नारायणागमन !

हा मजकूर प्रकाशित होईल तोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेतून विधानपरिषदवर निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे संपलेली असेल आणि दिवाकर रावते, सुभाष देसाई, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर प्रभृतींसोबत नारायण राणे यांचा विधिमंडळात प्रवेश झालेला असेल. आपण जनाधार गमावला असून आता आपल्याला सांसदीय राजकारणात मागील दरवाजाने प्रवेश केल्याशिवाय पर्याय नाही, हे कटू सत्य अखेर नारायण राणे यांनी स्वीकारलं आहे, हाच त्यांच्या विधानपरिषदेतील आगमनाचा अर्थ आहे. ‘राणे यांची निवड बिनविरोध झाली’, असा बचाव त्यांचे समर्थक करतीलही पण, सर्व म्हणजे दहाही उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्याचे श्रेय पंकजा मुंडे यांचं आहे, हे विसरता येणार नाही. एकनाथ खडसे यांच्यासोबत ‘फ्लेक्स’वर झळकण्याचा उतावीळपणा पंकजा मुंडेंनी दाखवला आणि ही निवडणूक भाजपला बिनविरोध करावी लागली, अन्यथा रंगत वाढून कदाचित राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचा ‘राजकीय गेम’ केला गेला असता. खरं तर, धनंजय मुंडे यांना पराभूत करण्याची योजना भाजपने आखली होती; त्यासाठीच जास्तीचे २ उमेदवार रिंगणात उतरवले गेले होते. निवडणुकीत काहीही घडू शकलं असतं म्हणजे ‘घडवून’ आणलं गेलं असतं; घोडेबाजार तेजीत आला असता. धनंजय मुंडेंच्या अपेक्षित वाट्याची मतं फुटली असती आणि ते पराभूत झाले असते; किंबहुना तेच भाजपला साधायचं होतं कारण बीड ते मुंबई या पट्ट्यात पंकजा मुंडे यांच्याशी उभा दावा सांगणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडे स्वबळावर निवडून येण्याइतका मतांचा कोटा नव्हता. पण, पंकजा यांनी पक्षाचा डाव ओळखलाच नाही आणि आरोपांच्या ज्वालामुखीवार बसलेल्या खडसे यांच्या ‘बहुजन’ जाळ्यात त्या अलगद अडकल्या; परिणामी राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषद निवडणूकही बिनविरोध पार पडली आणि त्यात निवड बिनविरोध झालेल्यात नारायण राणे आहेत.

अलिकडच्या पावणे-दोन वर्षात नारायण राणे यांना सलग दोन विधानसभा निवडणुकीत पराभव चाखावे लागले (शिवाय पुत्राचा लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव वेगळाच). हा जसा जनाधार गमावल्याचा परिणाम होता तसाच तो नारायण राणे आणि विशेषत: त्यांच्या पुत्रांनी दाखवलेल्या सत्ता व धन यातून आलेल्या मग्रुरीचा आणि पर्यायानं नारायण राणे यांच्या आंधळ्या पुत्र प्रेमाचा परिणाम होता. बाळासाहेब ठाकरे यांचा वरदहस्त लाभल्यानं नारायण राणे शिवसेनेत शक्तिमान झाले, नंतर कॉंग्रेसमध्येही एक शक्ती म्हणूनच त्यांचा प्रवेश झाला. अर्थात नारायण राणे यांचे श्रम, धन आणि ‘बलोपासना’ याचा या शक्तीत वाटा आहेच. दुसऱ्यांदा राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळण्याचं स्वप्न सेनेत राहून साध्य होत नाही हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप करत राणेंनी सेना सोडली आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्याच घराणेशाहीला स्वत:च्या घरात रीतसर मानाचं स्थान दिलं. सत्तेतील पदं त्यांनी मुलांच्या पदरात टाकली. कोणतेही परिश्रम न घेता वारसाहक्कानं मिळालेल्या राजकीय वारशाच्या पुंजीवर राणे पुत्रांनी काय उत-मात केली त्याची पुनरुक्ती करण्याची गरज नाही; त्याचा फटका मात्र नारायण राणे यांना बसला हे वादातीत.

विशेषत: १९९० नंतर भुजबळांपासून ते राणे-राज ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी शिवसेना सोडल्याच्या घटनांचा एक पत्रकार म्हणून आस्मादिक साक्षीदार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना घायाळ करून छगन भुजबळ यांनी सेना सोडली, त्या विदर्भात रंगलेल्या चित्तथरारक नाट्याचं ‘चक्षुर्वैसत्यम’ वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांच्या पिढीतील मीही एक. राज ठाकरे तर कधी भरून न येणारी जखम करणारा आघातच करुन गेले. गणेश नाईक यांचासोबत सुरेश नवले यांच्यासारखे दुकटे गेले. सुबोध मोहिते, संजय निरुपम एकटेच सेना सोडते झाले. भुजबळ आणि राणे यांच्यासोबत सर्वाधिक आमदार शिवसेना सोडून गेले. पण, पहिल्या फटक्यात यापैकी राणे वगळता कोणालाही निवडणुकीत विजय संपादन करता आला नाही. सेना सोडल्यावर या सर्वांचीच सुरुवातीच्या काळात फरफट झाली. छगन भुजबळ यांच्यासारख्या ‘हेवीवेट’ला सेनेच्या बाळा नांदगावकर यांनी निवडणुकीत चक्क धूळ चारली.(पुढे नांदगावकरही शिवसेना सोडून ‘मनसे’त प्रवेश करते झाले!) नंतर शरद पवार यांचा आधार मिळून छगन भुजबळ यांनीही विधानपरिषद गाठली आणि नंतर ते राजकारणात स्थिरावले. राज ठाकरे यांचं यश एका विधानसभा निवडणुकीपुरते अल्पजीवी ठरल्याचं सध्या तरी दिसतं आहे. शिवसेना सोडताना बाणेदारपणे आमदारकीचा राजीनामा फेकून, दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नाकावर टिच्चून विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणे दिमाखदारपणे विजयी झाले. ते यश त्यांच्या राजकीय यशाचं सर्वोच्च शिखर होतं. मात्र, पुढच्या काळात ते यश, ती लोकप्रियता, जनमानसावर मिळालेली ती पकड, त्यांना टिकवून ठेवता आली नाही. नंतर राणे यांची घसरण सुरु झाली. याची कारणं तीन; एक- कॉंग्रेसची संस्कृती न स्वीकारता त्यांनी सत्तेसाठी केलेली अगतिक तडजोड, दोन- टोकांधळे पुत्रप्रेम, तीन- ज्या ‘टक्केवारी’चे एकेकाळी स्वत:च वाटेकरी होऊन अफाट ऐश्वर्य तसंच सत्ता प्राप्त केली त्या, टक्केवारी तसंच पक्षनिष्ठेबद्दल शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर पातळी सोडून सतत केलेलं वक्तव्य. या संदर्भात उल्लेखनीय म्हणजे छगन भुजबळही कधीमधी बाळासाहेब ठाकरेंवर टीका करत, बाळासाहेब ठाकरे तर त्यांचा ‘लखोबा लोखंडे’ असा सर्रास उल्लेख अनेक वर्ष करत पण, भुजबळ यांनी (‘टी बाळू’ असे काही मोजके अपवाद) वगळता शिवसेना, बाळासाहेब आणि उद्धववर जहरी टीका केली नाही. गणेश नाईक यांनी तर अशी टीका अपवादानंही केल्याचं आठवत नाही. सेना सोडल्यावर पहिल्या विजयानं नारायण राणे यांची मात्र जीभ घसरली, पुत्राच्या लोकसभेवरील विजयाने ही घसरण वेगाने झाली..नंतर अशोक चव्हाण मंत्री मंडळात मंत्रीपद स्वीकारण्याची अगतिकता दाखवल्यावर तर ती घसरण वेगानेच होत गेली. परिणामी ज्या मातोश्रीच्या अंगणात नारायण नावाचं रोपटं जन्मलं… बहरलं त्याच मातोश्रीच्या अंगणात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सलग दुसरा पराभव पदरी पडून ते रोपटं मुळापासून उखडलंही गेलं… विजयानं उन्मादित झालेल्या सेना समर्थकांनी ‘नको-नको’ त्या शेलक्या शब्दात नारायण राणे यांचा उद्धार केला. अशी फरफट वाट्याला आलेले नारायण राणे हे राज्याच्या राजकारणातील एक शोकांतिका आहे असं त्यावेळी म्हणूनच एका लेखात मी म्हटलं गेलं.

सेनेत आपली घुसमट झाली आणि त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, हा नारायण राणे यांचा समज झाला; तो पुढे दृढ झाला. समज असा ‘दृढ होणं’ ही एक मानसिक धारणा असते आणि ती पूर्ण झाल्यावर बदलणं कठीणच असतं. शिवाय, शिंगावर घेणं आणि रक्ताचा थेंब-न-थेंब ‘शिवसैनिक’ असणे ही नारायण राणे यांची जडणघडण आहे. शिवसैनिकपण त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे. या जडणघडणीतून नारायण राणे बाहेर पडू शकले नाहीत. ‘अरे’ ला ‘कारे’ ही त्यांची अगतिकता आहे. म्हणूनच नारायण राणे लाचार, संधिसाधू, अस्सल-अर्क आणि बेरके कॉंग्रेसजन बनू शकले नाहीत ही खरी अडचण आहे. ‘शिवसैनिक’ असल्याची ताठर मानसिकता आणि सळसळणारं रक्त न बदलून घेता राणे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करते झाले, तेव्हा काँग्रेसजन आपली फरफट करणार याचा अंदाज राणे यांना आला नाही. याच कारणामुळे दहा वर्ष कॉंग्रेसमध्ये घालवल्यावर या ‘गेम करण्याच्या’ काँग्रेसी मनोवृत्तीचा थांगपत्ता नारायण राणे यांना लागलेला आहे, असं ठामपणे म्हणता येणार नाही. आता तर विधान परिषदेचा तुकडा फेकून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना कायमचं उपकृत ठेवलं आहे. ‘रक्त सळसळणा’रे नारायण राणे यापुढे पाहायला मिळतील की नाही ही शंकाच आहे.

सेनेत असताना अल्प काळासाठी मुख्यमंत्री झाल्यावर राणे यांच्या कर्तबगारीचे पोवाडे काही मंत्री, काही सनदी अधिकारी आणि काही पत्रकार गात असत. त्यांची धडाकेबाज निर्णयक्षमता, एखाद्या विषयाचा अभ्यास करण्याची चिकाटी, त्यांचं (मला अनुभवायला न मिळालेलं!) दातृत्व आणि जनसंपर्क, वक्तृत्व प्रभावी होण्यासाठी ते घेत असलेले श्रम…अशा अनेक बाबी त्यात ओसंडून वाहात असत. मग निवडणुका झाल्या, राणे विरोधी पक्षनेते झाले. त्यांची तोफ सभागृहात गर्जू लागली.. त्यांचं सांसदीय आकलन आणि जनाधार अफाट कसा आहे, याच्या दंतकथा प्रसारित होऊ लागल्या. हे असं करणाऱ्या भाटांपासून त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. शिवसेनेत केलेलं बंड..उद्धव ठाकरेंवर (असंस्कृतपणे) चढवलेला तुफानी हल्ला..काँग्रेस प्रवेश..मग त्यांची त्या पक्षात झालेली यांनी घुसमट..काँग्रेसमध्ये त्यांनी केलेलं आणि फसलेलं बंड…या काळात हे भाट कायम लांब उभे राहून नारायण राणे यांची होणारी फरफट चविष्टपणे चघळत आनंद घेत होते. म्हणून, चार भाटांपेक्षा शंभर टीकाकार परवडले हे नारायण राणे यांनी कधीही विसरू नये.

स्वत:त मोठी क्षमता आहे हे नारायण राणे याआधी दाखवून दिलेलं आहे. ते लक्षात घेऊन आपल्याला पराभवाचे कडवट घोट कां चाखावे लागले, याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करुन पुढची रणनीती आखायला हवी. आहे त्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी राणे यांनी पुढची पाऊले काळजीपूर्वक उचलायला हवीत कारण गाठ कॉंग्रेसमधील बहुसंख्य अर्क नेत्यांशी आहे. राणे यांच्या सुदैवाने कॉंग्रेस पक्षात सध्या आक्रमक नेते नाहीत. राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेतील विरोधी पक्ष नेते वाटण्याऐवजी एखाद्या भजनी मंडळाचे प्रमुख वाटतात इतके ते मुखदुर्बळ आणि मवाळ आहेत; बहुसंख्य कॉंग्रेस नेते सत्ता गमावल्याचं पराभूत स्मित कायम चेहेऱ्यावर बाळगत कानकोंडल्या वृत्तीनं वावरताना दिसतात. ‘आदर्श’च्या गुळणीमुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मनमोकळी फटकेबाजी करत येत नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाजूला पडले आहेत किंवा त्यांना बाजूला टाकण्यात आलेलं आहे, असंही म्हणायला वाव आहे. विधानपरिषदेत तर कॉंग्रेसचं अस्तित्वही जाणवत नाही. अशावेळी नारायण राणे मोठा प्रभाव निर्माण करू शकतात. महाराष्ट्र पिंजून काढत, कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष उभारणीचं काम करण्यात जर नारायण राणे यशस्वी झाले तर त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कदाचित साकार होऊ शकतं. स्वप्नभंग आणि नंतर निवडणुकीतील पराभवाचे कडू घोट चाखावे लागल्याच्या दु:स्सह पार्श्वभूमीवर आता जी एक संधी पुन्हा मिळाली आहे तिचा पुरेपूर वापर नारायण राणे करतील अशी आशा बाळगू यात पण, त्यासाठी पुत्रप्रेम बाजूला ठेऊन त्यांना स्वभावाला मुरड घालावी लागेल.

पुनरागमनाच्या निमित्तानं नारायण राणे यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा देऊ यात. राणे स्वीकारतील की नाही याबद्दल शंका वाटते पण, सुधारणांवाद्यांना अशा शुभेच्छां बळ देणाऱ्या असतात…

– प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या – www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट