आणखी किती आसारामबापू…

पत्रकारितेच्या निमित्तानं झालेल्या दिल्लीच्या वास्तव्यात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा अस्त तर भाजपात लालकृष्ण अडवाणी युगाचा अस्त आणि नरेंद्र मोदी युगाचा उदय यासह अनेक राजकीय घडामोडी आणि काही खळबळजनक घटनाही अनुभवाच्या पोतडीत जमा झाल्या . खळबळजनक घटनांत ‘तहलका’च्या तरुण तेजपाल आणि स्वयंघोषित भोंदू अध्यात्मिक गुरु आसारामबापू यांना लैंगिक शोषणाबद्दल झालेल्या अटकांचा समावेश आहे . तरुण तेजपालच्या अटकेनंतर ‘और कितने तेजपाल…’ अशी चर्चा जोरात रंगली ; त्याबद्दल माहिती घेतल्यावर दिल्लीतील मुद्रित , प्रकाश वृत्त वाहिन्या आणि डिजिटल पत्रकारितेचं जे उघडं-नागडं रुप पाहता तसंच त्याबद्दल जे काही ऐकता आलं त्यामुळे लाज वाटली . त्याच काळात देशातील प्रमुख भ्रष्ट पत्रकार आणि माध्यम समूह यांची एक यादी एका वेबसाईटवर प्रकाशित झाल्यावर तर माध्यमांचा बाजारबसावेपणा बघून भयकंपितही झालो…
आसारामबापू यांच्याबद्दल अनेक बाबी कानावर पडत होत्या आणि त्यात आश्चर्य वाटावं असं त्यात काहीच नव्हतं . कुणी तरी ठोस तक्रार केली की त्याच्या अशा मुसक्या बांधल्या जातील की तो सुटू शकणार नाही असं अनेक बडे पोलीस अधिकारी खाजगीत बोलत असत . आजन्म सक्तमजुरीची शिक्षा झाल्यापासून समाज माध्यमांवर आसारामबापू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील जवळीकीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे पण , आपण हे विसरता कामा नये की , ‘जेन्युईन’ अध्यात्मिक गुरु किंवा ‘आसारामी’ वृत्तीचे बुवा/बाबा आणि राजकारणी यांचे निकटचे संबंध भारतीयच काय जागतिक राजकारणालाही काही नवीन नाहीत . गुरु आणि बुवा/बाबा मुळत: हाडां-मांसाचे माणूस असल्यानं त्यांच्यापैकी काही चांगले तर काही भ्रष्ट आणि काही तर चक्क बदफैलीही होते…आहेतही . इंदिरा गांधी , नरसिंहराव , चंद्रशेखर , अटलबिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवानी , शंकरराव चव्हाण , विलासराव देशमुख , शिवराज पाटील चाकूरकर , कपिल सिब्बल , कमलनाथ , मनोहर जोशी , गोपीनाथ मुंडे , उद्धव ठाकरे , राज ठाकरे यांचीही नावं कोणत्या ना कोणत्या कथित गुरु किंवा बाबाशी जोडली गेलेली आहेत ; विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शपथविधी समारंभाच्या वेळी अशा वादग्रस्त बाबांची जत्राच भरवली होती की ! ( आवर्जून गौरवास्पद उल्लेख करायचा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपले शरद पवार आणि राजीव गांधी यांची नावं या संदर्भात कधीच चर्चेत आलेली नाहीयेत ! ) गंभीर बाब म्हणजे असे सर्व धर्मीय बुवा म्हणा की धर्मप्रसारक की नीतीमत्तेचे ठेकेदार आणि सर्व पक्षीय बहुसंख्य राजकारणी यांची सत्ता प्राप्तीसाठी अभद्र युती झालेली आहे . या गुरु आणि बुवा/बाबांचा वापर राजकारणी करतात आणि हे भोंदू बाबा/बापू त्यांचे भ्रष्ट व्यवहार आणि लैंगिक शोषणाचे व्यवहार लपवण्यासाठी ढाल म्हणून राजकारण्यांचा वापर करतात . एक नि:संशय खरं , बुवाबाजी वाढवण्यात बहुसंख्य राजकारण्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे ; बुवाबाजीला सरकार दरबारी मान्यता मिळवून देण्याबद्दल आपल्या देशात सर्वपक्षीय ‘राष्ट्रीय एकमत’ आहे आणि त्याला भारतीय जनतेचाही भक्कम पाठिंबा आहे . या दुष्टचक्रापासून आपण सावध असलं पाहिजे , हाही इशारा या आसारामबापूला शिक्षेतून पुन्हा एकदा मिळाला आहे .

गेल्या चार दशकांच्या पत्रकारितेत राजकारण्यांशी जवळीक ठेवणारे धीरेंद्र ब्रम्हचारी , भोंडशी बाबा , चंद्रास्वामी , सत्य साईबाबा , रामपाल , स्वामी नित्यानंद , गुरमित रामरहीम , आसारामबापू , भैय्यू महाराज , श्री श्री रविशंकर अशी किती तरी नावं आठवतात . यापैकी चंद्रास्वामी , रामपाल , गुरमित राम रहीम , नित्यानंद अशा काही बाबांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गजाआड व्हावं लागलेलं आहे ; चंद्रास्वामी यांच्यावर तर हवाला , शस्त्रास्त्र दलाली आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा कट असेही आरोप लागलेले आहेत . या बाबा लोकांच्या या कुकृत्यांना राजकारणातील नेत्यांची मान्यता होती किंवा आहे किंवा त्या राजकारण्यांच्या सांगण्यावरुन ही कृत्ये त्यांनी केली , असं समजणं हा मात्र शुद्ध दुधखुळेपणा आहे . हे भोंदू बुवा/बाबा आणि सर्वपक्षीय राजकारणी ते बहुसंख्य जनता हे श्रध्दा , अंधश्रद्धा , भाबडेपणा , मानसिक कमकुवतपणा , अस्मिता असे अनेक पैलू असलेलंही एक दुष्टचक्र आहे . म्हणूनच आसारामबापू तो सिर्फ झांकी है…
आपल्या देशात सर्वधर्मीय संत आणि ऋषींची मोठी उज्ज्वल अशी परंपरा आहे . धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची कामगिरी संत आणि ऋषींनी समर्थपणे पार पाडली आहे . सामाजिक सुधारणांसाठी धर्माचं जे काही विपरीत स्वरूप समोर मांडलं गेलं त्यावर तसंच समाजातील अन्यायपूर्ण चालीरीती , परंपरा यावर काही संतांनी कठोर आघात केलेले आहेत . काही संतांनी सदवर्तनाचे धडे दिले तर तुकडोजी महाराज , गाडगे महाराज यासारख्या संतांनी सामाजिक सुधारणासाठी आयुष्य झोकून दिलं . मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की , कोणत्याची मूळ धर्मग्रंथात अन्य कोणत्याही धर्माचा अनादर किंवा द्वेष करण्यास सांगितलेलं नाही . मात्र स्वार्थप्रेरित बुवा/बाबा , धर्म प्रसारक , प्रचारक तसंच कथित विश्लेषकांनी आणि धर्माच्या नावावर सत्ता राबवणा-या शासकांनी समाजाची कायम अशी दिशाभूल करत करत समाजाला धार्मिक नशेच्या अंमलाखाली ठेवलेलं . ( आता राहुल गांधी यांनीही ‘टेंपल रन’ सुरु केलीये ! ) . दुसरं म्हणजे , धनसंचय आणि कामवासना वर्ज्य करून सद्वर्तनाने समाजासमोर आदर्श उभा करावा असं सात्विक वर्तन ऋषी आणि संतानी ठेवलं पाहिजे असेच धार्मिक परंपरेत सांगितलं गेलेलं आहे . प्रत्यक्षात समाजाला धार्मिक संमोहनात ठेवत आसारामबापूसारख्या तथाकथित बुवा/बाबा/संतांनी अमाप धनसंचय करून लैंगिक स्वैराचार माजवला . मद्यविक्रेता ते संत असा जीवनप्रवास असलेले आसारामबापू स्वत:ला संत म्हणवून घेतात आणि त्यांचं ही म्हणणं बहुसंख्य समाज निमुटपणे स्वीकारतात हे संमोहनच आहे .

विविध ‘लीलां’नी वादग्रस्त ठरलेल्या आसारामबापूना अखेर आता कायम कारागृहाची हवा खावी लागणार आहे , हे स्पष्टच आहे . आसारामबापूचा हा प्रवास अपेक्षितच होता ! लैंगिक शोषण ते वाममार्गानं केलेला धनसंचय असा आसारामबापू यांच्या ‘लीलां’चा व्यापक घृणास्पद पट असून या देशातला कायदा आपलं काहीही बिघडवू शकत नाही या आसारामबापूंच्या उद्दामपणाची त्याला जोड होती . उजेडात आलेल्या माहितीनुसार आसारामबापूची देशात ( अजूनही बिनधास्तपणे सुरु असलेली ) २६ गुरुकुलं असून आसारामबापू यांना अटक झाली त्याआधीच्या पाच वर्षात त्यातील २० मुलींनी आत्महत्या केल्या आणि ९८६ मुलींनी गुरुकुल सोडून परत घर गाठलेलं आहे . या सर्व मुली इयत्ता १० वी ते १२वीच्या म्हणजे , ज्या मुलीच्या बलात्काराच्या तक्रारीवरून आसारामबापूंना अटक झाली त्या मुलीच्या वयोगटातील होत्या हे लक्षात घेता ; त्या मुली घरी का परत गेल्या आणि त्या मुलींनी आत्महत्या का केल्या असाव्यात याची कारणे स्पष्ट आहेत . या खटल्याच्या सुनावणीत आसारामबापूचा एकेकाळचा सहकारी आणि फिर्यादी पक्षाचा राहुल सचर या साक्षीदारानं दिलेल्या साक्षीतून त्याला दुजोराच मिळतो आहे ; म्हणून आता त्या सर्व प्रकरणांची तड पोलिसांनी लावली पाहिजे .

एका अंदाजानुसार किमान सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा धनसंचय असणारे ७९ वर्षीय आसारामबापू कारागृहात गेल्याने आणखी काही प्रश्न निर्माण झाले आहेत . ज्या मुलीच्या तक्रारीवरून आसारामबापू तुरुंगात गेले तिचे व्यापारी असलेले वडील आसारामबापूचे शिष्य होते . शिष्यकन्येसोबत अभद्र व्यवहार झाल्याने गुरु-शिष्य परंपरा कलंकित झाली आहे . असे आरोप लागले तेव्हा ‘विश्वास बसला नाही इतका माझा गुरुवर अढळ विश्वास होता’, असं या पित्यानं म्हटलेलं असल्याच्या बातम्या वाचनात आलेल्या होत्या ; म्हणजे , गुरुनं शिष्याचा विश्वासघातही केलेला आहे ; गुरु-शिष्य परंपरेला काळीमा फासला आहे .
देशातील महिला या अशा संत/बुवा/बाबांपासून जास्त असुरक्षित आहेत हे आसारामबापूमुळे पुन्हा एकदा समोर आलेलं वास्तव अतिदाहक आहे . श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील अदृश्य सीमारेषा ओलांडून अंधश्रद्धेच्या आहारी जाणा-यांनी हे दाहक वास्तव विसरता कामा नयेच . सर्वच जाती-धर्माच्या सत्संग कार्यक्रमात महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्याबद्दल नेहेमीच संवेदनशील माणसाच्या मनात शंकेची पाल चूकचुकत असते . देशातल्या अनेक धार्मिकस्थळी , मठ-आश्रम-दर्गे-चर्चेस या ठिकाणी झालेल्या आणि होत असलेल्या स्त्रीदेहाच्या शोषणाबद्दल वारंवार क्षीण का होईना आवाज उठलेला आहे हे विसरले जाऊ नये ; म्हणूनच अशा आवाजांना भक्कम बळ दिले जायला हवे शिवाय अशा ठिकाणी जाणाऱ्या महिलांवर सुरक्षा यंत्रणांनी पाळत ठेऊन भोंदू बुवा/बाबांचा छडा लावून त्यांना जेरबंद केलं पाहिजे .
बहुसंख्य लोकांच्या मनामनात वसलेले दुर्वर्तनी आसारामबापूसारखे लोक केवळ बलात्कारी नाही तर सामाजिक आणि धार्मिक या दोन्ही पातळीवरही द्रोही आहेत म्हणून त्यांचं कुकृत्य अक्षम्य आहे . सीमेपलीकडच्या शत्रूपेक्षा देशातील या अशा सैतानी वृत्तीपासून आपल्या समाजाला वाचवणं जास्त गरजेचं आहे , हा आसारामबापूला न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षेतून मिळालेला स्पष्ट इशारा आहे . हा इशारा लक्षात घेतला गेला नाही तर भविष्यात कधी ना कधी गल्लोगल्ली अशा बुवा/बाबांचं पीक दिसेल आणि ‘और कितने तेजपालच्या’ धर्तीवर ‘हे राम , आणखी किती आसाराम…’ म्हणण्याची वेळ भारतीय समाजावर येणार आहे !
( छायाचित्रे ‘गुगल’च्या सहकार्याने )

====​

‘डायरी’ , नोंदी डायरीनंतरच्या’ , ‘दिवस असे की…’ , ‘आई’ , ‘क्लोज-अप’ , ‘ग्रेस नावाचं गारुड’ , ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-

http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515 आणि ‘भाष्य’ ई-बुक्ससाठी dailyhunt शी संपर्क साधावा .

====

संबंधित पोस्ट