जण आपल्या नियमित संपर्कात नसतात , अनेकदा तर ते संपर्क क्षेत्राच्या बाहेरही असतात , अनेक महिने-वर्ष आपलं साधं बोलणंही झालेलं नसतं  तरी , ते आपले दोस्तयार असतात . त्यांच्या नावाचा एक टवटवीत फुलांचा ताटवा आपल्या मनात कायम फुललेला असतो . जरा फिल्मी अंदाजात सांगायचं तर-

‘वो जब याद आये ,

बहोत याद आये…’

( चित्रपट- पारसमणी / गायक- मोहम्मद रफी , लता मंगेशकर / संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल )

अशी ही दोस्तीची घट्ट नाळ असते .  या ‘बहोत याद आये ‘श्रेणी’त  चतुरस्त्र व्यक्तीमत्वाची कविता महाजन , सिद्धार्थ सोनटक्के ,  विजय सातोकर , धनंजय गोडबोले असे बरेच दोस्त आहेत . कविता आता आपल्यात नाही ; मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात तिचा पडाव कुठे पडलेला असेल हे ठाऊक नाही . सिद्धार्थही  कधीच त्याच मार्गे गेला . धनंजय गोडबोले संबंधी याआधीच लिहिलं आहे आणि विजय सातोकर संबंधी आजची नोंद नाही .

या ‘बहोत याद आये ‘श्रेणी’त  एक नाव आणखी आहे ते सुरेखा ठक्कर यांचं .

वर्ष १९८७ . तेव्हा आम्ही नागपूरला बजाज नगरात , पश्चिम उच्च न्यायालय मार्गावर अंबर नावाच्या फ्लॅट स्कीममध्ये रहात होतो . थंडीचे दिवस नुकतेच सुरु झालेले होते . एका सकाळी ज्यांना आम्ही श्रीकाका म्हणतो , त्या ज्येष्ठ , नामवंत बालरोग तज्ज्ञ डॉ . श्रीकांत चोरघडे यांचा फोन आला . सुरेखा ठक्कर एका मजकुराच्या संदर्भात  मंगलाला भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं . सुरेखाला , मंगला आणि मी ओळखत होतो . आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर अनेकदा कामासाठी जात असे , तेव्हा तिच्यासोबत औपचारिक  ‘हाय-हॅल्लो’ची मंगला आणि माझीही जुजबी ओळख होती . सुरेखा आली . साडेपाच फुटाच्या आसपास ऊंची , सावळा आणि गव्हाळ मिश्रित उजळ वर्ण , दाट केसांची एक वेणी , खांद्यावरुन मोठा पदर काढत साडी अत्यंत देखणेपणानं नेसण्याची शैली , कपाळावरचं अत्यंत ठसठशीत  कुंकू आणि स्वत:ला पेश करण्याची तिची आदब , असा डौल तिच्यात होता . तिच्या आवाजाला ऐकत राहावं अशी एक छानशी श्रवणीय लय असल्याचंही लक्षात आलं . ‘चर्चा’ या दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या एका आत्मपर मजकुराच्या संदर्भात सुरेखाला  मंगलाशी चर्चा करायची होती . स्वत:च्या आणि कन्येच्याही आजारपणाच्या कुरबुरीत अडकलेल्या मंगलानं त्या मजकुराची जबाबदारी माझ्यावर टाकली .

तो मजकूर एका दमात वाचला आणि मी हादरुनच गेलो . वयाच्या तिशीच्या आंत सुरेखानं जे कांही सहन केलेलं होतं ते अकल्पनीय होतं . स्त्रीच्या अफाट सहन शक्तीची आणि त्यातून बाहेर येण्याच्या तिच्या जिजीविषा ( Survial Instinct ) वृत्तीची जाणीव त्यातून   झाली . खरं सांगायचं तर , तो मजकूर वाचल्यावर  जीव एकाच वेळी स्तिमित झाला आणि दडपूनही गेला होता . सुरेखाच व्यक्तीमत्व भावनात्मक गुंतागुतीचं  आणि हळवं असणार  ही जाणीव तिच्या अक्षरावरुन झाली . मूळ गुजराथी असणार्‍या आणि इंग्रजी  संस्कारात वाढलेल्या सुरेखाच्या भाषेला मराठीचा अस्सल बाज होता . तिचं कथन प्रांजळ आणि लेखन शैली प्रवाही होती . त्यात आर्त होतं पण , टाहो नव्हता . जिथे समर्पण असतं तिथे अन्यायाची भावना नसल्याची जाणीवही त्या मजकुरातून झाली . सुरेखाच्या मजकुरात किरकोळ असे कांही अपवाद वगळता संपादकीय  संस्कार करण्यासारखं  विशेष असं कांही नव्हतं .

त्या संदर्भात तीन-चार दिवसांनी आम्ही चर्चा करायला बसलो तेव्हा त्या भोगल्याच्या वेदनेचे किंचितही व्रण तिच्या चेहेर्‍यावर नव्हते  ; अर्थात ते तिच्या  मनावर होतेच  . अत्यंत हळवं तरी स्पष्ट प्रतिपादन करणार्‍या सुरेखाचा चेहेरा त्या संदर्भात निर्विकार होता . कदाचित त्यामुळेच तिच्या संदर्भात एक हळवेपण मनात आलं असावं .  या वरकरणी तरी निर्विकार दर्शवणार्‍या तिच्या वृत्तीला मनोमन सॅल्यूट करुनच आमच्यात चर्चा झाली . कांही शब्दात सुचवलेले बदल तिनं कपाळावर आठ्या उमटवत स्वीकारले . आपण स्वत: सहाय्य मागितलं आहे तर ते करणाराचं ऐकलं पाहिजे , हा सुसंस्कृतपणा तिनं त्यातून दाखवला . पुढे मजकूर प्रकाशित करतांना ते बदल तिने केले किंवा नाहीत , हे मी बघितलं नाही कारण अशा लेखनातलं लेखकाचं स्वातंत्र्य मान्य असणारा संपादक माझ्यात  होता, अजूनही आहे  . तो मजकूर पुढे प्रकाशित झाला . गाजला . ही एकच वेळी हळवी असणारी  पण , दुसरीकडे त्याबाबत निर्विकारपणा  दर्शवणारी ही  बाई ‘कुछ तो बन के रहेगीही’ याची खूणगाठ  त्या भेटीनंतर मी मनाशी बांधली आणि पुढे घडलंही तसंच !

मग सुरेखा , मंगला आणि माझ्यात संवाद सुरु झाला . मंगलाप्रमाणे सुरेखाही माझ्यापेक्षा वयानं मोठी पण , जीभेला ‘अरे-तुरे’ पडलेलं वळण पत्रकारितेतून  आलेल्या कोडगेपणाच्या संवयीनं मी बदललं नाही . नंतर आकाशवाणीच्या वृत्त विभागात सुरेखाची बदली झाली . आमच्यातल्या भेटी नियमित वाढल्या . विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात घर , दोन मुलांचं संगोपन , शिक्षण , नोकरी , अशी सुरेखाची बरीच धावपळ आणि ओढाताणही होत असे . ते लक्षात आल्यावर प्रश्नोत्तरे आणि शून्य प्रहरातील कामकाजाच्या नोट्सची मदत मी तिला करत असे . त्यामुळेही आमच्यातल्या गप्पा वाढल्या . मात्र माझी मदत सहानुभूती म्हणून न स्वीकारण्याचा करारीपणा तिच्यात होता . तो व्यक्त करतांना हट्टीपणा सदृश्य स्पष्टपणा तिनं दाखवला हा भाग वेगळा .

जगतांना वाट्याला आलेलं टिकलीएवढं दाह आभाळाएवढं करुन उमाळे काढणारे समाजात पायलीला पन्नास मिळतील ; सुरेखात मात्र आभाळभर दाह  सोसल्याची टिकलीही दिसली नाही . तिच्यात दिसायची ती लढण्याची अव्यक्त जिद्द . तिला कधी मी म्लान बघितल्याचं आठवत नाही .  संपन्न घरातून आलेल्या आलेल्या सुरेखाच्या वाट्याला अचानक कांटेरी संघर्ष आला . घर सोडावं लागलं . वर्किंग वुमेन हॉस्टेलमध्ये राहावं लागलं . सेल्स वुमन म्हणून दारोदार हिंडावं लागलं . वयाच्या २३व्याच वर्षी प्रेमविवाह झाला पण , तो दाहक ठरला . दरम्यान दोन मुलं झालेली . शिक्षण अर्धवट सुटलेलं . धक्क्यातून स्वत:ला सावरत  तिनं आधी कला शाखेत , मग पत्रकारितेत पदवी आणि मग पदव्युत्तर पदवी  संपादन   केली , पीएच . डी . केलं . या काळात आमच्या भेटी होत असत . भेटल्यावर बोलतांना परस्परांविषयी आत्मीयता आणि सन्मान कायमच असे .

याच काळात सुरेखानं मराठी , हिन्दी , इंग्रजीत विपुल स्तंभ तसंच ललित लेखन केलं . कांही कथाही लिहिल्या . तिच्या लेखनातली तरलता वाखाणण्यासारखी आहे . भाव जीवनाचे सूक्ष्म कंगोरे आणि ताण-तणाव  व्यक्त होतं असले तरी लेखनात कटुता किंवा/आणि सूडभाव नाही . त्यामुळे ते लेखन वाचतांना एक प्रकारची प्रसन्नता वाटते . एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक थोरा-मोठ्यांशी तिच्या ओळखी होत्या पण , त्याचा गैरवापर तिनं केल्याचं ऐकण्यात आलं नाही . विशेषत: प्रख्यात लेखिका अमृता प्रीतम यांच्याशी तिची ‘माँ’ म्हणून घट्ट नाळ होती आणि त्याबद्दल मराठी-हिन्दी साहित्य जगतात अपरिहार्य असूयाही होती . मात्र , पत्रकारिता आणि साहित्यिक जगतातील टिवल्या-बावल्या , गटबाजी , कळप यापासून लांब रहात  सुरेखा संसार , लेखन आणि करियर यात आकंठ बुडालेली होती .

ऑक्टोबर १९९६मधे माझी मुंबईला बदली झाली . तत्पूर्वी आमच्यात दीर्घ म्हणता येतील अशा दोन भेटी झाल्या . त्यानंतर अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या मुळीच संपर्कात नव्हतो . ‘लोकसत्ता’चा निवासी संपादक म्हणून माझी मार्च २००३मधे  नागपूरला बदली झाली . सुरेखा आवर्जून भेटायला आमच्या कार्यालयात आली . आम्ही भेटलो तेव्हा बाहेर वैशाख वणवा पेटलेला होता . सुरेखा रायपूरला जाण्याच्या तयारीत होती . ती आमची शेवटची प्रत्यक्ष भेट . कांही वर्षांनी ती कुलगुरु झाल्याचं समजलं  . छान वाटलं पण , माझ्याकडे असणारा तिचा नंबर बदललेला होता . त्यामुळे बोलणं झालं नाही .

असाध्य आजारपणाच्या शेवटच्या दिवसात संपर्कात नसलेल्या ज्या कांही मित्र-मैत्रिणींची याद बेगम मंगलाला आली , त्यात सुरेखाही होती . मंगला गेल्याचं समजल्यावर सुमारे सव्वा महिन्यानी सुरेखाचा फोन आला तेव्हाही बाहेर वैशाख वणवा पेटलेला होता , हा एक योगायोग . दोन-तीन वेळा भरपूर गप्पा झाल्या . कल्पनातीत , असह्य दाह सोसल्यावर एका मनस्वी , हळव्या स्त्रीचा झालेला अभिमानास्पद प्रवास समजला . आनंद झाला .

तीन स्वायत्त विद्यापीठाचं कुलगुरुपद तिनं सुमारे आठ वर्ष भूषवलं . हिन्दी , इंग्रजी आणि मराठीत भरपूर लेखन केलंय . कांही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत . अजून कांही लेखनाचे तिचे इरादे समजले . सुरेखा ठक्कर सध्या रायपूरला असते . टाळेबंदी उठली की ती नागपूरला शिफ्ट होणार आहे आणि ‘हम तो नागपूर की गलिया हमेशा के लिये छोड  आये है !’

-म्हणजे आता आमची भेट होण्याची शक्यता नाही…टाळेबंदीच्या या अजूगपणात ‘बहोत याद आये’ श्रेणीतल्या एका दोस्ताची नोंद लिहून पूर्ण झाली , हे समाधान मात्र नक्की आहे !

 ( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत  )

-प्रवीण बर्दापूरकर

( ७ जून २०२० )

Cellphone  ​+919822055799 ​praveen.bardapurkar@gmail.com​ / www.praveenbardapurkar.com

अक्षर लेखन- विवेक रानडे

( अजूग = एकाकी / एकटा / एकेरी / बेगुमान / आड-दांड अशा अनेक अर्थछटा असलेला आणि कालौघात बराचसा विस्मरणात गेलेला शब्द म्हणजे ‘अजूग’ . )

संबंधित पोस्ट