कलाकृती आकळणं आणि आठवणींचा गुंता

|| २ ||

अक्षर लेखन- विवेक रानडे

( अजूग = एकाकी / एकटा / एकेरी / बेगुमान / आड-दांड अशा अनेक अर्थछटा असलेला आणि कालौघात बराचसा विस्मरणात गेलेला शब्द  आहे . )

ज्येष्ठ समीक्षक  बाळकृष्ण कवठेकर सरांच्या पोस्टमधील , “उतारवयातील हे एकाकीपण कुठे घेऊन जाणार कळत नाही . पुस्तके आहेत . पण वाचनात मन लागत नाही . टी.वी. पाहणे नकोसे वाटते . गाण्यात मन रमत नाही . सगळीकडे उदास उदास वाटते आहे .जगणे तर भाग आहे.” ही वाक्ये काळजावर चरा उमटवून गेली . कोरोनामुळे घरात कैद झालेल्या अनेक एकाकी माणसांच्या या भावना आहेत .

उन्हाचा कठोर कल्लोळ आणि चोहोबाजूनं चाल करुन येणारं अजूगपण कोरोनामुळे अनेकांच्या वाट्याला आलेलं आहे . जगण्याच्या वाटेवर उतार वयात अपरिहार्यपणे  कधी ना कधी येणाऱ्या अजूगपणाची मानसिक तयारी होती पण , ते असं क्रूर कातळी असेल याची कल्पना आमच्या या पिढीनं कधीच केलेली नव्हती . मुंबई , पुणे , नागपूर , औरंगाबाद , नासिक , सोलापूर  अशा सर्वच शहरात हीच स्थिती आहे . अनेक जीवांना कोरोनामुळे आलेलं एकाटपण असह्य झालेलं आहे . त्याच भावना कवठेकर सरांनी व्यक्त केल्या आहेत . आपापलं खाजगीपण आणि स्वातंत्र्य जपत  मुली किंवा/आणि मुलगे वेगळे आणि        आई-वडील वेगळे राहण्याची  ( विभक्त जीवन ) पद्धत आपण स्वीकारली , त्याला आता सहा तरी  दशकं झाली असावीत . त्या झाडाची मधुर फळं चाखली आता त्याचे कांटे सगळ्यांनाच बोचत आहेत .

काल बाळकृष्ण कवठेकर सरांची कालवा-कालव करणारी पोस्ट वाचली आणि आज  सकाळी टॅबवर कोणती कळ कशी दाबली गेली ते माहिती नाही पण , अचानक  संदीप खरे याची ‘नसतेस घरी तू जेव्हा , जीव तुटका तुटका होतो…’ ही कविता सुरु झाली  . ही कविता एकट्यानं ऐकण्याची ही पहिलीच वेळ . संदीप खरे याला मी अनेक वर्षापासून ओळखतो . अमेरिकेच्या एका दौर्‍यात

संदीप खरे

आम्ही सोबत होतो  . त्याच्या एका कार्यक्रमाचा मी प्रमुख पाहुणा होतो आणि त्याचा सत्कारही माझ्या हस्ते झालेला होता ; अर्थात त्याला हे सर्व आठवतं की नाही माहिती नाही आणि ते महत्वाचंही नाही  म्हणा .

आज सकाळी ऐकतांना ही कविता थेट भिडली , मन सैरभैर झालं . ‘जगण्याचे विरती धागे , संसार फाटका होतो…’ , हे ऐकतांना उर दाटून आला . डोळ्यांनी दगा दिला .  

आपण कविता वाचतो तेव्हा ती आपल्याला आवडते , कधी कोणी किंवा तो कवी दस्तुरखुद्द  ती व्यासपीठावरुन सादर करतो तेव्हाही आपण लगेच दादही देतो  पण , तेव्हा ती  कविता आपल्या हृदयाला खरंच भिडलेली असते ; ती कविता आपल्याला आकळलेली असतेच , असं मुळीच नसतं . ती कविता आपल्या भावभावनांचा , जगण्याच्या श्वास होण्याचा , ती आपल्या कवेत पूर्ण एकरुप होण्याचा क्षण यावा लागतो …संदीपची  ही कविता यापूर्वी अनेकदा ऐकली आहे पण , ती  कविता आकळण्याचा , तिनं उर दाटून येण्याचा क्षण आज आला . कवितेची प्रचीती येणं यालाच म्हटलं जात असणार .  

हे केवळ कवितेबद्दल घडत नाही . एखादं गाणं , एखादं गायन , चित्र , शिल्प , लेखन , एखादा चित्रपट अशा कोणत्याही कलाकृतींबद्दलही नेमकं असंच घडत असतं . आपण त्याचा या दृष्टीकोनातून विचार करत नाही , एवढंच .   

गगनेन्द्रनाथ टागोर यांचं ‘The Princess of the Enchanted Palace’ ( ढोबळ मानानं सांगायचं मराठीत तर ‘जादूच्या किंवा मोहमयी महालातील राजकन्या’ असं म्हणता येईल ) नावाचं एक जल रंगातलं चित्र आमच्याकडे आहे . ‘द प्रिन्सेस’ या नावानंही हे चित्र ओळखलं जातं . त्यांनी ते चित्र १९२५ मधे काढल्याची नोंद आहे . कुणा रोमा चटर्जी यांच्या संग्रहात ते असल्याची माहिती आहे . ललित कला अकादमीनं या चित्राच्या कांही मोजक्या प्रती १९८०साली मुद्रीत केल्या होत्या . १९८२ साली नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर पुस्तकांचं एक मोठ्ठं प्रदर्शन लागलं होतं . त्यात एका कोपर्‍यात ‘रिप्रिंट’ नावाखाली  पडलेल्या एका गठ्ठयात असलेली या चित्राची ही प्रत हाती लागली .

The Princess of the Enchanted Palace’

खूप दिवस नाही तर , अनेक  वर्ष ती गुंडाळी तश्शीच होती . पक्क आठवतं २०१२च्या मे महिन्यात  एक दिवस  आवरा-सावरी करतांना गुंडाळी ऊघडली तेव्हा ते चित्र नीट बघितलं गेलं आणि त्या सौम्य रंगांनी डोळे शांत झाले . त्या जलरंगात विरघळून गेलो . मन एका विलक्षण तृप्ततेनं जडशीळ झालं . एखादा ऐवज अचानक  हाती आल्यावर येते तशी क्लांत स्तब्धता किती तरी वेळ अनुभवली . भानावर आल्यावर ते चित्र फ्रेम करुन आणलं आणि बैठकीत लावलं .  प्रख्यात चित्रकार , ‘बसोली’कार , दोस्तयार चंद्रकांत चन्ने यानं ते चित्र एक दिवस पहिलं आणि ती तो लुब्धच झाला . भानावर आल्यावर चंदू त्याच्या शैलीत म्हणाला , ‘प्रवीण तू मेल्यावर गरज भासून विकलं तर , या चित्राचे मंगलाला  कांही लाख रुपये तरी नक्कीच मिळतील रे , काळजी नको करुस !’ गगनेन्द्रनाथ टागोर यांचं ‘द प्रिन्सेस’ आमच्या हॉलमधे आजही आहे पण , जिला पैसे मिळाले असते ती बेगम नाही…

तर , सांगायचं तात्पर्य – कलाकृती आकळण्याचा , मनाला भिडण्याचा , ती आपल्या कवेत विरघळण्याचा  एक क्षण असतो . ‘द प्रिन्सेस…’ला त्यासाठी तीस वर्ष लागली तर संदीप खरे याच्या ‘नसतेस तू घरी…’ ला त्याच्या निम्म्या पेक्षाही कमी काळ लागला .

एका आकळण्याशी आठवणीतलं किती कांही-कांही गुंतलेलं असतं आणि अजूगपणात ते कसं चोहोबाजूनं अंगावर चाल करुन येतं , नाही का ?  

♦♦♦

***ज्यांनी पहिली नोंद वाचली नसेल त्यांच्यासाठी —

अजूगपणातल्या नोंदी || १ ||

वळवाचा पाऊस माई आणि अक्का …
जीवाची काहिली करणाऱ्या उन्हात  दुपारी पावसाच्या चार थेंबांनी हजेरी लावली , किंचित मृदगंध पसरला आणि २०१७च्या मे महिन्यात आजच्याच दिवशीची एका पोस्टची याद फेसबुकने दिली…
कोरोनानं आणलेला सक्तीच्या एकाटपणा त्यात हा शुष्क मृदगंध , बेईमान उन्हं… परकं आणि पोरकं वाटावं अशी उदासी पांघरलेली वातावरण आहे हे एकंदरीत …
धी वादळ सुटलं ; मग ऐन उन्हाळ्यात पावसाची सर आली .
वातावरणात मृदगंध पसरला .
हा मृदगंध आला की मातृत्वाच्या नात्याची वीण नकळत पण सरारुन येतेच .
आजकाल बहुतेकांच्या बोलण्यात आणि माध्यमात या पावसाचा उल्लेख सर्रास ‘अवकाळी पाऊस’ असा होतो .
उन्हाळ्यात येणाऱ्या या पावसाला आमच्या लहानपणी वळवाचा ( वळीव ) पाऊस म्हणत .
या पावसाशी माझं नातं इमोशनल आहे आहे आणि त्याची नाळ थेट आईशी जुळलेली आहे .
( तसं तर बेगम मंगला आणि मलाही पाऊस आवडायचाच . दुचाकीवर फिरायचो त्या काळातही कधी न रेनकोट घेतला ना छत्री .)
आईला आम्ही माई म्हणायचो . बांध्यानं ठेंगणी आणि विलक्षण सुंदर माई शासकीय सेवेत नर्स होती . उनं-पुरं ४८ वर्षांचं आयुष्य ती जगली . त्यातलं आम्ही मुलग्यांनी जे पाहिलं ते जगणं मराठवाड्याच्या दुर्गम ग्रामीण भागात गेलं ; त्यापैकी जवळपास २२ वर्ष वैधव्याची .
लग्न कधी झालं , अण्णांशीच का झालं , मराठवाड्यात तू कशी आलीस… असे अनेक प्रश्न असायचे तिला माझे कळत्या वयात . पण, तिचं उत्तर एकच- ‘तुला नाही कळायचं ते . बाईचे भोग असतात ते…’
माईचं माहेर विदर्भातलं .

माई

वळवाचा पाऊस आला की तिचे डोळे हमखास ओले व्हायचे . ती गुमसुम व्हायची बराच वेळ .
अनेकदा कुठं तरी शून्यात बघत बसायची .
तेव्हा ; एकदा आलेल्या अशा पावसानंतर आईनं म्हटलेल्या बहिणाईंच्या ओळी अजूनही आठवतात—
वळवाचा पाऊस पडून ओसरला ,
भावाला झाल्या लेकी , बहीण इसरला…
तिला चार भाऊ आणि एक बहिण .
या ओळी एकदा तिनं ऐकवल्यावर मी त्यानंतर कधीच तिच्याकडे तिच्या माहेरच्यांची विचारपूस केली नाही .
वळवाचा पाऊस आला की माहेर तिच्या कातर डोळ्यात दिसायचं .
पत्रकारितेत आलो . पडाव नागपूरला पडला त्या वयात , वयाची तिशी पार केलेली असावी बहुदा तेव्हा ; एकदा उमरखेडला मामाकडे गेल्यावर एका दुपारी वयाची ऐंशी पार केलेल्या आजीशी गप्पा सुरु असतांना नेहेमीच येतो तसा अचानक वळवाचा पाऊस आला .
त्याआधी जोरदार वारं सुटलं .
टपटप थेंब पडू लागले…मृदगंध पसरला .
आजी-आम्ही तिला अक्का म्हणायचो ; एकदम गप्प झाली .
तिच्या डोळ्यात आठवणींचे ओले ढग दाटून आल्याचं दिसलं .
मी म्हटलं, ‘माईची आठवण येते का गं कधी तुला ?’ तेव्हा माईचा मृत्यू होऊन दहा-एक वर्ष उलटलेली असावी .
काहीच न बोलता तिनं मान डोलावली .
काही वेळ अक्का स्तब्ध बसली आणि मग म्हणाली , अरे माझ्या गर्भातनं आलेली नं ती . कशी विसरेन तिला…शेवटची भेटही झाली नाही आमची…खूप खस्ता खाव्या लागल्या तिला जगताना…’असं बरंच काही ती बोलत राहिली .
‘ असा, वळवाचा पाऊस आला की तिच्याही डोळ्यात पाणी उभं राहायचं ; रडायची ती माहेरच्यांच्या आठवणींनी’ , असं मी म्हणालो आणि अक्काच्या डोळ्यातून धारा लागल्या…काही वेळानं कढ ओसरल्यावर तिचा कृश हात माझ्या गालावरून फिरला . माईच्या स्पर्शाची याद आली . अगदी सेम टू सेम… मृदगंध घेऊन आलेली आणि वळवाच्या पावसात ओलीचिंब झालेली ती संध्याकाळ मग गडद होत गेली तरी आम्ही दोघं कितीतरी वेळ तस्सच शांत आणि स्तब्ध बसून राहिलो …
आता, वयाच्या पासष्टीत आलोय तरी वळवाचा पाऊस आला की माईच्या आठवणींचे कढत थेंब डोळ्यातून ओघळतात…
( ‘माई’विषयी ‘क्लोज-अप’ या व्यक्तिचित्र संग्रहात विस्ताराने लिहिलेलं आहे . हे पुस्तक देशमुख आणि कंपनी , पुणे येथे उपलब्ध आहे . )
***संपादित रिपोस्ट

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  ​+919822055799 
www.praveenbardapurkar.com    

संबंधित पोस्ट