कथा निलंगेकरांच्या पीएच. डी.ची !

काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर  यांचं नुकतंच निधन झालं . राजकरणातल्या प्रदीर्घ खेळीत सत्ता आणि पक्षात अनेक महत्वाची पदं त्यांनी भूषवली . त्यांच्याशी माझी ओळख होती पण , सलगी कधीच नव्हती . कदाचित , पत्रकारिता करतांना माझं कायम मराठवाड्याबाहेर असणारं वास्तव्य किंवा आमच्या वयात असणारं मोठं अंतर त्यासाठी कारणीभूत असावं . पदाचा कोणताही रुबाब न दाखवता त्यांचं सर्वांशी ऋजू वागणं कायम स्मरणात आहे . एक पत्रकार म्हणून शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं पीएच. डी. प्रकरण ‘गाजवण्यात’ मात्र माझा सहभाग होता . ‘डायरी’ या माझ्या स्तंभात त्या संदर्भात २००७ साली लिहिलेली एक नोंद देत आहे- ( पुण्याच्या देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेल्या डायरी या पुस्तकात हा मजकूर समाविष्ट आहे .)

♦♦♦♦♦♦

राजकारणाच्या क्षितिजावर विलासराव देशमुखांचा उदय होण्याआधी शिवाजीराव निलंगेकर-पाटील एकेकाळी मराठवाड्यातलं बडं प्रस्थ होतं . प्रदीर्घ काळ मंत्रीपदापाठोपाठ मुख्यमंत्रीपद आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदही त्यांच्या वाट्याला आलं . ही दोन्ही सर्वोच्च पदं कोणतंही लॉबिंग न करता मिळवणारे शिवाजीराव हे काँग्रेसमधले एकमेव नेते असावेत . लॉटरी लागल्यासारखं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे चालत आलं आणि मुलीच्या वैद्यक परीक्षेत गुण वाढवण्यावरून झालेल्या वादातून ते त्यांनी गमावलंही . एकदा मुख्यमंत्रीपद गमावल्यावर मग मात्र निलंगेकरांचा प्रभाव मराठवाड्यात फारसा उरला नाही कारण , तोपर्यंत विलासराव देशमुख पुरेसे प्रबळ झालेले होते .

शिवाय सरळमार्गी राजकारण करणार्‍या शिवाजीरावांना राजकीय पटावरचे एकाच वेळी खेळावे आणि खेळवावे लागणारे डावपेच फारसे जमले नाहीत . तशी त्यांची वृत्तीही नव्हतीच . आपण बरं आणि आपलं काम बरं , अशीच मंत्री आणि मुख्यमंत्रीपदी असताना त्यांची कामाची शैली होती . त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपद भूषवूनही महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चा एखादा पक्षांतर्गत किमान प्रबळ गट त्यांना निर्माण करता आला नाही . शिवाजीराव निलंगेकर पाटलांची ही पीएच.डी.च्या सन्माननीय उपाधीची कथा आहे .

शिवाजीराव निलंगेकर पाटील डबल पोस्ट ग्रॅज्युएट . एम .ए . ची पदवी त्यांनी राज्यशास्त्र विषयात संपादन केली , तर त्याचवेळी एल .एल .बी .ची ही पदवीच संपादन केली . त्या काळी म्हणजे सुमारे ५०  वर्षांपूर्वी एम .ए . आणि एल . एल .बी  . या दोन्ही अभ्यासक्रमांना एकाच वेळेस बसता येणे , केवळ नागपूर विद्यापीठातच शक्य होते आणि या दोन्ही पदव्या एकाच वेळेस संपादन करण्यासाठी , हैद्राबाद सोडून शिवाजीराव निलंगेकरांनी नागपुरात त्या काळात वास्तव केले . लॉच्या परीक्षेत तर विशेष प्रावीण्य प्राप्त करण्यातही निलंगेकरांनी यश मिळविले होते , हे अनेकांना ठाऊकही नसेल . विद्यार्थीदशेच्या या काळात त्यांची प . ल . जोशी यांच्याशी मैत्री जुळली आणि ती आजही कायम आहे . एका वेगळ्या अर्थाने शिवाजीराव निलंगेकर आणि डॉ . प . ल . जोशी या दोन मित्रांची ही कथा आहे . कारण हेच डॉ. प. ल. जोशी पीएच . डी .च्या संशोधनासाठी निलंगेकरांचे मार्गदर्शक होते .

शिवाजीराव निलंगेकरांना मराठवाड्यातील राजकीय चळवळींबद्दल विशेष आस्था होती आणि ती शेवटपर्यंत कायमही राखली . स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यात ज्या काही राजकीय चळवळी झाल्या , त्यावर पीएच . डी .चं संशोधन करण्याचं त्यांनी ठरवलं . ते मंत्री असताना खरं तर , हे संशोधन करताना निलंगेकरांनी एखादा संशोधक विद्यार्थी जितका गंभीर असायला हवा त्याहीपेक्षा जास्त गांभीर्य दाखविलं पण  , त्यांची पीएच .डी .ची उपाधी , बातम्यांमधून चर्चेचा विषय , मी आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल शर्मांनी ठरवली . अनिल शर्मा तेव्हा ‘हितवाद’मध्ये होते आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’चेही प्रतिनिधी म्हणून काम करीत होते , तर मी ‘तरुण भारत’सोबतच ‘लोकसत्ता’चाही प्रतिनिधी म्हणून काम करीत होतो .

विद्यापीठात एक दिवस असंच फिरत असताना निलंगेकरांच्या पीएच.डी.ची बातमी सर्वप्रथम अनिल शर्माला मिळाली आणि मग आम्ही दोघंही त्या बातमीच्या अक्षरश: मागेच लागलो . एव्हाना डॉक्टरेट संपादन करून राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख असलेले प . ल . जोशी , तेव्हा नागपूर विद्यापीठाच्या राजकारणातले बहुचर्चित व्यक्तिमत्त्व होतं . त्यामुळे स्वाभाविकपणे निलंगेकरांच्या पीएच .डी .च्या बातमीला जितका मसाला लावला जाईल , तितका तो कमी पडत असे . खरं तर , निलंगेकरांनी रीतसर नोंदणी करून आणि नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ . मधुसूदन चान्सरकर यांच्याकडून सर्व मान्यता घेऊन ‘मराठवाड्यातील राजकीय जागृती , चळवळी आणि बदल’  हा विदषय संशोधनासाठी निवडला . प. ल. जोशी , त्यांचे  एकेकाळचे सहाध्यायी असल्याने हे संशोधन म्हणजे काहीतरी गोलमाल आहे, असेच वातावरण तेव्हा निर्माण झाले . याला कारणही निलंगेकरांचे मंत्रीपद आणि प. ल. जोशींचे विद्यापीठाच्या राजकारणात बहुचर्चित असणे कारणीभूत ठरले . त्यामुळे सेतुमाधवराव पगडींसारख्या तज्ज्ञाने निलंगेकरांच्या संशोधनाला मान्यता मिळाली आहे याचा विसर पडला , यात नवल काहीच नव्हते .

निलंगेकरांच्या पीएच.डी.च्या संशोधनाच्या प्रत्येक पातळीवर, आम्ही बातमी हुडकून काढत असू. डॉ . प . ल. जोशी गांभीर्यपूर्वक त्याची माहिती आम्हाला देत असत आणि मीठमसाला लावून आम्ही त्या बातम्या देत असू . निलंगेकर नुसताच आव आणत आहेत, असाच सूर आम्ही बातम्यांमधून आळवत असू . संशोधनाच्या शेवटच्या टप्प्यात तर शिवाजीराव निलंगेकरांनी मंत्रीपदाचा आब विसरु न हैदराबादच्या विद्यापीठात बारा-पंधरा दिवस बसून, एखादा विद्यार्थी काढतो त्याप्रमाणे नोटस् काढल्या . नंतर सेतुमाधवराव पगडी आणि उत्तर प्रदेशातील इतिहासाचे एक जाणकार डॉ. श्रीवास्तव यांनी या संशोधनाची सूक्ष्मदर्शक यंत्र लावून चिरफाड केली आणि मगच त्याला मान्यता दिली . या पीएच.डी.ची तोंडी मुलाखत जी झाली, तीही शिवाजीराव निलंगेकरांनी अतिशय गंभीरपणे दिल्याचे त्यावेळी सांगितले गेले . मुलीच्या गाजलेल्या गुणवाढ प्रकरणाचा संदर्भ देऊन , आम्ही निलंगेकरांची पीएच . डी . वादग्रस्त ठरवली . कारण एव्हाना त्या गुणवाढीच्या वादाचा फटका बसून निलंगेकरांचे मुख्यमंत्रीपदही गेलेले होते . अखेर १९८६ मध्ये नागपूर विद्यापीठाने शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचा संशोधन-प्रबंध रीतसर स्वीकारला आणि त्यांना पीएच . डी .ची सन्माननीय उपाधी बहाल केल्याची अधिसूचना जारी केली .

मात्र , या सन्माननीय प्रतिष्ठेच्या उपाधीचा आणि त्यासाठी गंभीरपणे केलेल्या संशोधनाबद्दल, स्वत: शिवाजीराव निलंगेकर पाटीलच नंतरच्या काळात फारसे गंभीर राहिले नाहीत . ती उपाधी महाराष्ट्राच्याच नाही तर शिवाजीरावांच्याही जणू विस्मरणात गेली . पीएच .डी .ची सन्माननीय उपाधी जाहीर झाल्यावर सुरुवातीचा काही काळ , त्यांचा उल्लेख मी मुद्दाम ‘डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर गायकवाड’ असा करीत असे . नंतर नंतर एवढे लांबलचक नाव लिहिण्याचा मलाही कंटाळा येऊ लागला आणि शिवाजीराव निलंगेकर असा सुटसुटीत उल्लेख पुन्हा सुरु झाला. नंतर विधानसभेच्या काही निवडणुका त्यांनी लढवल्या. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले . त्यांच्यावर आलेली सर्व राजकीय किटाळेही दूर झाली . तरीही आपल्या नावापुढे ‘डॉ.’ असा सन्माननीय उल्लेख त्यांनी कधीच येऊ दिला नाही . त्यांनी त्यांचे जसे गायकवाड हे आडनाव विस्मरणात जाऊ दिले , तसेच त्यांच्या पीएच.डी.बद्दलही घडले .

या बातम्या आम्ही निष्कारण ‘वाजवल्या’ त्याबद्दलही खेदाचा एखादा साधा शब्द निलंगेकरांनी अनेकदा भेटी होऊनही कधी व्यक्त केला नाही . उलट १९९८मध्ये ‘लोकसत्ता’चा औरंगाबाद प्रतिनिधी म्हणून बदली झाल्यावर निरोप पाठवून, आठवण ठेवून त्यानी मला सिंचन खात्याच्या विश्रामगृहावर बोलावून घेतले. औरंगाबाद येथील काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची आवर्जून ओळख करुन दिली आणि ‘मराठवाड्यातील पत्रकार महाराष्ट्र पातळीवर पोहोचतो आहे तर त्याला मदत करा ,’ असेच त्यांना सांगून उमेदपणाचा एक वेगळाच परिचय शिवाजीरावांनी करून दिला . पीएच.डी. कधीच विस्मरणात गेली .

पुढे  निलंगा तालुक्यात शिवाजीराव निलंगेकर यांचा एकछत्री अंमल उरलेला नाही . त्यांच्या साम्राज्याला त्यांच्या आप्तस्वकीयांनीच भाजपच्या कमळाचे देठ धरुन , केवळ सुरुंगच लावला नाही; तर त्या साम्राज्याची शकलेही केलेली आहेत .

♦♦♦♦♦♦

शेवटी – या नोंदीत उल्लेख असलेले डॉ . मधुसूदन चान्सरकर , डॉ . प . ल. जोशी , पत्रकार अनिल शर्मा यांचं निधन झालेलं आहे तर आता शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही या जगाचा निरोप घेतला आहे आणि ही नोंद लिहिणारा…

-प्रवीण बर्दापूरकर

​Cellphone  ​+919822055799 /

www.praveenbardapurkar.com / praveen.bardapurkar@ gmail.com

संबंधित पोस्ट