भाजपला मोठं तर काँग्रेसला थोडसं यश !

गामी लोकसभा निवडणुकीसाठी जर राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील विधानसभा निवडणुका सेमी फायनल ( उपांत्य फेरी ) समजायची असेल तर भारतीय जनता पक्षानं सेमी फायनलमध्ये दणदणीत विजय संपादन केलेला आहे आणि अंतिम फेरी जिंकण्याचेही स्पष्ट  संकेत दिलेले आहे , हे मोकळेपणानं मान्य करायला हवं . पराभवाचं विश्लेषण करायला आणि त्यानिमित्तानं वेगवेगळी समीकरणं नंतर भरपूर वाव आहे .

२०१८ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले त्यादिवशी या चार  राज्यातील ६४७ पैकी तब्बल ३८० जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या ( नंतर मध्यप्रदेशातील कांही आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेले आणि त्या राज्यातून काँग्रेसला पायउतार व्हावं लागलं  ! ) २०१८च्या विधानसभा निवडणुकीत या चार राज्यात काँग्रेसचं एकूण संख्याबळ तेलंगणात सत्तापालट करुनही २३४ इतकं कमी झालेलं आहे . २०१८च्या विधानसभा निवडणुकीत या राज्यात भाजपला केवळ १९८ जागा मिळाल्या होत्या आणि या म्हणजे , आज निकाल लागलेल्या  २०२३च्या निवडणुकीत भाजपचं संख्याबळ ३३८च्या आसपास जाईल असं सध्याचं चिन्ह आहे .या चारही राज्यात हा मजकूर लिहित असतांना भाजपच्या जागांत घसघशीत वाढ झाली आहे तर काँग्रेसची तेलंगणा वगळता अन्य तीन राज्यात मोठी पीछेहाट झालेली आहे . हा कांही केवळ काँग्रेसलाच नाही तर आगामी म्हणजे , २०२४च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीलाही मतदारांनी दिलेला जोरदार धक्का आहे .

एक लक्षात घ्यायला हवं , २०१८च्या विधानसभा निवडणुकीत या राज्यात भारतीय जनता पक्षाची जबर पीछेहाट झाली तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या चारपैकी तीन म्हणजे , मध्यप्रदेश , राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिलेला होता . या राज्यात मिळून लोकसभेच्या एकूण ८२ जागा आहेत आणि त्यापैकी तब्बल ६५  जागी ( राजस्थान २४ , मध्यप्रदेश २८ , छत्तीसगड ९ आणि तेलंगणा ४ जागी ) भाजपनं विजय संपादन केलेला होता . ही विधानसभा निवडणूक जर लोकसभेची सेमी फायनल समजायची(च) असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्ठ्या यशाची खात्री किमान या चार राज्यांनी तरी दिलेली आहे असं म्हणायला हवं .

हा मजकूर लिहिताना हाती आलेली आकडेवारी लक्षात घेता या विधानसभा निवडणुकीत या चार राज्यात भाजपचं विधानसभेतील संख्याबळ कसं वाढलेलं आहे यांची आकडेवारी अशी आहे – कंसातील आकडे २०१८ तील विजयाचे आहेत . राजस्थान ११५  ( ७२ ) , मध्यप्रदेश १६६ ( १०९ ) , छत्तीसगड ५७ ( १५ ) आणि आंध्रप्रदेश १ ( ९ ) .

याउलट तेलंगणा या राज्याचा अपवाद वगळता काँग्रेसची अन्य तीन राज्यात मोठी पीछेहाट झाली आहे . तेलंगणा राज्यात गेल्या     विधानसभेत  काँग्रेसला १९ जागा होत्या आणि त्या वाढून ६३ झालेल्या आहेत म्हणजेच काँग्रेसला या राज्यात सत्तास्थापनेसाठी निर्विवाद कौल मिळालेला आहे . मात्र राजस्थानात ९९ वरुन ७७ वर , मध्यप्रदेशांत १९४ ( फुटीपूर्वीचा आकडा ) वरुन ६३ वर आणि छत्तीसगडमध्ये ६८ वरुन ३३ वर येताना दिसत आहे . ही आकडेवारी काँग्रेसलाही उमेद देणारी नाही , हे निश्चित . पराभवातून सावरण्यासाठी काँग्रेसला परखड आत्मपरीक्षण करावं लागणार आहे हाच यांचा एक अर्थ आहे . राहुल गांधी यांच्या पदयात्रेला मिळालेल्या प्रतिसादाचं पाठिंब्यात रुपांतर करवून घ्यायचं असेल तर वर्षानुवर्षे पद अडवून बसलेल्या ढुढ्ढाचार्यांना बाजूला सारुन नव्या चेहेऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे आणि ‘बलाढ्य’ भाजप आणि नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासही तळागाळापासून संघटित व्हावं लागणार आहे हा चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाचा दुसरा एक अर्थ आहे .

या चार राज्यातील निवडणुकीत ‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’ हा सामना होता असं वरवरच म्हणता येईल .  ही लढत खरं  तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी अशीच होती कारण या चारही राज्यात एनडीए आणि इंडिया या दोन्ही राजकीय आघाड्यातील पक्षांचं स्थान लिंबू-टिंबू असंच होतं . त्यामुळे या उपांत्य लढतीचे सामनावीर नरेंद्र मोदी हेच आहेत आणि या यशाने केवळ त्यांच्यासह संपूर्ण भारतीय जनता पक्ष उन्मादित झाला तर आश्चर्य वाटायला नको . एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पराभूत झाल्यावरही जो पाठिंबा कप्तान रोहित शर्मा आणि भारतीय संघाला मिळाला तसं , कांही इथे राहुल गांधी यांच्याबाबत घडताना दिसलेलं आहे असं म्हणता येणारच नाही .

 शेवटी-बेडकांची उपमा देण्याचा मोह आवरुन सांगतो , तेलंगणात टीआरएस चंद्रशेखर आणि त्यांच्या बीआरएस या पक्षाला मतदारांनी चांगलीच चपराक लगावली आहे . चंद्रशेखर यांचा स्वकर्तृत्वाचा त्यांनीच  प्रमाणाबाहेर फुगवलेला फुगा मतदारांनी टचकन फोडला आहे .

प्रवीण बर्दापूरकर 

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट