लळा आणि छंदही शब्दांचा !

१५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन , त्यानिमित्तानं हे  कांही आत्मपर –

बालपणीचा काळ , १९६०ते ७०च्या दशकातला . माझी आई-माई नर्स होती . औरंगाबाद जिल्ह्यातलं खंडाळा आणि बीड जिल्ह्यातलं नेकनूर ही दोन गावं वगळली तर तिची प्रत्येक नियुक्ती आडगावातलीच . एसटीनं  रस्त्यावरच्या फाट्यावर सोडलं की तिच्या नियुक्तीचं गाव हमखास २/३ तरी  किलोमीटर आत असे . मग ते अंतर पायी चालत जायचं आणि यायचं किंवा मिळेल त्या बैलगाडीची  ‘लिफ्ट’ घेऊन तो प्रवास करायचा . असे ते दिवस . आमचं कुटुंब कनिष्ठ मध्यमवर्गीय श्रेणीतलं आणि ग्रामीण भागातलं.  तेव्हा एकूणच शहरी , निमशहरी किंवा ग्रामीण अशा तिन्ही स्तरावरच्या मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मनात किंवा वातावरणात म्हणा , हॉबी , पर्सनिलिटी डेव्हलपमेंट , करियर , करियर काउन्सिलिंग अशी काही थेरं नव्हती . शाळा सुटली की घरी दप्तर टाकायचं आणि हुंदडायचं .

संध्याकाळ झाली की कंदिलाची काच वगैरे पुसून ठेवायची . बहुतेक सार्‍या ग्रामीण भागात कंदील फारच कमी होते . मिणमिणते दिवे किंवा चिमण्या हेच उजेडाचे साधन . खेळही फार नाहीत . नदीच्या किनारी जाऊन काही तरी धावाधाव करायची किंवा त्या वाळूत कबड्डी खेळायची किंवा गल्लीतल्या गल्लीत ‘धप्पाकुटी’ हे असे काही मोजके खेळ असत . चिंध्यांना एकमेकांभोवती गुंडाळून त्याचा तयार केलेला मध्यम आकाराचा चेंडू आणि तो एकमेकांना फेकून मारणे या खेळाला धप्पाकुटी असे म्हणतात . पण तरीही का कोण जाणे , खंडाळा या गावी मला चित्रकलेचे वेध लागले . माईनं  आणलेल्या कुठल्या तरी पुस्तकात कोण्या चित्रकाराचं पुस्तक असावं , त्याचा हा परिणाम असू शकतो किंवा आमच्या शेजारी एक कुंभार होते . खरं तर , आम्ही त्यांच्या वाड्यात राहायचो .  त्यांच्या अगदी शेजारी आम्ही राहात असू असं म्हणायला हवं . त्यांची एक शैली होती . प्रत्येकवेळी कुठलंही पात्र घडवायला घेतलं की त्याची एक रेखाकृती ते काढायचे आणि त्या डिझाईननुसार ते पात्र घडवायचे . ते बघून बघून ते पात्रांचे आकार काढायचा छंद मलाही लागला . पुढे मी त्यात सुधारणा करीत आजूबाजूच्या आकृत्या वगैरे रेखाटू लागलो . अर्थात त्या रेषांना आकार आणि मार्गदर्शन दोन्ही काही नव्हतं . पण त्यातील काही चित्रं बघून आमचे चित्रकलेचे शिक्षक मात्र बर्‍यापैकी खूष झाले .  त्या आकृत्यात रंग वगैरे कसे भरायचे हे त्यांनी शिकवलं. मलाही त्यात रस वाटू लागला . पुढे जाऊन त्यांना चित्रं कशी काढायची , असं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला आजूबाजूला जे काही दिसेल ते काढत चल , चित्र आपोआप येत जाईल . चित्र करण्यासाठी इतकं व्यापक मार्गदर्शन करणारा हा जगातला एकमेव गुरु आणि मी त्याचा एकमेव शिष्य .

पण , मूलतः माझ्यावरचा जो संस्कार आहे तो शब्दांचा . तिकडे वळण्याआधी चित्रकलेची ही कथा इथे पूर्ण करुन टाकतो . तर , त्या चित्रकलेतील माझी रुची बघून आईने मला कॅम्लीनच्या रंगांच्या काही डब्या दिल्या आणि ड्रॉईंगपेपर आणून दिले . दोन-चार ब्रशही आणून दिले . रंग ठेवण्यासाठीची एक चकती आणून दिली . त्या चकतीला पॅलेट म्हणतात हे चित्रकलेच्या शिक्षकांनी सांगितलं तेव्हा मला समजलं . मग आमच्या वर्गातल्या एका मित्राच्या वडिलांनी आंब्याच्या बुंध्यापासून दोन-चार फ्रेम करून दिल्या आणि त्यावर ते ड्रॉईंग पेपर पक्के करुन दिले . ते घरात खुंटाळ्याला टांगून मी काहीबाही करीत असे . पुढे औरंगाबादला आल्यानंतर, मला  वाटतं तो १९७२-७३च्या नंतरचा काळ असावा . रमण त्रिफळे आणि त्याच्या अनुषंगाने काही माझे मित्र झाले . हेमंत नागदिवे वगैरे वगैरे ; तो पुढे  राज्याचा कला संचालक झाला . एक पारपियानी नावाचे कलाशिक्षक होते . ही सर्व मंडळी औरंगाबादच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये नुकतीच लेक्चरर म्हणून लागली होती . त्यांच्या नादाने त्यांच्या विद्यार्थ्यांसह औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर रात्री उशिरा जाऊन रेखाटनं करण्याचा छंदही मला लागला .

माईला मात्र हे उद्योग फारसे पसंत नव्हते . कारण माझी चित्रकला म्हणून जी कांही होती , ती बिगरी अशा स्वरुपाची होती . त्यातून अर्थार्जन काही होणार नाही हे तिला माहिती  होतं . दरम्यानच्या काळात माईमुळेच मला शब्दांचा लळा लागला .  माईला वाचनाचा विलक्षण छंद . त्या काळातलं जनजीवन लक्षात घेतलं तर तिला या सगळ्या छंदासाठी फारसा वेळ मिळत नसे . कारण एकदा बाळंतपणाचं आमंत्रण आलं की त्यात तिचे २/३ दिवस जात असत. एक दिवस यायचा, एक दिवस जायचा, एक दिवस बाळंतपणाचा . तिचा प्रवासही सगळा बैलगाडीनंच .  आल्यानंतर ती जाम थकलेली असे. त्यात तिला अर्धशिशीचा खूप त्रास होता आणि ती अर्धशिशी उफाळून आली की डोक्याला फडकं बांधून ती २/२ , ३/३/ दिवस झोपून राहात असे  आणि घरात अमृतांजनचा दर्प सुटत असे . याच काळात आलं ( अद्रक ) कुटून त्यात थोडीशी साखर टाकून तिला द्यावी लागे . या सगळ्या तिच्या जगण्याच्या व्यापामध्ये वाचनाला एक विशिष्ट स्थान नसे . ती आजारी असो वा नसो , झोपलेली असो वा नसो सतत आम्हा मुलांकडून वाचून घेत असे. थोडासा रिकामा वेळ मिळाला की गवले करणे आणि ते करता करता कविता गुणगुणणे हा तिचा छंद होता . ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी ’ ही आणि अशा अनेक कविता ती गुणगुणत असे .

शिक्षा करण्याची माईची सवयही जगावेगळी . आम्ही तर लहानच होतो . खोड्या करण्याचं , चुका करण्याचं ते वयच होतं .  ( साधारणपणे छोट्या  चुका , छोट्या-मोठ्या खोड्या याकडे गावातले लोक दुर्लक्ष करत कारण माईकडून त्यांना कायम औषध लागत असे .) पण ,  चूक किंवा खोडी जर गंभीर असेल आणि त्याबद्दल शेजारच्या-पाजारच्यांनी कोणी चुगली केली तर मग मात्र शिक्षा अपरिहार्य असे . मग माई शिक्षा म्हणून मला एका पितळी पाण्याच्या पिंपात उभं करायची आणि त्या पाण्यात उभं असताना एखादं पुस्तक मोठ्या आवाजात वाचण्याची ती सक्ती करीत असे . शिक्षेची मुदत संपण्याआत वाचन थांबलं तर शिक्षेच्या मुदतीत वाढ होत असे . यापेक्षा कठोर शिक्षा म्हणजे याच पिंपात उभं राहून वीरकरांच्या डिक्शनरीतले शब्द पाठ करणं . एखादं अल्फाबेट माई सांगत असे आणि त्या अक्षरानं  सुरु  होणारा इंग्रजीशब्द पाठ करणं किंवा मग रेड अ‍ॅण्ड मार्टिनचं ग्रामर घोकणं अशी ती शिक्षा असे आणि ते अतिशय कंटाळवाणं काम असे . पाठ करीत असलेल्या शब्दातले काही शब्दार्थ माई अचानकरीत्या डिक्शनरी हातात घेऊन विचारीत असे . त्याची उत्तरं अचूक देता आली तर शिक्षा समाप्त नाही तर पिंपातल्या पाण्यात उभं राहणं आणि पाठांतर पुढे सुरु ,  अशी ती वाढलेली शिक्षा असे .

शब्दांची झालेली अशी ही पहिली ओळख पुढे आयुष्यभर आपला श्‍वास बनणार आहे हे तेव्हा काही ठाऊक नव्हतं पण , हीच शिक्षा पुढे माझा जगण्याचा श्‍वास बनली हे मात्र खरं . हळूहळू वय वाढत गेलं , शिक्षण वाढत गेलं, आईच्या सोबत जे  काही वाचत असे ते वाचत वाचत महाविद्यालयीन जीवन सुरु झालं.  मी मॅट्रिक झालो आणि नेमक्या त्याच वर्षी कन्नडला महाविद्यालय सुरु  झालं त्यामुळे पुढच्या शिक्षणाची सोय झाली . त्या महाविद्यालयामुळे ग्रंथांचं आणखी एक मोठं दालन खुलं झालं . तिथे मिळेल ते वाचत होतो पण , त्या वाचनाला काही शिस्त अशी नव्हती . माईनं  तर माझ्याकडून ‘कर्‍हेचं पाणी’ पासून दासबोध आणि तुकारामांची गाथा असं काय काय वाचून घेतल्याचं आठवतं . ती देवभोळी नव्हती किंवा देवभक्तही नव्हती पण , अधूनमधून तिने गजानन महाराजांची पोथीही वाचून घेतली हेही आठवतं . उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत , ( तेव्हा या  सुट्ट्या मोठ्या असत. ) जुन्या-पुराण्या टाईम्स ऑफ इंडिया आणि एक-दोन दिवस शिळ्या असलेल्या मराठा या दैनिकातील १०/२० ओळी दररोज लिहिणं बंधनकारक होतं . हे लेखन झाल्याशिवाय सकाळचं खाणं मिळत नसे . ( हल्लीच्या भाषेत त्याला नाश्ता किंवा ब्रेकफास्ट असं म्हणतात . ) असं शुद्धलेखन व्याकरणदृष्ट्या अचूक असेल तर सातूच्या पिठात गुळाचा खडा किंवा एखादं बिस्कीट बक्षीस मिळत असे . अनेकदा तर माई स्वयंपाक करीत असतानाही तिला पुस्तकं वाचून दाखवावी लागत .

शब्द म्हणजे केवळ काही अक्षरांचा समूह नाही आणि अक्षरांचा समूह म्हणजे काही भाषा नाही . ते जे काही शब्द असतात आणि त्यातून जो कांही मजकूर तयार होतो , त्याला निश्चित अर्थ असतो ,  भावना  असतात , हा माईचा माझ्यावर लहानपणीच झालेला संस्कार होता . त्या काळातही गावात मराठी , हिंदी आणि आमचा भाग मराठवाड्याचा असल्याने विशेषतः उर्दू अशा तीन भाषा प्रचलित असत . त्याबद्दल एकदा तिनं एकदा स्पष्ट शब्दात आणि तेही निक्षून सांगितलं होतं की , भाषेला धर्म किंवा जात नसते . माईनं  भाषेला जात किंवा धर्म नसतो हा केवढा संपन्न संस्कार लहानपणी केला होता, हे आता वयाच्या ६८  व्या वर्षांनंतर जाणवतं आणि माईबद्दल जन्म दिल्याबद्दल कृतज्ञ राहायचं की हा भाषा संस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची , असा तो संपन्न संभ्रम आहे .

संध्याकाळी पाढेही ( परवचा ) आवश्यक असत .  दुसरी-तिसरी पर्यंत तर घरी पाढे म्हणायचे आणि मग लगेच उर्दू बाराखडी  ‘अलीफ बे’ घोकण्यासाठी जावं लागायचं . माझ्या तिसरीपर्यंत आमच्या शालेय शिक्षणामध्ये उर्दू भाषाही होती . नंतर ती बंद झाली . पण परवचा झाला की अलीफ बे म्हणायला जाणं आवश्यक असायचं . आयुष्याच्या तारुण्यात डॉ. विनय वाईकर आणि नारायण कुळकर्णी-कवठेकर यांच्यासारखे  उर्दूचे जाणकार भेटल्यानंतर उर्दूची गोडी नंतर जोपासणं राहून गेलं याची राहिली नाही याची खंत कायम वाटत आलेली आहे.

भाषेचा, शब्दांचा हा लळा आणखी दृढ झाला तो विशेषतः नागपूरला आल्यावर आणि त्यातही मंगला विंचुर्णेची भेट झाल्यानंतर .  नागपूर पत्रिका या दैनिकातली मंगला माझी सहकारी . रविवार पुरवणीची इन्चार्ज .  तिला सहायक म्हणून मी रविवार पुरवणीचे काम बघत असे . तिला शब्दकोडी सोडवण्याचा नाद होता . तिच्या घरी चकरा सुरू झाल्या. ( त्या चकरांचा परिणाम शेवटी आमच्या लग्नात झाला हे इथे सांगायला नकोच ! ) तिच्या घरच्यांनाही हा शब्दकोड्यांचा नाद होता . तो नाद मलाही लागला आणि मग शब्दांशी एक वेगळं नातं जुळून गेलं . पर्यायी शब्द ,  शब्दांची  उत्पत्ती अशाअनेक बाबी कळायला लागल्या . शब्दांशी लागलेला हा लळा आजही अव्याहतपणे सुरु आहे .  सकाळी मी आणि मंगला जेव्हा वृत्तपत्र वाचत डायनिंग टेबलवर बसलेलो असूत तेव्हाही माध्यमात आलेल्या चुकीच्या शब्दांवरुन आमच्यातच वाद होत असे . अनोळखी शब्द भेटला की आमचे हात  डिक्शनरीकडे जात . शब्दांचे हे खेळ आहेत ते कळण्यात आणि त्यातून शब्दांचा लळा लागण्यात मंगलाची भूमिका खूपशी मोठी होती .  ती मराठीची स्नातक आणि इंग्रजीवर तिचं प्रभुत्व . तिचं पीएच.डी.साठी रजिस्ट्रेशनही झालेलं होतं . ती मुक्तिबोधांची भक्त , कविवर्य ग्रेसांची विद्यार्थिनी अशा अनेक अर्थांनी मराठीची ती जाणकार होती . त्यात रविवार पुरवणीचं काम बघत असताना तिच्यात एक प्रगल्भ अशी संपादकीय जाण विकसित झालेली होती . या सगळ्याचा परिणाम माझ्यावरही होत गेला .

अशात शब्दकोड्यांच्या संदर्भात झालेली गंमत सांगायलाच हवी . वृत्तपत्रातील शब्दकोडी मग ती इंगजी असो वा मराठी सोडवणं ही बेगम  मंगलाची मक्तेदारी होती . विशेषतः तिची नोकरी सुटल्यापासून तिच्या या मक्तेदारीला आव्हान दिलेलं मुळीच  चालत नसे . माझी कन्या अर्थातच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर इंग्रजी शिक्षणाकडे वळली . आता तर तिचा विवाहही अ-मराठी भाषकाशी झालेला आहे . त्यामुळे ती मराठी वृत्तपत्र वाचत नाही म्हणून हा वाद माझ्या आणि मंगला पुरताच असे . मग मी मनातल्या मनात शब्दकोडी सोडवायला सुरुवात केली आणि लिखित स्वरुपात सोडवण्यासाठी ती शब्दकोडी मंगलसाठी ठेवत असे .

शब्दांचा हा लळा सुरुवातीच्या काळात सर्वस्तरीय होता . इथे स्तर म्हणजे वाचनाला काही दिशा असते , वाचनाची काही एक बैठक असते , वाचन हे विचारासाठी करायचं असतं , वाचन हे आपल्याला अज्ञात असलेलं वैचारिक विश्‍व जाणून घेण्यासाठी करायचं असतं , वाचन हे कुठला तरी इझम , धर्म , जात , पंथ, काही आंतरराष्ट्रीय घटना , इतिहास अशा विविध पैलूंशी निगडित असतं  असं काही माहीत नव्हतं.. सुरुवातीला जे हातात येत असे ते वाचत असे.  त्याला कथा ,  कादंबर्‍या , इतिहास, धर्म , भाषा असं काही बंधन नव्हतं . पुढे औरंगाबादला आल्यावर मात्र या सगळ्याला निश्‍चित दिशा लाभली . मग माझ्या लेखना आणि वाचनातून हळूहळू कथा , कादंबर्‍या वजा होत गेल्या . अर्थात त्यातही काही ललित लेखक मात्र माझ्या आयुष्यातून कधीच वजा होऊ शकले   नाही . महेश एलकुंचवार माझे अत्यंत आवडते लेखक, नाटककार आहेत . जयवंत दळवी , ग्रेस , ह. मो. मराठे , भास्कर लक्ष्मण भोळे , यशवंत मनोहर , सुरेश भट , मंगेश पाडगावकर , नारायण कुळकर्णी-कवठेकर अशा अनेक प्रतिभावंत लेखकांशी ओळख झाली . त्यांचा सहवास लाभला. त्यांच्या सहवास आणि  प्रभावातून माझं भाषाविषयक आकलन अधिकाधिक समृद्ध होत गेलं आणि माझा छंद अधिकाधिक उजाळत  गेला असं म्हणता येईल.

इथेच आणखी एक मस्त अशी घटना घडली . या आधीच्या महाविद्यालयीन जीवनापर्यंतच्या वाचनातून आणि  जे काही अति अभावग्रस्त  जगणं वाट्याला आलं त्यातून मला कथालेखक व्हावं अशी मोठी प्रबळ इच्छा निर्माण झालेली  होती . एव्हाना चित्रकला बरीचशी बाजूलाच पडली होती आणि मी काही कथा लेखनही केलेलं होतं . त्यातील कांही  कथा तेव्हाच्या मान्यताप्राप्त दैनिकांतून प्रकाशित झालेल्या होत्या . कवितांच्या मात्र मी फारसा वाट्याला गेलो नाही . याचं एक कारण असं की , कविता करण्यासाठी जी काही चिकाटी , संवेदनशीलता आणि निष्ठा लागते तसं कांही माझ्यात नव्हतं .  ( किंवा इतकं प्रेमळ होणं , इतकं लटकं होणं तेही नव्हतं . ) म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर कोणत्याही फॉर्ममधल्या कवितेशी एकनिष्ठ राहण्याची माझी वृत्ती नव्हती मग मी बहुधा कथालेखनाकडे वळलो असेन किंवा इतक्या मर्यादित शब्दात व्यक्त होण्याचं सामर्थ्य ज्याच्यात असतो तोच कवी होऊ शकतो आणि शब्दांचे सामर्थ्य माझ्यात नसावं अशीही एक भावना मी कदाचित कथालेखन करण्याकडे वळण्यात असावी . पण , एक खरं, माझी कविता फार लवकरच सुटली पण कविता वाचन आणि कवींशी मैत्री मात्र अजूनही कायम आहे .

कथालेखनाकडे वळल्यानंतरची गंमत . सुरुवातीला कथा लिहिल्या, त्या प्रकाशितही झाल्या .  काही कथांना तर चांगली मोठी पारितोषिकंही मिळाली . काही स्तुतिपत्रंही आली . भेट झाल्यावर , पुढची कथा कोणती  किंवा कुठल्या विषयावर, किंवा पुढे काय, आता कोणती कथा, पुढची कथा कधी येणार अशा विविध पृच्छा लोक करीत . ते सगळे तसे तर सुखावणारे क्षण होते . नागपूरला असतानाच माझा जिवलग मित्र प्रकाश देशपांडे ‘युगवाणी’चा संपादक होता . त्यानं  संपादकपदाची सूत्रं हाती घेतल्यावर युगवाणीचा पहिलाच दिवाळी अंक निघणार होता . त्या अंकाच्या तयारीसाठी आम्ही बसलेलो असताना १०  निवडक कथा प्रकाशित करायच्या आणि प्रत्येकी  २००  रुपये मानधन द्यायचं असं ठरलं . १९८४  मधली ही घटना आहे . तेव्हा कवितेला जास्तीत जास्त १५ रुपये आणि कथेला २५  आणि प्रथितयश लेखकाला १००  रुपये असं मानधन मिळण्याचा तो जमाना होता . त्या पार्श्‍वभूमीवर कथेला २००  रुपये मानधन देण्याची योजना ‘मोहमयी धाडसी’  होती . खरं म्हणजे मुंगेरीलालचं ते स्वप्नच होतं. गप्पा अशाच पुढे सुरु  राहिल्या आणि माझ्या कथालेखनाचा विषय निघाला . प्रकाश देशपांडेनी मला आव्हानच दिलं की , आता तू पत्रकारितेत स्थिरावला आहे आणि कथालेखन विसरला आहे , तू काही या स्पर्धेत भाग घेण्याच्या लायकीची कथा लिहू शकणार नाही . मी ते आव्हान स्वीकारलं आणि यथावकाश ‘बिटविन द लाइन’ ही कथा लिहिली . ती प्रकाशला दिली . ती पुढे परीक्षकांकडे गेली . परीक्षकांकडे जाताना अर्थातच लेखकांनी नावं बंद करण्यात आलेली होती .

माझ्या कथेला पहिल्या तीन कथांत स्थान मिळालं. ते २००  रुपयांचं पारितोषिक त्या दिवाळीत आमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं . विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला . प्रमुखपाहुणे माधव गडकरी होते . माझ्या आग्रहाखातरच ते त्या कार्यक्रमाला आलेले होते. आणि स्टेजवरून त्यांच्या हातून तो पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद झाला . मात्र रात्रीच्या बैठकीत माधव गडकरी यांनी , स्पष्ट शब्दांत सांगायचं झालं तर चंपीच केली . कथालेखन करायचं असेल तर पत्रकारितेत येऊ नकोस आणि पत्रकारिता करायची असेल तर कथालेखन वगैरे विसर . पत्रकारिता म्हणजे ललित साहित्य नव्हे . केवळ साहित्य हे बीट  होऊच शकत नाही . सांस्कृतिक क्षेत्र हे बीट व्हावं लागतं आणि सांस्कृतिक क्षेत्र म्हणजे साहित्य , संगीत , अन्य सर्व कला , मूर्तिकला , गायन , वादन , नृत्य अशी विविध दालनं आहेत .  या  सर्वांच्या विषयी जेव्हा तुला माहिती होईल तेव्हाच तू सांस्कृतिक बीट कव्हर करु शकतो . पुस्तकांची प्रकाशनं कव्हर करुन कुणी सांस्कृतिक बीट करु शकत नाही वगैरे वगैरे.  त्याच  दिवशी रात्री माधव  गडकरी यांनी  माझी रवानगी राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात केली आणि एका उत्तम ( ? ) अशा कथालेखकाचा मृत्यू झाला व राजकीय वृत्तसंकलकाचा उदय झाला !

शब्दांच्या लळ्यातून मी पत्रकारितेत आलो . पुढे राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आलो तरी तो लळा कायम राहिला . शब्दांचा हा लळा माझ्या केवळ  उपजीविकेचं साधन ठरला नाही तर अत्यंत वैपुल्याने आयुष्य संपन्न करणारा अनुभव ठरला.

( महात्मा गांधी मिशनच्या ‘गवाक्ष’ या गृहमासिकाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख )

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट