उडता पंजाब !

स्वामीप्रसाद मौर्य यांनी बसपाचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं जसं बिगुल फुंकलं तस्सच, फटकेबाजीसाठी ओळखला जाणाऱ्या जिगरबाज माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धूनं भाजपनं दिलेल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पंजाब विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाची सुरुवात केलीये. थोडंस विषयांतर करून सांगायचं तर, सिद्धूनं राज्यसभा सदस्यत्व आणि भाजप सोडण्याच्या निर्णयाचं दिल्लीच्या राजकारण्यांना आणि विविध माध्यमातील पत्रकारांना फारसं काही आश्चर्य वाटलेलं नाहीये.

पंजाबात भाजपची अकाली दलाशी युती आहे पण, अकाली दलाशी सिद्धूचा छत्तीसचा आकडा आहे. सिद्धू आणि त्याची आमदार असलेली पत्नी डॉ. नवज्योत कौर हे दोघेही अकाली दलावर कायम भडकलेले असतात. अकाली दलाच्या पाठिंब्याने भाजपचा उमेदवार म्हणून दोन वेळा अमृतसर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या सिद्धूच्या उमेदवारीला अकाली दलानं त्यामुळेच २०१४च्या लोकसभा निवडणुकीत टोकाचा विरोध केला. इतका विरोध की, भाजप-अकाली युती तुटण्याची वेळ आली. अखेर, त्या मतदार संघातून भाजपनं अरुण जेटली यांना उमेदवारी दिली आणि सिद्धूला राज्यसभेवर नियुक्त करण्याचं कबूल करून हा गुंता सोडवला; तरी जेटलींचा त्या निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी सिद्धूही जबाबदार असल्याची चर्चा झाली; होणारच होती कारण, ठिणगी पडल्याशिवाय धूर थोडीच निघतो? थोडक्यात, भाजपची सिद्धूवरची आणि नवज्योत सिद्धूची भाजपवरची नाराजी हे एक मुरलेलं लोणचं आहे ! आता ‘आप’मध्ये नसलेल्या पण, तेव्हा पक्षात खूप प्रभावी असलेल्या एका नेत्यानं, आम्हा काही पत्रकारांशी बोलतांना नवज्योत सिद्धूची पाऊलं ‘आप’च्या दिशेनं वळली असल्याचं सांगितलं होतं. त्या काळात तशा बातम्याही दिल्लीतील मिडियात प्रकाशित झालेल्या होत्या.

माझा एक डॉक्टर मित्र होता. एकाचवेळी धो-धो पैसा मिळवावा, राज्याच्या आरोग्य खात्याचं संचालक, आयएएस अधिकारी, आमदार, मंत्री, संपादक व्हावं असं त्याला वाटायचं. त्याची आठवण होण्याचं कारण; हिंदी-पंजाबी आणि इंग्रजीचं लज्जतदार ‘फ्युजन’ करणारा एक उत्तम वक्ता, हजरजबाबी आणि पंजाबी मोकळे ढाकळेपणा अंगात पुरता मुरलेल्या बावन्न वर्षीय नवज्योत सिद्धूलाही एकाच वेळी खूप खूप काही होण्याची महत्वाकांक्षा होती-आहे. यशस्वी क्रिकेटपटू असलेल्या सिद्धूची भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान होण्याची इच्छा होती. लोकप्रिय समालोचक, अभिनेता, कॉमेडीचा बादशहा, खासदार, मंत्री, पंजाबचा मुख्यमंत्री असं, खूप काही एकाचवेळी व्हावं अशी ‘स्टारडम’ असलेल्या सिद्धूची इच्छा आहे. तो खासदार आहे, त्याची पत्नी डॉ. नवज्योत कौर आमदार आहे तरी राजकारणात आणखी काही होण्याच्या सिद्धूच्या इच्छा काही संपत नाहीयेत. पंजाबातील अकाली-भाजप युतीत अकाली दल मोठा भाऊ आहे. म्हणजे, भाजपनं ठरवलं तरी सिद्धू मुख्यमंत्री होऊ शकत नाही. शिवाय, भाजपतील पदांचा मार्ग रा. स्व. संघाच्या मान्यता पथावरुन जातो, असं जे म्हटलं जातं ते खोटं थोडीच आहे ? पंजाबात स्वबळावर निवडणूक लढवून भाजप सत्तेत येऊच शकत नाही. त्यात निवडणुकीआधी पंजाबात सबकुछ अरविंद केजरीवाल असलेल्या ‘आप’ची हवा आहे आणि ‘आप’ला निवडणुका लढवण्यासाठी राज्यव्यापी चेहेरा हवा आहे. नवज्योत सिद्धू हा जाट शीख आहे. सिद्धू हे त्याचं गोत्र आहे. वर्ल्ड जाट फाउंडेशनचा तो अध्यक्ष आहे. नेता आणि लोकप्रियता सिद्धुत गुण्यागोविंदानं एकत्र नांदताहेत. नवज्योत सिद्धू तसा भडक डोक्याचा; क्रिकेट खेळत असताना तत्कालिन कप्तान अझरुद्दीनशी त्यानं इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये मालिका सुरु असताना पंगा घेतला आणि कोणालाही न जुमानत सरळ भारताकडे येणारं विमान पकडलं होतं. क्रिकेट खेळत असतानाच सिद्धुनं एका चाहत्यांच्या डोक्यात क्रिकेटची बॅट इतक्या जोरात हाणली की त्याला प्राणच गमवावे लागले. या खटल्याचा निकाल लागला आणि शिक्षा झाली तेव्हा सिद्धू भाजपचा खासदार होता. मग त्यानं लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयातून शिक्षेला दिलासा मिळाल्यावर सिद्धुनं पुन्हा त्याच मतदार संघातून पोटनिवडणूक लढवली आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल सत्त्याहत्तर हजारावर मतांनी पराभव केला; अशी त्याची लोकप्रियता आहे. थोडक्यात, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टर बॉय म्हणून ‘परफेक्ट कॉम्बिनेशन’ म्हणजे सिद्धू आहे. त्याची लोकप्रियता कॅश करण्याची संधी अरविंद केजरीवाल यांच्यासारखा चाणाक्ष राजकारणी सोडणार नव्हता. हे सर्व लक्षात घेता नवज्योत सिद्धू निवडणुकीनंतर पंजाबचा मुख्यमंत्री झाला तर फारसं आश्चर्य वाटायला नको. एक मात्र खरं, केजरीवाल यांनी पहिल्या खेळीत भाजपला घायाळ केलंय यात शंकाच नाही! (मात्र, भाजपनं अजूनही आशा सोडलेली नाहीये. हा मजकूर लिहित असताना सिद्धू दांपत्याला भाजपकडून समजावण्याचे प्रयत्न अजूनही सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धू दांपत्य त्या प्रयत्नांना किती प्रतिसाद देत आहेत याबद्दल मात्र काहीही समजलेलं नाहीये.)

पंजाबात विधानसभेच्या ११७ जागा आहेत; अकाली दलाकडे ६०, भाजप १२, कॉंग्रेस ४२ आणि अन्य ३ असं विद्यमान बलाबल आहे. अकाली दल गेल्या दहा वर्षापासून सत्तेत आहे. प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र सुखबीरसिंग उपमुख्यमंत्री आहेत. पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेल्या प्रकाशसिंग बादल यांचं वय ८८ आहे. प्रकाशसिंग बादल कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात आणि आधीच्या टर्ममध्ये (२००७-२०१२) त्यांनी राज्यकारभार छान हाकला. मात्र ते आता थकले आहेत. सरकारची सत्ता त्यांचे पुत्र सुखबीरसिंग यांच्या हाती केंद्रित झालेली आहे; सर्व निर्णय उपमुख्यमंत्री असलेले सुखबीरसिंगच घेतात. पण, सुखबीरसिंग यांचा कारभार वादग्रस्त ठरलेला असल्यानं लोकात उघड नाराजी आहे. ही नाराजी आपल्याकडे ओढून सत्ता मिळवण्याचा ‘आप’चा प्रयत्न आहे. सध्याही अकाली दलाकडे स्वबळावर सत्ता आहे तरी भाजप हा त्यांचा ‘कमिटमेंटल पार्टनर’ म्हणून सत्तेत आहे. यावेळी अकाली दलाचा मूड स्वबळावर लढण्याचा आहे. प्रकाशसिंग बादल यांचा शब्द पाळला गेला तरच अकाली-भाजप युती होईल अन्यथा भाजपला वेगळं लढावं लागेल आणि आताच्या अंदाजानुसार भाजप पंजाबात चौथ्या नंबरचा मानकरी पक्ष असेल !

सध्या पंजाबचे मुख्य प्रश्न नाराज शेतकरी, राज्य कारभाराची लागलेली वाट आणि अंमली पदार्थांचा राज्याला पडलेला विळखा हे आहेत. शेतकरी अकाली दलाची मोठी व्होट बँक समजली जातात. ही बँक प्रकाशसिंग बादल यांनी मोठ्या अविश्रांत श्रमांनी तयार करवून घेतली आहे. पण, कधी नव्हे ते पंजाबातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं; हा राज्य सरकार आणि प्रकाशसिंग बादल यांनाही व्यक्तिश: बसलेला धक्का मानला जातो. शेतकरी मतदार जर असाच नाराज राहिला तर अकाली दल सत्ता गमावणार असंच मानलं जातंय. पंजाबात गेल्या सात-आठ वर्षात रोजगार निर्मिती पुरेशा प्रमाणात झाली नाही, असा विरोधकांचा आक्षेप आहे आणि त्याला साधार-ठोस उत्तर देण्यात अकाली राज्य सरकार कमी पडलेलं आहे.

अंमली पदार्थांचा विळखा ही पंजाबातील प्रत्येक दहापैकी दोन घरांची समस्या आहे. या तस्करीतून एक मोठी समांतर शासन आणि अर्थ व्यवस्था राज्यात उभी राहिलेली आहे. त्यातून कायदा आणि सुव्यस्था पोखरली गेल्यानं परस्थिती चिंताजनक आहे. खरं काय ते सांगणं कठीण आहे पण, यात बादल कुटुंबीयातील काही लोक गुंतलेले असल्याचे दावे केले जातात. अंमली पदार्थांच्या तस्करीनं पंजाब राज्य कसं उभं-आडवं पोखरलं गेलंय या विषयावर आलेल्या ‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटात दाखवली आहे त्यापेक्षा, पंजाबातील स्थिती जास्त वाईट्ट असल्याचं बोललं आणि लिहून येतं आहे. पंजाबातलं आजचं वातावरण असं अकाली दल विरोधी असलं तरी, कॉंग्रेस किंवा भाजप या राष्ट्रीय पक्षांना त्याचा लाभ मिळण्याची अजिबात शक्यता नाही; लाभ मिळेल ‘आप’ला असं चित्र आहे.

एक राजकीय पक्ष म्हणून असायला हवा असतो तसा संघटनात्मक विस्तार राज्यभर नाही; शिवाय राज्य पातळीवर सहज स्वीकारला जाईल असा नवज्योत सिद्धूसारखा सर्वमान्य, लोकप्रिय दुसरा नेता नाही, ही भाजपची पंजाबातील खरी अडचण आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या १९८४त झालेल्या हत्त्येनंतर उसळलेल्या दिल्लीतील दंगली आणि हत्याकांडापासून शीख जनमन बहुसंख्येनं कॉंग्रेसपासून दुरावलेलं आहे. त्या दंगलीचं नेतृत्व करणारे अनेकजण आजही कॉंग्रेसच्या दिल्लीतील राजकारणात वावरतात; त्यापैकी कमलनाथ एक आहेत. दोन पिढ्या बदलल्या पण आजही त्या दंगलीच्या जखमा भरुन निघालेल्या नाहीत. काळाच्या खपल्याआड त्या जखमा अजूनही ताज्या आणि दुखऱ्या आहेत. त्या आठवणी जाग्या झाल्या की त्या झळांची धग लागलेल्यांच्या डोळ्यातून एकाच वेळी वेदना आणि टोकाची नफरत बाहेर पडते. त्यातच कॉंग्रसने हा विषय (नेहेमीच्या) घाईत हाताळला. निवडणुकीच्या काळात पंजाबचे प्रभारी म्हणून कमलनाथ यांना नियुक्त करण्यात आलं आणि त्याची म्हणूनच तीव्र प्रतिक्रिया उमटली. जितक्या घाईघाईनं नियुक्ती झाली त्यापेक्षा दुप्पट घाईत कमलनाथ यांनी ते पद सोडलं. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे भावी प्रबळ दावेदार कॉंग्रेस नेते अमरिंदरसिंग यांनाही कमलनाथ नाही तरी नकोच होते. थोडक्यात कमलनाथ यांची नियुक्ती हा कॉंग्रेससाठी स्वहस्ते केलेला कपाळमोक्ष ठरला. सलग होणाऱ्या पराभवातून कॉंग्रेस काहीही शिकायला तयार नाही असाच संदेश कमलनाथ यांच्या नियुक्तीनं गेला.

अकाली दल आणि भाजप युती तुटली तर पंजाबात अकाली दल, भाजप, कॉंग्रेस, भाजप आणि उर्वरीत सर्व अशा पंचरंगी लढती होतील. चौरंगी-पंचरंगी लढतीत झालेल्या मतदानापैकी ३० टक्क्यांच्या आसपास मते मिळवणारा पक्ष सत्तेत येतो असं समीकरण अलिकडच्या काही वर्षात भारतात रूढ झालेलं आहे. सध्या तरी या शर्यतीत ‘आप’ आघाडीवर असल्याचं दिसतंय. हे अर्थात निवडणुकीच्या सहा महिने आधीचं चित्र आहे. जसजसे दिवस उलटतील तसतसं राजकीय चित्र बदलत जाईल. देखते है, घोडा आणि मैदानही जवळच आहे!

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या- www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट