राजकारणातला सुसंस्कृतपणा गेला कुठे ?

महाराष्ट्रातील बहुसंख्य राजकारण्यांची बेताल , असंस्कृत ‘मुक्ताफळं ‘ ऐकताना  उबग आल्यानं जे कांही आठवलं ते म्हणजे हा मजकूर आहे – 

ळवळीची पार्श्वभूमी घेऊन पत्रकारितेत माझा प्रवेश झाला तो            १९७७ साली म्हणजे , त्याला आता साडेचार दशकं  पूर्ण झाली . १९१८० पासून विधीमंडळ वृत्तसंकलनाला सुरुवात झाली आणि १९८२-८३ साली ज्येष्ठ  संपादक माधवराव गडकरी यांनी मला राजकीय वृत्त संकलनाच्या क्षेत्रात अक्षरक्ष: ढकललं . तेव्हा मी  ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर तसंच ‘मुंबई सकाळ’ आणि ‘सकाळ’चा वार्ताहर होतो . लोकसत्ता तेव्हा मराठीतील सर्वाधिक खपाचं दैनिक होतं आणि तिथे मी सुमारे ३० वर्ष आणि प्रामुख्यानं राजकीय बीटमधे स्थिरावलो . नंतर लोकमत वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून नवी दिल्लीतही काम केलं .  महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर , राजधानी मुंबई , देशाची राजधानी दिल्ली अशा , सतत राजकीय घडामोडी घडत असलेल्या शहरात काम करायला मिळालं .  खरं तर , राजकारणाच्या परिघाबाहेर जाऊन भरपूर लेखन केलं तरी , माझी प्रतिमा मात्र कायमच एक राजकीय वृत्त संकलक/भाष्यकार  ( पोलिटिकल रिपोर्टर/कमेंटेटर  ) अशीच प्रामुख्यानं झाली . अलिकडची पांच वर्षे सोडली तर मी पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात नाही म्हणजे ही वर्ष सोडली तर सोडली तर राज्य आणि देशाचं राजकारण एक पत्रकार म्हणून मला अनुभवता आलं आहे ; सत्तेच्या दालनात , अनेक राजकारण्यांच्या अंतर्गत गोटात वावरत आलं आहे . या अनुभवाअंती लक्षात येतं आहे की , ‘Democracy is Government by Discussion’  असं जॉन स्टुअर्ट मिल  या विचारवंतानं  म्हटलं आहे , पण आपल्या लोकशाहीतला संवाद हरवला आहे , माजला आहे तो नुसता कर्णकर्कश्श कलकलाट…शिवाय सध्या राजकारणाचा ढळलेला तोल , वाढलेली मग्रुरी , राजकारण्यांचा  चंगळवाद  आणि राजकारणातील हरवलेला सुसंस्कृतपणा कुणाही संवेदनशील लोकशाहीवाद्याला फारच अस्वस्थ करणारा आहे .

केशवराव धोंडगे

केशवराव धोंडगे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी व्यक्तिमत्व . विधिमंडळ आणि संसदेतही प्रदीर्घ काळ वावरलेले केशवराव  ‘मण्यारचा वाघ’ ते ओळखले जात . वयाचं शतक गाठलेल्या केशवराव धोंडगे यांची त्यांच्या शेवटच्या आजारपणात रुग्णालयात भेट झाली तेव्हा हा मण्यारचा वाघ थकला  होता . त्या भेटीत सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं ? या माझ्या प्रश्नाला केशवरावांनी तत्परतेनं  साभिनय उत्तर दिलं . ‘राजकारणाबद्दल बोलण्यासारखं आता काहीच नाही . बोलणं बंदच करायला पाहिजे . उत्तर एकच .  तोंडावर हात आणि कानावरही हात , हेच आजच्या राजकारणावरचं उत्तर आहे’ , असं केशवराव म्हणाले होते . ( त्या भेटीबद्दल अधिक माहितीसाठी – https://bit.ly/3CiTIE3 )

महाराष्ट्राच्या राजकारणातले आणखी एक वादळी एक ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्याशी मध्यंतरी फोनवर गप्पा झाल्या . ( नुकतंच बाबनराव ढाकणे यांचं निधन झालं…)  जुन्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला आणि विषय आताच्या राजकारणावर आला . काय वाटतं सध्याच्या राजकारणावर ,  या प्रश्नाला उत्तर देताना पटकन बबनराव ढाकणे म्हणाले , ‘चिंता वाटते .’ राजकारण्यांची भाषा , वागणं , राहणी आणि मग्रुरी यावर मग बबनराव बराच वेळ बोलत राहिले ; त्यात कळकळ होती , तळमळ होती आणि चिंताही . सध्याच्या राजकारणाचा स्तर खरंच  इतका खालावला आहे की , बबनरावांच्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे . राजकारण म्हटलं की , आरोप – प्रत्यारोप होणारच , सत्ताधारी आणि विरोधकांत राजकीय कलगीतुरा रंगणारच पण , मनुष्य आणि प्राण्यांचे अवयव तसंच असंसदीय भाषा तेव्हाच्या राजकारणात खरंच नव्हती .
बबनराव ढाकणे यांच्याबद्दल तरुण पिढीला थोडं सांगायला हवं . राजकारणातला त्यांचा प्रवास पाथर्डी पंचायत समितीचे

बबनराव ढाकणे

सदस्य ते केंद्रीय मंत्री अशा भरारीचा आणि चार दशकांचा आहे . ते राज्यात आणि केंद्रातही काही काळ मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते . आवर्जून सांगायचा मुद्दा म्हणजे अतिशय आक्रमक म्हणून बबनराव ओळखले जात . अहमदनगर जिल्ह्यातल्या दुष्काळी पाथर्डी तालुक्यात विकास कामे सुरु व्हावीत म्हणून बबनरावांनी विधान सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली होती . जनतेच्या प्रश्नासाठी असं काही करणारे बबनराव देशातले पहिलेच . उडी मारुन ज्या सभागृहात त्यांनी प्रवेश केला त्याच विधानसभेचं सदस्यपद आणि उपाध्यक्षपद त्यांनी नंतर भूषवलं . विधानसभेत मंडल आयोगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार राजी होत नव्हतं , तेव्हा बबनराव चक्क सभापतींच्या आसनासमोरील राजदंड घेऊन पळाले होते ; इतके ते आक्रमक होतं . पण , तेव्हाचे राज्यकर्तेही सुसंस्कृत होते . बबनराव ढाकणे यांनी विधानसभेत उडी मारली ती तारीख होती ८ जुलै १९६८ . ( तो संदर्भ बोलतांना काढला तेव्हा पंच्याऐंशी वर्षांच्या असलेल्या   बबनरावांनी पटकन ही तारीख सांगितली ! ) बबनराव ढाकणेंना पाच दिवसांच्या कारागृहाची शिक्षा झाली पण , महत्त्वाचं म्हणजे सभागृहात त्यावर फार गंभीर चर्चा झाली आणि प्रशासनाला खडबडवून जाग आणण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले . लक्षात घेतलं पाहिजे की , बबनरावांची ही आक्रमकता जनतेच्या प्रश्नासाठी होती , स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी नाही . ( अधिक माहिती – http://blog.praveenbardapurkar.com/?p=99015 )

शब्दांच्या धडाडत्या तोफांतून मारा करुन  सभागृह आणि मैदानी सभा गाजवणारे आचार्य अत्रे ,  त्यांचे विरोधक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , ( मात्र , बाळासाहेब ठाकरे कधीच कोणत्याही संवैधानिक सभागृहाचे सदस्य नव्हते ) जांबुवंतराव धोटे , केशवराव धोंडगे , प्रमोद नवलकर , एन . डी  . पाटील , छगन भुजबळ , मृणालताई गोरे , अहिल्या रांगणेकर , मनोहर  जोशी ,  गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते सभागृहात पाहता आले ; त्यांचा सुसंस्कृतपणा अनुभवता आला आणि जनतेप्रती त्यांच्या हृदयांच्या गाभाऱ्यातून आलेल्या  कळकळीची आणि क्वचित क्रोधाहीही  प्रचीती घेता आली . वसंतदादा पाटील , वसंतराव नाईक , शंकरराव चव्हाण ,  ( तेव्हाचे ) शरद पवार , सुधाकरराव नाईक , विलासराव देशमुख अशा अनेक सत्ताधारी नेत्यांचा आणि त्यांच्या मंत्री मंडळातील बहुसंख्य सहकाऱ्यांचा सुसंस्कृतपणाही डोह खोल  होता . मंत्रीपद भूषवलेल्या शेषराव वानखेडे , राफीक झकेरिया ,  शिवराज पाटील चाकुरकर , सुधीर जोशी , शंकरराव गेडाम , सुंदरराव साळुंके , शंकरराव गेडाम , नितीन गडकरी , दिग्विजय खानविलकर , आर. आर. पाटील , भारत बोंद्रे…अशी किती तरी नावं या संदर्भात घेता येतील .
आठवल्या म्हणून या निमित्तानं आणखी काही जुन्या आठवणी सांगायला हव्यात . ‘विदर्भवीर’ म्हणून ओळखले जाणरे जांबुवंतराव धोटे हेही खूप आक्रमक नेते होते . ( अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2Ig9JA3  ) स्वतंत्र विदर्भाची त्यांची भूमिका मला साफ अमान्य होती तरी आमच्यात पुढे चांगलं सूत  जुळलं.  जांबुवंतरावांचं नेतृत्व जनतेच्या

जांबुवंतराव धोटे

कळवळ्यानं ओसंडून वाहणारं होतं . वारांगणांच्या समस्या ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू  तराळले . त्या समस्यांच्या निराकरणासाठी  धाऊन जाणारे जांबुवंतराव धोटे  हे पहिलेच राजकीय नेते . तेव्हा विधि मंडळाच्या सभागृहात सदस्याच्या मेजावर लांब दांडी असणारा ध्वनिक्षेपक तसंच पेपर वेटसह कागद , पेन्सिल अशी स्टेशनरी असे . विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर जांबुवंतरावांच्या आक्रमकतेचा फटका माईक तुटण्यातही झाला होता . एकदा तर त्यांनी जनतेला न्याय मिळत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं पेपरवेटही भिरकावला होता . ते प्रकरण खूप गाजलं ; जांबुवंतराव धोटे यांचं सदस्यत्व काही काळासाठी निलंबित करण्यात      आलं .  या घटनेनंतर  सदस्यांच्या मेजावरचे माईक पक्के करण्यात आले . तसंच स्टेशनरीसारख्या सहज उचलता येण्याजोग्या वस्तूही गायब करण्यात आल्या . सरकार आणि विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री , जांबुवंतराव यांच्याच यवतमाळ जिल्ह्याचे वसंतराव नाईक हे जांबुवंतरावांचं आवडत लक्ष्य होतं . अतिशय कडक आणि जहरी शब्दांत जांबुवंतराव त्यांच्यावर हल्ले चढवत . मात्र वसंतराव नाईक यांनी त्यांचा सुसंस्कृतपणा कधीच सोडला नाही म्हणजे जांबुवंतरावांना विरोधकच मानलं , शत्रू नाही . जाबुवंतराव धोटे यांच्या मातोश्री गंभीर दुखणं घेऊन रुग्णालयात दाखल झाल्या तेव्हा त्यांची विचारपूस करायला मुख्यमंत्रीपदाचा कोणताही गाजावाजा न करता भेटीला जाण्याचा सुसंस्कृतपणा वसंतराव नाईक यांनी दाखवला तेव्हा जाबुवंतराव चकीतच झाले होते .

आणखी एक हृद्य हकीकत आहे आणि ती माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून अनेकदा ऐकलेली आहे– विधानसभेत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  सरकार विरुद्ध विशेषत: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी जुगलबंदी त्या काळात रंगलेली होती . आचार्य अत्रे अति आक्रमक आणि सरस्वती पुत्र त्यामुळे त्यांच्या भात्यातून एक एक जहरी शाब्दिक बाण असा काही सुटत असे की , सत्ताधारी प्रतिवादही करु शकत नसत . एकदा बोलण्याच्या ओघात यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भात एक वावगा शब्द      ( निपुत्रिक )आचार्य अत्रे यांच्या तोंडून निघून गेला . तो शब्द यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी वेणूताई यांच्या जिव्हारी लागला . आपण निपुत्रिक का आहोत आणि त्याला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी कशी आहे हे, ( यशवंतरावांच्या वतीने ) आचार्य अत्रेंना कळवण्यात आलं . ते ऐकल्यावर अत्रे खजील झाले  . तडक उठून यशवंतरावांच्या घरी जाऊन यशवंतराव आणि वेणूताई यांची आचार्य अत्रे यांनी (असं म्हणतात की हात जोडून ) दिलगिरी व्यक्त केली . या पुढची हकीकत अत्यंत हृद्य  आहे , चव्हाण दांपत्यांनी त्यांना माफ तर केलंच पण , पुढे जाऊन वेणूताई चव्हाण यांनी ‘मला एक भाऊ भेटला’ , अशा शब्दांत त्या कटू प्रसंगावर कायमचा पडदा टाकला .
हा सुसंस्कृतपणा , वर्तनातला दर्जा हा असा एकेकाळी आपल्याकडच्या राजकारण्यात वैपुल्यानं होता . कारण

ज्यांनी कधी सुसंस्कृतपणा सोडला नाही असे महाराष्ट्राचे दोन नेते- यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक .

आक्रमकता म्हणजे आततायीपणा , उतावीळपणा , उठावळपणा , वाचाळपणा , शिवीगाळ एवढंच नाहीतर कंबरेच्या खाली वार करणं नव्हे , याचं पक्कं भान राजकारणातल्या लोकांना होतं . यातले अनेक राजकारणी अल्पशिक्षित होते पण , त्यांची सुसंस्कृतपणाची पातळी अतिशय उच्च दर्जाची होती . काही राजकारणी अतिशय निश्चितपणे ‘माडी’चढणारे आणि ‘ताडी’ चढवणारेही होते पण , त्या संदर्भात बोभाटा न होऊ देण्याचं भान त्यांच्यात होतं . ‘द्वितीय पात्र’ समाजात उघडपणे मिरवण्याचा आणि त्याचं समर्थन करण्याचा निलाजरेपणा त्यांच्यात आलेला नव्हता . थोडक्यात नैतिकता , मानवी मूल्य आणि सुसंस्कृतपणा असा त्रिवेणी संगम त्या काळच्या बहुसंख्य राजकारण्यात होता आणि त्या नेत्यांच्या वर्तनाची मोहिनी लोकांच्या मनावर होती . म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली होणारं आंदोलन असो की सभा ( हजेरीचे पैसे न घेता ) लोक हजारांनी सहभागी होत . बबनराव ढाकणे , जांबुवंतराव धोटे , केशवराव धोंडगे , एन . डी  . पाटील,  विठ्ठलराव हांडे , मृणाल गोरे , अहिल्याताई रांगणेकर , अशा अनेक  नेत्यांनी  काढलेल्या मोर्च्यात अनेकदा दहा-वीस हजार लोक असत  पण , त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना कधी दंडुका उभारावा लागला  नाही . नेत्यानं  उच्चारलेला एक शब्द आणि बोटाने केलेला इशारा ती गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी पुरेसा असायचा .
अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते हे खरं असलं तरी , जेव्हा अध:पतन व्यक्तीगत किंवा सामूहिक पातळीवर इतक्या प्रचंड वेगानं होतं तेव्हा , कुणीही विवेकी आणि संवेदनशील माणूस साहजिकच अस्वस्थ होतो पण , यापेक्षाही जास्त गंभीर असतं ते येणार्‍या/नवीन पिढीच्या मनात त्याविषयी निर्माण होणारा  तिरस्कार किंवा घृणा . मतदानाच्या न वाढणार्‍या टक्केवारीला हेही एक कारण असावं  आहे . निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत , शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील , विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदानापासून जर दूर राहिला तर त्यांना दोष देणार तरी कसा ? तेव्हाचं म्हणजे सुसंस्कृत राजकारण का लोप पावलं यांची दोन कारणं आहेत .
राजकारण करियर झालं . निवडणूक ‘इव्हेंट’ झाली आणि ती इव्हेंट यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक आले ; दुसऱ्या भाषेत त्यांना मॅन्युप्लेटर्स म्हणता येईल  . सत्ता प्राप्ती हाच मूळ उद्देश झाला . सत्ता आली म्हणून  पैसा आला . त्यासाठी लपवाछपवी , ‘तोडपाणी’ आलं . त्यापाठोपाठ आला तो सत्ता आणि पैशाचा माज . या माजामुळे कर्कश एकारलेपणा आणि टोकाचा कडवेपणा आला .  यात सुसंस्कृतपणाला जागा उरली नाही आणि मग त्या  माजातून आली ती मग्रुरी . एक मारेन , थोबाड फोडेन , कानपटात लगावेन , कुणाचे तरी गाल , अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेले वळू आणि त्याला प्रत्युत्तर देताना म्हसोबाला सोडलेले बोकड , अशी भाषा आली . शिव्या ‘लाईव्ह’ दिल्या जाऊ लागल्या आणि सज्जनांनी शरमेनं मान खाली घातली . ही आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय  संस्कृतीची वाटचाल.राष्ट्रीय पातळीवर खुनी , तू चोर-तुझा बाप चोर , दरोडेखोर , जल्लाद , मौत-का-सौदागर , मांड्या , महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचे रंग…अशी किती उदाहरणे द्यायची ? सत्ताधार्‍यांनी जात आणि धर्माचा वापर प्रचार आणि उमेदवार निवडताना केला असा दावा करणार्‍या विरोधी पक्षांनी काय कमी दिवे पाजळले आहेत ? नागपूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीला कुणबी व कोष्टी विरुद्ध ब्राह्मण , शिरुर मतदार संघात मराठा विरुद्ध माळी असा रंग देणारे , यज्ञ आणि धार्मिक विधी जाहीरपणे करणारे ‘वाचाळेश्वर’ दिग्विजयसिंग  शहरो-शहरी दिसू लागले आणि अशांमुळे अब्रू गेली ती काँग्रेसची . एका मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला ‘पप्पू’ म्हणणं जितकं प्रचंड अशोभनीय व अवमानकारक आहे तेवढंच अशोभनीय व अवमानकारक देशाच्या पंतप्रधांनांना ‘फेकू’  आणि ‘चोर’ म्हणणं आहे ., हे आपल्या राजकीय अध:पतनाचं केवळ राज्यस्तरीयच नव्हे तर राष्ट्रीयही कुरुप स्वरुप झालेलं आहे .

आपण बहुसंख्य मतदारांच्या मनात बहुसंख्य राजकारण्यांविषयी तिरस्कार आहे , काहीच्या मनात घृणाही पण , आपण या दिव्य लोकांना मतदान का करतो , चांगल्या उमेदवारांना निवडून का देत नाही , यासंदर्भात आपण बहुसंख्य कधीच किमानही गंभीर नसतो . आपण अनेक तर मतदानालाही जात नाही आणि राजकारणी कसे वाईट आहेत यांच्या पोस्ट समाज माध्यमांवर टाकण्यात धन्यता मानतो .

याच संदर्भात आहे म्हणून – उद्धव ठाकरे यांचा कायम  ‘सुसंस्कृत राजकारणी’ असा उल्लेख मी आजवर केलेला आहे ; आजवर जो काही संपर्क आला त्यावरुन उद्धव ठाकरे यांची ती प्रतिमा माझ्यासह अनेकांच्या  मनात निर्माण झालेली होती पण ते आणि आमचे एकेकाळचे पत्रकारितेतले सहकारी संजय राऊत यांनी भाषा संयम पूर्णपणे  सोडला आहे  . त्यांच्या सोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणे , जितेंद्र आव्हाड , अमोल मिटकरी , नितेश राणे  , अबू आझमी , गोपीचंद पडळकर  असे एकापेक्षा एक हुच्च राजकारणात दिसत आहेत . देशातील अशा सुमारे १०७ लोकप्रतिनिधीविरुद्ध ‘हेट स्पीच’ प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्यापैकी तब्बल ४२ ‘संस्कृती रक्षक’ भारतीय जनता पक्षाचे आहेत ! या अशा बहुसंख्य  राजकारण्यांमुळे , राजकारण म्हणजे केवळ आणि केवळ यथेच्छ शिवीगाळ असा समज वेगानं पसरतो आहे ; हा समज गडद देशव्यापी झाला तर उद्या लोक मतदानालाच न फिरकण्याची भीती आहे ; असं जर खरंच घडलं तर लोकशाहीत लोकच नसतील .

लोकशाहीतील सुसंवाद हरवत चालला आहे , सुसंस्कृपणा लोप पावत आहे , हे चित्र अस्वस्थ करणारं आहे  .

-प्रवीण बर्दापूरकर
भ्रमणध्वनी – ९८२२०५५७९९

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट