हट्टी मुलीची यशकथा !

– ती डाव्यांच्या डाव्या आणि उजव्यांच्या उजव्या डोळ्यात कायम सलते..
– स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घेणारे कॉंग्रेसवाले तर तिच्या नावानं कायम बोटं मोडत असतात..
– पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘तुमची मुलगी हट्टी आहे’, अशी तक्रार तिच्या वृद्ध्द आईकडे कौतुकानं केली होती, महत्वाचं म्हणजे तेव्हा ती वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होती..
– पश्चिम बंगाल म्हणजे आपली जहागिरी आहे, असं समजून तोऱ्यात वावरणाऱ्या डाव्यांची तीन दशकांची सत्ता तिनं मोडीत काढली, डाव्यांना तिनं पश्चिम बंगालात असं काही नेस्तनाबूत केलंय की सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत डाव्यांना डोकंही वर काढता आलेलं नाही, इतकं घवघवीत यश तिनं निवडणुकीत तिनं संपादन केलंय..
– रापलेला चेहेरा​, मुख्यमंत्री असूनही साधीशी सुती किंवा खादीची पांढरी साडी, पायात स्लीपर आणि अनेकदा खांद्यावर शबनम बॅंग घालून ती सहज वावरते..
– सरकारी तामझाम आणि शासकीय शिष्टाचार झुगारून एका जुन्या झेन कारमधून ती प्रवास करते..
– रापलेला चेहेरा, मुख्यमंत्री असूनही एका साध्याशा कोलकात्याच्या कालीघाट परिसरातील घरात ती कोणताही डामडौल न करता राहते..
– राजकारणातला विरंगुळा म्हणून हाती असलेल्या सत्तेचा वापर करुन धनप्राप्ती किंवा स्वत:ची मालमता वाढवण्याऐवजी ती चित्र काढते, कविता करते..
– वाजपेयी यांनी जिचा ‘हट्टी मुलगी’ उल्लेख केला होता त्या मुलीचं नाव ममता बँनर्जी आहे..
अटलबिहारी वाजपेयी यांनी वर्णन केलेला आणि जो नंतरच्या काळात एखाद्या सन्माननीय पदवीसारखा संबोधित होणारा ‘हट्टी’पणाच ममता यांचं मुख्य राजकीय भांडवल आहे. या हट्टीपणाला अविचल ध्यास, चिकाटी, खंबीर संयम आणि अविश्रांत अविश्रांत श्रम यांची जोड आहे. म्हणूनच पश्चिम बंगालमधलं डाव्यांचं साम्राज्य उध्वस्त करण्यात आणि कॉंग्रेसचा संकोच करण्यात ममता यांना यश आलं. कवी आणि चित्रकार असण्यामुळे ममतांचा स्वभाव ‘कलावंती’य मनस्वी होताच. ठरवून केलेल्या अविरत संघर्षामुळे त्यांच्यात हट्टासोबतच अतिआक्रमकता आली आणि यशामुळे आततायीपणाही आला.
५ जानेवारी १९५५ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या या ‘हट्टी मुली’नं मार्क्सवादी कम्युनिस्ट विरोधात सलग दोन दशके पूर्णपणे लोकशाही मार्गाने संघर्ष केला. त्या संघर्षाला आलेल्या राजकीय यशकथा म्हणजे ममता बँनर्जी यांचा भारतीय राजकारणातला प्रवास आहे. याच यशानं त्यांना भारतीय राजकारणातल्या पहिल्या दहा प्रभावशाली महिला हे स्थान मिळवून दिलं. ममता बँनर्जी यांचा जन्म कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला. ममता नऊ वर्षाच्या असतांना त्यांचे वडील वारले. आईनं काबाडकष्ट करून ममता यांना शिकवलं. इतिहास विषय घेऊन ममता यांनी आधी ऑनर्स आणि मग एम ए केलं, नंतर इस्लामिक हिस्ट्री या विषयातही पदवी संपादन केली. शिक्षण आणि विधी या शाखांतही त्यांनी प्राविण्य संपादन केलं. शाळकरी वयापासून ममतांना राजकारण, चित्रकला आणि कवितेची ओढ होती. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा राजकारणातला प्रवास काँग्रेसच्या वाटेवरुन सुरु झाला. कॉंग्रेस संघटनेमध्ये अनेक पदं त्यांनी भूषवली. युवक काँग्रेसचं काम करताना पश्चिम बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट सरकारकडून मिळालेल्या अपमानास्पद आणि हिंसक वागणुकीने ममता नावाची तरुणी दुखावली.. संतापली आणि मार्क्सवाद्यांची सत्ता उलटून टाकण्याची प्रतिज्ञा तिनं केली. सत्ताधारी सोमनाथ चटर्जी यांच्यासारख्या मातब्बराला हरवून त्या लोकसभेवर निवडून आल्या नंतर १९८९चा अपवाद वगळता पुढच्या सलग सहा निवडणुका त्यांनी दक्षिण कोलकाता लोकसभा मतदार संघातून जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला आणि केंद्रात मंत्री झाल्या तरी ममता दिल्लीच्या राजकारणात मात्र रमल्या नाही. त्यांचं लक्ष्य पश्चिम बंगालमधील सत्ता सनदशीर मार्गाने उलटवून टाकणं हेच होते आणि त्यामुळेच त्यांचा एक पाय कायम पश्चिम बंगालमध्येच असे.
एका क्षणी ममता यांच्या लक्षात आलं की, पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट करण्यात काँग्रेस परिणामकारक ठरुच शकत नाही. त्याची कारणं तीन होती, एक तर सिद्धार्थ शंकर रॉय यांच्यानंतर त्यांच्यासारखा तोलामोलाचा नेता काँग्रेसकडे नव्हता त्यामुळे आणि डाव्यांच्या आक्रमकतेमुळे काँग्रेस संघटना तळापासून खिळखिळी झालेली होती. डाव्या पक्षांनी पंचायत ते लोकसभा असा जम पश्चिम बंगालमध्ये बसवला होता. तिसरं आणि महत्वाचं महत्वाचं म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांशी ममता यांचे मतभेद निर्माण झालेले होते. ममता यांना ताकद मिळवून द्यावी आणि राज्यात काँग्रेस वाढवावी ही दृष्टी असणारे नेते कॉंग्रेसमध्ये राहिलेले नव्हते. मग ममता यांनी तृणमुल काँग्रेस पक्ष हा सवता सुभा उभारून कम्युनिस्टांविरुद्ध लढण्याची उमेद कार्यकर्त्याना दिली. संघटना बांधणीसाठी तळागाळापासून पुढाकार घेतला. पक्षाच्या गाठीला निधी नाही, कार्यालयासाठी जागा नाही नाही, कार्यकर्त्यांची फौज पुरेशी तयार झालेली नाही तरीही पहिल्याच लोकसभा निवडणुकीत सात जागा जिंकून तृणमूल आणि पर्यायाने ममता यांनी देशाच्या राजकीय वर्तुळाला धक्का दिला. नंतर तर केंद्रात भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करण्याचा धूर्तपणा ममता यांनी दाखवला आणि पक्षाला स्थैर्य मिळवून दिलं.
देशात आता बहुपक्षीय सरकारे ही अपरिहार्यता आहे असा प्रस्थापित समज स्वीकारल्यानं पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली. लोकसभेत ३०-३५च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त जागा संपादन केल्या तर देशाचं नेतृत्व लांब नाही असं त्यांना वाटू
​लागलं. म्हणून दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा लढवण्याची आस बाळगून त्यांनी २०१४त मोर्चेबांधणी सुरु केली. नेमक्या याचवेळी अण्णा हजारे यांचा आशीर्वाद मिळवण्यात त्याना बहुप्रयत्ने यश आलं. मात्र अण्णा हजारे ही एक केवळ प्रतिमा आहे शक्ती नाही हे, अरविंद केजरीवाल यांनी जसं लक्षात घेतलं तसं ममता यांनी घेतलं नाही. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी केवळ प्रतिमा पुरेशी नसते तर ‘सर्व प्रकारची’ साधन सामग्री लागते, हे वास्तव ममता विसरल्या. अण्णा हजारे यांनी ऐनवेळी पाठ फिरवली आणि ममता तोंडघशी पडल्या. परिणामी २०१४च्या निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागा लढवण्याचा त्यांचा मनसुबा साफ फसला. शहाणपणाचा पवित्रा घेत त्यांनी त्यांची मूठ पश्चिम बंगालपुरती बंद ठेवली असती तर त्यांचा हा मुखभंग झाला नसता. एव्हाना राजकीय प्रगल्भता आणि आणि पुरेसा अनुभव पदरी पडलेला असल्यानं मग त्यांनी सारं लक्ष पश्चिम बंगालवर केंद्रित केलं.
एव्हाना ममता एक राजकीय ब्रांड झालेला होता. अत्यंत साधी राहणी, जाडी-भरडी वस्त्र आणि सत्तेला साजेसा कोणताही डामडौल न बाळगता, पोलिसांचा बंदोबस्त न घेता झेन या कारनं फिरणं, हा कौतुकाचा आणि प्रतिमा उजळवून टाकण्याचा विषय ठरला. या सध्या राहणीचा (अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे) ममता यांनी कधीही गाजवजा माजवला नाही की त्याकडे मिडियाचे लक्ष वेधून स्वत:ची प्रतिमा मोठी करून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण, विधानसभा निवडणुकीत स्वबळावर आणि एकहाती जनमताचा कौल मिळवून पश्चिम बंगालमधील डाव्यांची राजवट उलथवण्यात यश आलेलं असल्यानं ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती ममता यांच्या अंगी भिनली. ही वृत्ती आणि एकारलेपणामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत त्या लोकशाहीवादी नाहीत, असंही काही घटनांत समोर आलं, त्यामुळे आरोपांच्या फैरी झडल्या, तीव्र टीकेलाही त्यांना सामोरं जावं लागलं. मात्र, एव्हाना एक प्रभावी राजकीय शक्ती म्हणून उद्याला आलेल्या ममता बेडरपणे त्या आरोप आणि टीकेला सामोरं गेल्या. पश्चिम बंगालात डावे आणि कॉंग्रेसशी त्या ‘ठकास ठक’ शैलीत वागल्या! कॉंग्रेसला पर्याय म्हणून पश्चिम बंगालनं त्यांच्याकडे पाहिलं आणि डाव्यांच्या वोट बँकेवर त्यांनी ज्या सफाईने डल्ला मारला त्यामुळे, त्या पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट होतं.
त्यांच्या एकारल्या कारभारामुळे तृणमूल कॉग्रेसच्या जागा कमी होतील असे जनमत पाहणीचे अंदाज आलेले होते, माध्यमांनाही तसंच वाटत होतं. पण, ममतांचा करिष्मा असा की, प्रत्यक्षात तृणमूल कॉंग्रेसच्या जागा वाढल्या. याची कारणं तीन. एक- म्हणजे ममता सरकारनं (बहुदा शारदा चीट फंड घोटाळ्यापासून धडा घेऊन) आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होऊ दिले नाहीत आणि मोठ्ठ्या प्रमाणात जमीन संपादन-मध्यमवर्गीयविरोधी निर्णय घेणं टाळलं. दोन- कॉंग्रेस-डाव्यांची झालेली युती. भाजपनं स्वतंत्र निवडणुका लढवल्यानं हिंदू मतं वळणार हे स्पष्टच होतं असं असलं तरी डावे-कॉंग्रेस आघाडीला भाजप हा काही पर्याय नव्हता. त्यामुळे डावे-कॉंग्रेस या युतीला राजकीय पर्याय तृणमूल कॉंग्रेस म्हणजे ममता याच आहे, असं मतांचं ध्रुवीकरण झालं. तीन- ममता यांची साधी प्रतिमा डावे आणि कॉंग्रेसला भारी पडली. परिणामी जनमत पाहणीचे निष्कर्ष आणि माध्यमांचे अंदाज खोटे ठरवत ममतांच्या नेतृत्वखाली तृणमूल कॉंग्रेसनं मोठ्ठं यश मिळवलं. ममतांच्या हट्टीपणावर मतदारांनी केलेलं ते शिक्कामोर्तब होतं म्हणूनच निकालानंतर ममतांनी पत्रकारांना ‘तुमचे अंदाज खोटे ठरुन तृणमूल कॉंग्रेसनं घवघवीत यश संपादन केलंय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन!’, असं बेडरपणाने बोचकारलं. ‘बिच्चाऱ्या’ पत्रकारांनी ते निमूटपणे सहन केलं. कारण, एका हट्टाच्या यशासमोर माध्यमांची विश्वासार्हता थिटी ठरलेली होती!

(ममतांच्या राजकीय प्रवासासंबधी अधिक जाणून घेण्यासाठी Kalyanee Shankar यांचे PANDORA’S DAUGHTERS हे ब्लुम्सबरी, इंडिया प्रकाशित पुस्तक वाचावे)

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या – www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट