घराणेशाहीचे कांदे नाकानं सोलण्याचा भाजपचा नसता उद्योग !

(  चित्र- विवेक रानडे )

पुन्हा एकदा काँग्रेसमधील घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या निवासस्थानी एक तर आरसा नसावा किंवा घरात असलेल्या आरशात हे नेते स्वत:चा चेहेरा बघत नसावेत असंच म्हणायला हवं . खरं तर , घराणेशाही हे आपल्या देशातील राजकारणाचं सर्वपक्षीय व्यवच्छेदक लक्षणं आहे , तरी सर्वच राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षातल्या घराणेशाहीवर मानभावीपणे टीका करत असतात . काँग्रेसला गांधी-नेहरू शिवाय जसा पर्याय नाही तशीच स्थिती आपल्या देशातील बहुतेक सर्व राजकीय पक्षांची आहे ; भाजपला तरी नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे कोणते नेतृत्व आहे ? ठाकरेंच्या शिवाय शिवसेना नाही, यादवांच्या शिवाय सपा नाही, मायावती यांच्याशिवाय बसपा नाही लालूशिवाय राष्ट्रीय जनता दल नाही…स्टॅलिन , देवेगौडा , ममता बॅनर्जी , शरद पवार, चंद्रशेखर राव, गेला  बाजार नितीशकुमार अशी अनेक घराणी आहेत ; ते पक्षाच्या प्रमुखपदी त्या-त्या घराण्यातील व्यक्तीला बसवतात आणि  अन्य पक्षांवर घराणेशाहीची टीका करतात . ‘स्वत:चं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ असा प्रकार आहे .

आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचलेली आहे . १५-२० फेब्रुवारीच्या आत सर्व कामे  आटोपण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेलेल्या आहेत कारण त्यानंतर कोणत्याही दिवशी निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू होऊ शकते . देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडून झालेला आहे आणि त्यानिमित्तानं नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणातून नेहेमीप्रमाणं काँग्रेसवर सडकून टीका करत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारचं  बिगुल फुंकलेलं आहे . ( बाय द वे , मोदी यांच्या भाषणाचा प्रभावी  सोडाच पण , किमान तरी प्रतिवाद करण्याइतकाही काँग्रेस पक्ष  सभागृहात उरलेला नाही , हे चित्र कांही हा पक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपला तुल्यबळ  लढत देईल या आशेला बळकटी देणारं नाही ! ) पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहेमीच संसदेत प्रचारकी भाषण करतात असं म्हणून घराणेशाहीवर केलेल्या टिकेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही कारण ती  टीका करतांना त्यांच्या पक्षामधील घराणेशाहीकडे त्यांनी सोयीस्कर कानाडोळा केलेला आहे म्हणून भाजपतील घराणेशाहीचा पुन्हा एकदा घेतलेला हा धांडोळा-

भाजप सध्या राज्यात ज्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आहे त्या राज्याचे माजी मुख्य आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव महाराष्ट्र विधान परिषद सदस्य होते . देवेंद्र यांच्या काकू शोभाताई फडणवीस प्रदीर्घ काळ आमदार आणि १९९५मधे राज्यात सत्तारुढ झालेल्या सरकारात मंत्रीही होत्या . भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात ज्यांनी खोलवर रुजवला असं समजलं जातं त्यात गोपीनाथ मुंडे यांचं नाव अग्रस्थानी आहे . त्याच मुंडे यांचीही घराणेशाही भारतीय जनता पक्षात आहे . पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि पक्षाचा मध्यप्रदेशचा कार्यभार असलेल्या , महाराष्ट्रातील ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ आहोत असा दावा केलेल्या ,  गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे तीन वेळा आमदार आणि राज्यातील भाजपाच्या सरकारात एक प्रभावी मंत्रीही होत्या . पंकजा यांची सख्खी बहीण डॉ . प्रीतम सलग दुसऱ्यांदा भाजपच्या उमेदवार म्हणून विजयी झालेल्या असून पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारीच्या रिंगणात आहेत .

भाजपचे एकेकाळचे दिग्गज एकनाथ खडसे आता जरी राष्ट्रवादीत गेले असले तरी एकनाथराव भाजप-सेना मंत्रिमंडळात दोन्ही वेळा मंत्री होते ; विधानसभेचे ते विरोधी पक्ष म्हणून वावरले तेव्हाही भाजपतच होते . ते भाजपत असतांनाच त्यांच्या सूनबाई रक्षा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्या लोकसभा  निवडणुकीत विजयी झाल्या . भाजपनं एकनाथ खडसे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली  ( देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करुन नंतर  ते भाजप  सोडून गेले ! )  पण , त्यांच्या कन्येला पक्षानं उमेदवारी दिली . ‘दाजी’ या नावानं ओळखले जाणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही त्यांच्या पुत्राला राजकारणात आणून पक्षांतर्गत विरोधकांच्या नाकावर टिच्चून विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली आणि विजयी करुन दाखवलेलं आहे . भारतीय जनता पक्षातील राष्ट्रीय  स्तरावरील  ‘हेवी वेट’ प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यावर त्यांची कन्या पूनम महाजन-राव यांना उमेदवारी देणं ही राजकीय घराणेशाहीच आहे . त्या  उत्तर- मध्य मुंबई मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर विजयी झाल्या आहेत आणि त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची अंधुक का असेना संधी आहे . पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या शाखांवरही त्यांनी काम केलेलं आहे . विद्यमान कॅबिनेट मंत्री विजय गावित यांची कन्या हिना ( नंदुरबार ) आणि एक आप्त  राजेंद्र (पालघर ) हे दोघेही भाजपचे  खासदार आहेत . पक्षाची राष्ट्रीय तिजोरी प्रदीर्घ काळ सांभाळलेले वेदप्रकाश गोयल आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र पियूष गोयल , हे दोघेही भाजपचे खासदार म्हणून वावरले . पियूष गोयल तर २०१४ पासून केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत .

‘येन केन’ मार्गानं अन्य पक्षातून लोकांना ओढून पक्ष बळकट करण्यात भाजप माहीर आहे .        ( अन्य पक्षातून भाजपत आलेल्या अशा लोकांना मी परोपजीवी जंतू -Ectoparasite म्हणतो ! ) शिवसेना ते भाजप मार्गे काँग्रेस असा प्रवास झालेले  नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचे पुत्र नीतेश आमदार आहेत . मोठे पुत्र माजी खासदार पुन्हा राजकारणात संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत . काँग्रेस-राष्ट्रवादी-काँग्रेस असं तळ्यात मळ्यात करुन दत्ता मेघे भाजपत आल्यावर त्यांचे पुत्र सागर आणि समीर या दोघांनाही भाजपनं उदार हस्ते आमदारकी बहाल केली .  कॉंग्रेस-शिवसेना-कॉंग्रेस असा प्रवास करुन भाजपवासी झालेले राधाकृष्ण पाटील राज्यात नुकतेच कॅबिनेट मंत्री झाले आहेत तर त्यांचे पुत्र डॉ . सुजय  लोकसभेचे सदस्य आहेत . अशा अनेक ‘परोपजीवीं’ची  घराणेशाही आता भाजपत पावन झाली आहे !

भाजपतील घराणेशाही केवळ महाराष्ट्रातच घडलेली आहे असं नाही . उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महंत अवैद्यनाथ यांचे वारसदार आहेत . देशाचे विद्यमान संरक्षण मंत्री आणि उत्तरप्रदेशचे माजी सिंह यांचे पुत्र पंकज सिंह सलग दुसऱ्यांदा आमदार आणि मंत्री आहेत . भारतीय जनता पक्षातील छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे पुत्र अभिषेक, हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे पुत्र अनुराग ठाकूर सलग तिसऱ्यांदा खासदार आणि दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र पर्वेश खासदार आहेत . याशिवाय कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा आणि बी. वाय. राघवेंद्र , मनेका गांधी आणि वरुण गांधी, सी. लाल गोयल आणि विजय गोयल, व्ही. के. मल्होत्रा आणि ए. के मल्होत्रा ,  सुंदरलाल पटवा आणि त्यांचे बंधू , के. विजयवर्गीय आणि ए. विजयवर्गीय अशी कितीतरी घराणेशाहीची उदाहरणे देता येतील .

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना आणि उभारणीत राजमाता या नावाने ओळखल्या गेलेल्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या वसुंधराराजे राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या . वसुंधराराजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह खासदार होते . वसुंधराराजे यांची बहीण यशोधरा राजे याही मंत्री होत्या . विजयाराजे शिंदे यांच्याच कुटुंबातील ( काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र ) ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसचा त्याग करुन आणि मध्यप्रदेशात काँग्रेसला खिंडार पाडून नुसतेच भाजपत आलेले नाहीत तर काँग्रेसचं मध्यप्रदेशातलं सरकार घालवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली . ज्योतिरादित्य सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत . वर दिलेली सर्व उदाहरणे घराणेशाहीची आणि भारतीय जनता पक्षातीलच आहेत. ती जर घराणेशाही नाही असं कुणाला ( म्हणजे भाजप समर्थकांना )  वाटतं असेलच तर ते सर्व गोडगैरसमजाच्या ढगात आत्ममश्गुल विहार करत आहेत असंच म्हणायला हवं  ! एका अहवालानुसार उत्तरप्रदेशमधले भाजपचे ७१ पैकी १२ , बिहारमधले  २२ पैकी ५ , गुजरात आणि राजस्थानमधले प्रत्येकी ३ खासदार राजकीय घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करतात. केंद्रीय मंत्रिमंडळातही १५ मंत्री राजकीय घराणेशाहीचे वारसदार आहेत . ही सर्व माहिती लक्षात घेता अन्य पक्षांतल्या घराणेशाहीमुळे लोकशाहीला धोका आहे आणि भाजपतील घराणेशाही मात्र लोकशाहीला पोषक आहे , अशी टीका करणं  हा शुद्ध ढोंगीपणा आहे . आपल्याच पक्षातील या घराणेशाहीची माहिती नसणाऱ्याना  एक तर विस्मृतीचा रोग झाला असावा किंवा ती माहिती त्यांना नाही , असं सोंग तरी ते वठवत असावेत  .

घराणेशाहीची लागण सर्वपक्षीय आणि राष्ट्रीय आहे हे लक्षात घेऊन , दुसऱ्या पक्षातील घराणेशाहीचं कुसळ बघणाऱ्याच्याही डोळ्यांत घराणेशाहीचंच  मुसळ आहे , याचा विसर भाजपनं पडू न देता घराणेशाहीचे कांदे नाकानं  सोलण्याचे नसते उद्योग बंद करावेत .

 प्रवीण बर्दापूरकर
भ्रमणध्वनी – ९८२२०५५७९९

www.praveenbardapurkar.com

praveen.bardapurkar@gmail.com

praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट