|| परमधाम आश्रम , वर्धा ||

 

 

 

|| नोंद …४ ||

नागपूरहून वर्ध्याला जाताना पवनार गावाच्या आधी एक पूल लागतो . या पुलाच्या थोडसं अलीकडे उजव्या हाताला एक छोटा रस्ता खाली उतरतो आणि नदीकाठाला बिलगत पुन्हा उजवीकडे एका छोट्या  चढावरचं वळण घेऊन परमधाम आश्रमात विसावतो . हाच तो आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम . महात्मा गांधी यांनी त्यांच्या साबरमती आश्रमाची शाखा वर्ध्याला ( वर्‍हाडी भाषेत ‘वर्धेला’ ! ) सुरु केली आणि त्या आश्रमाचे प्रमुख म्हणून त्यांचे  सर्वोत्तम शिष्य  विनोबा भावे यांची नियुक्ती केली . वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी विनोबा वर्ध्याला आले . परमधाम आश्रम या नावानं हा आश्रम ओळखला जातो . कांही लोक ‘परमधाम’चा उच्चार ‘परंधाम’ असाही करतात . परमधाम म्हणजे उघड/प्रकट/जाहीर/विख्यात/नावाजलेला असा शब्दकोशातला अर्थ आहे  . आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेला म्हणून हा आश्रम प्रख्यात असल्याचं एका शिबिरात आम्हाला सांगण्यात आलेलं आहे .

                                                                                          परमधाम आश्रम

परमधाम आश्रम ही  विनोबा भावे यांच्या चरणी अतिशय भक्तीभावाने माथा टेकवण्याची गांधीवादी , समाजवादी आणि काँग्रेसजनांची एकेकाळची जागा . गांधीवादावर निष्ठा असणा-या अनेकांना रचनात्मक काम करण्याच्या प्रेरणा येथून सुमारे २० कि. मी. अंतरावर असणार्‍या आणि महात्मा गांधी यांनी वास्तव्य केलेल्या सेवाग्राम तसंच याच परमधाम आश्रमात मिळाल्या . त्यापैकी अनेकजण आजही अव्यभिचारी निष्ठेने त्या आता प्रकाशमान झालेल्या वाटांवर चालत आहेत .

आचार्य विनोबा भावे मिजासखोरांची कशी मस्त जिरवत याबाबत  यांची आमच्या सिनियर्सनी सांगितलेली  एक छान आठवण आहे माझ्याकडे . फार पूर्वी एकदा फेसबुकवर टाकली होती पण , इथे पुन्हा देतो-

एकदा आधी वेळ ठरवून विनोबा भावे यांची मुलाखत घ्यायला एक पत्रकार परमधाम आश्रमात गेला . इंग्रजी वृत्तपत्राचा म्हणून तोर्‍यात वावरणारा आणि  पूर्णपणे इंग्रजाळलेला तो पत्रकार होता . आश्रमात आल्यापासून तो त्याच तोर्‍यात वावरत होता . ते लक्षात आलेल्या आचार्य  विनोबा भावे यांनी मुलाखतीची वेळ झाल्यावर त्या पत्रकाराला विचारलं , ‘मी कोणत्या भाषेत बोललेलं तुम्हाला चालेल ?’

त्यानं पत्रकारितेच्या मिजाशीत उत्तर दिलं , ‘आपल्या आवडत्या भाषेत बोला’ .

विनोबांच ते…त्या पत्रकारांन पहिला प्रश्न विचारल्यावर त्यांनी सरळ मौन धारण केलं !

पत्रकार चक्रावला . भलं मोठ्ठ प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर उमटलं . बराच वेळ शांततेत गेला . त्या पत्रकाराची चुळबुळ वाढली . ती शांतता असह्य झाल्यावर अखेर त्यानं ‘आपण बोलत का नाही ?’ अशी आर्त विचारणा विनोबाजींना केली .

तेव्हा विनोबांनी लिहून दिलं …मौन ही संवादाची सर्वश्रेष्ठ भाषा आहे !

एका क्षणात मिजास उतरलेला तो पत्रकार मग खूपच गयावया करु  लागला , ‘सॉरी’ , ‘एक्स्ट्रीमली सॉरी’ असा जपच त्यानं सुरु केला . त्याची मिजास पूर्ण उतरल्यावर विनोबा यांनी मौन सोडलं आणि त्याला मुलाखत दिली . असो .

♦♦♦

काँग्रेस नेते- कार्यकर्त्यांसाठी , इंदिरा गांधी हयात असतांना नियमितपणे परमधाम आश्रमाला भेट देणं हा अप्रत्यक्षपणे इंदिरा गांधी यांच्यावरच्या निष्ठेचा एक भाग बनलेला होता  . कोणत्याही राज्याचं मुख्यमंत्रीपद  , कुठलंही मंत्रीपद मिळालं की , तो काँग्रेसवाला पवनारला येऊन विनोबा भावे यांना दंडवत घालणार . प्रणाम करतानाच तो फोटो घेऊन दिल्लीला जाऊन इंदिराजींच्या स्वीय सहाय्यकाला देणार हा शिष्टाचार होता . मुख्यमंत्री किंवा गेला बाजार किमान मंत्रीपद मिळण्याची कामना पूर्ण होण्यासाठी परमधाम आश्रमात येऊन विनोबा भावे यांना पायलागू करण्याची राष्ट्रीय (अंध)श्रद्धा काँग्रेस वर्तुळात त्या काळात होती !

परमधाम आश्रमात आचार्य विनोबा भावे यांच्याशी चर्चा करतांना तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी

काँग्रेसचे तत्कालीन एक बडं प्रस्थ सीताराम केसरी तर वर्षातून एकदा तरी आठ-दहा दिवस आश्रमात ठिय्या ठोकून बसलेले असत . रात्री आठ-साडेआठ नंतर गेलं तर अनेकदा अर्धी बंडी घातलेले केसरी आश्रमाच्या एकमेव फोनवरुन इंदिराजींशी दर दहा-पंधरा  मिनिटानं ‘हां जी म्याडम’ म्हणत बोलताना दिसत . तेव्हा हे सीताराम केसरी तत्कालीन पंतप्रधान इंदिराजीच्या अतिशय  जवळचे मानले जात त्यामुळे त्यांच्याभोवती गोंडा घोळताना अनेक काँग्रेसजन दिसत . आम्हा तरुण पत्रकारांनी हे गोंडा घोळणं बघितल्यावर हे नेते ओशाळवाणे होत…आम्हाला मजा वाटत असे .

सत्ता आणि राजकारणातल्या अगदी पंतप्रधानांसह  अतिमहत्वाच्या अनेक व्यक्तींची  ये-जा सतत असल्यानं परमधाम आश्रम हे एक न्यूज सेंटर होतं . असा कुणी मंत्री , बडा नेता येणार असला की , प्रसिद्धी खात्याच्या वाहनातून आमची आठवड्यातून किमान दोन वेळा तरी वर्धा वारी होत असे . तेव्हा नागपूर-वर्धा रस्ता लहान आणि अर्थातच एकेरी होता . इतका लहान की , बस किंवा ट्रकला रस्ता करून देण्यासाठी स्कूटरही रस्त्याच्या खाली घ्यावी लागे ! रस्त्यात आणि आश्रमाच्या परिसरातही खाण्याची तर सोडाच साधं पाणी पिण्याचीही बोंब असे . नेते आणि अधिकारी कारमध्ये ऐटीत बसून येत आणि तो-यात निघून जात . हाल होत ते बंदोबस्तावरील पोलीस आणि वृत्तसंकलन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांचे ! पत्रकार आणि पोलिसांकडे आश्रमवासीय लक्षही देत नसत . उलट त्यांच्याशी फटकूनच वागत  असत . आपल्याला काय या लोकांशी घेणं-देणं अशी आश्रमवासीयांची  वृत्ती असे . विनोबा भावे यांनी स्वेच्छा मरणाचा म्हणजे प्रायोपवेशन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अशा विपरीत परिस्थितीत ज्या पत्रकारांनी रात्रं-दिवस जागून प्रायोपवेशनाचं वृत्तसंकलन केलं त्या पिढीत अस्मादिकही होते .

विनोबा भावे यांचं प्रोयोपवेशन यशस्वी ( ? ) झालं . तेव्हा रशियात असलेल्या  दस्तुरखुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी तातडीनं मायदेशी परतल्या आणि वर्ध्याला पोहोचल्या . त्यांच्या  उपस्थितीत विनोबा भावे यांचं पार्थिव अनंतात विलीन झालं . ( एक पत्रकार म्हणून ते दिवस खूप कांही  शिकवणारे होते . तो प्रायोपवेशनाचा अनुभव मी विस्तारानं लिहिलाय . देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेल्या ‘डायरी’ या पुस्तकात आहे समाविष्ट  तो मजकूर .  ) विनोबा अनंतात विलीन झाले आणि  हळूहळू परमधाम आश्रमाचं राजकीय महत्व कमीकमी होत गेलं . गांधीवादी , समाजवादी आणि या विचाराने प्रेरित होऊन काम करणारासाठी मात्र वर्ष पुढील अनेक परमधाम आणि सेवाग्राम प्रेरणास्थान  राहिल .

जागतिकीकरण आणि खुली अर्थ व्यवस्था यातून आलेल्या नागरीकरणाचे वारे वर्धा जिल्ह्यातही वाहू लागले . देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम सुरु झाल्यावर नागपूर-वर्धा रस्ता तेव्हा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या  नितीन गडकरींच्या आग्रहामुळे मुंबई-नागपूर महामार्गाचा भाग झाला , मोठा चौपदरी झाला आणि परमधाम आश्रमात जाणार्‍या बाजूच्या छोट्या त्या  रस्त्यानं अंग चोरुन घेतलं  . दीनवाणा झाल्यासारखा दिसतो आता तो रस्ता आता आणि परमधाम आश्रमही अनोळखी कटाक्ष टाकतो आपल्याकडे .

♦♦♦

चिपळूणला दैनिक ‘सागर’मध्ये असताना १९७९साली एकदा विनोबा यांच्या रायगड जिल्ह्यातील गागोदे या जन्मगावी जाऊन आलो . गावाकडे तटस्थपणे पाहत त्यांचं घर आत्ममग्न उभं होतं . विनोबा यांचं लेखन नंतर वाचनात आलं .  कांही समजलं…खूपसं

                                                                                    परमधाम आश्रम

डोक्यावरून गेलं तरी हा माणूस ज्ञानाचा अतिविशाल वटवृक्ष आहे हे लक्षात आलं . त्यांच्या ज्ञानगर्दसावलीने संमोहित केलं…मग त्यांचे विचार आकळून न घेण्याचा पत्रकाराला साजेसा कोडगेपणा आला . दोन-चारदा त्यांचे कार्यक्रम कव्हर केले  . दोन-तीन वेळा जवळून त्यांना बघता आलं . ज्ञानस्थ , स्वमग्न आणि सात्विक तपस्वी अशी त्यांची प्रतिमा मनावर कोरली गेली .

राजकारण आणि प्रशासनाच्या आघाडीवर आता सेवाग्राम आणि परमधाम आश्रमांना स्थान नाही . अनेक संस्थांना नावं दिलेली  असली आणि उठता-बसता गजर होत असला तरी प्रत्यक्षात महात्मा गांधी चलनी नोटेपुरते उरले आहेत तर निर्मला देशपांडे यांचं निधन

झाल्यावर तर विनोबांचे नाव खिजगणतीत गेल्यासारखंच आहे…

खरं तर , गांधी-विनोबा यांचे विचार विस्मृतीच्या खाईत सोयीस्करपणे ढकलून देण्यात आले आहेत . महात्मा गांधी-विनोबा भावे यांच्या स्वप्नातला भारत त्या स्वप्नापासून किती-किती दूर-दूर गेला आहे याची जाणीव परमधाम आश्रमाला महामार्गावरुन जा-ये करणार्‍या वाहनांच्या  अनोळखी आवाजातून होत असेल का ?

-प्रवीण बर्दापूरकर

( ३१  मे २०२० )

​Cellphone  ​+919822055799 / ​praveen.bardapurkar@gmail.com​ / www.praveenbardapurkar.com

(लेखातील  छायाचित्रे अनिल गडेकर , नागपूर यांच्या सौजन्याने )

अक्षर लेखन- विवेक रानडे

( अजूग = एकाकी / एकटा / एकेरी / बेगुमान / आड-दांड अशा अनेक अर्थछटा असलेला आणि कालौघात बराचसा विस्मरणात गेलेला शब्द म्हणजे ‘अजूग’ . )

संबंधित पोस्ट