लेखक आणि संपादक 

|| नोंद …११ ||

प्रतिथयश कथा आणि ललित लेखिका , कौटुंबिक स्नेही , नागपूरच्या श्रीमती सुप्रिया अय्यर यांनी त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘काही शुभ्र कमळे’ हा ललित लेखांचा संग्रह बेगम मंगला आणि मला अर्पण केलेला आहे ( प्रकाशक – विजय प्रकाशन , नागपूर )  . नुकतंच हे पुस्तक हाती पडलं आणि संपादक नेमका कसा असावा यासंदर्भात थोडा संवाद साधावा असं वाटलं.

“ज्यांनी  माझ्याकडून  हे स्तंभ लेखन करवून घेतले

त्या श्री . प्रवीण बर्दापूरकर यांना

आणि

जिने माझ्या ‘खुळी बोगनवेल’ या कथेला

प्रथम पुरस्कार दिला ती माझी मैत्रीण

मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर हिला समर्पित” ,

असं अर्पण पत्रिकेत सुप्रिया अय्यर यांनी नमूद केलं आहे . ज्या संपादकांच्या काळात  प्रसिद्धी मिळते त्या संपादकांविषयी बहुसंख्य लेखक आणि स्तंभ लेखकांची काहींशी अशीच ममत्वाची किंवा आदराची किंवा क्वचित कृतज्ञतेची भावना असते , हे एक संपादक म्हणून नागपूर पत्रिका या दैनिकाच्या रविवार पुरवणीच्या संपादनाची जबाबदारी आली तेव्हापासून म्हणजे १९८२पासून , मला  जाणवत आलेलं आहे  . मात्र असं असलं तरी , एक संपादक म्हणून , अमुक एक लेखक/ कवी/कलावंत मी घडविला किंवा माझ्यामुळे तो प्रकाशात आला , अशी आग्रही भूमिका घेणाऱ्या संपादकाच्या पठडीतला मी  ( आणि बेगम मंगलाही ) कधीच नव्हतो , असणारही नाहीच .

वृत्तपत्र असो की कोणतं नियतकालिक , त्यासाठी उत्तम लेखन आणि ते करण्यासाठी उत्तम जाणीवेचा , कसदार लेखन करणारा लेखक/स्तंभ लेखक मिळणं  ही संपादकाची खरं तर अपरिहार्य गरज असते . पुरवण्यांमध्ये किंवा संपादकीय पानांवर प्रकाशित होणारं लेखन जर सकस नसेल , तो मजकूर नवा पैलू मांडणारा किंवा नवी दिशा देणारा नसेल , लेखनाची शैली सोपी व  प्रवाही नसेल तर त्या मजकुराला प्रसिद्धी मिळणार नाही . असा दर्जेदार मजकूर नसणार्‍या  वृत्तपत्राची वाचक संख्या कमी असणार , त्या वृत्तपत्र किंवा नियतकालिकाचा प्रभाव फारसा नसणार हे ओघानं आलंच . मात्र बहुसंख्य संपादक लेखक/स्तंभ लेखकांच्या बाबतीत ‘घडता/घडविता’ अशा ( अहंमन्य ! ) भूमिकेतून वागत असतात . नुकत्याच दिवंगत झालेल्या एका संपादकाला तर खाजगीत , मंतरलेल्या सोनेरी पाण्याच्या साक्षीनं “ग्रेसला मीच प्रकाशात  आणला” , असा दावा करतांना अस्मादिकांनी अनेकदा ऐकलेलं आहे . एकदा त्या संदर्भात कवीश्रेष्ठ ग्रेस यांना विचारलं तेव्हा काहींशा कडवट व उपरोधिकपणे ते  म्हणाले , “माझ्या कविताही त्यांनीच लिहिल्या असं ते म्हणाले नाहीत , हे काय कमी आहे देवा ?” लेखक/स्तंभ लेखकाचं लेखन वाचकांपर्यंत पोहोचवणारा आणि त्याच्या मजकुरावर कुशल पण , नेमके संपादकीय संस्कार करणारा मध्यस्थ म्हणजे संपादक असतो , अशी माझी धारणा आहे आणि ती समकालीन संपादकांच्या फळीतीलही अनेकांना अमान्य असल्यास त्याविषयी आश्चर्य वाटण्यासारखं कांहीच नाही .

बेचाळीस वर्ष मुद्रीत माध्यमांत विविध पदावर वावरल्याच्या अनुभवाच्या आधारे सांगतो , बहुसंख्य पत्रकार/संपादकांचा आणखी एक (गोड) गैरसमज असतो . पत्रकार/संपादक म्हणून आपण जे काही लिहितो ते ‘अक्षर ​वाङ्मय’ आहे ; ते ​लेखन वाचकांनी जशाला तसं स्वीकारलंच पाहिजे असा बहुसंख्य पत्रकार/संपादकांचा केवळ आग्रह नाही तर दुराग्रह असतो आणि ते त्याला चिकटून बसलेले असतात . यातला पहिला भाग असा की , पत्रकार/संपादक बातमीसह जे काही म्हणजे अग्रलेख , उपाग्रलेख , व्यक्तीवेध आणि अन्य  प्रासंगिक लेखन करतात ; ती त्यांची व्यावसायिक जबाबदारी म्हणा की बंधन            ( legitimate professional responsibility किंवा compulsion ) असतं . प्रत्येक पत्रकार/लेखकाला संपादकाला शब्दांची मर्यादा आणि कोणताही मजकूर देण्यासाठी डेडलाईन पाळावी लागते . माझा मूड नाही म्हणून आज मी लिहिणार नाही , असं प्रतिभावंतीय स्वातंत्र्य पत्रकार/संपादकाला कधीच घेता येत नाही . ते लेखन महत्वाचं नसतं असा याचा अर्थ मुळीच नाही . एखादी बातमी , घटना किंवा उद्भवलेल्या परिस्थितीवर पत्रकार/संपादक करतो ते भाष्य किंवा त्यानं घेतलेला वेध किंवा केलेली नवीन मांडणी इत्यादी लेखन महत्वाचं असतंच . तत्कालीन सामाजिक स्थितीचा , तत्कालीन समाज जीवनाचा तो हुंकार असतो आणि त्याला एक संदर्भयुक्त डाक्युमेंटेशन म्हणून खूपच महत्व असतं…च ,  हे मी मुळीच नाकारत नाहीये .

मात्र , पत्रकार/संपादकानं केलेलं लेखन सर्जनशीलतेचा हुंकार नसतो आणि लेखक/कवीचं ​वाङ्मय मात्र सर्जनाचा अविष्कार असतो . एखाद्या ओळीसाठी कित्येक महिने कवी तळमळत असतो किंवा कथाबीज नेमक्या शैलीत मांडण्यासाठी लेखक महिनो-महिने अस्वस्थ असतो कारण त्याचं लेखन मनाच्या गाभाऱ्यातून आलेला उच्चार असतो , लेखकाचा हात सर्जनशीलतेचं व्यवस्थापन करणारा असतो , अशी माझी धारणा आहे .  दुसरा भाग असा की , ज्या मातीत ज्ञानेश्वर आणि तुकाराम , फुले-आंबेडकर , टिळक-आगरकर होऊन गेले , त्या भाषेत केलेलं वृत्तपत्रीय लेखन ‘अक्षर ​वाङ्मय’ तर सोडाच किमान ​वाङ्मय आहे , हे मानणं हाही , एक बालसुलभ दुराग्रहच समजायला हवा , असंही मला वाटतं .

आणखी एक सांगायला हवं , समकालीन बहुसंख्य संपादकांमध्ये , त्यांना जेवढं ज्ञान आहे तेवढंच ज्ञान जगात अस्तित्वात आहे , असा एक भ्रम निर्माण झाल्याचं सातत्यानं दिसतं . माध्यमांसाठी असा समज असणारे संपादक अतिशय धोकादायक आहेत . खरं तर , ते अल्पज्ञानी आहेत आणि ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षांपर्यंत मजल मारु शकत नाहीत असा याचा अर्थ आहे , हे ते समजून घेत नाहीत . मध्यंतरी एक समीक्षक अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले . महाराष्ट्राच्या एका दूरच्या शहरात राहून लेखनाची ज्योत पेटवून ते एकाग्र चित्तानं समीक्षेची ( त्यांच्या समीक्षेचा पोत काय हा मुद्दा इथे नाही ! ) आराधना करत बसलेले होते . त्यामुळे ते सर्वज्ञात नव्हते . साहजिकच आपण लोकशक्ती असल्याचा      दावा करणाऱ्या वृत्तपत्रांच्या संपादक मंडळाला ते नाव ठाऊक नव्हतं , म्हणून या वृत्तपत्रानं कोण हे ‘अमुक-तमुक’ असा एक अग्रलेखच खरडून   ( का टायपून ? ) टाकला . संपादकांनी त्याच्या अज्ञानाचे असे दिवे पाजळले , तर त्यांच्या माध्यमांचा प्रभाव निर्माण होईल तरी कसा ?

२०१६मधली एक घटना सांगतो- इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहातील माझ्या एकेकाळच्या ज्येष्ठ सहकारी वसुंधरा पेंडसे-नाईक यांचं निधन झालं . लोकप्रभा या साप्ताहिकाच्या कार्यकारी संपादक पदावरुन निवृत्त झाल्यावर त्यांनी मुंबईच्या एका दैनिकाचं कार्यकारी संपादकपद काही काळ भूषवलं . वसुंधराबाईंच्या निधनानंतर मुंबईतून प्रकाशित झालेल्या संपादकीय मजकुरात ‘एखाद्या मराठी दैनिकाचं संपादकपद भूषवणा-या त्या पहिल्या महिला होत्या’ असे उल्लेख आले . तोपर्यंत , माझ्या माहितीप्रमाणे यमुनाताई शेवडे , लीलाताई परुळेकर , हेमा रसाळ , पुढे राजकारणात जाऊन आमदार व खासदार   झालेल्या , केंद्रात मंत्री झालेल्या सूर्यकांता पाटील , विद्याताई बाळ , ( पुढे माझी बेगम झालेली ) मंगला विंचुर्णे अशा अनेक स्रियांनी अनेक दैनिक /नियतकालिकाचं संपादकपद भूषविलं होतं . हे मुंबईच्या त्या वृत्तपत्रांच्या  संपादकांना मेलद्वारे मी कळवलं पण , कुणीही झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याचं सौजन्य दाखवलं नाही किंबहुना ‘कोण हा टिकोजीराव आम्हाला शिकवणारा ?’ अशी हेटाळणी करत माझ्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्षच         केलं . उद्या जर स्पर्धा परीक्षेत मराठी दैनिक/नियतकालिकांच्या पहिल्या स्त्री संपादक   कोण ? असा प्रश्न आला  , त्याचं उत्तर परीक्षार्थींनी मुंबईच्या वृत्तपत्रांत आलेले उल्लेख वाचून जर वसुंधरा पेंडसे -नाईक असं दिलं आणि परिक्षकांना जर नेमकं ऊत्तर माहिती असेल तर त्यांच्या कापल्या जाणाऱ्या गुणांचे प्रायश्चित हे अल्पज्ञानी संपादक कधीच घेणार नाहीत , हे उघड  आहे .

हा विषय मनात घोळत राहिला आणि त्यासंदर्भात एक पोस्ट मी फेसबुकवर टाकली . त्याला उत्तर देतांना ठाण्याचे पत्रकार संजय भालेराव यांनी कळवलेली माहिती अशी होती- कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरु केलेल्या ‘दीनबंधू’ या दैनिकाचं संपादकपद तानूबाई बिर्जे यांनी १९०६ ते १९१२ अशी तब्बल साडेसहा वर्ष सांभाळलेलं होतं . म्हणजेच माझीही माहिती पूर्ण बरोबर नव्हती . पुढे समजलं तानुबाई बिर्जे या केवळ मराठीतीलच नव्हे तर भारतातील पहिल्या स्त्री संपादक होत्या ! नागपूरचे गिरीश गांधी गेली अनेक वर्ष दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलच्या स्मृत्यर्थ  ‘स्मिता स्मृती वार्षिकांक’ प्रकाशित करतात . २०१६च्या  त्या अंकाचं संपादन गिरीश गांधी यांनी माझ्याकडे सोपवलं . मग हाच विषय घेऊन , गेल्या चार दशकात मराठी पत्रकारितेवर छाप उमटवणा-या महिला पत्रकारांच्या जडणघडणीचा आढावा घेणारा मजकूर त्यात समाविष्ट केला . संजय भालेराव यांनी लिहिलेलं तानुबाई बिर्जे यांच्या संबधीचं टिपणही त्यात आहे . पुढे हाच मजकूर सुधारित स्वरुपात पुस्तक रुपानं ‘माध्यमातील ती’ म्हणून देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केला . तानूबाई बिर्जे ते हलिमा कुरेशी असा मजकुराचा तो पट आहे . झाली चूक उमदेपणा दाखवत दुरुस्त न करणार्‍या तुच्छतावादी वृत्तीच्या संपादकांमुळे एखादं पुस्तक सिद्ध होण्याची ही मराठी साहित्य आणि पत्रकारितेतील पहिलीच घटना असावी !

संपादकाचं लेखन कितीही खरं/परखड/प्रांजळ असलं तरी त्या लेखनाचा प्रतिवाद करण्याचा अधिकार समोरच्याला असतो  शिवाय समोरच्याला त्याचं एक मतही असतं , ही जाणीव मला सर्वांत प्रथम करुन दिली ती दि . भा . उपाख्य मामासाहेब घुमरे यांनी . पुढे माधव गडकरी , कुमार केतकर , अरविंद गोखले यांच्यासारख्या संपादकांसोबत काम करताना ही जाणीव अधिक व्यापक व समंजस झाली . जर्नालिस्टिक लेखन आणि ​वाङ्मय यातील फरक अधिक स्पष्ट होत गेला . लेखकापेक्षा स्वत:ला वरचढ आणि श्रेष्ठ लेखकराव समजणार्‍या  मराठीतल्या विद्यमान बहुसंख्य पत्रकार/संपादकांवर असा चांगला संस्कार करणारे ज्येष्ठ भेटले नसावे , असं म्हणण्यास म्हणूनच भरपूर वाव आहे . अजून एक म्हणजे- संपादकांमध्ये संयमी श्रवणशक्ती असायलाच हवी आणि मी म्हणतो तेच खरं हा दुराग्रह नको . विद्यमान बहुसंख्य पत्रकार/ संपादकांमध्ये त्याऐवजी ‘अहो रुपम अहो ध्वनी’पणा आलेला आहे . माध्यमांच्या घसरत्या विश्वासार्हतेचं हेही एक कारण आहे .

आधी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या रविवार पुरवणीचा मग ‘लोकसत्ता’चा निवासी संपादक आणि नंतर नागपूर आवृत्तीचा  संपादक म्हणून अनेक लेखक आणि स्तंभ लेखकांशी संपर्क आला . विदर्भ आवृत्तीसाठी त्यातील अन्नेकांनी लेखन केलं, त्यासाठी त्यांच्याशी अनेकदा सल्ला मसलत करावी लागली , त्यांच्या लेखनावर संपादकीय संस्कार करावे लागले , याचा अर्थ मी त्यांना घडवलं किंवा त्यांचं ​वाङ्मय प्रकाशित करणारा उपकारकर्ता आहे , अशी माझी यत्किंचितही धारणा नाही . त्या-त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक संचिताला , नवोन्मेषी प्रतिभेला , चांगल्या ​वाङ्मयाला आणि लेखकाला प्रसिद्धी देण्याचं काम एक वारकरी म्हणून संपादकाचं असतं , ते मी केलं .

-सुप्रिया अय्यर यांच्या आधी वर्ध्याचे लेखक , समीक्षक , प्रकाशक डॉ . नवनीत देशमुख आणि नागपूरच्या डॉ . प्रमोद मुनघाटे यांच्यासह अन्य कांहीनी त्यांची पुस्तकं मला अर्पण करण्याचा उमदेपणा दाखवला आहे . प्रमोद मुनघाटे , नवनीत देशमुख नंतर आता सुप्रिया अय्यर यांनी ‘काही शुभ्र कमळे’च्या निमित्तानं मंगला आणि माझ्याविषयी अर्पणाची जी कृतज्ञता व्यक्त केली ती वर उल्लेख केल्याप्रमाणं ( बेगमच्याही वतीनं ) मी वारकरी घेतो तशा भक्तीभाव या अर्थानं घेतो .

( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत  )

-प्रवीण बर्दापूरकर 

( १० ऑगस्ट २०२० )

Cellphone  +919822055799 / www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट