राजकीय वृत्त संकलनाचं वळण !

〈 महात्मा गांधी मिशनच्या ‘गवाक्ष’ या गृह नियतकालिकाच्या दिवाळी अंकातील लेख- 〉

युष्य कधीच एका सरळ रेषेत नसतं . जगण्याच्या वाटेवर खाच-खळगे , चढउतार आणि अवघड वळणंही असतातच . जगण्याच्या या रस्त्यावरुन चालताना हे अडथळे कुणालाच टाळता येत नाहीत . काही वळणं वेदनादायक , काही कसोटी पाहणारे तर काही जगण्याला कलाटणी देणारे असतात . अशाच एका माझ्या पत्रकारितेला कलाटणी देणा-या वळणाविषयीचं हे कथन आहे .

वाचनाची आवड वयाच्या सातव्या – आठव्या वर्षांपासून आई म्हणजे , माईमुळे लागली . त्या सवयीतूनच लेखनाकडे कधी ओढला गेला हे समजलं नाही . सटरफटर       लिहिता – लिहिता कथा लेखन सुरु झालं . त्यातल्या कांही कथा प्रकाशितही झाल्या. काही कथा तर मान्यवर नियतकालिकांत समाविष्ट झाल्या . त्याबाबत थोडीफार चर्चा होऊ लागली . लेखनाचा आत्मविश्वास अंगात भिनू लागला . तेव्हा मी तेव्हाच्या बी अँड सी ( बिल्डींग अँड कन्स्ट्रक्शन ) आणि आताच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात रोजंदारीवर कारकून म्हणून काम करत होतो ; रोजी चांगला म्हणजे पावणे अकरा रुपये पगार होता आणि नोकरी कायम होण्याची पूर्ण शक्यता होती . याच दरम्यान आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रासाठी पांच-सहा कार्यक्रमांसाठी वृत्तांत लेखन केलं . ते काम खूप आवडलं . आपण  जर पत्रकारितेत गेलो तर याचा उपयोग कथा लेखनासाठी होऊ शकेल , प्रसिद्धीचे मार्ग आणखी सुकर होतील ,असं वाटू लागलं . आकाशवाणी या औरंगाबाद केंद्राचे वृत्त विभागाचे प्रमुख वसंतराव देशपांडे यांनाही  माझं काम आवडलं  . माझ्या अक्षरांवर तर ते फिदाच होते . पत्रकारितेकडे वाढलेला ओढा बघून त्यांनी  त्यांचे मित्र आणि गोव्यातील ‘गोमंतक‘ या वृत्तपत्राचे तत्कालीन प्रसिद्ध संपादक माधव गडकरी यांना एक चिठ्ठी दिली आणि माझा पत्रकारितेतला प्रवेश सुकर झाला . ते वर्ष होतं १९७७ .

‘माधव गडकरी स्कूलचा विद्यार्थी’ म्हणून घेण्यात आजही अभिमान वाटतो , इतका त्यांचा माझ्या पत्रकारितेवरचा संस्कार अमीट आहे . माधव गडकरी गोव्यात त्यानंतर फार काळ राहिले नाही . ते मुंबईला गेले म्हणून मीही गोवा सोडलं . पुढे कोल्हापूर , सातारा , चिपळूण मार्गे नागपूरला पोहोचलो आणि ‘नागपूर पत्रिका‘ या दैनिकात रुजू झालो . हे दैनिक सुरु होऊन ५ वर्ष झाली तेव्हा कार्यक्रमाला एखादा बडा पाहुणा बोलवावा असं ठरलं . त्या पाहुण्यांच्या यादीत माधव गडकरी यांचं नाव अग्रक्रमावर होतं आणि त्यांना कार्यक्रमासाठी राजी करण्याची जबाबदारी अर्थातच माझ्यावर होती . तेव्हा गडकरी मुंबई ‘सकाळ‘ चे संपादक होते . संपादक म्हणून ते महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय होते . त्यांच्या लेखणीला सत्ताधारी चळाचळा कापत . राजकारणासोबतच प्रशासन , समाजकारण , साहित्य , कला , संस्कृती असा त्यांचा चौफेर वावर होता . कुठेही गेले तरी त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडलेला असे , इतके ते अफाट लोकप्रिय होते . माधव गडकरी यांच्यामुळेच ‘मुंबई सकाळ’ नागपूरचा वार्ताहर म्हणून मी काम करत होतो .  ‘नागपूर पत्रिका‘  या दैनिकाच्या कार्यक्रमासोबतच विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनाचे प्रमख पाहुणे म्हणून माधव गडकरी यांचं नाव निश्चित करण्यातही मी पुढाकार घेतला . त्या कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाच्या ‘युवावाणी‘ या वाङमयीन नियतकालिकाचं प्रकाशन आणि कथा स्पर्धेचं पारितोषिक वितरण गडकरी यांच्या हस्ते होतं . त्या स्पर्धेत उत्कृष्ट कथालेखनाचं पारितोषक मला मिळणार होतं .

एक सत्कार विलासराव देशमुख यांच्या हस्ते !

विदर्भ साहित्य संघाचा कार्यक्रम संपल्यावर रात्रीच्या जेवणाच्या आधी रंगलेल्या ‘मंतरलेल्या सोनेरी पाण्या’सोबतच्या गप्पात कुणीतरी माझ्या कथेचा विषय काढला आणि माधव गडकरी माझ्यावर जाम भडकले . मला सांस्कृतिक क्षेत्राचं वृत्तसंकलन करण्यात रस आहे , हे त्यांना ठाऊक होतं , तोच धागा पकडून सांस्कृतिक जगत म्हणजे केवळ मराठी साहित्य नाही आणि  पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या बातम्या देणं म्हणजे आपल्याला सांस्कृतिक क्षेत्र कळलं असं समजणं निव्वळ अज्ञान आहे , असं गडकरी यांनी सर्वांसमक्ष मला झापलं . ‘साहित्यासोबतच संगीत , चित्र , शिल्प अशा विविध कला सांस्कृतिकतेत येतात . ते क्षेत्र खूप व्यापक आहे . साहित्यासोबत संस्कृती आणि संचिताचा अभ्यास कसा हवा , त्यावर लिहिता कसं आलं पाहिजे’ , वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं . मग समजावणीच्या स्वरात ते मला म्हणाले , ‘तुला विदर्भ आणि मराठवाड्याची चांगली माहिती आहे . मुंबईत तू काम केलेलं आहे . मुंबई – पुण्यात अजूनही तुझा वावर असतो . राज्याच्या राजकारणातले अनेक नेते तुला ओळखतात . राजकारणाची चांगली समज आहे , म्हणून तू राजकीय वृत्तसंकलनात आलं पाहिजेस ’. एवढंच नाहीतर मुंबई सकाळचे तेव्हाचे वृत्तसंपादक राधाकृष्ण नार्वेकर यांना लगेच फोन करुन यापुढे प्रवीणला पोलटिकल रिपोर्टर म्हणून घडवा . त्याला विधानसभा कव्हर करायला पाठवा वगैरे सूचनाच दिल्या . राधाकृष्ण नार्वेकर यांनीही ते म्हणणं गंभीरपणे घेतलं आणि मला घडवण्यास सुरुवात केली .

एक पत्रकार म्हणून आयुष्यात आलेलं हे सगळ्यात निर्णायक वळण होते . एक तर , माझं मत राजकारणविषयी चांगलं नव्हतं . कारण माई होती . ती नर्स होती आणि अतिशय लहान–लहान गावात तिच्या बदल्या होत . गावातले राजकारणी तिला कसा त्रास देत हे मी जवळून अनुभवलं होतं . एकदा तर एका पुढा-याचा जाच कमी व्हावा म्हणून ‘मराठवाडा’चे तत्कालीन संपादक अनंतराव भालेराव यांना साकडं घातलं होतं . त्यांनीही त्या पुढा-याचा चांगला बंदोबस्त केलेला होता . दुसरं म्हणजे कळत्या वयात

एका फुरसतीच्या क्षणी नितीन गडकरी , तत्कालीनउपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत

वृत्तपत्र वाचन आणि हिंदी – मराठी चित्रपटातून राजकारण्याच्या खलनायक म्हणून रंगवल्या जाणा-या प्रतिमा हेही एक कारण राजकीय वृत्त संकलनात रस नसण्याचं होतं . पण , माझा नाईलाज होता कारण राजकीय वृत्त संकलनाच्या क्षेत्रात यावं हा साक्षात माधव गडकरी यांचा आदेश होता . त्यांना नाही म्हणणं शक्य नव्हतं . नाही म्हटलं तर कदाचित गडकरी नाराज झाले असते , अशी भीती मला तेव्हा वाटली होती . पुढे १५/१६ वर्षांनी एकदा माधवरावांना हे भीती प्रकरण सांगितलं तेव्हा ‘’तुझ्यातलं राजकीय वृत्त संकलनातलं तोवर फारसं प्रकाशात न आलेलं कसब मी ओळखलेलं होतं .‘’ असं माधव  गडकरी म्हणाले .

याच दरम्यान आणखी एक महत्वाची घडामोड होत होती . पत्रकारितेत आल्यामुळे माझा कथालेखनातला रस बर्‍यापैकी कमी होऊ लागलेला होता . याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे व्यक्त होण्याच्या बाबतीत आपण मध्यमवर्गीय पांढरपेशा आणि अभावग्रस्त जगण्याच्या परिघात अडकलो असल्याचं जाणवू लागलं होतं . विशेषत: नागपूरला आल्यावर तर पत्रकारितेमुळे दररोज जे समोर येत होते , जे काही नवीन अनुभवायला मिळत होतं त्याच्यासमोर आपलं अनुभव विश्व फारच तोकडं आहे , याची खात्री पातळी होती . त्यामुळे आपल्या लेखनाला खूप सा-या मर्यादा येत आहेत , हे किमान स्वत:पुरतं तरी स्पष्ट झालेलं होतं .

राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आल्यामुळे माझ्या पत्रकारितेचं जगच बदलून गेलं . एका नवीन , अद्भुत विश्वात प्रवेश झालेला होता . त्यात खूप अनोळखी होतं . त्यामुळे आपल्या देशाच्या संसदीय लोकशाहीची चौकट समजली . संसद आणि विधिमंडळ कामकाज कव्हर करायला मिळाल्यामुळे संसदीय प्रथा , परंपरा , शिष्टाचार , नियम , घटना अशा अनेक बाबींबद्दल जाणून घेता आलं . मी मुळातचं उत्सुकतेनं चाळवलेला माणूस आहे .  कुठलाही नवीन संदर्भ मिळाला की त्याची माहिती मिळवण्याची उपजत ओढ मला  आहे . त्यामुळे संसदीय लोकशाही आणि आपल्या राज्याचं  आणि देशाचं राजकारण त्यातील खाचा खोचांसह समजत गेलं . राजकारणातल्या लोकांशी सलगी

‘नोंदी डायरीनंतरच्या’ आणि ‘दिवस असे की…’ या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यासोबत चा एक क्षण

निर्माण झाली तेव्हा लक्षात आलं की , सर्वच राजकारणी वाईट नसतात . नेते दिवसाचे २४ तास राजकारणातले डाव खेळण्यात मग्न नसतात . राजकीय डावपेच , कट–कारस्थानं आणि खेळ्या यांच्या पल्याड आपल्यासारखाच एक जीताजागता  माणूस लपलेला असतो . तो    आई–बाप , पती–पत्नी , मामा–काका , मुलगा–मुलगी अशा विविध नातेसंबंध तसंचं त्या भाव जीवनाशी आपल्यासारखचं जोडलेला असतो . सग्यासोय-यांच्या , प्रियजनांच्या आठवणींनी तो सद्गदित होतो आणि ते कायमचे दुरावले की त्याच्या डोळ्यांत अश्रूही तरळतात . आणखी एक भाग म्हणजे सहकार , शिक्षण , उद्योग अशा विविध क्षेत्रात अनेक राजकारण्यांची  कामगिरी उत्तुंग आहे .

सत्तेच्या दालनात वावरणं सुरु झाल्यावर प्रशासन कसं चालतं , कोणं चालवतं हेही पैलू कळले . सरकार आणि प्रशासन यातला फरक समजला . राजकीय वृत्तसंकलनात आल्यामुळेच अनेक निवडणुका कव्हर करता आल्या . त्यातून निवडणुकांचा बदलणारा बाज , मतांचा अनुनय , धन आणि गुंडशक्तीचा प्रभाव आणि वापर , या सर्वांतून आपल्या देशाच्या राजकारणाचं बदलत गेलेलं स्वरुप लक्षात येत गेलं . हे आकलन कधी धक्के देणारं , कधी सुन्न करणारं तर कधी हळवं करणारंही होतं . लेखनाच्या विषयाचा अवाका त्यामुळे वाढत गेला . मराठीसोबत हिंदी व इंग्रजीतही लिहिण्याची संधी मिळाली . त्याचेही अनेक लाभ झाले . पंतप्रधान , मुख्यमंत्री आणि मंत्र्यासोबत परिचय झाला , त्यांच्यासोबत वैपुल्यानं वावरता आलं . देशाचे दोन पंतप्रधान मला व्यक्तीश: पहिल्या नावाने ओळखत . राज्याच्या गेल्या ४२ वर्षांत एक वगळता सर्व मुख्यमंत्र्यांशी व्यक्तिगत संबंध निर्माण झाले . अनेक मंत्री , आमदार , खासदार तर दोस्त म्हणण्याइतके आणि एकमेकाला ‘अरे-तुरे’ करण्याइतके सलगीचे झाले . सनदी सेवेतील शकडो

‘डायरी’ या माझ्या पुस्तकाच्या मुंबईत झालेल्या प्रकाशन समारंभात उद्धव ठाकरे आणि कुमार केतकर यांच्यासोबत

अधिका-यांशी वैयक्तिक आणि अनेकांशी कौटुंबिकही संबंध निर्माण झाले .  त्या सर्वांच्या नजरेतून दिसणारा देश , देशाचा विकास , अर्थव्यवस्था , जनतेप्रती असणारी      ( आणि नसणारीही ! ) कळकळ , त्यांचे जडलेले बरे-वाईट हितसंबंध लक्षात आले . अनेक परदेशांना भेटी देता आल्या ; मधला दहा बारा वर्षांचा काळ तर असा आला की , दर चार सहा-महिन्यांनी माझा परदेश दौरा ठरलेला असे .  त्यातून राजकारण , प्रशासन व अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक भानही आलं . देशाच्या आणि राज्याच्या राजधानीसोबतच राज्याच्या उपराजधानीत ही काम करायला मिळालं . त्यामुळे राजकारण , समाजकारण आणि प्रशासनाचे बहुपेडी प्रवाह , त्यात गुंतलेले परस्पर आर्थिक , जातीय आणि धार्मिक पैलू लक्षात आले . त्यामुळे माझं लेखन एकाचवेळी टोकदार आणि आशयगर्भही झालं . लेखनातील विश्वासाहर्तेमुळे साल्झबर्ग सेमिनारसह कांही आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती मिळाल्या . असं खूप कांही सांगता येईल .

आता मागे वळून बघितलं की , कधी कधी इथंवर झालेल्या प्रवासाबद्दल चकीत व्हायला होतं  . लेखनातली अचूकता आणि विश्वासार्हता तसंच राजकारण आणि प्रशासनातील अफाट संपर्क , देश आणि परदेशांतील मुशाफिरी , यातून माझ्या अनुभवांची पोतडी दिवसें दिवस अधिकच भरत गेली . मी जर केवळ सांस्कृतिक बीटपुरता मर्यादित राहिलो असतो तर माझ्यातला  पत्रकार असा चौफेर झालाच नसता . यात एक उप पण , महत्त्वाचा मुद्दा असा की , व्यक्तिगत लाभ उठवण्याचा अल्पसाही प्रयत्न न केल्यामुळे प्रतिमा धवल आणि जरबेची राहिली .

हे सर्व करत असताना माझ्यातला वाचक आणि लेखकही जागरुक होता . त्यामुळे मराठी सांस्कृतिक जगताशी मी जोडला गेलेलो होतोच . त्या क्षेत्रात वावरत असतानाच सत्तेतील संपर्काचा वापर करुन अनेकांची अडली नडली  काम करुन देता आली , हेही एक खूप मोठं समाधान आहे पण , त्या कामाचा उच्चार न करणंचं इष्ट . ललित शैलीशी नाळ पक्की असल्यामुळे माझं राजकीय लेखन शुष्क न होता काहीसं सहज आणि प्रवाही शैलीत झालं . लोकांना आवडू लागलं . मोठा चाहता वर्ग मिळाला . हे सारं पैशात कधीच मोजता येणार नाही .

पत्रकार म्हणून राजकीय वृत्त संकलनाच्या वळणावर केवळ  माधव गडकरी यांच्यामुळे जाता आलं आणि असंख्य सहकार्‍यांच्या सहकार्यामुळे ते वळण यशस्वीपणे पार करता  आलं . माझ्यातला पत्रकार प्रगल्भ झाला , आकलन विस्तारलं , दृष्टी व्यापक झाली . या वळणावर आणून सोडल्याबद्दल माधव गडकरी यांच्याविषयी माझ्या  मनात कृतज्ञतेची ज्योत कायमच तेवती आहे .

( छायाचित्र सौजन्य – ‘क्लिक आर्ट’चे अमित बिरारी , औरंगाबाद . )

|| या संदर्भातील आणखी मजकूर‘ते भरजरी वार्कोहोलिक दिवस’ , लिंक- https://goo.gl/2eHKyq || ‘अजूगपणातल्या नोंदी … / ‘लेखक आणि संपादक’ , लिंक – https://bit.ly/3iujqK9 ||

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट